
व्यापा-यांच्या अडचणी समजून घेऊन निर्णय त्वरीत मागे घेण्याची सूचना
नागपूर,ता. १३ ऑगस्ट: मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांनी घाईघाईने कोणताही अभ्यास न करता,शहरातील व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता १८ ऑगस्ट पूर्वी सर्व व्यापा-यांनी आपापल्या कर्मचारी वर्गाची कोविड चाचणी करुन तो अहवाल झोनमधील सहा.आयुक्तांना सादर करण्याचा जो ’फतवा’काढला आहे तो त्यांनी त्वरीत मागे घ्यावा,कारण केवळ सहा दिवसात लाखो व्यापारी व त्यांच्या कर्मचारी वर्गाची कोविड चाचणी ही अशक्य कोटीतील बाब असल्याचे परखड मत महापौर संदीप जोशी यांनी आज पत्र परिषदेत व्यक्त केले.
मुंढे हे कोविडच्या संदर्भात शहरासाठी अत्यंत अव्यवहारिक निर्णय घेत असून आम्ही जेव्हा त्या निर्णयांना विरोध करतो तेव्हा आम्ही ‘राजकारण’करीत असल्याचा आरोप केला जातो. मुंढेंचा हा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचे महापौर म्हणाले.परवा १५ ऑगस्टची सुटी आहे.शहरात व्यापारी वर्गाचे चार असोसिएशन आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात ५० हजार व्यापारी तर जवळपास पाच लाख कर्मचारी आहेत.
एकीकडे शहरात सर्व प्रयोगशाळा मिळून तीन हजारच्या जवळपास कोविड चाचण्या होत असून ती देखील जनतेसाठी आहे. त्यात सहा दिवसात पाच लाख व्यापारी-कर्मचा-यांच्या चाचण्या घेणे शक्य आहे का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सहा दिवसात रोजचे ऐंशी हजार चाचण्या घ्यावा लागतील,तेवढी प्रशासनाची तरी तयारी आहे का?
ती ही स्व-खर्चाने करण्याचे निर्देश आहेत. याचा अर्थ शहरातील व्यापारी व त्यांचे कर्मचारी मिळून ८५ कोटी रुपयांचा खर्च होणार,त्यात ही आज जो निगेटीव्ह निघाला तो उद्या पॉझिटीव्ह होणार नाही कशा वरुन?मुंढेंचे कोणतेही निर्णय वास्तवतेला धरुन नसल्याचे महापौर हे म्हणाले.त्यामुळेच शहराचा प्रथम नागरिक म्हणून बोलण्याचे ठरवले.
महापौर म्हणून नागरिकांसोबत रस्त्यावर देखील उतरण्याची वेळ आली तर उतरणार.यात कुठलीही राजकीय भूमिका नाही. आयुक्तांनी नागरिकांसाठी आधी व्यवस्था उभारावी मग निर्णय लादावे!
मुंढे जनतेलाच पॅनिक करीत आहेत-
मुंढेंच्या या निर्णयावर सडकून टिका करताना महापौरांनी मुंढे हे शहरातील जनतेवर वेगवेगळे नियम लादून पॅनिक करीत असल्याची टिका केली. जेव्हा व्यापारी किवा त्यांचा कर्मचारी हा पॉझिटीव्ह आढळला तेव्हा बघता येईल,मात्र आधीपासूनच चाचण्यांचे बंधन का?आम्ही मुंढेंना शहरातील जनतेला वेठीस धरु देणार नसल्याचा इशारा यावेळी महापौर यांनी दिला.
ऑड-इवनचा निर्णयही याच स्वरुपाचा आहे. सेंट्रल ऐव्हन्यूसारख्या १२ मिटरच्या रस्त्यावर हा निर्णय लागू करु नका , ३१ जुलैच्या बैठकीत या संबंधी निर्देश दिले असताना मुंढेंनी ते लागू केले नाही कारण?कारण ते निर्देश आम्ही दिले आहेत.मुंढेंचा हा आठमुठेपणाच असून त्यांचे हे सर्व निर्णय हे दूर्देवी असल्याची टिका महापौरांनी केली.
व्यापा-यांचे शिष्टमंडळ आज येऊन भेटले तेव्हा व्यवसायासंबधीची फार विदारक परिस्थिती त्यांनी सांगितली. उदाहरणच द्यायचे असल्यास बर्डी मेनरोडवरील एका दूकानदाराला ऑड-इवन फॉर्म्यूल्यामुळे दिवसाभरात केवळ १८ हजारांचा धंदा होत आहे, कोविड पूर्वी हाच व्यवसाय ४ लाखांचा होत होता. त्यात त्याला आपल्या ७ कर्मचा-यांचा पगार, विजेचे बिल,दूकानाचे भाडे हा खर्च देखील देणे भाग आहे, यावर आणखी,अयुक्तांची व्यापा-यांवरील कोविड चाचणीची सक्ती म्हणजे अक्ष्रर: तुघलकी निर्णय असल्याची टिका महापौरांनी केली.
‘मुंढे साहेब कृपया…कृपया असे अहितकारी निर्णय घेऊ नका’असे कळकळीचे आवाहन याप्रसंगी महापौरांनी केले.व्यवस्थेवर वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे ताण पडला आहे हे आम्ही देखील मान्य करतो. ५ ऑगस्ट रोजी एका भागात करोना पॉझिटीव्ह निघाला त्याचा भाग ७ दिवसांनी सील करण्यात आला,ही वस्तूस्थिती आहे. नागपूरकर जनतेनेही स्वत:ला शिस्त लावून घेण्याची अत्यंतिक गरज आहे.मात्र करोनावर लॉक डाऊन हा उपाय नाही,याचा पुनरोच्चार महापौरांनी केला.
दूसरीकडे व्यापारी वर्ग असो किवा शहरातील रुग्णालये असोत,त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करा,त्यांच्या अडचणी समजून घ्या,’मै तुम्हारा हॉस्पीटल बंद कर दूंगा’अशी भाषा पहील्याच दिवशी बोलणे योग्य नाही. त्यांनी नियम नाही पाळले तर नक्कीच कारवाई करा,असे महापौर म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा