

लॉक डाऊन न लावल्याने व्यपारी वर्ग आनंदी
नागपूर,ता.१ आगस्ट: मनपा मुख्यालयात दूपारी १२ वाजता लॉक डाऊनच्या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांनी ’लॉक डाऊन नाही म्हणजे नाहीच’असे जे प्रशासनाला ठणकावले,प्रसंगी या मुद्दावर जनतेसोबत रस्त्यावर देखील उतरण्याचा इशारा दिला त्यांच्या या निर्णयावर शहरातील अनेक व्यापारी वर्गाने व दूकानदारांनी मनापासून आंनद व्यक्त केला. काल दूपारीच हा मॅसेज व्हायरल झाला आणि समस्त व्यापारी वर्ग सुखावला.
दि.१ ते ४ आगस्टपर्यंत बकर ईद व राखी असल्याने प्रशासन गर्दीची शक्यता लक्ष्ात घेऊन चार दिवसांचा का होईना कडकडीत लॉक डाऊन करेल,अशी धास्ती त्यांना होती. लॉक डाऊन आजच्या बैठकीनंतर लागेलच अशी शंभर टक्के शक्यता या व्यापारी वर्गाने गृहीत धरली होती मात्र त्यांची भीती फोल ठरली आणि अपेक्ष्ेपेक्ष्ाही जास्त आंनद त्यांना महापौरांच्या या निर्णयामुळे झाला. कळमना,कॉटन मार्केट पासून शहरातील बाह्य ठिकाणी भरणा-या अनेक बाजारात बघता-बघता जोशी साहेबांचा हा निर्णय सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि,हे आपल्या जोशी साहेबांनी केले…हे आपल्या जाेशी साहेबांमुळे झाले..असे स्तुतीगान महापौरांसाठी सुरु झाले.
एवढेच नव्हे तर लॉक डाऊनच्या भीतीमुळे धस्तावलेल्या व्यापारी वर्गाने तर ’…..ऐसी तैसी’सारखे शब्द मनपा प्रशासनासाठी वापरल्याची माहिती आहे!

करोनाच्या काळात मुंढेंना कायदे आठवले!
मात्र दुसरीकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज एक परिपत्रक काढून शहरातील व्यापारी वर्गाला चांगलेच अडचणीत आण्याचा डाव साधला.या परिपत्रकानुसार व्यापारी वर्गाला ज्या बाबीसाठी परवाना देण्यात आला आहे त्यांनी तोच व्यवसाय करावा,याशिवाय ज्यांच्या नावाने दूकाने आहेत व परवाने आहेत त्यांनीच व्यवसाय करावा अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ३७६ च्या तरतूदीन्वये लायसन्स/परवानाशिवाय विविक्ष्ति गोष्टी ठेवल्याचे, विवक्ष्ति व्यवसाय व कामे केल्याचे निर्दशनास आल्यास व उक्त तरतुदीचा भंग केल्याचा अपराध सिद्ध झाल्यास उचित कलमाच्या तरतूदी अंतर्गत संबधित व्यक्तीवर दंड आकारणे व दिवाणी व फौजदारी कार्यवाही दाखल केली जाईल,असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महापौरांवरचा राग व्यापारी वर्गावर!
आयुक्तांनी हे परिपत्रक काढताच याचेही पडसाद आज बाजारात उमटले.महानगरपालिका क्ष्ेत्रात मनपा आयुक्तांनी दिलेल्या लायसन्सशिवाय जागेत/इमारतीत विवक्ष्ति गोष्टी ठेवता येणार नाही व विवक्ष्ति व्यवसाय व कामे करता येणार नसल्याचे हे पत्रक आहे.कालच महापौरांनी आयुक्तांना लॉक डाऊन संदर्भात आयुक्तांना कोंडीत पकडले या शिवाय स्मार्ट सिटीच्या बैठकीत देखील ते तोंडघशी पडलेत,त्याचाच वचपा आयुक्त आता गरीब,गरजू,सामान्य व्यापारी वर्गावर परवाना आणि लायसेन्सच्या नावावर काढीत असल्याची चर्चा आज ऐकू आली.
आयुक्तांना करोनाच्या काळातच कायदे आठवले का?असा संताप दूकानदारांनी व्यक्त केला.काळ कोणता आहे?महाभयंकर साथ रोगामुळे आधीच जनसामान्यांचे जीवन ढवळून निघाले असताना आयुक्त हे नागपूरकर जनतेवर नुसता ‘सूड’ उगवायला बसलेत का?असा सवाल व्यापा-यांनी केला. आता आयुक्तांच्या या परिपत्रकामुळे परवाने काढा,पैसे खर्च करा,कुठून आणणार पैसा?नियम वगैरे सगळं ठिक आहे, आम्ही ही नियम पाळतो,सायंकाळी ७ वा.च्या ५ मिनिटांच्या आत दूकाने बंद करतो. एका दिवसा आड दूकाने उघडतो,झोनचे मनपा कर्मचारी यांची सतत नजर असते,आता परवान्याला घेऊन ते मागे लागतील!
आज परिस्थिती अशी आहे की आलू-कांदावाला धान्य ही ठेवत आहे तर धान्य विकणारा आलू-कांदेही ठेवीत आहे. ज्याला ज्या व्यवसायातून दोन पैसे मिळेल तो धंदा पोटापाण्यासाठी व्यापारी वर्ग करीत आहे. मुंढेंनी नियम पाळावे,नियमानुसार कारभार करावा मात्र करोना तर जाऊ द्या! सामान्य माणसांचे जगणे रुळावर तर येऊ द्या!शहरात इतकी वर्षे झालीत व्यवसाय करतोय पण पहील्यांदा ही अशी नोटीस पाहीली हो!कुठून शोधून काढला आयुक्तांनी हा नियम अगदी वेळेवर? जो आला ता चालान फाडतोय. मग ते मनपाचे झोनचे कर्मचारी असाे,उपद्रव शोध पथकाचे कर्मचारी असो, वाहतूक पोलीस असो,दिवसभराची कमाई ५००-७०० नाही आणि दंड बसतोय हजार रुपये,पाच हजार रुपये!
दंड नाही झाला पाहीजे जेल झाली तर चालेल!
आयुक्तांच्या या आजच्या परिपत्रकावर अनेक व्यापारी यांनी मार्मिक प्रतिक्रिया देताना दंड नाही झाला पहिजे,जेल झाली तरी चालेल,असे विधान केले.आताच तर चालान फाडताना किती वादविवाद होतात.ज्याच्यावर दंड बसतो त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो.तो वाद घालतो तर त्याच्यावर खुन्नस ठेऊन आणखी दंड आकारला जातो.आता हे नवीन काय आयुक्तांनी मागे लावले आहे?अशी चिंता व्यापारी वर्गाला पडली आहे.
मात्र आमचा फूल सपोर्ट जोशी साहेबांना असल्याचे ते म्हणाले.ईद,राखीच्या सणासुदीच्या दिवशी त्यांनीच आम्हाला टेंशन फ्री केले आमचा आनंद काल गगनात मावत नव्हता असे खास ’सत्ताधीश’ला त्यांनी सांगितले.लॉक डाऊन न लावण्याचे क्रेडीट पालकमंत्र्यांनी कितीही आव आणला तरी त्यांना नाही गेले,असेही ते म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा