Advertisements

सांडपाणी (गटार) तुंबण्याच्या समस्येवरुन नाईक ले-आऊट, सुभाष नगर येथील नागरिक त्रस्त
Advertisements

२०२३ पासून मनपा प्रशासन ढिम्म:कंत्राटदारानेही काम सोडले अर्ध्यावर
नागपूर,ता.१५ जुलै २०२६: पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दक्षीण पश्चिम मतदारसंघाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघातील नाईक ले आऊट,सुभाष नगर येथील भागात सांडपाणी(गटार)तुंबण्याच्या भंयकर समस्येमुळे येथील हजारो नागरिक त्रस्त झाले अाहेत.मनपाकडे वारंवार लेखी निवेदन देऊन देखील मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील,मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील समस्या मागील तीन वर्षांपासून सुटली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून हजारो नागरिक दररोज अतिशय दुर्गंधीत जगण्यासाठी हतबल झाले आहेत.
या भागातील गटार तुंबण्याची समस्या २०२३ मध्ये सुरू झाली. यात सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अगदी घरांमध्येच सांडपाणी ओव्हरफ्लो होत असल्याचे दिसून पडतं.या समस्यांचे अनेक व्हिडीयो येथील पिडीत नागरिकांनी ‘X’ (ट्विटर) वर २०२३ मध्येच व्हायरल केले.
येथील रहिवाशांनी ही समस्या दूर करण्यासाठी वारंवार नागपूर महानगरपालिकेकडे (NMC) तक्रार करण्यास सुरुवात केली मात्र,नागरिकांचे कोणतेही समाधान मनपा काढू शकली नाही. पालिकेने मोठ्या क्षमतेची नवीन सांडपाणी वाहिनी (सीवरेज लाईन) टाकण्याच्या कामाला मंजुरी देईपर्यंत, येथील नागरिकांच्या दररोजच्या जगण्या – मरणाची झालेली ही समस्या नाईक ले-आऊटमधील निम्म्याहून अधिक भूखंडांमध्ये (प्लॉट्स) देखील पसरत गेली!
अखेर वर्ष २०२५ मध्ये नवीन मल वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र, २०२५ च्या दिवाळीत हे काम पूर्ण न करताच अचानक बंद करण्यात आले.
दरम्यान, जुन्या कंत्राटदाराने काही घरमालकांच्या स्वाक्षऱ्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रावर (Completion Certificate) घेतल्या यानंतर हा कंत्राटदार काम अर्धवट सोडून पसार झाला!ही किमया मुख्यमंत्र्याच्याच मतदारसंघात त्या कंत्राटदाराने साधल्याने येथील पिडीत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

