
आयुक्तांनी केला गौतम नगर परिसर सील
नागपूर: ‘मरकज’वाल्यांच्या संपर्कात आल्यामुळे गौतम नगर येथील एका ४० वर्षीय तरुणाचा अहवाल आज शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला .नागपूरात आता करोनाबाधितांची एकूण संख्या ही ‘५९‘वर पोहोचली.दिलासा देणारी बाब म्हणजे यातील ११ करोना बाधित हे बरे होऊन घरी गेले आहेत. एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. ४० वर्षीय या रुग्णाचे चिकन सेंटर असल्याचे सांगितले जात आहे,परिणामी किती नागरिक त्याच्या संपर्कात आले,प्रशासन याचा युद्धपातळीवर आता शोध घेत आहे.
या तरुणाला २ एप्रिल रोजी कोराडी जवळील लोणारा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी चाचणीत त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजिले आहेत. शुक्रवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार प्रभाग १० व प्रभाग १२ चा परिसल सील करण्यात आला. या तरुणाला मेयो येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
सध्या मेडीकलमध्ये ३२ तर मेयोमध्ये २७ करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.१०७१ संशयितांना विलगीकरणातून घरी पाठवण्यात आले असून अद्याप ५४५ संशयित हे आमदार निवास,वनामती,रवि भवन तसेच लोणार येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे याशिवाय घरीच अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या पाठपुरावा सुरु असणा-यांची संख्या ही १२७८ एवढी असल्याचे पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयातील जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
काल गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी दोन करोना संशयितांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता,हे दोघेही लाेणार येथे विलगीकरणात वास्तव्यास होते. यामध्ये एकाचे वय २७ तर एकाचे वय ६१ वर्ष असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली होती. यातील एक करोना बाधिताचा संपर्क मरकजवाल्यांशी आला होता तर एक करोना बाधित हा अजमेरवरुन आला होता. आज मेयो येथे भरती करण्यात आलेल्या रुग्णाचे वर्य ४० वर्ष असून त्याचा मरकजवाल्यांशी संपर्क आला असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी दिली. अनेक माध्यमांमध्ये मात्र आजच्या रुग्णाचे वय हे २५ वर्ष असल्याचे प्रसारित करण्यात आले.
महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक १० या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागामध्ये होउ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२चा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग १२च्या दक्षिण-पूर्वेस गिट्टीखदान पोलिस स्टेशन, दक्षिण-पूर्वेस पारसी सिमेटरी एंट्री पॉईंट, दक्षिणेस पारसी सिमेटरी साउथ पॉईंट, दक्षिण-पश्चिमेस ताज किराणा, पश्चिमेस निर्मल गंगा कॉम्प्लेक्स, पश्चिमेस गिट्टीखदान चौक काटोल रोड, उत्तर-पश्चिमेस वेल्कीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, उत्तरेस कॅप्स रिजेकन्सी, उत्तर-पूर्वेस श्री रामदेवबाबा टेंम्पल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येता येणार नाही.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
नागपूरातील आणखी एका वेगळ्याच प्रभागात करोना बाधित रुग्ण आढळ्याने प्रशासनावरचा ताणही आता बराच वाढला आहे.

आमचे चॅनल subscribe करा