Advertisements

नागपूर पर्यटन विकास योजना
नागपूर शहराला पर्यटनाच्या नकाशावर प्रामुख्याने आणण्यासाठी नागपूर पर्यटन विकास योजना राबविण्यात येणार आहे. यात शहरातील ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, मंदिरातून शहराची वेगळी ओळख दिसून येते. आपले शहर, आपली ओळख अंतर्गत शहरातील १००चौकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
मारबत महोत्सव-
नागपूर शहरातील हा एक विशेष सांस्कृतिक घटना आहे. यातून पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी या देशातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाचा उपयोग करून घेतला जाईल.
सावजी बुनकर महोत्सव-
सावजीची पाककला देशात व विदेशात लोकप्रिय आहे. शहरात सात दिवस सावजी महोत्सव साजरा करून यातून देशातील व विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पुष्पाताई घोडे सायकल बँक योजना-
दिवंगत माजी महापौर पुष्पाताई घोडे यांच्या स्मृतीनिमित्त शहरातील ७५ प्रतिभावान मुलींना मोफत सायकलचे वाटप केले जाणार आहे.
युवकांसाठी सुषमा स्वराज योजना-
शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात माफक दरात विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएसीच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून दिले जाईल.
प्रमिलाताई मेंढे भाषा शिकवणी केंद्र-
राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून समाज कार्य केलेल्या प्रमिलाताई मेंढे यांच्या स्मृतीनिमित्त शहरात जपानी, जर्मन, फ्रेंच शिकविण्यासाठी ई-लायब्ररीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
माझा प्रभाग , स्मार्ट प्रभाग-
या योजनेअंतर्गत स्मार्ट, शाश्वत व पर्यावरण पूरक तत्वावर जो प्रभाग कर संकलन, पाणी कर संकलन, स्वच्छता, अभिनव योजना राबविण्यात अग्रेसर राहील, त्या प्रभागाला ५० लाख रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे.
महापौर माहेर योजना-
लग्न झाल्यानंतर नागपूर शहराच्या बाहेर गेलेल्या उल्लेखनीय कार्य करणार्या विवाहितांचा मकरसंक्रांतीला माहेरवाशिण मानून महापौरांतर्फे त्यांची ओटी भरून नागपूरकरवासियांतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. शहराच्या बाहेर असल्या तरी शहराशी नाते अधिक भक्कम करण्याचा यामागे हेतू आहे.
मजुरासाठी ठिय्या-
विकसित होत असलेल्या नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार कामानिमित्त येत असतात. त्यांच्यासाठी विश्रांती केंद्र (ठिय्या) उभारण्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्षांनी या अर्थसंकल्पात केली. सर्व झोनमध्ये ही योजना राबविण्यात येईल.
इलेक्ट्रिक सोलर योजना-
मनपातर्फे स्वच्छ व परवडणारी उर्जा उपलब्ध करून देण्यासाठी ५ हजार सोलर शेगड्या वितरित केल्या जाणार आहे. यामुळे पर्यावरण प्रदूषण मुक्त राखण्यासाठी मदत होणार आहे.
हॉटेलचे होणार मूल्यांकन-
शहरातील हॉटेलचा दर्जा वाढविण्यासाठी हॉटेलचे वर्गीकरण व प्रमाणपत्र प्रणाली राबविण्यात येणार आहे. या मूल्यांकनानुसार हॉटेलला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. यामुळे पर्यटकांना हॉटेलमध्ये चांगली सुविधा मिळण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांचा उल्लेख-
शहराच्या विकासामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या योगदानाचा व मार्गदर्शनाचा स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी आवर्जून उल्लेख केला.
अर्थसंकल्प वीरमातांना समर्पित-
भाषणाची सुरूवात करताना स्थायी समितीच्या सभापतींनी हा अर्थसंकल्प राजमाता जिजाऊपासून ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सर्व विरांच्या मातांना समर्पित असल्याचे सांगितले.
जलपर्णी बॅगचे वितरण-
शहरातील तलावांमध्ये आढळणारी पर्यावरणाला घातक असलेल्या जलपर्णीपासून तयार करण्यात आलेल्या बॅगमध्ये नगरसेवकांना अर्थसंकल्पाची प्रत वितरित करण्यात आली.
#VISITNagpur पुस्तिका-
परदेशातील अनेक शहरांमध्ये सिटी सेंटरवर पर्यटकांसाठी माहितीपूर्ण पुस्तिका सहज उपलब्ध असतात. त्या पुस्तिकांमध्ये एका दिवसात शहर कसे फिरावे, प्रमुख आकर्षणे कोणती, खाद्य संस्कृतीची ठिकाणे कोणती याची सविस्तर माहिती दिलेली असते. मात्र, नागपूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात अशी एकत्रित व अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ही उणीव लक्षात घेऊन #VisitNagpur या उपक्रमांतर्गत एक सर्वसमावेशक, आकर्षक आणि अययावत माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील विविध सांस्कृतिक, पारंपरिक, औद्योगिक तसेच क्रीडा उत्सवांचे एकत्रित वार्षिक फेस्टिव्हल कॅलेंडर तयार करण्यात येईल.
