
नागपूर, ता. १६ : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदींबाबत नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी माहिती घेतली आणि आवश्यक ते निर्देश दिले.
आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सर्वप्रथम मनपात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली. नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉलवर नागरिकांकडून काय माहिती मागितली जाते, आपल्याकडून त्यांचे समाधान होते अथवा नाही, याबाबत तेथे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. नागरिकांना वेळेवर धान्य भेटत नसल्याच्या बहुतांश तक्रारी येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी तेथे उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णवाहिका सेवा, कोरोनाबाधित रुग्णांची व्यवस्था आदींवर चर्चा केली. पेयजल आणि गटारासंदर्भातील तक्रारी तसेच निराधार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी असलेल्या हेल्पलाईनवरही गरजू व्यक्ती मदत मागत असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यानंतर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र सवाई, डॉ. प्रवीण गंटावार, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांच्याशी चर्चा केली. शहरात सुरू असलेले सर्व्हेक्षण, विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांची व्यवस्था याबद्दलही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शहराच्या ज्या भागात सर्व्हेक्षण झाले नाही अशा संजय गांधी नगर, नवीन वस्ती टेका आदी भागातही सर्व्हेक्षण तातडीने करण्याची सूचना केली. कोरोनाविरुद्धच्या युद्धात योद्धा म्हणून समोर असलेल्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चमूचे त्यांनी कौतुक केले. या चमूमुळे नागपूरची जनता सुरक्षित आहे, असा गौरवोल्लेखही त्यांनी केला.

आमचे चॅनल subscribe करा