
नागपूरात करोना बाधितांची वाटचाल आता शंभरीकडे! बाधितांची संख्या झाली ९१
नागपूर: नागपूरच्या रणरणत्या उन्हाचे चटके हे एप्रिलच्या मध्यात ज्याप्रमाणे वाढत जात आहे त्याचप्रमाणे करोना नावाच्या महामारीने संसर्गित होणा-यांची संख्या ही देखील उत्तरोत्तर वाढतच जात असून आज मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी एकूण ११ संशयितांच्या करोना चाचणीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. दूर्देवाची बाब म्हणजे यात दोन आणि तीन वर्षांच्या दोन चिमूरड्या असून ३० वर्षाची एक महिला आहे. या तिघींना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सतरंजीपूरा येथील मृत्यू पावलेल्या करोना बाधित मृतकाच्या संपर्कातून त्यांना ही बाधा झाली असून या तिघींना मेडीकल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. मेडीकलमध्ये तपासण्यात आलेले ८४ चाचण्यांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला असून ही नागपूरकरांसाठी अत्यंत दिलासा देणारी बाब ठरली आहे.
मेयोमध्ये आज ७ बाधितांना भरती करण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी दिली.रविभवनमधून ४ व वनामती येथील विलगीकरण कक्ष्ातून ३,त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मेयोमध्ये भरती करण्यास आणण्यात आले. आज मेडीकल व मेयामध्ये भरती करण्यात आलेल्या ११ रुग्णांपैकी ६ पुरुष आणि ५ महिला असल्याचे सांगण्यात आले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल सोमवारी,सतरंजीपूरा येथील मृत पावलेल्या करोना बाधिताच्या संपर्कात एकूण १९३ लोकं आले असल्याची माहिती दिली होती. या सर्वांना आमदार निवास,वनामती, रवि भवन व कोराडी जवळील लोणारा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले असून यांच्याच चाचण्या या करोना पॉझिटीव्ह निघत असल्याने, एक ‘मरकज’प्रकरण संपूर्ण देशासह महाराष्ट्राच्या उपराजधानीलाही किती धोकादायक ठरले आहे,याची ते साक्ष् देतात. करोना बाधिताच्या संपर्कात आल्याने व प्रशासनाने वारंवार आवाहन करुन देखील ही मंडळी समोर आलीच नाही. प्रशासनालाच त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यास बाध्य व्हावे लागले.
यांचा शोध घेतला नसता व त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले नसते तर यांच्या संपर्कामुळे शहरातील इतर नागरिकांना देखील करोना संसर्गाचा धोका हा वाढला असता.
या सर्व १९३ लोकांपैकी करोना बाधितासोबत संपर्क साखळीत आलेल्या ब-याच जणांचा अहवाल अद्याप यायचा आहे. मात्र नागपूरात आज मंगळवारी करोना बाधितांचा आकडा हा ९१ वर जो पोहोचला आहे,असाच प्रभाव राहील्यास लवकरच नागपूरात हा आकडा आता शंभरी ओलांडेल,अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ९२ करोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्णा हे संतरजीपू-यातील त्या मृत व्यक्तिच्या संपर्कातील असून तो मृत करोना बाधित हा मरकजशी संबधित होता,हे विशेष!
मनपा प्रशासनाच्या एककल्ली कारभारामुळे शहरात बाधितांचा आकडा वाढतोय-महापौरांचा आरोप
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महापौर संदीप जोशी यांनी मनपा प्रशासनाच्या विशेषत: आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभारामुळे नागपूरात दररोज करोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचा आरोप केला. मंंुढे हे २७ जानेवारी रोजी आयुक्त पदी रुजू झाले होते.त्यांना नागपूरात येऊन फक्त अडीच महिने झाले आहेत.त्यांना नागपूरातील सर्व झोनशी पुरेशी माहिती नाहीच.फक्त प्रशासकीय अधिका-यांच्या माहितीवर ते विसंबून असतात मात्र शहरातील प्रथम नागरिक व शहराचा महापौर या नात्याने माझ्याशी किवा सर्व पक्ष्ांच्या निवडून आलेल्या जनप्रतिनिधींशी ते कोणताही संवाद साधत नाहीत. विचारणा करीत नाही.माहिती घेत नाही. जनप्रतिनिधींसोबत योग्य समन्वय त्यांनी ठेवला असता तर शहरातील रेड झोन्सबाबत त्यांना योग्य ती दक्ष् ता घेण्यात मदत मिळाली असती,असा आरोप महापौरांनी केला.
आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आलेल्यांवर कोणतेही निर्बंध नाहीत. पॉझिटीव्ह-निगेटीव्ह सगळेच एक साथ जेवतात,गच्चीवर फिरतात,एकमेकांच्या खोलीत जातात परिणामी करोनाचा आणखी फैलाव होत असल्याचा आरोप महापौरांनी केला. नागपूरात करोना बाधितांचा आकडा वाढण्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचाच प्रशासकीय कारभार जवाबदार असल्याचा आरोप महापौर यांनी केला. यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील प्रतिउत्तर देत,मनपा प्रशासन नागपूरकरांची संपूर्ण काळजी घेत असल्याचे सांगितले.
मुंढेची पत्रकारांना कराेना बाधितांविषयी विस्तृत माहिती न देण्याची मेयो-मेडीकल प्रशासनाला सूचना!
मुंढेंनी मेयो व मेडीकलच्या वरिष्ठ अधिका-यांना प्रचार व प्रसार माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांना करोना बाधितांविषयी कोणतीही सविस्तर माहिती न देण्याबाबत बजावले आहे! प्रसार-प्रचार माध्यम प्रतिनिधी किवा पत्रकारांना संपूर्ण माहिती ही ‘महापालिकेतर्फेच ’कळविली जाईल,अशी सक्त ताकीद वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांना देण्यात आल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सूत्राने दिली.
विशेष म्हणजे आज मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी शहरात ११ करोना बाधितांचा आकडा वाढला असताना मनपा प्रशासनाकडून फक्त एका ओळीची माहिती ही पुरविली जाते. त्यात ही आज करोना पॉझिटिव्ह यांचा आकडा फक्त ९ दाखवण्यात आला.
मुंढे यांच्या एककल्ली कारभाराला सगळेच त्रस्त झाले असून पुरेश्या माहिती अभावी माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांची नुसती तारांबळ उडते. त्यांना सर्व दूर दूरध्वनी फिरवून माहिती गोळा करावी लागते. या उलट जिल्हा प्रशासनस्तरावर माध्यमांना मिळणारी माहिती ही सविस्तर व अचूक असते. थोडक््यात जिल्हा प्रशासन,मनपा प्रशासन,पोलिस प्रशासन तसेच मेयो-मेडीकलमधील वैद्यकीय प्रशासन यांच्यात कोणताही ताळमेळच नसल्याने शेवटी पत्रकारांवरील ताण देखील अचूक माहिती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची तक्रार लवकरच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा