वेलेंटाईन डे स्पेशल (भाग-२)
नागपूर,ता.८ फेब्रुवरी २०२६: ‘माशुक की एक सिफत उस का फरेबी होना भी है । वो हर मआमले में धोखे-बाज साबित होता है । वस्ल का वादा करता है लेकिन..कभी वफा नही करता है ।’या शायरी सारखंच जगणं कमालीचं सौंदर्य असणारी व भावपूर्ण अभिनय करणा-या चित्रपटसृष्टितील दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांच्या नशीबात आलं.बालपणापासून भोगलेले दु:खं, प्रेमात मिळालेला धोका, आणि जगाच्या स्वार्थी व्यवहाराने मीना कुमारी या महान अभिनेत्रीचं आयुष्यं ‘ट्रेजेडी क्विन’मध्ये परिवर्तित केलं.
महजबीन बानो म्हणजे मीना कुमारीचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबईत झाला. वडील मास्टर अली बख्श हे पारसी रंगमंच कलाकार होते,तर आई इक्बाल बेगम या नृत्यांगना होत्या.त्या अली बख्स यांच्या दुस-या पत्नी होत्या.त्यांचे मूळ नाव प्रभावती देवी होतं.लग्नासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.त्या देखील रंगभूमीवर काम करायच्या.हीच प्रतिभा मीना यांच्या अंगी रक्तातून भिनली.कुटूंबाच्या अतिशय हलाकीच्या आर्थिक स्थितीमुळे वयाच्या ४-५ वर्षापासूनच मीना कुमारी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरवात केली.त्या ’बेबी मीना’नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.मीना जन्माला आली तेव्हा अली बक्षकडे डॉक्टरांच्या फीसाठी देखील पैसे नव्हते.
मीना यांना मोठी बहीण होती,त्यामुळे मीनाचा जन्म झाल्यावर त्यांच्या वडीलांना आनंद नव्हे तर फार दु:खं झालं.त्यांना मुलगा हवा होता.या रागातून त्यांनी मीना यांना एका अनाथ आश्रमात बाहेरच सोडून दिले.त्या लहानशा जीवाला असंख्य मुंग्यांनी चावा घेतला होता…!इथूनच मीना यांच्या जीवनात नशीबाने काय वाढून ठेवले आहे,याचा अदमास मिळतो.आई-वडील जिवंत असताना मीना यांना काही वर्ष अनाथआश्रमात काढावी लागली.काही वर्षाने वडीलांचा ‘विचार’(मन नाही)बदलल्यामुळे ते मीनाला घरी घेऊन आले.
मीना यांना अभिनयाची आवड नव्हती,सिनेमात अभिनय करायचा,याच त्यांनी विचारही केला नव्हता मात्र,कुटूंबाला हातभार लावण्यासाठी बाल कलाकार म्हणून वयाच्या ४-५ व्या वर्षीच ती कॅमरा फेस करु लागली.परिणामी,शाळेच्या अभ्यासपासून तिचं नातं तुटत गेलं.दिग्दर्शक विजय भट यांनी मीना यांना ‘लेदर फेस’सिनेमासाठी कास्ट केलं.या सिनेमासाठी पहील्याच दिवशी २५ रुपये इतकं मानधन दिल्या गेलं.‘लेदरफेस’सिनेमा १९३९ साली प्रदर्शित झाला त्यावेळी मीनाचे वय अवघे चार वर्ष होते.विजय भट यांच्यासोबत मीना यांनी ‘अधूरी कहानी’,‘पूजा‘ आणि ’एक ही भूल’या चित्रपटांमध्येही काम केलं.मात्र,त्यांच्या आईचं निधन झालं व मीनावर दु:खाचा डोंगर कोसळला.त्यावेळी मीना फक्त १४ वर्षांची होती.मीनाचं चित्रपटातील काम मात्र थांबलं नाही.’दूनिया एक सराय’,’पिया घर आजा’,’बिछडे बालम’ या चित्रपटात तिने काम केलं.या चित्रपटांमध्ये अभिनयासोबत मीनाने गाण्यांनाही आवाज दिला आहे.
