
मनपा सभेत तिवारी यांनी प्रशासनाची लक्तरे टांगली वेशीवर
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २० ऑगस्ट: कोविड-१९च्या महामारीच्या काळात आज शासकीय व खासगी रुग्णालयात नागपूरकर जनतेसाठी वीस-वीस,तीस-तीस नंबरवर खाटांसाठी वेंटिंग आहे. कोविड संदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अग्रगण्य भूमिका घेतली. मात्र जनतेकडे त्यांचे लक्ष् च नाही.नागरिकांचे दू:ख दूर करण्यासाठी असं वाटंल ते आक्रमक भूमिका स्वीकारतील मात्र ते तर अज्ञातवासात गेले आहेत,असा घणाघाती टोळा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या ऑन-लाईन सभेत आज आयुक्तांना लगावला.
दयाशंकर तिवारी यांचा काेविडच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव महापौरांनी कालच्या सभेत स्वीकारला होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे काल सभा स्थगित करावी लागली होती. महापौरांनी प्रशासनाला संपूर्ण तांत्रिक बाबी २४ तासात सुधरवण्याचे निर्देश दिले होते. आज सकाळी ११ वा.सभेला सुरवात होताच महापौरांनी दयाशंकर तिवारी यांना स्थगन प्रस्तावामागील भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी बोलताना दयाशंकर तिवारी यांनी शहरातील जनतेला कोविडच्या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन योग्य यंत्रणा पुरविण्यास पूर्णपणे अपयशी राहील्याची टिका केली.अाधीपासूनच प्रशासनाने नागरिकांसाठी खाटांची कोणतीही व्यवस्था केलीच नाही.गेल्या सभेत २४ जून रोजी मी या विषयावर प्रशासनावर टिका केल्यानंतर २६ जून रोजी आमदार निवासात विलगीकरण केंद्र बंद करुन ३५० खांटांचे कोविड केअर सेंटरमध्ये ते परिवर्तित केले.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात कोविडच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे यासाठी महापौरांसोबत झालेल्या मागील बैठकीत आयुक्त देखील उपस्थित हाेते. त्याच वेळी शहरातील माहेश्वरी समाज असो किवा खंडेलवाल समाज,अग्रसेन समाज,गुजराती समाज,पाटीदार समाज,अनेक मंगल कार्यालयांचे मालक यांनी मनपाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली होती मात्र मनपा प्रशासनाने त्यांनाच डॉक्टर,नर्सेस,स्टॉफचा बंदोबस्त करण्यास सांगितले. शहरातील या सेवाभावी संस्था आपल्या जागा,विज,पंखे,पाणी,स्वच्छता,चहा-नाश्ता सर्व काही देण्यास तयार असताना प्रशासनाने त्यांनाच डॉक्टर्स आणि नर्सेस आणण्याची सूचना केली. अश्या अकर्मण्यशून्य आयुक्तांनी शहरातील इंडियन मेडीकल असोसिएशन(आयएमए)सोबत देखील अश्या सेवांविषयी चर्चा घडवून आणली नाही. म्हणूनच आयुक्त हे अज्ञातवासात गेले आहेत का?अशी शंका येते.
ख्रिश्चन मिशनरीच्या दोन वृद्ध भगिनी यांना कोविडची लागण झाली. त्यांना मेडीकलमध्ये भरती करण्यात आले,मात्र तेथील शौचालय ब्लॉक झाल्याने या भगिनींनी वोक्हार्टमध्ये उपचार मिळावे यासाठी फोन केला असता पर हेड दोन लाख रुपये डिपॉझिट लागतील,औषधांचा खर्च वेगळा!असे त्यांना सांगण्यात आले.मनपा प्रशासनाने आधीच शहरातील कोविडचा उपचार करणा-या रुग्णांलयांना दर ठरवून दिले आहेत.जनरल वॉडचे ४,००० र,आयसीयूचे ७.५००,वेंटिलेटरचे ९ हजार यात संपूर्ण चाचण्या,औषधांचा खर्च समाविष्ट आहे. १४ दिवसांपेेक्ष्ा जास्त उपचार होत नाही.तरी देखील पर हेड २ लाख रुपये उपचाराचा खर्च!
त्यातही या भगिनींनी सरकारी एंबूलेन्स मागवली तर कोविड रुग्णासाठी नकार मिळाला,खासगी संस्थेची एंबूलेेन्स मागवली तर...मेडीकल ते वोक्हार्ट त्यांना ७,५०० रुपये द्यावे लागले. एवढ्या पैसात तर माणूस विमानाने मुंबईपर्यंत जाऊन येतो.हीच आहे का आयुक्तांची यंत्रणा?एपिडेमिक एक्टच्या नावाने मूकदर्शक होऊन बसलेली!
७४ वर्षीय ज्योती खटी या घरात घसरुन पडल्या. पाच महिने त्या वरच्याच खोलीत होत्या.कोणाच्याही संपर्कात आल्या नव्हत्या.डॉ.अय्यर यांच्याकडे कोविडची चाचणी केली ती पॉझिटीव्ह निघाली.त्यांच्या कुटंूबियांनी दुस-या पॅथोलॉजी लॅबमध्ये चाचणी केली,संपूर्ण कुटुंबाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह निघाली.नीलेश माथूर याने तायडे हॉस्पीटलमध्ये करोना चाचणी गीतांजली समोर केली,पॉझिटीव्ह आली,भालदारपूरामध्ये केली निगेटीव्ह आली.धरमपेठच्या एका व्यापारी कुटंबियांनी मनपाच्या चाचणी केंद्रात चाचणी केली, ८ पैकी ४ पॉझिटीव्ह आलेत. खासगीमध्ये केली ८ ही जण निगेटीव्ह आलेत.भाजपच्या नेत्या डॉ.कीर्तीदा अजमेरा यांच्या मुलाने १३ ऑगस्ट रोजी मनपाच्या केंद्रात चाचणी केली,त्याला सांगण्यात आले अहवाल पॉझिटीव्ह आला की कळवू,निगेटीव्ह आला की कळवणार नाही, तब्बल ५ दिवसांनंतर प्रशासनाने त्याला फोन केला,अहवाल पॉझिटीव्ह आला!या ५ दिवसात त्याला फोनच आला नसल्याने तो अापल्या दैनदिन कामाकाजानिमित्त अनेकांना भेटला.५ दिवसांनी संपूर्ण कुटंबाने स्वसतिक लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली,सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले तरीदेखील त्यांच्या घरावर मनपा प्रशासनाने स्टीकर चिटकवले!हे होम क्वारंटाईन आहेत…यांच्यापासून दूर रहा!
डॉ.योगेंद्र सवाई यांनीच बैठकीत स्पष्ट केले होते ॲण्टीजन चाचणी ही खात्रीशीर नाही. यात निगेटीव्ह आले तरी करोनाची लक्ष् णे असू शकतात म्हणूनच आरटी-पीसीआर चाचणीच खात्रीशीर आहे. मनपाच्या २१ चाचणी केंद्रापैकी ५ केंद्रावर फक्त ॲण्टीजन चाचणी होत आहे. ५ हजार चाचणीमध्ये एक हजार पॉझिटीव्ह येत आहेत.या सर्व चाचण्या संशयास्पद आहेत.एक भयावह परिस्थिती मनपा प्रशासनाने शहरात निर्माण करुन ठेवली आहे.दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने मिळून होम क्वारंटाईनचे निकष ठरवून दिल्लीमध्ये करोना आटोक्यात आणला मात्र महाराष्ट्राला केंद्राचे कोणतेही सहकार्य नको आहे.
स्क्रीनिंग,मॉनिटरिंग,टेस्टींग, चेस्ट,खोकला, फूफ्फूसाचा संसर्ग,ऑकस्ीजनचा लेवल हे सर्व टप्पे अश्या कोविड केअर सेंटरमध्ये असण्याची गरज असताना प्रशासनाने अशी कोणतीच व्यवस्थाच केली नसल्याचा अारोप दयाशंकर तिवारी यांनी केला.मनपा सांगते १०१ ताप असला तरी घरीच रहा,केंद्र सरकार सांगते तापाचे रुग्ण घरात ठेऊ नका.मनपाच्या याच नियमामुळे आज मेडीकल आणि मेयोमध्ये सर्वाधिक मृत्यू पावलेले रुग्ण हे तापाचे रुग्ण घरी ठेवल्यानेच झाले.घरात विलगीकरणात असणा-या रुग्णांना मनपाचे डॉक्टर हे ७-७ दिवस भेटतच नाही. तपासत नाही.त्यांना देवाच्या भरवश्यावर सोडून दिले जाते.डॉक्टरच्या एका आवाजानेही रुग्ण हा बरा होत असतो,मात्र मनपा च्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर्सला फूरसत नाही.
