Homeनागपूर न्यूजनागपूरात दोन दिवस ’जनता’ कर्फ्यू

नागपूरात दोन दिवस ’जनता’ कर्फ्यू

नागपूर,ता. २४ जुलै: नागपूर शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या संदर्भात मात्र आज दि. २४ जुलै रोजी महापौर संदीप जोशीमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संयुक्तरित्या नागपूरात उद्या शनिवार २५ व रविवार २६ जुलै असे दोन दिवसांच्या ’जनता कर्फ्यू’लागू होणार असल्याची घोषणा आज दूपारच्या बैठकीनंतर केली.

यादरम्यान मनपाच्या अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापने,दूकाने बंद राहणार आहेत.सकाळी दूध वितरण करण्यात येईल. कालच ‘फेसबूक लाईव्ह’ दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्फ्यूसह शहरात लॉक डाऊन लावण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज शुक्रवारी पदाधिकारी व अधिकारी यांची मनपा मुख्यालयात बैठक अायोजित केली होती. या बैठकीत शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा महापौर व आयुक्तांनी केली.

दोन दिवस जनता कर्फ्यू राहणार असल्याचे कळताच नागरिकांनी बाजारात गर्दी केली. शनिवारी नागपंचमी हा सण असल्याकारणाने बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली. पेट्रोल पंपावर देखील ग्राहकांची एकच झुंबड उडाली. किराणा दूकानातही ग्राहकांची गर्दी वाढली.दोन दिवसांचा भाजीपाला भरुन घेण्यात नगरिकांनी रस दाखवला.मद्य दुकाने बंद राहणार असल्याने दोन दिवसांचा ‘स्टॉक’ साठवून घेण्यासाठी मद्याच्या दूकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा दिसल्या. दूधाचे दूकान उघडे राहणार असल्याने मात्र नागपंचमी रोजी दूध,दही हे सहज उपलब्ध राहणार आहेत. तरीही कर्फ्यूच्या धास्तीने लोकांनी गरजेपेक्ष्ा जास्त खरेदी करुन ठेवण्याकडे कल दाखवला.
कर्फ्यूच्या घोषणेमुळे शहरात दोन दिवस पोलीसांचाही कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. नियम तोडणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधात पाेलीस अधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाच्या व्यतिरिक्त घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियम मोडल्यास पोलीसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक सायंकाळी पार पडली.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन ठिकाणी फिक्स पॉईंट आणि दोन ठिकाणी नाकेबंदी लावण्याचे निर्देश देण्यात आले.याशिवाय पोलीसांच्या गस्तीवाहनांवरुन ध्वनिक्ष्ेपकांवरुन नागरिकांना सूचना देण्यात येणार आहे.शहरात या दोन दिवसात आपातकालीन परिस्थितीत फिरणारी वाहने व जीवनावश्‍यक वस्तूंची आवाजाही करणारी वाहने यांनाच फक्त परवानगी असणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर दिसल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. घराबाहेर पडणा-या सर्व सरकारी कर्मचारी, अधिका-यांना आणि अत्यावश्‍यक सेवेकरिता निवडण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांची ओळखपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत.प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही त्यांची ओळखपत्रे जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिलह्यातील नागपूरला जोडल्या जाणा-या सर्व सीमा या सील केल्या जाणार आहेत. बाहेरगावातून फक्त रुग्ण व त्याचे नातेवाईक यांनाच फक्त शहरात येण्याची परवानगी राहील.शहरातील सर्वच्या सर्व भागात पोलीसांची गस्त राहणार आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करुन विनाकारण बाहेर फिरणा-या व्यक्तिींना पोलीसांच्या कडक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी महामारीच्या रुपात आलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्येय यांनी केले आहे.

जनता कर्फ्यूच्या या दोन दिवसात कुठेही गडबड,गोंधळ झाल्यास किवा समाजकंटकांनी कायदा हाती घेऊन आपात्कालीन स्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी बीट मार्शल,मोबाईल व्हॅन,शीघ्र कृती दल, दंगाविरोधी पथक तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ.नीलेश भरणे यांनी दिली आहे.

हे राहणार सुरु-
वैद्यकीय सेवा
कचरा संकलन
पाणीपुरवठा
आपत्ती व्यवस्थापन
वृत्तपत्र
दूध वितरण

Latest बातम्या