फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपोलीस आयुक्तांचा मेडिकल व मेयो हॉस्पिटलमधील मार्डच्या संपकरी डॉक्टर्स सोबत संवाद

पोलीस आयुक्तांचा मेडिकल व मेयो हॉस्पिटलमधील मार्डच्या संपकरी डॉक्टर्स सोबत संवाद

नागपूर,ता.२२ ऑगस्ट २०२४: पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल ,नागपूर शहर यांनी आज दि .२२ ऑगस्ट रोजी सायं.६.३० वा मेडिकल व ७.१५ वा .मेयो हॉस्पिटल येथील मार्डचे डॉक्टर यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस उपायुक्त निमित गोयल परि. क्र. ३ ,सहायक पोलीस आयुक्त विनायक कोते, अजनी विभाग, अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार, मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता राज गजभिये आणि मार्डचे संपकरी विद्यार्थी डॉक्टर हे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्डच्या संपकरी डॉक्टरांना आश्‍वस्त करताना पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, आमचे  स्थानिक पोलीस अधिकारी हे नियमितपणे मेडिकल हॉस्पिटल येथे भेट देतील. विद्यार्थी डॉक्टर यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता व स्थानिक पोलीस अधिकारी यांची ओळख व्हावी याकरिता आम्ही  सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी आलो आहेत, असे त्यांनी सांगितले. सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी, सीसीटीव्ही द्वारे संशयास्पद हालचालींची नोंद घेतली जाईल. मेडिकल हॉस्पिटलचे सर्व क्षेत्रे सीसीटीव्ही द्वारे निगराणी खाली ठेवले जाईल. संशयास्पद हालचालींबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील.
मेडिकल बूथ येथील पोलीस अमलदार व एमएसएफ यांनी त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे पार करण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाईल. मेडिकल हॉस्पिटलच्या महिला वसतीगृहातील सुरक्षा मेडिकल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व प्रतिनिधींनी यांनी तपासली पाहिजे. अशा देखील सूचना पोलीस आयुक्त यांनी केल्यात. पोलीस आयुक्त यांनी विशेष करून मुलींनी सावध राहावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाची, व समाजकंटक यांची हालचालीवर लक्ष ठेवावे व सतर्क रहावे. याबाबत काही समस्या उद्भवल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी. अप्रिय घटनांची माहिती, स्थानिक मेडिकल हॉस्पिटल तसेच वसतीगृहाची जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला व पोलिसांना देखील ती त्वरित दिली पाहिजे. डॉक्टर विद्यार्थी यांना कोणतीही समस्या असेल तर आम्ही स्वतः संवाद साधण्यासाठी यापुढेही उपलब्ध आहे. तातडीने मदतीसाठी ११२ डायल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

एमएसएफ कर्मचा-यांची कार्य प्रणाली,एसओपीएस व  पुनरावलोकनासाठी बैठका मेडिकल हॉस्पिटल येथे घेण्यात याव्या. कॅम्पची सुरक्षा ऑडिट केली जावी. पार्किंग समस्यांचे निवारण करावे. फेरीवाले, हाथठेले, हॉकर्स अवैधरीत्या लावण्यात आलेली स्टॉल या सर्वांना  मनपाच्या सहकार्याने काढून घेण्यात यावे. अशा कडक सूचना पोलीस आयुक्त यांनी सर्वांना केल्यात. तसेच या सूचनांचे पालन झाले किंवा नाही यासाठी पोलीस आयुक्त यांनी ते पुन्हा दोन-चार दिवसात या परिसरात भेट देणार असल्याचे सांगितले. मेडिकल हॉस्पिटलचा  अंधारात येणाऱ्या परिसर, या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात यावी, ज्यामुळे जाण्या-येण्याकरिता महिला विद्यार्थी यांना अडचण होणार नाही. अश्‍याप्रकारच्या सूचनापोलीस आयुक्त यांनी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना केल्यात.
याच प्रकारे पोलीस आयुक्तांनी मेयो हॉस्पिटल या ठिकाणी देखील मार्डच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.याप्रसंगी सह पोलीस आयुक्त अश्वति दोरजे व पोलीस उपायुक्त निमित गोयल परि क्र ३ व तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुवा व कोतवाली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे,मेयाचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व मार्ड संपकरी विद्यार्थी हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना,पोलिस आयुक्त म्हणाले,की कलकत्ता येथील घटना ही खरोखरच दूर्देवी आहे. अशा प्रकारची घटना होऊ नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मेयो हॉस्पिटल येथे देखील सुरक्षेचे ऑडिट झाले पाहिजे. अंधारातील परिसर हा लाईट्स लावून प्रकाशित केला पाहिजे तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन केले पाहिजे. याकरिता मेयो हॉस्पिटल यांनी विशेष करून लक्ष द्यावे.
मेयो हॉस्पिटल येथील शवागृह आणि मुलींचे हॉस्टेल हे एकाच वाटेवर असल्याकारणाने या ठिकाणी भविष्यात चुकीचा प्रकार घडू नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच हॉस्पिटल व्यवस्थापनाने याबाबत पावले उचलून उपाययोजना केल्या पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असून शवागृह या ठिकाणी समाजकंटक किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, मरच्युरी रूम कडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती ,भेट देणारे, त्यांच्या बाबतीत आपण शाश्वत अशी हमी देऊ शकत नाही की सदर व्यक्ती ही कशी आहे!
 आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने सदर ठिकाणी गर्दी झाल्यास त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोखपणे तर लावत असतो परंतु तरी देखील मुलींनी या ठिकाणी मेयो हॉस्पिटलच्या या परिसरात काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस विभागातील पोलीस ‘दीदी’ सदर परिसरामध्ये भेट देतात.आपल्याला काही अडचण आल्यास आपण त्यांना तक्रार करू शकतात. तसेच ११२ हा नंबर प्रत्येक विद्यार्थी यांच्याकडे असावा जेणेकरून मार्शल हे ६  मिनिटात आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येतील.

मेयो हॉस्पिटल येथून तहसील पोलीस स्टेशन जवळच असल्याकारणाने व या परिसरात पोलीस बंदोबस्त व बीट मार्शल पेट्रोलिंग सतत सुरू असल्याने आम्ही याबाबत काळजी घेतच आहोत. परंतु घटना घडल्यानंतर त्वरित प्रतिसाद देणे व पोलिसांना कळविणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपल्याकडून पोलिसांना रिपोर्टिंग त्वरित होणं हे तितकेच महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
अश्‍याप्रकारे कोलकत्ता येथील रुग्णालयात घडलेल्या दूर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर,नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी शहरातील दोन्ही महत्वाच्या शासकीय रुग्णालयांना भेट देऊन दोन्ही रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व मार्डचे वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस आयुक्त यांनी हे देखील नमूद केले की, आपल्या परिसरात अम्ली पदार्थांचे सेवन करणारे,व्यसनाधीन कोणी असेल तर त्वरित त्याची माहिती द्या. जर येथे मद्यपान करणारा स्टाफ व इतर कोणी असेल, तर त्याची माहिती द्या. आम्ही पोलिसांमध्ये केस नोंदवू. पोलीस विभागात असे घडल्याने आम्ही केस नोंदविल्या आहे त्याचप्रमाणे,तुम्ही देखील तुमच्या विभागाबाबत तसे करू शकता.
यावेळी पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले व आपण सर्वांनी एकत्र येऊन समस्येचे निराकरण करू  असे सांगून,आम्ही तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहोत असा,  उपस्थित डॉक्टर्स विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त यांनी  विश्वास  दिला.
……………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या