(छायाचित्र : कंत्राटदार नागरिकांच्या घराजवळीत काम असे अर्धवट सोडून पसार झाला!पैसे संपले, इतक्याच कामाचे पैसे मिळाले असल्याचे कंत्राटदाराने येथील पिडीत रहीवाश्यांना सांगितले! संपूर्ण कामाचे कंत्राट मिळाले असताना ‘टक्केवारीतच’कंत्राटदाराचे पैसे संपले का?असा संतप्त सवाल पिडीत नागरिक विचारीत आहेत)
दिवाळीनंतर रहिवाशांनी पुन्हा एकदा मनपा अधिकाऱ्यांकडे सांडपाणी घरात व अंगणात येण्यापासून थांबविण्यासाठी,काम पूर्ण करण्याबाबत विचारणा सुरू केली, परंतु त्यांनी नेहमीच हा मुद्दा टाळला.
अखेर, मुख्यमंत्र्यापर्यंत येथील नागरिकांचे दैनदिन जगणे अतिशय ’दीन’झाल्याने आपली ‘व्यथा’ व मुजोर मनपा प्रशासनाची ‘कथा’ पोहोचवली.मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने काम करण्याची सूचना प्रशासनाला केली.यानंतर मनपाचे ढिम्म प्रशासन हलले व मनपा अभियंता सुरडकर हे नवीन कंत्राटदारासह जागेची पाहणी करण्यासाठी आले. मात्र, पुढील महिन्यातच सुरडकर सेवानिवृत्त झाल्यामुळे पुढे काहीच झाले नाही व पुन्हा एकदा कीर्तनकाराची कथा पूर्वपदावर आली.
जुन्या कंत्राटदाराने ज्या घरापर्यंत काम अर्धवट सोडून पळ काढला आता तिथे सांडपाणी तुंबण्याची समस्या पुन्हा सुरू झाली. ही स्थिती इतकी भयंकर आहे की येथील एका घरमालकाला स्वतःच्या घरात सोक पीट (शोषखड्डा) तयार करण्यासाठी खोदकाम करावे लागले! महत्वाचे म्हणजे हीच मनपा नागपूरकर नागरिकांकडून अद्यापही मलनिस्सारण व्यवस्था पुरविण्यासाठी भरमसाठ कर घेत आहे!
इतकंच नव्हे तर जुन्या कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जेवढे पण काम केले ते ‘बिंदासपणे‘ अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले! त्याच्या कामामुळे आता नाईक ले-आऊटमधील डॉ. शास्त्री यांच्या बागेतून सांडपाणी बाहेर येऊ लागले आहे!
येथील रहीवाशांनी यासंदर्भात आता भाजप नगरसेविका निधी तेलगोटे संजय उगले आणि शिवानी दाणी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त जाधव यांच्या दारयावर डोके आपटल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.विपीन इटणकर यांना, या अमेरिका-इस्त्राईल युद्धापेक्षाही भीषण झालेल्या समस्येतून सोडवणूकीसाठी निवेदनस्वरुपात ८ जुलै रोजी साक्षात दंडवत घातला आहे. . परंतु आज एक आठवडा उलटून गेल्यानंतर देखील जमिनीवर (प्रत्यक्षात) काहीही हालचाल होताना दिसत नाही.यावरुन त्यांची देखील मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातील नागरिक हे ‘घर’नावाच्या ’हागणदारीतच’जगावे ही मंशा असल्याचा संताप येथील उच्च विद्याभूषित व उच्च मध्यम वर्गीय मतदार व्यक्त करीत आहेत.
हीच जर शहरातील एखाद्या झोपडपट्टीत समस्या उद् भवली असती तर त्यांच्या आक्रोशासमाेर संर्पूण यंत्रणा हलली असती,नगरसेवकांनी मतदार नाराज होण्याच्या भीतीतून प्रशासनाकडून काम करुन घेतले असते मात्र,शहरातील मोठ्या प्रमाणात असणा-या मध्यम वर्गीयांचाच, मुख्यमंत्र्यांच्या शहरात कोणीही वाली नाही,अशी खंत देखील खास ‘सत्ताधीश’कडे अनेक पिडीत व्यक्त करतात.
एकंदरीत नाईक ले-आऊटमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रहिवाशांना गेल्या जवळपास ३ वर्षांपासून नरकयातना आणि घाणीत जगावे लागत आहे.आता तरी या हागणदारीतून नागरिकांची सुटका करावी,काम अर्धवट सोडून जाणा-या कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करावी तसेच मनपाचे झोन व मुख्य कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करतात.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………….
तळटीप:-
धंतोलीतील भाजपच्या प्रादेशिक कार्यालय इमारतीत देखील सांडपाणी तुंबत असल्याची गंभीर समस्या गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे.या शहराचे भाग्यविधाते नेते,राजकारणी,मंत्री,संत्री,आमदार यांना नागपूरचा विकास म्हणजे शेकडो उड्डाणपुले,भुयारी मार्गे,अगदी गल्लीबोळ्यातही सिमेंट काँक्रिटचे रस्ते निर्माण करण्यातच वाटतो,मात्र,शुद्ध हवा,स्वच्छ पाणी,खड्डेमुक्त व अपघातमुक्त रस्ते तसेच आरोग्यदायी जीवनमान नागपूरकर नागरिकांना देण्यास गेल्या १७ वर्षांपासून मनपात भाजपचीच सत्ता असताना देखील ते अपयशी ठरले आहे.संपूर्ण शहरातच इंग्रजाच्या काळातील सांडपण्याची व्यवस्था काेलमडली आहे मात्र,सत्ताधा-यांच्या अजेंडात नागरिकांच्या दैनदिन जीवनाशी निगडीत या समस्या दुय्यम असून,पार कोलमडलेल्या सांडपाणी व्यवस्थेवरवच ’विकासाचे’इमले चढवले जात आहेत असा संताप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत असतो.
संपूर्ण शहरातच पूर्वीची जुनी घरे व मोजके कुटूंब सदस्य राहत असलेल्या इमारती मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त होत असून त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती,मॉल्स ,व्यवसायिक संकुले इत्यादी झपाट्याने उभी राहत आहेत मात्र,त्या इमारतींच्या खाली असलेल्या १०० वर्षे जुन्या सांडपाणी वाहून नेणा-या पाईपलाईन्सची क्षमता कधीचीच संपली आहे,याकडे मोठमोठ्या नेत्यांच्या बैठकीत ‘हूशार’सनदी अधिकारी लक्ष वेधत नाहीत,याचा परिणाम सुभाष नगर नाईक ले आऊट,सुभाष नगर सारख्या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील नागरिकांवर व्हावा,यातच विकासाचे कोणते मॉडल या शहरात शासन व प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात राबविले जात आहेत,याची प्रचिती येते.
……………………………………………..