प्रमोद भागचंदानीचा पत्रकार परिषदेत आरोप

नागपूर,ता.७ ऑक्टोबर २०२६: सातत्याने मी जरीपटका भागातील अवैध धंदे करणा-यांच्या विरोधात एक जागरुक नागरिक म्हणून पोलिसात तक्रार देतो,न्यायालयात पीआयएल दाखल करतो त्यामुळे माझी अनेकांना अडचण होते,त्यांच्या अवैध धंद्यावर परिणाम होत असल्याने या शहरात माझे अनेक शत्रू निर्माण झाले आहेत,आठ महिनेच नव्हे तर आठ-आठ वर्षांपूर्वीचे मुद्दे उकरुन काढत शहरातील विविध पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावण्यात आला असून, यासाठी सिव्हिल लाईन्स येथील राणी कोठीमध्ये बाकायदा माझ्या विरोधकांची रात्री दोन वाजेपर्यंत बैठक पार पडली,असा आरोप प्रमोद भागचंदानी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दिपक बजाज हा त्याच्या वडीलांच्या काळात सरकारमान्य झालेल्या जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेचा संचालक आहे.माझी दोन्ही मुले त्याच शाळेत शिकत होती मात्र,त्याच्या अवैध धंधामुळे त्याची तक्रार मी केली व त्याला सहा वर्षे तुरुंगात जावे लागले.आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देखील तो प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २८०० रुपये जीएसटीच्या नावाखाली वसूल करतोय.३,५०० रुपये शाळेतील शिक्षकांकडून वसूल केले जातात तसेच शाळेतील इमारतीत पाचवी ते दहावी पर्यंतचे खासगी कोचिंग क्लासेस चालतात,क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्यां मागे दिपक बजाज हा ७०० रुपये वसूल करतोय.याचे सगळे पुरावे माझ्याकडे असल्याचे भागचंदानी यांनी सांगितले.सरकारमान्य अनुदानित शाळेत विद्यार्थी व शिक्षकांकडून २८०० व ३,५०० रुपये वसुली वैध आहे का?हे कोणत्या नियमात बसतं?असा सवाल त्यांनी केला.दिपक बजाजच्या विरोधात मी आवाज उठवल्याने त्या बैठकीत तो देखील सहभागी झाला होता,असा आरोप भागचंदानी यांनी केला.
राणी कोठी हा तर जरीपटकामधील काही सिंधी व्यापा-यांसाठी जुगार व वेश्या व्यवसायाचा अड्डा बनला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.हे शहर राज्याच्या मुख्यमंत्र्याचे शहर आहे मात्र तरी देखील जरीपटका सारख्या भागात सर्वाधिक अवैध धंधे व भेसळीचे प्रकार याच भागात होतात.दर रविवारी जरीपटक्यातील काही होलसेल कापड व्यापारी राणी कोठीमध्ये जुगार खेळतात व रशियन मुलींचा या ठिकाणी देह व्यापार चालतो.या प्रकाराची तक्रार मी लिखित स्वरुपात शासनाच्या सगळ्या विभागांकडे केली आहे.तत्कालीन पोलिस आयुक्त भुषणकुमार उपाध्येय,अमितेश कुमार,रविंद्र सिंघल यांनी वारंवार या व्यापा-यांवर कारवाई देखील केली असल्याचे भागचंदानी यांनी सांगितले.याच व्यापा-यांनी राणी कोठीत बसून माझ्या विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा कट रचला,असा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी त्यांनी दैनिक ‘लोकमत’चे पत्रकार जगदीश जोशी यांच्यावर देखील प्रहार करीत, जोशी हे सडक्या सुपारी व्यापा-यांकडून खंडणी वसूल करीत असल्याचा गंभीर आरोप केला.शहरातील अतिक्रमणित मालमत्तांवर जोशी यांचे विशेष लक्ष राहत असे.वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याची धमकी देत त्यांच्याकडून देखील खंडणी वसूल करीत असल्याने जोशी विरोधात मी पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेतल्याने,राणी कोठीतील बैठकीत माझ्या विरोधात षडयंत्र करुन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे भागचंदानी यांनी सांगितले. जोशी देखील कारणीभूत असल्याचा आरोप भागचंदानी यांनी केला.माझ्या पत्रकार परिषदेनंतर जोशी यांना लोकमतची नोकरी गमवावी लागली,असे ते म्हणाले.
