Justice is Due…..

मृत्यूनंतर वकीलाने देखील घेतली न्यायाधीशाचीच बाजू!
सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण
पत्नीपेक्षाही भ्रष्ट न्यायव्यवसथेचा ठरला अतुल बळी?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,दि.११ डिसेंबर २०२४: बेंगलुरुच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला ३४ वर्षीय अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी जौनपूरच्या कौटूंबिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती रिता कौशिक यांच्यावर गंभीर आरोप करीत,सेटलमेंट करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे व्हिडीयोमध्ये सांगितले!तुझ्याकडे तीन कोटी रुपये असतील म्हणूनच तुझ्या पत्नीने इतक्या कोटींची मागणी केली असेल,असे न्यायमूर्ती म्हणाल्या.हे ऐकून अतूल याला मानसिक धक्का बसला.पाच लाख रुपये दिल्यास मी तुझी केस सेटल करुन देते अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना आयुष्यभर कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील,असा दम दिला.या न्यायमूर्ती फक्त भ्रष्टच नव्हे तर दृष्ट देखील असल्याचा आरोप मृतक अतुल याने केला.अतुलने मृत्यू पूर्वी सर्वाधिक वेळ न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर संभाषण केले,त्यामुळे अतुलच्या मृत्यूला पत्नी निकीताचा लोभ व स्वार्थापेक्षाही न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे बोल लावले जात आहे.

I

(छायाचित्र : पत्नी निकीता सिंघानिया)

आज,देशातील संपूर्ण  माध्यमे तसेच सोशल मिडीयावर अतुल सुभाष याचा ८१ मिनिटांचा मृत्यू पूर्वीचा व्हीडीयो व २४ पानी लिखित तक्रारींचीच चर्चा आहे.अतुलच्या अश्‍या जाण्यामुळे देशातील नागरिक स्तब्ध झाले आहेत!कलम ४९८(अ)च्या दुरुपयोगाची देखील चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.महिलांना कौटूंबिक हिंसेपासून संरक्षण देण्यासाठी असणा-या या कलमाचा कश्‍याप्रकारे फक्त सूड भावनेतून दुरुपयोग होत आहे,यावर देशातील अनेक न्यायालयांनी तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक खटल्यांच्या वेळी,वेळोवेळी कडक शब्दात ताशेरे ओढले आहे.२०१९ मध्ये एका विवाह संबंधित संस्थेच्या माध्यमातून अतुल याने निकीतासोबत विवाह केला.एका वर्षाने त्यांना मुलगा झाला मात्र,यानंतर अतुलची पत्नी निकीता सिंघानिया व सासरच्या मंडळींनी अतुलला पैशांसाठी त्रास देण्यास सुरवात केली,असा आरोप अतुलने केला आहे.लग्नाच्या दोनच वर्षात पत्नी जौनपूरला निघून गेली.तिने अतुल व त्याचे आई-वडील व भाऊ यांच्या विरोधात कौटूंबिक हिंसा,यौन उत्पीडन,हूंड्याची मागणी,जीवे मारण्याचा प्रयत्न इत्यादीसह अनेक गंभीर आरोप करीत गुन्हे दाखल केले.
अतुलला १२० वेळा कौटूंबिक न्यायालयाच्या तारखा पडल्या. ४० वेळा तो स्वत: बंगलुरुतून येऊन जौनपूरच्या न्यायालयात हजर झाला.त्याला फक्त २३ सुट्या वर्षातून मिळत होत्या.तो या सर्व कायदेशीर व कौटूंबिक उत्पीडनातून थकून गेला होता.निकिता सिंघानियाने ६ गुन्हे खालच्या न्यायालय तर ३ हायकोर्टात दाखल केले होते.निकीताने अतुल,त्याचा भाऊ व आई-वडीलांवर हत्या,हत्येचा प्रयत्न,अनैसर्गिक लैंगिक शोषण,कौटूंबिक हिंसाचार,हूंडा मागणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे नोंदवले होते.

(छायाचित्र : कुटूंबियांसोबतचा एक सुखद क्षण)

अतुलने न्यायमूर्तीला उद्वीग्न होऊन,निकीता त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत असल्याचे सांगितले.यावर न्यायमूर्ती हसल्या व तू हे प्रकरण तडजोड करुन का सोडवित नाही?अशी विचारणा केली.सुरवातीला न्यायमूर्तीनी पत्नी व मुलाची पोटगी ८० हजार रुपये देण्याचा आदेश काढला.यानंतर पत्नीने १ कोटीची मागणी केली.हे ही नसे थोडके तर ३ कोटींची मागणी रेटून धरण्यात आली.यावर आक्षेप घेतला असता न्यायमूर्तींनी,तुझ्याकडे तेवढे पैसे असतील म्हणूनच तुझी पत्नी एवढ्या पैश्‍यांची मागणी करीत आहे,असे विधान केले.असे खटले असेच चालत राहतात,असे त्या म्हणाल्या.मला पाच लाख दिल्यास मी तुमच्यात तडजोड घडवून आणते,अन्यथा तू आणि तुझे कुटंूबिय आयुष्यभर कोर्टाच्या चकरा मारत राहतील,न्यायमूर्ती रिता कौशिक यांचे हे शब्द अतुलला अगदी आतून तोडून गेलेत अन्…!
अतुलचा हा व्हिडीयो आज संपूर्ण वृत्त वाहिन्यांनी दाखवला,सोशल मिडीयावर यावर गंभीर चर्चा झडली.ज्या न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा होती,त्यानेच अतुलचा घात केला,असा

सरळ आरोप नेटीझन्सनी केला.न्यायमूर्तींना लाच न दिल्यानेच त्यांनी अतुलला पत्नी व मुलासाठी ८० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश काढला,असा आरोप अतुल यांनी केला.इतकंच नव्हे तर माझ्या मृत्यूनंतर न्यायालयाने माझ्या आई-वडीलांना त्रास न देण्याचे आवाहन केले.पत्नीला अखेरच्या शब्दात, माझ्या मुलाला जिवनातील नैतिक मुल्ये शिकण्यासाठी माझ्या आई-वडीलांकडे सांभाळायला दे,असे आवाहन केले.आपल्या भावाला सल्ला देत,कॅमरा शिवाय त्याच्या सासरकडच्या माणसाला भेटू नकोस,असे अतुल सांगता झाला.माझे अस्थि विसर्जन तेव्हाच करा जेव्हा मला न्याय मिळेल,मला त्रास देणा-यांना शिक्षा होईल तेव्हाच अस्थि विसर्जन करा अन्यथा न्यायालया समोरील गटारीत माझ्या अस्थि टाकून द्या,अशी हताश अंतिम ईच्छा अतुलने व्यक्त केली.यानंतर त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा व्हिडीयो ज्याने कोणी बघितला तो स्तब्ध झाला.त्याच्या आईचे कारुण्य रुदन मन हेलावून टाकणारे होते.तरुण,होतकरु मुलगा,अश्‍यारितीने जग सोडून जाणे हे जगातील कोणत्याही मातेसाठी खूप जीवघेणे आहे.अतुलचा भाऊ ही म्हणाला,त्याने आमच्याशी संवाद साधला असता तर आम्ही त्याला या परिस्थितीतून आणि मनस्थितीतून सहज बाहेर काढले असते पण..?असे घडले नाही.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एका कार्यक्रमात बोलताना कलम ४९८(अ)च्या दुरुपयोगाची घटना सांगताना त्यांच्या समोर अशी केस आली होती ज्यात नव-या मुलाला लग्नाच्या आधीच या कलमामुळे ५० लाख रुपये वधू पक्षाला द्यावे लागले.तो अमेरिकेत नोकरीवर होता.तेलंगणाचे न्यामूर्ती नागरत्ना यांनी देखील या कलमाच्या दुरुपयोगाची घटना विशद केली होती.२०१७ मध्ये केरळच्या हायकोर्टाने देखील या कलममुळे कश्‍याप्रकारे अंथरुणावर असलेल्या वयोवृद्ध आजी-आजोबांना अटक झाल्यावर पोलिसांवर कठोर ताशेरे ओढले होते.यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या कलममध्ये सुधारणा करीत,पोलिसांनी तक्रारीची संपूर्ण शहनिशा करुन,त्यात तथ्या आढळल्यावरच अटक करण्याची तंबी पोलिसांना दिली.
या घटनेनंतर अतुल सुभाषच्या मामांनी न्यायमूर्तींच्या विरोधात खटला दाखल करण्याची मागणी केली तर एका वकीलाने या न्यायमूर्तींची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली आहे.अतुलने व्हीडीयोमध्ये सांगितल्याप्रमाणे या न्यायमूर्तीच्या शेजारी माधव नावाचा बाबू बसतो तो गोरगरीबांकडून Next Slip देण्यासाठी ५० रुपये वसूल करतो तर माझ्यासारख्या सुखवस्तु कुटूंबातील अशिलांकडून सहज ५०० ते एक हजार रुपये वसूल करीत असल्याचा आरोप केला.मी इतके पुरावे दिल्यानंतर ही या न्यायमूर्तींकडून मला न्याय मिळाला नाही,मी अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगून ‘Justice is Due’अशी जर्सी घालून पंख्याल लटकून आत्महत्या केली!
मात्र,अतुल सुभाष याचे वकील याने त्याच्या मृत्यूनंतर न्यायमूर्तींवर केलेल्या आरोपांबाबत पल्ला झाडत,जौनपूरच्या कौटूंबिक न्यायालयात हजारो केसेस प्रलंबित असून कामाचा ताण न्यायमूर्तींवर असल्याचे सांगितले.अतुलने केलेले आरोप हे सर्वस्वी चुकीचे असल्याचे सांगितले.वकीलांना शेवटी न्यायालयातच आपली रोजीरोटी मिळवावी लागते.एखाद्या न्यायमूर्तींच्या विरोधात कॅमरा समोर बोलून वकीली खराब करायची नसते.सत्य हे कितीही कटू असले तरी एखाद्या न्यायमूर्तीच्या विरोधात बोलल्यास इतर न्यायमूर्तींच्या नजरेत देखील तो वकील हा टार्गेट ठरत असतो,जौनपूर असो की नागपूर,जगातील कुठलेही न्यायालय असो,मरणारा अशिल हा खरा बोलून मरुन ही गेला तरी,वकील हा मात्र मृतकाचे म्हणने खोटेच ठरवून,पुढे जात असतो,अतुल सुभाषच्या वकीलाचे ‘एएनआय’या वाहिनीला दिलेले बयाण देखील ‘जल मे रहकर मगरमच्छ से बैर क्यो ले’याच पठडीतले आहे.
सोशल मिडीयावर अनेकांनी अतुल याने किडलेल्या,सडलेल्या व्यवस्थेशी न लढताच हार मानण्यावर देखील रोष व्यक्त केला.न्यायमूर्तींची लिखित तक्रार या उच्च विद्याभूषित अभियंताला देशाच्या सरन्यायाधीशांकडे पत्राद्वारे करता आली असती.याशिवाय पंतप्रधान कार्यालयासह इतर अनेक फोरम होते जिथे तो त्याच्यावरील अन्यायाविरोधात दाद मागू शकला असता मात्र,इतरांना शिक्षा देण्याच्या हव्यासापायी आपले अमूल्य व बहूमोल जिवन संपविण्याचा अट्टहास व अज्ञानाने त्याचा ही घात केला.
या जगाला काल काय घडले हे देखील आठवत नाही,त्यामुळे अतुलचा मृत्यू देखील लवकरच जगाच्या विस्मरणात जाईल,यात शंका नाही मात्र,अतुलच्या आत्महत्येचे दुख हे त्याच्या जन्मदात्यांना मरणयातना देऊन गेले आहे,या वयात ते सोसणे हे फार जीवघेणे आहे.अतुल याने किमान त्यांचा तरी विचार करायला हवा होता.न्याय-अन्यायाच्या या लढ्यात अतुलला तुरुंगवास ही भोगावा लागला असता किवा नोकरी गमावून घरी बसावे लागले असते तरी त्याच्या जन्मदात्यांना ते मंजूर झाले असते मात्र,कायमचा हा दुरावा त्यांना सहन करने कदापि शक्य होणार नाही.उधवस्त मातेचे रुदन अनेकांचे डोळे ओलावून गेले आहे.ज्या मातेने गर्भात घडवलं,प्रसव वेदना सहन करुन जन्म दिला,संगोपन केले,शिकवले,संस्कार दिले,आपल्या सुखाचा त्याग केला किमान पंख्याला लटकण्या पूर्वी त्या मातेचा तरी विचार करायला हवा होता.इतक्या लवकर हार मानायला नको होती,अशी हळहळ आज संपूर्ण सोशल मिडीयावर व्यक्त झालेली दिसून पडतेय.एका उच्च विद्याभूषित अभियंताने समाजासमोर कोणता आदर्श प्रस्थापित केला?तर भेकडपणाचा,असेच आता म्हणावे लागेल.
त्याच्या मनावरील ताण हा सहन करण्यापलीकडचा झाला होता,हे वास्तव जरी असले तरी चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तो उपचार घेऊ शकला असता.आत्महत्या हा कोणत्याही समस्यावरील पळवाट होऊच शकत नाही,भारतीय धर्मग्रंथात देखील ही कृती वर्ज्य व निषिद्ध मानली आहे.आत्महत्या करणा-यांना सद्गती मिळत नाही,कित्येक काळ त्यांना मनुष्य योनीत जन्म ही मिळत नाही,असे शास्त्र सांगतो.ब्रम्हांडात अविरत भटकंती हेच त्यांचे प्राक्तन बनतं.आत्महत्या हा भेकडपणा आहे,पळवाट आहे,बुजदिली आहे,जग अश्‍या लोकांना फार काळ सहानुभूती देत नाही किवा स्मरणात ही ठेवीत नाही,अतुलने जिवंतपणीच हा लढा जिंकला असता तर तो इतरांसाठी ही एक ‘आदर्श’ठरला असता.जगात अतुल एकमेव नाही जो ४९८(अ)ने पिडीत होता,असे हजारो अतुल आज समाजात,देशात आहेत मात्र,प्रत्येकाने आत्महत्या केली नाही.

अतुलने एक्सवर जो व्हिडीयो मृत्यू पूर्वी शेअर केला तो बघता सुप्रसिद्ध अजीज नाझाच्या लोकप्रिय कव्वालीचे बोल नकळत आठवून जातात,‘हूये नामवर बेनिशां कैसे कैसे,जमीं खा गई नौजवां कैसे कैसे..मुठी बांध के आनेवाले हात पसारे कल जायेगा..चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा….!अतुलने थोडा धीर धरला असता तर कोण जाने मुलासाठी त्याचे वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा सुखी झाले असते….!अतुलने वैवाहिक नात्यालाही थोडा वेळ द्यायला हवा होता…!किवा…त्याच्या जीवनात सुख घेऊन दुसरी कोणी जोडीदार येण्याची तरी वाट बघायला हवी होती पण….?
………………………………….

Latest बातम्या