मीना यांना खरी ओळख विजय भट यांच्याच ‘बैजू बावरा’चित्रपटातून मिळाली.या चित्रपटाने मीना कुमारीला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवले.१९५२ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईत एकाच थिएटरमध्ये शंभर आठवडे चालून एक रेकॉर्ड नोंदवला.याच वर्षी सुरु झालेल्या फिल्म फेअरच्या पहील्याच पुरस्कारावर मीना कुमारीचे नाव नोंदवले गेले.सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून ‘परिणिता’साठी देखील मीना कुमारीला दुस-याच वर्षी पुन्हा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.सर्वोकृष्ट अभिनेत्रीचे लागोपाठ १२ पुरस्कार पटकावणारी मीना ही पहीली अभिनेत्री.‘पाकिजा‘या चित्रपटातील तिची भूमिका अजरामर झाली आहे.
दिलीप कुमार,राज कुमार या सारखे स्टार तिच्यासोबत अभिनय करताना आपले डायलॉग विसरत असत.मीना कुमारी कमालीची सुंदर होती.अनेक कलाकार तिच्या सौंदर्यावर मोहित होते मात्र,इतक्या सौंदर्याने .बहरलेल्या देहाला, मनाच्या सुखासाठी कायम तहानलेलं राहवं लागलं…!
पुढे,आयुष्याच्या प्रवासात नामवंत दिग्दर्शक कमाल अमरोहीवर मीना कुमारी भाळली.तिला कमालमध्ये नि:स्वार्थ प्रेमभावना दिसली.ती कमालवर इतकी भाळली की कमाल तिच्यापेक्षा १६ वर्षांनी मोठे आहेत,त्यांना आधीच दोन पत्नी असून तीन अपत्ये आहेत,जीवनातील या वास्तवाकडे देखील मीना यांनी आंधळ्या प्रेमातून दूर्लक्ष केले.त्यांची प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हती.कमाल यांनी मीनाला पहील्यांदा पाहिले तेव्हा ती फक्त ५ वर्षाची होती.कमाल त्यांच्या एका चित्रपटासाठी त्यांना भेटायला गेले होते मात्र,त्यावेळी गोष्टी जुळून आल्या नाही.१४ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांनी मीना यांची कमाल यांच्याशी पुन्हा ओळख करुन दिली.
कमाल यांनी मीनाला ‘अनारकली’ची ऑफर दिली होती.त्याच काळात मीनाचा अपघात झाला.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.कमाल रोज मीनाला रुग्णालयात भेटायला जात होते.जेव्हा भेटण्यास मनाई केली जायची,तेव्हा दोघेही एकमेकांना पत्र लिहायचे.सुमारे ४ महिन्यांच्या नात्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले व ज्या दिवशी संपूर्ण जग ‘प्रेम दिवस’साजरा करतो,त्याच १४ फेब्रवरी १९५२ रोजी दोघांनी गुपचूप लग्न केले.यावेळी मीना अवघ्या १८ वर्षांच्या होत्या तर कमाल ३४ वर्षाचे होते.‘चलते चलते यू ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते…!’
लग्नानंतरही मीना या गुपचूप वडीलांकडे राहत होती.मात्र,या लग्नाची बातमी घरी कळताच एकच गोंधळ उडाला.वडील अली बक्ष यांनी तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकला.निर्बंध वाढवले.त्याच वेळी कमाल यांनी मीनाला त्यांचा ‘दायरा’हा चित्रपट ऑफर केला,पण वडीलांनी त्यात काम करण्यास मीनाला परवानगी दिली नाही.मीना ‘दायरा’मध्ये काम करणार असेल तर तिच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद होती,असे वडीलांनी ठणकावले.