माझ्यावर खोटे आरोप करणारे संतोष बंटी शाहू,राजेश शाहू यांचा भंगारचा व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात ते करचोरी करीत असल्याचा आरोप भागचंदानी यांनी केला.वस्तू सेवाकर,स्थानिक मालमत्ता कर इत्यादी मोठ्या प्रमाणात शाहू बुडवित असून पैशांच्या जोरावर अनेक सरकारी जमीनींचा त्यांनी सौदा घडवून आणला,त्यांच्या या अवैध धंध्यांचा मी भंडाफोड केल्याने ते देखील या कटात सहभागी झाल्याचे भागचंदानी म्हणाले.
शंकर गुल्हानीचे मागील २५ वर्षांपासून मनपाच्या सर्व झोनमधील कर अधिका-यांसोबत अर्थपूर्ण संबंध असून त्यांच्या मदतीने तो नागरिकांच्या करांमध्ये फेरफार करीत दलाली खात होता.त्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर दलाली बंद झाल्याने त्याने आशीनगर झोनचे कर अधिकारी सूरज स्वामीद्वारे अट्रासिटीचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला,यात मला जामीन मिळाला असल्याचे भागचंदानी यांनी सांगितले.
रविशंकर चंदूलाल केवलरमानी(वय वर्ष ५७,जरीपटका)यांचे गांधीबाग परिसरात कपड्याचे दूकान असून २४ जून २०१९ रोजी त्यांना आसीनगर झोनमधून अतिक्रमणासंबंधी तक्रार आली.ही तक्रार भागचंदानी यांनी केल्याचे त्यांना झोनकडून सांगण्यात आले.केवलरमानी यांच्या घराचा नकाशा मंजूर नसल्याने घर पाडण्याचे किंवा दंड भरण्याची भीती दाखवून, तक्रार मागे घेण्यासाठी भागचंदानी यांनी दोन लाख रुपये खंडणी मागितली असल्याची तक्रार केवरलरमानी यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात नोंदवली.मात्र,माझ्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी केवलरमानी यांना आठ वर्षांचा कालावधी का लागला?असा सवाल भागचंदानी यांनी केला.
भागचंदानी यांच्या विरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात दोन,सीताबर्डी पोलिस ठाण्यात एक व जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.मी एक उच्चविद्याभूषित नागरिक असून सामाजिक संस्था चालवित असल्याचे भागचंदानी यांनी सांगितले.जरीपटका तसेच शहरातील इतर ठिकाणी काही सिंधी व्यापा-यांकडून जी काही कर चोरी होते.अवैध धंदे,सरकारी जमीनींची लृट तसेच भेसळीचे कृत्य होते त्या विरोधात प्राणपणाने लढत असून यासाठी शासनाकडून मला ‘रिवार्ड’मिळाला असल्याचे ते म्हणाले.
माझ्या विरोधात वरील सर्व तक्रारकर्ते व त्यांचे समर्थक व्यापारी यांनी २२ व २३ सप्टेंबर रोजी कॅफे हाऊस,राणी कोठी येथे बैठक घेऊन आठ वर्षे जुने मुद्दे उकरुन काढत शहरातील विविध पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला असून,या विरोधात मला पोलिस प्रशासन व न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे,असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत वंचितांचे संघटन ‘आवाज’चे नागपूर जिल्हा अध्यक्ष नागसेन पाटील यांनी भागचंदानी हे त्यांच्या संघटनेचे अनेक दशके जुने कार्यकर्ते असून जरीपटक्यात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या अवैध धंद्यांचा भंडाफोड करीत असल्यानेच त्यांच्यावर कटकारस्थानातून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले.जरीपटक्यातील सिंधी समाजातील अनेकांनी शेतीच्या जमीनी देखील नियमबाह्यरित्या खरेदी केली असल्याचे ते म्हणाले.नियमानुसार शरणार्थींना शेतीची जमीन विकत घेता येत नाही मात्र,भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या माध्यमातून जरीपटक्यात अनेक अनाधिकृत जमीनींचा व्यवहार पार पडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.जरीपटक्यातील पोलिस ठाण्यातील समस्त अधिकारी व कर्मचारी वर्ग कुकरेजा यांच्या कृत्यातून त्रस्त व तनावात असल्याचा दावा त्यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जवळीकीचा गैरफायदा कुकरेजा घेत असून,भागचंदानी यांच्या विरोधात मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा खोट्या तक्रारी दाखल करण्याचा प्रकार त्यांनी केल्याचा आरोप नागसेन पाटील यांनी केला.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयो ‘sattadheesh official‘या युट्यूब चॅनलवर उपलब्ध)