मनपाच्या किती कोविड केंद्रात छातीचा एक्सरे होतो?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महालच्या दटके रुग्णायलातील एक्सरे टेक्नीशियनची मनपा प्रशासनाने मुख्यालयात कॉल सेंटरवर ड्यूटी लावली! रुग्णाचे एक्सरे महत्वाचे की कॉल सेंटरवर कॉल घेणे?मंगळवारी झोनचे युनानी डॉक्टर रहमान यांना एक दोन नव्हे तर दहा जवाबदा-या मनपा प्रशासनाने सोपवल्या.ते झोनल ऑफिसर ही आहेत,ते जन्म-मृत्यू विभाग देखील सांभाळतात.खासगी रुग्णालयातील अद्यावत मशीने तपासण्याचे काम देखील तेच करतात,एक युनानी डॉक्टर अद्यावत मशीन तपासण्याएवढा तज्ज्ञ असतो का?
(हे ऐकताच ११.५० वा. स्क्रीनवर आयुक्त तुकाराम मुंढे हे लेफ्ट झाल्याचे झळकले!)
नंतर मात्र ते पुन्हा जॉईन झाले.याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी शहरात मनपा प्रशासन जे काही कोविडच्या नावाखाली कार्यभार करते आहे त्या कामांचे डिजिटल बोर्ड महापौर कक्ष्ात देखील असावे,अशी मागणी केली.याशिवास वृत्तपत्रांमध्ये फोन नंबर द्यावा,यामुळे शहरात खासगी रुग्णालयांनी किती नागरिकांची लृट केली आहे,हे देखील महापौरांना कळेल.जे रुग्ण ५ दिवसात घरी गेले त्यांचे देखील बिल ५ ते ७ लाख रुपये आले!
कालच शहरातील खासगी कोविड रुग्णालयाची संख्या वाढवल्याचे छापून आले मात्र हे रुग्णालय कोविडचे रुग्ण तपासण्यासाठी खरंच तयार आहेत का?म्हणूनच आयुक्त हे कायम ‘अज्ञातवासात’असल्याचे मी बोलतो.फक्त प्रसिद्धीवर त्यांचे लक्ष् आहे. तिवारी यांच्या या वाक्यावर अनेक नगरसेवकांनी ‘शेम शेम’म्हणून प्रतिक्रिया दिली. आयुक्तांनी आपल्या उत्तरात सांगावे हे नव्याने जे रुग्णालय जोडले त्यात कोविड रुग्णांसाठी किती खाटा आहेत?विचार वगेळे..विकार वेगळे..मी मागच्या सभागृहात देखील आयुक्तांना ‘लबाड’संबाेधले मात्र ते आनंदाने संबोधले नाही,दू:खात संबोधले,असे ते म्हणाले.
ज्याच्यावर विश्वास ठेऊन हे शहर आज प्राणांची भीक मागत आहे ते किती लबाड आहेत याचे आणखी एक उदाहरण देतो. नुकतेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या कोविड संदर्भात आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यांनी विचारले मनपा प्रशासनाला कोविडच्या उपाययोजनेत कशाची कमतरता आहे का?त्यावेळी लबाड अयुक्तांनी काहीच कमतरता नाही उलट १२६० खाटा या रिकाम्या आहेत असे सांगितले.मात्र त्यांनीच काढलेल्या परिपत्रकात ९६७ रुग्ण हे उपचाराच्या प्रतिक्ष्ेत असल्याचे नमूद आहे!आयुक्त खोटे का बालले?महसूल मंत्री हे पैसे देण्यासाठी आले होते.मग का नागपूरकर जनतेसाठी सुविधा मागितल्या नाही?
चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत देखील आयुक्त तुकाराम मुंढे हे सतत खोटे बोलत होते.त्या बैठकीत देखील अायुक्तांनी दहा हजार खाटांची क्ष् मता असल्याचे सांगितले.मग तुमच्या परिपत्रकात तो दहा हजारांचा आकडा का दिसला नाही?हे विचारताच तेव्हा तो अपग्रेड नव्हता!असे चमत्कारिक उत्तर आयुक्तांनी दिले.मग तो सुधारित रुपात का दिसला नाही?तर ते जुने सादरीकरण होते,असे मुंढे म्हणाले!मला ते कंठस्थ आहेत,असे मुंढे म्हणाले. मी त्यांना दहा हजार खाटा कोणत्या ठिकाणी आहेत सांगा,असे विचारले असता त्यांनी अति.आयुक्त राम जोशी यांना सांगायला लावले. जोशी हे २१०० आकडे सांगून थांबले!मग आयुक्तांना लबाड नाही म्हणू तर काय म्हणू?
मनपा प्रशासन हे रुग्णांचे रक्त पित असल्याचा घणाघातही त्यांनी केला. नंतर मात्र त्यांचा आवाजच बंद झाल्याने पुढील भाषणात बरेचदा व्यत्य आला.

आमचे चॅनल subscribe करा