त्याचवेळी मीना मेहबूब खान यांच्या ‘अमर‘चित्रपटाची शुटिंग करीत होती.चित्रपटाचे ४ दिवस शुटिंग केल्यानंतर मीनाने मेहबूब खानसोबतचा करार रद्द केला आणि थेट बॉम्बे टॉकिजमध्ये पोहोचल्या,जिथे ‘दायरा’चे शूटिंग सुरु होते.मीना यांनी ‘दायरा’ची शूटिंग सुरु केली,ही बातमी वडिलांपर्यंत पोहोचली.मध्यरात्री शूटिंग संपवून मीना घरी पाेहोचली तेव्हा वडीलांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला.मीना यांनी कार वळवली आणि थेट पती कमाल अमरोही यांच्या घरी पोहोचल्या.
वडीलांचे घर सुटल्याने ती कमालच्या अश्या घरी गेली ज्या घरात कमाल यांची पहीली पत्नी व तीन अपत्ये रहात होती.या घरात मीना कुमारीला भेटायला व चित्रपट साईन करुन घेण्यासाठी निर्मात्यांची कायम रिघ असायची.अनेक मोठे निर्माते येत होते.पुरुषी अहंकारातून कमाल अमरोहीने मीनावर अनेक बंधणे लादण्यास सुरवात केली.यात तीन अटी मुख्य होत्या.सायंकाळी ६ नंतर शुटींग करायची नाही,मेकअप रुममध्ये मेकअप मॅनशिवाय एक ही पुरुष बसणार नाही,तिसरी अट होती मीना कुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील.ती कारच त्यांना घरुन स्टूडिओत घेऊन जाईल व घरी परत आणेल.
सहकलाकारांच्या कारमध्ये बसायचं नाही,त्यांच्याकडून लिफ्ट घ्यायची नाही,मी ज्याच्यासोबत सांगेन त्याच्यासोबत अभिनय करायचा नाही, अंगप्रदर्शन होईल असे कपडे वापरायचे नाही फक्त साडीत राहायचे.अश्या अनेक अटी तिच्यावर पती म्हणून या ‘प्रियकराने’लादल्या होत्या. इतकंच नव्हे तर मीना कुमारीवर लक्ष ठेवण्यासाठी कमाल अमरोहीने एक माणूस देखील नेमला होता.अगदी लहानपणापसून दू:खाने पोळलेल्या मीनाने सुखी.आनंदी संसाराचे स्वप्न बघणा-या भावूक मनाच्या मीना कुमारीने ज्या पुरुषासोबत लग्न करण्याचे धाडस केले होते,त्याच पुरुषाची इतकी भीती तिच्या मनात बसली होती की एक दिवस,‘साहिब,बीबी और गुलाम’च्या चित्रीकरणात वेळ झाला म्हणून तिने रडत चित्रिकरण पूर्ण केले..!दूनिया करे सवाल करे तो हम क्या जबाब दे…!’
‘साहिब,बीबी और गुलाम’चित्रपटाला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले,पण कमाल यांनी मीनासोबत येण्यास नकार दिल्याने मीना देखील तिथे जाऊ शकली नाही.सोहराब मोदी यांनी मीना व कमाल या दोघांनाही ‘इरोज‘सिनेमागृहात एका प्रिमिअरसाठी आमंत्रित केले.सोहराब यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना मीना कुमारीचा परिचय करुन दिला.’या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आहेत आणि हे कमाल अमरोही त्यांचे पती आहेत,असा परिचय त्यांनी करुन दिला.दोघे एकमेकांना नमस्कार करण्या पूर्वीच कमाल म्हणाले,‘नाही,मी कमाल अमरोही आहे आणि ही माझी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आहे’एवढे बोलून ते सिनेमागृहाच्या बाहेर निघून गेले आणि मीना कुमारी यांना सर्वांसमोर खजिल होऊन एकट्याने चित्रपट पहावा लागला…!अजीब दास्ताँ है ये..कहाँ शुरु कहाँ खतम..!’
