
दंडा ऐवजी समज देऊन सोडायचे होते,दूकानदारांची वेदना
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २१ जुलै: गेल्या दोन दिवसांपासून महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी हे रस्त्यावर उतरुन दूकानदार व नागरिकांना समज देत आहेत. नियम न पाळणा-यांना धारेवर धरीत आहेत. दंड आकारत आहे मात्र शहराचे प्रथम नागरिक असणारे महापौरच जर नागरिकांचे जगणे हे कोरोनाच्या काळात किती कठीण झाले आहे हे समजून घेणारे नसतील तर…महापौरांचं डोकं ठिकाण्यावर नसल्याचा असा संताप आज काही दूकानदारांनी व्यक्त केला! मुंढे यांचे ठिक आहे ते सनदी अधिकारी आहेत,आज ना उद्या बदली होऊन निघून जातील मात्र महापौर साहेब तुम्ही सुद्धा….!अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
महापौरांनी आज धरमपेठ झोनमधील बाजारात दोघांवर दंडात्मक कारवाई केली. लक्ष्मीभूवन चौकातील मांगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली, या ठिकाणी सुरक्ष्ति अंतराचे नियम न पाळल्यामुळे महापौरांनी उपद्रव शोध पथकाला दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. याशिवाय गोकूलपेठ ते राम नगर मार्गावरील दूकानांच्या ओळीत सम व विषम तारखांचे उल्लंघन करुन तसेच फुटपाथवर अतिक्रमण करुन दुकान पुढे आणलेल्या मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाद्वारे दोन्ही आस्थपनेकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले तसेच फूटपाथवरील मिल्टन शॉपचे साहित्य ही जप्त केले.

काल आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बाजारपेठेचा असाच आकस्मिक दौरा केला. झांशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारांमध्ये नियमांचे पालन होत आहे अथवा नाही,याची शहनिशा केली. नियम मोडणा-या दूकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.बर्डी,कॉटन मार्केट परिसर,सुभाष रोड,चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागर दरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरुन नियम मोडणा-या दूकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फूटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नाही(घरात कुटुंबियांसोबत उपाशी मेले तरी चालेल!)हातावर पोट असणा-या या हॉकर्सवर देखील आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली!
महापौरांनीही काल अनेक दूकानदारांवर ’ऑन दि स्पॉट’दंड ठोठावला. या पुढे नियम तोडले तर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.काल महापौरांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत बाजारांचा पायी दौरा केला. महापौरांच्या या दौ-यात गोपालनगर,प्रताप नगर परिसरात काही दुकाने सम-विषम नियमांचे उल्लंघन करताना आढळले.त्या दुकानदारांवर ऑन दि स्पॉट दंड आकारण्यात आला. ५ हजार दंडाची रक्कम भरताना दूकानदारांच्या मनात काहूर माजला होता.
नागपूरात दररोज कोरोना बाधितांची संख्या ही चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक हे बाजारात गर्दी करीत आहेत.कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे जागरुक राहणे,खबरदारी घेणे हे अत्यावश्यक आहे मात्र तीन महिन्यांच्या ’प्रदीर्घ’लॉक डाऊननंतर व्यापार-व्यवसायिक यांच्यात प्रपंच व्यवसायापुढे ‘कोरोनाची भीती’ नाहीशी झाली आहे.

लक्ष्मीनगर-धरमपेठ भाग हा सुशिक्ष्तिांचाच!
महापौर संदीप जोशी यांनी गेल्या दोन दिवसांपासून ज्या भागांचा जनजागृतिपर दौरा केला तो भाग सुशिक्ष्तांचा भाग म्हणून ओळखल्या जातो. या भागात मोठ्या प्रमाणात वकील,डॉक्टर्स साहित्यिक,प्रोफेसर,विद्यार्थी यांची संख्या जास्त आहे. अश्या सुशिक्ष्तिांमध्ये शासनाचे कोरोनाविषयी नियम पाळण्याविषयी जनजागृतीची वेळ येणे हेच मूळात दूर्देवी आहे. अश्या सुशिक्ष्तिांमध्ये महापौर यांना जनजागृती करावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, महापौर कोणामध्ये जनजागृती करीत आहेत?महापौरांचे डोके ठिकाण्यावर नसल्याचा उद्वेग ही ऐकू आला.
