Homeनागपूर मनपाकोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंडदेण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा - गडकरी

कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंडदेण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा – गडकरी

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्देश: व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक सुविधांचा आढावा

नागपूर, दिनांक 7: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्यावश्यक सुविधासह तपासणीसाठी आवश्यक असलेल्या किट्स पुरेशा प्रमाणात तयार ठेवा. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दृष्टीने आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे आज दिल्या.

महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवनात कोरोनासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

महापौर संदीप जोशी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, पोलिस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ‘मेडिकल’चे अधिष्ठाता संजय मित्रा, ‘मेयो’चे डॉ.अजय केवलिया, ‘एम्स’च्या मेजर जनरल डॉ.विभा दत्ता, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल, महापालिका उपायुक्त राम जोशी पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, माजी महापौर प्रविण दटके, आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी मेयो आणि एम्स येथे सुविधा उत्तम असून मेडिकल व पशुवैद्यकीय महाविद्यालयात लवकरच ही सुविधा सुरु होत आहे. कोरोना संशयित तसेच संपर्कात असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेल्या तपासणीत पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना करतांना श्री.गडकरी म्हणाले की, वैद्यकीय सुविधा कायम सज्ज राहावी, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची तसेच अन्य सामुग्री एक महिना पुरण्यासाठी नियोजन करावे. वैद्यकीय सामुग्रीसाठी अडचण येत असल्यास तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी. यासाठी आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनारुग्णांचा उपचार करतांना वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देतांना विविध संस्थांच्या माध्यमातून 15 हजार सुरक्षा किट उपलब्ध करुन देण्यात येतील. याव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या सुरक्षा किट शासनाच्या उपलब्ध निधीमधून खरेदी करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.
मेडिकल येथे ट्रामा केअरचा 220 बेड असलेला स्वतंत्र कोरोना वार्ड तयार करण्यात येत आहेत. मेयो व मेडिकल येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा रुग्णवाहिका यासोबतच शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये आयसीयु सुविधा आहे. अशा सर्व हॉस्पिटलच्या सेवा घेण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीविरुद्ध कठोर कारवाई-

लॉकडाऊनच्या काळात जीवनाश्यक वस्तूचा काळाबाजार होणार नाही तसेच साठेबाजी करुन किंमती वाढणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करतांना गडकरी म्हणाले की, या वस्तुंच्या वाहतुकीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. लॉकडाऊन असतांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पोलिक विभागाने यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचनाही त्यावेळी यांनी दिल्यात.

जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहित्य खरेदीसाठी जनतेची गर्दी तसेच कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधीने लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. त्यासोबतच सोशल डिस्टंसिंग, प्रत्येक वेळेस साबणाने हाथ धुणे, त्यासोबत सॅनिटायझर चा वापर आणि गर्दीच्या ठिकाणी जातांना प्रत्येकांनी मास्क वापरावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक गरीब गरजु नागरिकांना धान्य मिळावे, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करतांना गडकरी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार धान्य वितरणात येणाऱ्य अडचणी सोडविण्यात येतील, यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावा. तसेच लोकप्रतिनिधींनी धान्य वितरणासंदर्भात येणाऱ्य अडचणींची माहिती यावेळी सांगितली. ज्या कुटूंबांकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटूंबांना धान्य वितरणासंदर्भात करावयाच्या उपाययोजना संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रारंभी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना संशयित नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेले विलगीकरण केंद्राची सुविधा, बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरण करणे, तसेच त्यापरिसरात सर्वेक्षण करुन माहिती संकलित करणे, शहराच्या प्रत्येक भागात निर्जंतुकीकरण फवारणी करणे, स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचा पुरवठा, जीवनावश्यक वस्तु, भाजी विक्रेते आदींच्या विक्री संदर्भातील नियोजनासंदर्भात यावेळी माहिती दिली.

महापौर संदीप जोशी, खासदार डॉ.विकास महात्मे तसेच लोकप्रतिनिधींनी कोरोना विषाणू संदर्भात करावयाचे उपाययोजना संदर्भात बैठकी सूचना केल्यात.
***

Latest बातम्या