बघता बघता वैवाहिक आयुष्यात मतभेदाचे रुपांतर मीना कुमारीला शारिरीक मारहाणीत झाले. बंद खोलीत तिला मारहाण केली जात होती.नर्गिस दत्त यांनी स्वत: मीनाच्या खोलीतून मारहाणीचे आवाज ऐकले.‘मै चूप रहूंगी‘या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नर्गिस यांनी मीना कुमारीसोबत रुम शेअर केली होती.मीनाच्या मृत्यूनंतर एका उर्दू मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नर्गिस म्हणाल्या होत्या की,मी तिला झालेल्या मारहाणीचे आवाज स्वत: ऐकले होते.दुस-या दिवशी मीनाला भेटले तेव्हा तिचे डोळे सुजले होते…!‘मोहे भूल गये सावंरिया….!‘
मीना एक लोकप्रिय कलाकार असून देखील खूप बंधनात व तनावात जगत होती.मीना अनेक र्निबंधात जगत होती.मीना यांनी एकदा गीतकार गुलजार यांना त्यांच्या मेकअप रुमध्ये येण्याची परवानगी दिली.हे पाहून कमाल याने मीनावर पाळत ठेवण्यासाइी ठेवलेल्या असिस्टंट बकर अलीने मीना यांना गुलजार समोरच जोरदार थापड मारली.मीनासाठी हा खोलवर रुतणारा अपमान होता,मीनाने बकर अलीची तक्रार कमालकडे केली मात्र,कमालने मीनाच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही.आपल्या नव-याने नेमलेला गडी माणूस देखील आपल्यावर हात उचलतो,हे तिच्या मनासाठी फार वेदनादायी ठरले.तिने नव-याला जाब देखील विचारला मात्र,अमरोही यांनी काहीच उत्तर दिले नाही.त्यांच्या नात्यात दूरावा निर्माण झाला.मीना कुमारी तिच्या जिवनात सगळी नाती असतानासुद्धा ‘एकटी’पडली.या परिस्थतीत धर्मेंद्रचा तिला भावनिक आधार मिळाला होता.
मीना कुमारी यांची अवस्था बघून नर्गिस यांना खूप दु:खं झालं होतं.‘पाकिजा‘चित्रपट पूर्ण करण्यासाठी अमरोहीने अनेक खोटे बहाणे करुन या चित्रपटात आपला अडकलेला पैसा काढण्यासाठी हा चित्रपट १६ वर्षांनंतर पूर्ण करायचं ठरवलं होतं.यासाठी त्याने मीना कुमारी यांची घनिष्ठ मैत्री असलेले सुनील दत्त,नर्गिस दत्त यांची मदत घेतली.या चित्रपटात,चित्रपटाशी संबंधित अनेक गरजू कामगारांचे भविष्य अडकले असल्याचे नर्गिस यांनी सांगितले.मीना यांचा स्वभाव मूळात खूप हळवा आणि दयाळू असल्याने त्यांनी हा चित्रपट त्या कामगारांसाठी पूर्ण करण्याचे व पुन्हा शुटिंग सुरु करण्याचे मान्य केले.मात्र, कमाल अमरोहीने आधी तिला घटस्फोट द्यावा ही अट मीनाने ठेवली.स्वार्थी व संधीसाधू कमालने ही अट मान्य केली व मीनाला घटस्फोट दिला.
‘पाकीजा‘चित्रित होताना मीनाची तब्येत इतकी जास्त बिघडली होती तरी देखील कमाल हे अनेक तास चित्रिकरण करीत होते.अनेक वेळा मीना कुमारी शुटिंग करताना खाली कोसळल्या व रक्तबंबाळही झाल्या.नर्गिस यांना त्यांच्या निर्णयाचा खूप पश्चाताप झाला.मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस यांनी मीनाच्या आयुष्याविषयी एका उर्दू दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ‘मीना तुला मृत्यूच्या शुभेच्छा,आता पुन्हा या जगात पाऊल ठेवू नकोस’.असे म्हटले होते…!‘दिल जो ना कह सका वो ही राजे दिल कहने की…!‘
मीना कुमारीला कधीही चित्रीकरणाच्या वेळी डोळ्या अश्रू आणण्यासाठी ग्लिसरीनची गरीज भासली नाही.मीना यांना स्वत:चे लग्न वाचवण्याची आशा देखील होती.मात्र,मीना यांच्या मृत्यूनंतर कमाल म्हणाले होते की,मीना एक चांगली अभिनेत्री होती,पण ती चांगली पत्नी नाही,कारण ती स्वत:ला घरातही अभिनेत्री समजत असे…!
लहानपणापसून प्रेमासाठी आसुसलेल्या मीनाने वयाने इतक्या मोठ्या पुरुषामध्ये जीवनाचा आणि जगण्याचा ‘आधार’ शोधला होता.मात्र,प्रेमाच्या नात्यात तिला ‘धोका’मिळाला.कालांतराने या दोघांमध्येही मतभेद निर्माण झाले.१९६४ मध्ये मीना कुमारी कमालपासून वेगळी झाली.पतीपासून विभक्त होताच मीना यांनी स्वत:ला दारुच्या नशेत अखंड बूडवून घेतले.त्यांना झोप येत नसल्याने डॉ.सईद तिमुर्जना यांनी त्यांना थोडीशी ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला होता.दारुच्या अतीसेवनामुळे त्यांना लिव्हर सिरोसीस झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मीना यांच्या भावूक ह्दयावर धोक्याचा दूसरा घाव घालणारा अभिनेता हा धर्मेंद्र होता.
त्याकाळी मीना यशाच्या सर्वोच्च शिखरावर होती तर गांव देहातमधून आलेला धर्मेद्र हा आपल्या करिअरच्या पहिल्या टप्प्यावर गंटागळ्या खात होता..मुंबईत धर्मेंद्र एका गॅरेजमध्ये रहात होता व सह अभिनेता म्हणून काम करीत होता.मूळात खूप दयाळू स्वभावाच्या मीनाला हे कळल्यानंतर तिने धर्मेंद्रला आधाराचा हात दिला.धर्मेंदला हिरो घेण्यासाठी मीनाने अनेक निर्मात्यांकडे शब्द टाकला.धर्मेंद्रला मोठे करण्यासाठी मीना यांनी कुठलीही कसर सोडली नाही.

धर्मेंद-मीना कुमारीच्या‘फूल और कांटे‘च्या यशानंतर धर्मेंदने मीनाकुमारी पासून अंतर राखण्यास सुरवात केली.मीना कुमारी पुन्हा आपल्या आयुष्यात ‘एकटी‘झाली.प्रेमात मिळालेला हा ‘दूसरा’धोका मीना कुमारीचं खूप संवेदनशील मन सहन करु शकलं नाही.धर्मेंद्रने एकदा सर्वांसमोर मीना कुमारी यांच्या कानशिलात मारल्याचा किस्साही त्याकाळी खूप गाजला.आयुष्याचा जोडीदार म्हणून कमाल अमरोहीने धोका दिला होता,तर धर्मेंदने धोक्यासोबतच ‘विश्वासघात’केला.चित्रपटसृष्टित यशाच्या पाय-या चढण्यासाठी धर्मेंद्रने मीना कुमारीचा सिढीसारखा वापर केला होता.तिच्या भावनांशी,तिच्या विश्वासाशी खेळ केला होता.धर्मेंद्रने सर्वांसमोर केलेला अपमान तिच्या खूप काेमल मनाला सहज सहन हाेणे शक्य नव्हते.परिणामी,अति दारुच्या व्यसनाने तिला लीवर सोरायसीस नावाचा रोग दिला.
काेणावर कितीही नि:स्वार्थ प्रेम केलं तरी प्रेम…भीकेमध्ये मिळत नसतं,‘भावना’ संपल्या की नातं ही डोईजड होतं,हे कमाल अमरोहीसोबतच्या नात्यात स्वत: मीना यांनी अनुभवलं होतं तर धर्मेद्र सोबतच्या नात्यात तिच्या वाट्याला आलं होतं…!