कळमन्यात का जात नाहीत?
कळमना बाजारात मुंढे यांनी कठोर नियम लावून एका दलालाकडे फक्त दोनच गाड्या सोडण्याचे फरमान सोडले, यामुळे शहरात मालाची आवक ही निम्म्याने घटली. भाज्यांचे भाव अचानक कडाडले. प्रत्येक दलालाकडे नेहमीप्रमाणे पंधरा ते वीस गाड्या सोडल्यास मालाची आवक ही संपूर्ण शहरात संतुलित राहील,अश्यावेळी महापौरांनी शहराचे प्रथम नागरिक म्हणून शहरातील नागरिकांप्रति कर्तव्य पार पाडीत,आपल्या अधिका-यांसह तेथील शिस्त दुरुस्त केली तर निश्चितच याचा फायदा नागरिकांना होईल,असा देखील सल्ला महापौरांना देण्यात आला!
शासनाचे नियम उपाशी ठेवणारे!
शासनाचे नियम….शासनाचे नियम,नागरिकांच्या मागे सातत्याने शासनाच्या नियमांच्या पालनाचा घोषा लावला जातो. सम विषम प्रमाणात दूकाने उघडी ठेवणे,ठराविक मोजक्याच वेळत बंद करणे,एका दूचाकीवर नवरा-बायको बसून बाहेर पडू शकत नाही,(घरात राहू शकतात,तेव्हा कोरोना होत नाही!)खासगी आस्थापनेत १५ टक्केच उपस्थिती,हॉकर्सला पोटा पाण्याची परवानगी नाही, चहा-नाश्ता पॉईंटला परवानगी नाही,ऑटो चालकांना परवानगी नाही,मूळात खरोखरच हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सूचनांचे नियमन केले आहेत का?असा प्रश्न आता नागरिक व दूकानदार उपस्थित करीत आहे,कि साथ रोग प्रतिबंध कायद्याच्या नावाखाली आयुक्तांनीच नागपूरात हे निर्गमित केलेत?असा सवाल काही दूकानदारांनी केला.
दूचाकीवर नवरा-बायको किवा एकाच कुटुंबातील सदस्यांना आधार कार्ड बघून परवानगी द्यावी. शासकीय कार्यालये व काही खासगी आस्थपने सुरु शहरात सुरु आहेत.अश्यावेळी नवरा जर आपल्या बायकोला दूचाकीवरुन अॉफिसमध्ये सोडायला गेल्या तो का म्हणून दंड भरणार?हा कोणता ‘तुघलकी’ नियम मुंढे यांनी नागरिकांवर लादला आहे?दोन मित्रांना दूचाकीवर परवानगरी देऊ नका मात्र कुटंबातील सदस्य जे एकाच घरात दिवस-रात्र राहतात,त्यांना सडकेवर निघता येत नाही?महापौर जनतेच्या या समस्या का सोडवित नाहीत?असा सवाल अनेकांनी केला.
गेल्या पंधरा दिवसांपासून केंद्राने कोरोनापासून संपूर्णपणे आपले अंग काढून घेतल्याचे देशातील नागरिक बघत आहे. केंद्र सरकार राम मंदिराच्या शिलान्यासमध्ये व्यस्त आहे.कोरोनाची जवाबदारी राज्य पातळीवर ढकलून देण्यात आली. तर ठाकरे सरकारने ती स्थानिक पातळीवर विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्यास्तरावर ढकलली. विचित्र नियमांच्या कात्रीत मात्र व्यापार उद्दीम करणारे लहान-मोठे व्यापारी,दूकानदार,फूटकळ दूकानदार आणि ग्राहक- नागरिक सापडले आहेत.मोठ्या प्रमाणात त्यांची घुसमट आता व्यक्त होऊ लागली आहे.
