Homeनागपूर न्यूजनागपूरात कोरोनामुळे दूसरा मृत्यू: मोमिनपुरा येथील ७० वर्षीय व्यक्ति ठरली कोरोनाची दूसरी...

नागपूरात कोरोनामुळे दूसरा मृत्यू: मोमिनपुरा येथील ७० वर्षीय व्यक्ति ठरली कोरोनाची दूसरी बळी

आज आणखी दोघांचे अहवाल आले पॉझिटीव्ह: कोरोनाबाधितांची संख्या १३६

नागपूर,२९ एप्रिल: आज महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोरोनामुळे दुसरा बळी गेला असून मोमिनपुरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५ एप्रिल रोजी नागपूरात कारोनाची लागण होऊन सतरंजीपुरा येथील पहीला मृत्यू अब्दूल लतीफ या ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तिचा झाला होता. मात्र ५ एप्रिल नंतर शहरात कोरोनामुळे कोणाच्याही मृत्यूची वार्ता नव्हती.मात्र बुधवार दि.२९ एप्रिल रोजी कोरोना विषाणूने आणखी एका वृद्ध व्यक्तिचा बळी घेतल्यामुळे नागपूरात कोरानाची बाधा होऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तिींची संख्या ही दोन झाली आहे.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारासाठी भरती असलेला सत्तर वर्षीय कोरोनाबाधित बुधवारी दगावला. उपराजधानीत कोरोनाच्या विषाणूमुळे झालेला हा दूसरा मृत्यू असून यामुळे प्रशासनाचे सर्व प्रयत्न हे अपुरे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यात शहरात तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान मेयो आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून पुढे आले. यामुळे शहरातील बाधितांची संख्या १३६ वर पोहचली आहे.

उपराजधानीत ५ एप्रिल रोजी ६८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. यानंतर तब्बल २५ दिवसानंतर दुसऱ्या मृत्यूंची नोंद झाली. मृत व्यक्ती मोमीनपुरा येथील रहिवासी असून त्याला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संपर्कातून या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. विशेष बाब अशी की, नागपुरातील कोरोनाच्या पहिला बळी ठरला होता त्याला तसेच बुधवारी झालेल्या दुसऱ्या कोरोनाच्या बाधेने दगावलेल्या रुग्णाला कोणत्याही विदेशी किंवा इतर शहरातील प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती. शिवाय मरकज मधील कार्यक्रमातही गेलेला नाही. त्यामुळे दोन्ही मृत्यू हे समुदाय प्रादुर्भावाचे बळी ठरले असेच म्हणता येईल.

मोमीनपुरा येथील या व्यक्तीला २१ एप्रिल रोजी मेयोत दाखल करण्यात आले होते.त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मेयोत तपासणीसाठी आला होता. मात्र कोरोना सदृश्‍य लक्षणे असल्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. यात कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यानंतर तातडीने कोरोना वॉर्डात दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचे निधन झाले.

दुसरीकडे मेयोत प्रसुती झालेल्या महिलेसह सिंम्बॉयसिस येथे विलगिकरणात असलेल्या सतरंजीपुरातील एका व्यक्तीला कोरोना असल्याचे निदान झाले. तर एक रुग्ण मेयोत उपचार घेत असली तरी, दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या नवीन रुग्णांमुळे शहरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या १३६ वर पोहचली आहे. सतरंजीपुरा येथील मृतकाच्या संपर्कातील सुमारे ऐंशीपेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. यामुळे महापालिकेचा आरोग्य विभागही हादरला आहे. बुधवारी मोमीनपुरा येथील वृद्धाचा मेयोत मृत्यू झाला. या वृद्ध कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना आमदार निवासात विलगिकरण करण्यात आले. २१ एप्रिल रोजी त्यांना मेयोत दाखल केले गेले होते. याप्रसंगी त्यांच्या एक्‍स रे तपासणीत न्युमोनियाची लक्षणे आढळली होती.

पत्नीसह मुलगाही बाधीत-

बुधवारी दगावलेल्या मोमीनपुरा येथील वृद्ध बाधिताच्या पत्नीसह मुलगा व इतरही काही नातेवाईक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यांच्यापैकी काहींवर मेयोत उपचार सुरू आहेत. या सगळ्यांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

नुकतेच शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्क रुग्णालाही कोरोनाने विळख्यात घेतले होते. परिणामी शहरातील वृद्ध व गंभीर आजारी रुग्णांचा कोरोनापासून बचावाचे आणखी एक गंभीर संकट प्रशासना समोर उभे ठाकले आहे.

२९ एप्रिल २०२०-उपराजधानीतील कोरोनाचा आढावा-
दैनिक संशयित-४४
एकूण संशयित-१५३६
सध्या भरती असलेले संशयित-१३१(मेडीकल-६९,मेयो-६२)
एकूण भरती केलेले संशयित-१४९४(मेडीकल-६४४,मेयो-८५०)
एकूण भरती पॉझिटीव्ह- ९२(मेडीकल-४९,मेयो-४३)
दैनिक तपासणी नमुने-३९६
एकूण तपासणी नमुने-२७३७
कोव्हीड-१९ पॉझिटीव्ह नमुने-१३६(मेडीकल-७१,मेयो-६३)
डिस्चॉर्ज केलेले पॉझिटीव्ह-४१(मेडीकल-२२,मेयो-१९)
एकूण डिस्चॉर्ज केलेले संशयित-१३६२(मेडीकल-५७५,मेयो-७८७)
आज अलगीकरण केलेले संशयित-१२
आज अलगीकरण कक्ष्ात भरती असलेले संशयित-९८३
अलगीकरणातून घरी पाठवलेले संशयित-९१
अलगीकरण कक्ष्ातून मेडीकल/मेयो येथे पाठवलेले संशयित-४
पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित- ४२२

Latest बातम्या