‘पाकीजा‘प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर मीना कुमारी गंभीर आजारी पडली.२८ मार्च १९७२ रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.दूस-या दिवशी मीना कुमारींच्या तोंडून अखेरचे कमाल अमरोहीचे नाव बाहेर पडले.यानंतर ती कोमात गेली.नशीबाची ही थट्टाच होती ३१ मार्च १९७२ रोजी तिचे निधन झाले मात्र,१ एप्रिल रोजी जेव्हा तिच्या निधनाची बातमी जगभर कळली तेव्हा लोकांना हे सुरवातीला ‘एप्रिल फूल’असल्याचे वाटले.आयुष्यासारखंच तिच्या मृत्यूलाही जग गांर्भीयाने घेण्यास तयार नव्हतं…! अवघ्या ३९ व्या वर्षी मीना कुमारी हे स्वार्थीजग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली…!
३० वर्षांच्या कारर्कीदीत त्यांनी ९० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. जगण्यातल्या
दु:खाने त्यांना कसदार अभिनेत्री तर केलेच मात्र,आयुष्यातल्या दु:खांनी त्यांच्या लेखणीला ही दमदार शब्द दिलेत.‘नाझ‘या टोपण नावाने त्यांनी अनेक शायरी व कविता लिहल्या आहेत.गुलजार व मीना कुमारीची याच शायरीच्या संदर्भात एकांतात भेट होत असे.
मीना कुमारीचे धर्मेंद्रवरील प्रेम हे खरे होते मात्र,धर्मेंद्रसाठी मीना कुमारीचे र्निव्याज प्रेम ही केवळ ‘संधी ’होती.धर्मेंद हे देखील विवाहीत होते यामुळे धर्मेंदने मीना कुमारीसोबतच्या नात्यातून माघार घेतली.ड्रीम गर्ल हेमा मालिनीला जे पुढे जाऊन विवाहित व चार अपत्यांचा पिता धर्मेंद्र सोबत लग्न करुन साधता आलं ते मीना कुमार यांना कधीच जमलं नाही.एक मात्र खरं,धर्मेंद्र व मीना कुमारी यांनी ताहयात कधीही आपल्या नात्याविषयी वाच्यता केली नाही…!
प्रेमाच्या या दोन्ही नात्यांनी हळव्या मनाच्या मीना कुमारीला अतोनात दु:खं दिलं.या दु:खातूनही मीना कुमारीचा पडद्यावरील अभिनय हा निखरत गेला.मीना कुमारी प्रसिद्धीच्या यशाचे मजले पादक्रांत करीत असताना अमरोहीने तिला घटस्फोट दिला नाही.ती आयुष्यात एकटी होती,आनंदी जगण्यासाठी तिच्याकडे काहीही नव्हतं.एकटेपणातून आलेलं नैराश्य आणि त्यातून पळवाट शोधताना दिवस रात्र दारु पिण्याची लागलेली सवय.यातून आलेलं लीवरचं आजारपण एक दिवस तिला रुग्णालयात व त्यानंतर मृत्यू लोकात घेऊन गेला.
कमाल अमरोहीपासून पाच वर्ष वेगळे राहूनही मीना यांनी ‘पाकिजा‘चे शुटिंग पूर्ण केले.हा चित्रपट तयार व्हायला १६ वर्ष लागली होती.१९६८ मध्ये शूटिंगच्या दरम्यान मीनाला माहित होते की,त्या जास्त काळ जगू शकणार नाहीत.उपचार घेऊन लंडनहून परतल्यावर मीना यांनी पुन्हा पाचव्या दिवशी पाकीजाचे अंतिम शूटिंग पूर्ण केलं.
‘पाकीजा’चा प्रीमीअर ३ फेब्रुवरी १९७२ रोजी मराठा मंदिर थिएटरमध्ये झाला.मीना कमाल अमरोहीसोबत बसल्या.चित्रपट पाहिल्यानंतर मीनाचे शब्द होते,कमाल अनुभवी चित्रपट निर्माता आहेत हे मी मान्य केलं’.दूस-या दिवशी ‘पाकिजा‘रिलिज झाला मात्र,समीक्षकांनी देखील चित्रपटावर टिकात्मक लेख लिहल्याने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला यश मिळाले नाही.
