
रामरक्षेच्या निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

मुख्यमंत्री फडणवीसांना हिंदुत्व शिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न; आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा!
नागपूर, दि. १६ : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी पाठविलेल्या रामरक्षा पठणाच्या निमंत्रणावर भाजपचे माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी जोरदार पलटवार केला आहे. खुले पत्र प्रसिद्ध करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली असून, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्व शिकविण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय विनोद असून, हा केविलवाणा राजकीय स्टंट आहे,” असा घणाघात केला. रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना आता ‘रामरक्षा’ आठवली, असाही टोला लगावला आहे.
जोशी यांनी पत्रात म्हटले आहे की, आयुष्यभर हिंदुत्व कृतीतून जगणाऱ्या आणि श्रीराम मंदिर उभारणीच्या लढ्यात सातत्याने ठाम भूमिका घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रामभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. हिंदुत्वावर उपदेश करण्यापूर्वी आपल्या पक्षाने सत्तेसाठी किती वेळा विचारधारा बदलली, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला.
“आमचे हिंदुत्व निवडणुकीपुरते जागे होत नाही, परिस्थितीनुसार रंगही बदलत नाही. भगवा आमच्यासाठी केवळ झेंडा नाही, तर तो विचार, संस्कार आणि जीवनपद्धती आहे. त्यामुळे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला नौटंकीची किंवा दिखाऊ कार्यक्रमांची गरज नाही,” असेही जोशी यांनी स्पष्ट केले.
रामभक्तांचा अपमान करणाऱ्या पूर्वीच्या वक्तव्यांची आठवण करून देत, “जय श्रीराम म्हणणाऱ्यांवर आक्षेपार्ह भाषा वापरणारे आज कोणत्या नैतिक अधिकाराने रामरक्षा पठणाचे निमंत्रण देत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. श्रद्धा ही प्रसिद्धीची नौटंकी नसून ती आचरणातून दिसली पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.
रामरक्षेचा अर्थ समजावून सांगण्याच्या प्रयत्नावर उपहासात्मक टीका करत, “रामाच्या सुरक्षेपेक्षा आज आपल्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाची सुरक्षा करण्याची धडपड अधिक दिसते. त्यामुळे हा उपक्रम रामभक्तीचा नसून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न वाटतो,” असा आरोपही त्यांनी केला.
यापुढे, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना रामरक्षा पठणासाठी निमंत्रण देण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला रामरक्षा स्तोत्र व्यवस्थित म्हणता येते का, याची खात्री करून घ्या,” असा टोला लगावत जोशी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखात, मनात आणि आचरणात श्रीराम आहेत. त्यामुळे त्यांना रामभक्ती शिकविण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. राजकारण जरूर करा; मात्र श्रीरामांच्या नावाचा वापर राजकीय अस्तित्व टिकविण्याचे साधन म्हणून करू नका. महाराष्ट्रातील जनता आता दिखाऊ हिंदुत्व आणि खऱ्या हिंदुत्वातील फरक ओळखते,” अशा शब्दांत संदीप जोशी यांनी आपल्या पत्राचा समारोप केला.
……………………………..

आमचे चॅनल subscribe करा