
महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिका-याने जारी केले पत्र
नागपूर,ता. १९ जून: महानगरपालिकेची प्रस्तावित सर्वसाधारण सभा शनिवार,दि.२० जून रोजी पार पडण्याचा मार्ग आता सर्वस्वी मोकळा झाला आहे. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर मनपाची सर्वसाधारण घेण्याचे पत्र महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांना जूनच्या पहील्या आठवड्यातच पाठविले होते.
मात्र,प्रारंभी काही अटींवर, सभा घेण्याचे संमती पत्र दिल्यानंतर अचानक आयुक्त तुकाराम मुंढे ‘घुमजाव’करीत शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या या सबबीखाली, अशी सभा घेणे ही ‘बेकायदेशीर कृती’ठरवली.आयुक्तांच्या या निर्णया विरोधात महापौर संदीप जोशी यांनी गुरुवार दि.१६ जून रोजी पत्र परिषद घेऊन,ही’ सभा होणारच’अशी डरकाळी फोडली.
यावर मुंढे यांनी राज्य सरकारला या सभेविषयी निर्णय घेण्याचे पत्र पाठविले. या पत्रात मुंढे यांनी नागपूर शहरातील सद्य:स्थिती विचारात घेता दि. २० जून रोजीची सर्वसाधारण सभा आयोजित करणे संयुक्तिक होणार नाही,असा अभिप्राय नमूद केला होता. या सभेचे आयोजन करावे किवा कसे,याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागविले होते.
यावरील उत्तरात,राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ३ एप्रिल रोजीच्या पत्राकडे मुंढे यांचे लक्ष् वेधून,अश्या सभांबाबतचे निर्णय आपल्या स्तरावर घेण्याचे निर्देश त्यात स्पष्टपणे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अनुषंगाने महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अनिवार्य असलेल्या सभा,योग्य ते सामाजिक अंतर ठेऊन व कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन,इतर महापालिकांकडून घेण्यात आलेल्या आहेत,असे सांगण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आपणाकडूनही उद्या दि. २० जून २०२० रोजी बोलाविण्यात आलेली नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा,कोविड विषयक मार्गदर्शक तत्व व योग्य ते सामाजिक अंतर ठेवून संपंन्न होईल याची कृपया दक्ष् ता घेण्यात यावी,तसेच सदरची सभा आयोजित करताना ,सभागृह गटनेत्यांशी चर्चा करुन,मोजकेच काही सदस्य सभागृहात उपस्थित राहतील व उर्वरित सदस्य ऑनलाईनद्वारे(गूगल,झूम इ.)सभेच्या कामकाजात भाग घेतील,या पर्यायाचाही विचार करावा,असे उत्तर पाठवण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी हे पत्र निर्गमित केले असून मुंढे यांना आता प्रशासनाचे प्रमुख म्हणून उद्या शनिवार दि. २० जूनच्या सभेत उपस्थित राहणे भाग आहे.
उद्याची सभा कोविडवरील एकंदरित झालेल्या खर्चावरुन देखील गाजण्याची चांगलीच चर्चा आहे.

आमचे चॅनल subscribe करा