मृत्यू पूर्वी,मीना या ज्या ‘सेंट एलिजाबेथ नर्सिंग होम’मध्ये दाखल होती त्या रुग्णालयाचे बिल कमाल यांनी देण्यास नकार दिला होता.मी मीनाला तलाक दिला असल्याने मीनाचे रुग्णालयाचे बिल मी भरणार नाही,अशी अमानवी भूमिका कमाल यांनी घेतली.रुग्णालयात रुम.क्र.२६ मध्ये भर्ती असताना मोठी बहीण खुर्शीद यांना ‘आपा,आपा मला मरायचे नाही’हे त्यांचे अखेरचे शब्द होते.मोठी बहीण खुर्शीद यांनी मीनाला सहारा देताच मीना कोमामध्ये गेल्या.हे बिल नर्गिस यांनी भरले असल्याचे बोलले जाते.
‘पाकिजा‘ रिलिज होऊन तीन आठवडे झाले होते,मीनाच्या मृत्यूनंतर लोकांच्या मनात मीना विषयी सहानूभूतीची लाट उसळली,मीनाचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांनी चित्रपटगृहात उड्या मारल्या.हा चित्रपट ११९७२ चा ब्लॉक बस्टर ठरला होता.आपल्या मृत्यूनंतर देखील धोकेबाज कमालला मीना कुमारी आर्थिक फायदा पोहाचून गेली.
१९७२ मध्ये त्या सावन कुमार यांच्या ‘गोमती के किनारे’चित्रपटात सावन कुमारच्या विनंतीमुळे या चित्रपटांच दिग्दर्शन करीत होत्या.मात्र,मद्याच्या आहारी गेल्याने त्यांची प्रकृती खूप बिघडली होती.या चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाच मीना कुमारीची प्रकृती खूप बिघडली.सावन कुमार यांना चित्रपटाचं शुटिंग थांबवावं लागलं यामुळे त्यांचा खर्च खूप वाढला.त्यावेळी मीना कुमारी यांनी वांद्रे भागात असलेला त्यांचा बंगला सह अभिनेत्री मुमताज यांना विकला.सावन कुमार यांना सह अभिनेत्री मुमतात यांना चित्रपटाचे पाच लाख रुपये देणं बाकी होतं.मीना कुमारी यांनी मुमताज यांना पैसे देण्या ऐवजी बंगला दिला,असे मुमताज यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
कमाल अमरोही यांच्या ईच्छेनुसार मीना यांना रहमताबादच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले.११ फेब्रुवरी १९९३ रोजी कमाल अमरोही यांचे देखील निधन झाले.त्यांना मीना कुमारी यांच्या शेजारी दफन करण्यात आले व प्रेम,सहजीवन,धोका व विश्वासघाताचा एक करुण युग संपुष्टात आला…!‘हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक..खुदां करे की कयामत हो और तू आये…’
मागे उरले…मीना कुमारीवर चित्रित झालेले लताचे तरल स्वर..‘इन्ही लोगो ने…इन्ही लोगो ने.इन्ही लोगो ने ले लीना दुपट्टा मेरा…!
मीना कुमारीच्या अंतिम ईच्छेप्रमाणे गुलजारने त्यांच्या शेराशायरीच्या संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले.त्यातील त्यांची बेहतरीन नज्म:-
चाँद तन्हा है आसमां तन्हा
दिल मिला है कहाँ तन्हा
बुझ गई आस छूप गया तारा
थरथरता रहा धूआँ तन्हा
जिंदगी क्या इसी को कहते है
जिस्म तन्हा है और जाँ तन्हा
हम-सफर कोई गर मिले भी कहीं
दोनों चलते रहें यहाँ तन्हा
जलती-बुझती सी रौशनी के परे
सिमटा सिमटा सा इक मकाँ तन्हा
राह देखा करेंगा सदियाे तक
छोड जाऍंगे ये जहाँ तन्हा….
Advertisements

Advertisements

Advertisements