मत्सालय-
Maharashtra Fisheries Department यांच्या माध्यमातून नागपूरमध्ये एक अत्याधुनिक मत्स्यालय (Aquarium) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिका आवश्यक जागा उपलब्ध करून देईल, तर फिशरीज विभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, आकर्षक आणि दर्जेदार मत्स्यालय उभारण्यात येईल.
लहान मुलांसाठी विशेष
नागपूर महानगरपालिके तर्फे राष्ट्रीयत्व जागृत लहान मुलांमध्ये व्हावे म्हणून सुरेश भट सभागृहात विशेष बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येईल. त्यात प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या द्वि शताब्दी निमित्त्य, सरदार वल्लभभाई पटेल हयांची १५० वी जयंती, अहिल्या बाई होळकर ह्यांची ३०० वी जयंती, शिवराज्याभिषेकाची नुकतीच झालेली ३५० वी जयंती च्या उपलक्षाने, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर शिशु वर्गासाठी आणि मुलांसाठी या महोत्सवाचे आयोजन निःशुल्क करण्यात येईल. बालजगत सोबत संयुक्त विद्यमाने काही प्रकल्प राबविण्यात येतील.
महा संगीत-
शहरात सकाळी ७ ते ८ एक तास ठराविक चौकांवर दररोज महाराष्ट्रातील संस्कृतीवर आधारित संगीत प्रत्येक चौकात मधुर आवाजात वाजवण्यात येईल. दिवसाची सुरुवात मंगलमय वातावरणात आणि सकारात्मक व्हावी ह्यासाठी चा हा प्रयत्न असेल. यासाठी मनपाचे कुठलेही आर्थिक योगदान नसेल.
स्टार्टअप-
जेन झी (Gen Z) साठी प्रामुख्याने… महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये अव्वल आहे, पण सगळे स्टार्टअप हे पुणे मुंबई सारख्या शहरातून येतात, त्यात नागपुर कुठे ही मागे न राहावा म्हणून एक अययावत स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर बनवेल. महानगर पालिका जागा उपलब्ध करून देईल, शासन आणि महानगर पालिका तसेच डिपीसी च्या माध्यमातून नागपूर महानगर पालिका ‘जमशेदजी टाटा इनक्युबेशन सेंटर’ उभारेल.
तक्रार निवारण सेल-
नागपूर महानगरपालिकेचे तक्रार निवारण सेल आय.टी. विभागाद्वारे संचालित करण्यात येते या माध्यमातून नगर सेवकांसाठी वेगळी यंत्रणा विभागाने तयार करावी. जेणेकरून सर्व नगरसेवक या यंत्रणेद्वारे आपल्या तक्रारींची नोंद करू शकतील. नगरसेवकांना आलेल्या तक्रारीचा फोलोअप टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून येणे सोयीचे होईल व डॅशबोर्डच्या माध्यमातून त्याची नोंद नगरसेवकांकडे असेल. तसेच कमीतकमी मानवी हस्तक्षेप आणि जास्तीत जास्त यंत्रणेचा आणि डिजिटलीकरणासह आधुनिक प्रणाली व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेची सेवा करणे अधिक प्रभावी ठरणार आहे.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे उद्यान-
पश्चिम नागपुरातील बाजीप्रभू नगर स्थित महानगरपालिकेच्या उद्यानाचे नाव नरवीर बाजीप्रभू देशपांडे करण्यात येईल.
डिजीटलायझेशन-
डिजीटलायझेशन या उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडून कर, पाणीपुरवठा आदी विविध विभागांसाठी अत्याधुनिक चॅटबॉट प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये एआय-आधारित आऑडिओ व टेक्स्ट बॅटवॉट्सचा समावेश असेल, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची तत्काळ आणि अचूक उत्तरे मिळू शकतील.
डेटा सेंटर-
डिजिटल युगात सुरक्षित आणि विश्वासार्ह डेटा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. नागपूरमध्ये उभारणी होत असलेल्या डेटा सेंटर्सचा विचार करता, महानगरपालिकेने या क्षेत्रात दूरदृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने स्वतः चे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारून सर्व विभागांचा डेटा एकत्रित, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने व्यवस्थापित करणार आहे.
नागपूर जीरो कार्बन फुटप्रिंट च्या दिशेने अग्रेसर-
‘सुसबिडी प्रकल्पामुळे नागपूर शहर शून्य-कार्बन फुटप्रिंटकडे पहिले ठोस पाऊल टाकले. ‘या उपक्रमातून स्वच्छ ऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक उपायांना चालना मिळून शहराच्या शाश्वत विकासाला गती मिळेल.
सुरेश भटांच्या काव्याने शेवट-
स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी भाषणाचा शेवट कविवर्य सुरेश भट यांच्या काव्याने केला.
वादळांना सांगून ठेवा
आमची दिशा बदलणार नाही
नागपूरच्या विकासाचा दीप
कोणत्याही वा-याने विझणार नाही.
…………………………………