शिस्तीत तिरड्या काढणार का?
काही दूकानदारांनी आज आपला संताप व्यक्त करताना आयुक्त व महापौरांना कोरोना संसर्ग वाढण्याची चिंता आहे, गरीब,गरजू,दूकानदारांची त्यांना काळजी नाही.आमच्याही मागे खाणारी तोंडे आहेत, कुटुंबाच्या गरजा आहेत,कोरोनाची भीती आम्हाला पण आहे,हौस म्हणून गर्दीमध्ये व्यवसाय करीत नाही,गरज आहे म्हणून दूकाने उघडलीत. महापौर आणि आयुक्तांनी शिस्तीत कारभार करण्याचा काल पासून घोषा चालविला आहे, कोरोनाने नाही मात्र उपाशी मरण्याची वेळ कुटुंबावर आल्यास ’शिस्तीत तिरड्या काढणार का?’असा मार्मिक सवाल केला.
आज दि. २१ जुलै रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिक आक्रमक होऊन सदर,इंदोरा,जरीपटका, गांधीबाग भागात दौरा करुन अनेक दूकानांवर दंड ठोठावला. आयुक्तांचे हे दौरे आकस्मिक असतात,सायंकाळपर्यंत ते कुठे जातील याची माहिती ते आधिका-यांनाही सांगत नाही,असे त्यांचा जनसंपर्क विभाग सांगतो.पोलीसांनी चोर,दरोडेखोर,बलात्कारी,खूनी यांच्यावर जशी दबा धरुन धाड मारावी तसेच आयुक्त अचानक दूकानदारांवर,नागरिकांवर धाड टाकतात!आज सदर येथील कराची गल्लीमध्ये दूकान थाटून बसलेल्या एका दूकानदारांवर १० हजारांचा दंड आयुक्तांनी ठोठावला.अनेक दूकानदारांना त्यांनी दरडावले.मंगळवारी कॉम्प्लेक्स समोर फूटपाथावरील सर्व गाड्यांवर त्यांनी कारवाई केली.यानंतर इंदोरा,जरीपटका, नारा रोड भागात पाहणी केली व येथील अनेक दूकानांवर १० हजार रु.चा दंड आकारला. यानंतर गांधीबाग मधील गल्लोगल्ली पिंजून काढून रात्री ७ नंतर दूकाने सुरु ठेवणा-यांकडून जबर दंड वसूल केला.
सेंट्रल एव्हेन्यूवर असेलेल्या ऑटोमोबाईल्स दूकानदारांनी फूटपाथवरच दूकानदारी थाटल्याने त्या संपूर्ण रांगेतील दूकानांवर दंडात्मक कारवाई केली. कस्तूरचंद पार्क समोरील दोन मोठ्या शो रुमवर रात्री ७.३० पर्यंत दूकान सुरु ठेवल्याने जबर दंड आकारला. आयुक्त हे सेंट्रल एेव्हेन्यू व कस्तुरचंद पार्क मार्गावर (स्वत:) उभे राहून नियम मोडणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत होते!लवकरच हे सर्व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले व आयुक्तांवर(नेहमीप्रमाणे) कौतूकांचा वर्षाव पडू लागला.
मात्र महापौरांनी दंड नव्हता करायला पाहिजे, फक्त वॉर्निंग देऊन सोडायला पाहीजे होते,आम्ही त्यांचे ऐकले असते.त्यांच्या अश्या वागण्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयीचे प्रेम कमी होईल.जोशी साहेबांचं क्रेडीट जनतेमध्ये खूप चांगलं आहे मात्र ते असेच वागतील तर विचार करायला जनतेला भाग पडेल!एक व्यापारी दूस-याला सांगतो.दूसरा तिस-याला सांगतो मग दहा व्यापा-यांना ही गोष्ट कळते,यामुळे महापौरांविषयी राग वाढत जातो….!.

आमचे चॅनल subscribe करा