
नितीश ग्वालबंशी यांचे विधान: प्रशासनाला गुंतवूण ठेऊन भाजपची पत्र-परिषद
नागपूर,ता. २५ जून: महानगरपालिकेची सभा ही शनिवार २० जून रोजी भरली होती मात्र त्या सभेत मनपा आयुक्त तुकराम मुंढे हे सत्ताधा-यांच्या आरोपांनी ‘घायाळ’होऊन सभात्याग करुन निघून गेले होत.तब्बल तीन महिन्यांनी ही सभा भरली होती मात्र घडले भलतेच.यानंतर महापौरांच्या विनंतीला मान देऊन अथवा मुंबईवरुन आलेल्या ‘सूचनेवरुन’ आयुक्त हे मंगळवार दि. २३ जून रोजीच्या सभेत उपस्थित झाले.या सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनच्या मंगला गवरे यांचा स्थगन प्रस्ताव महापौरांनी स्वीकारल्यानंतर यावर गेल्या दोन दिवसांपासून सभागृहात ‘वादळी’चर्चा सुरु आहे मात्र,आज भाजपचे नितीश ग्वालवंशी यांनी चर्चेदरम्यान प्रशासन हे ‘सभागृहात’असल्यामुळेच शहरात कोराेनाचा प्रादुर्भाव ‘कमी’ झाल्याचे ‘उपरोधिक’ वक्तव्य केले आणि आयुक्तांच्या भुवया उंचावल्या.
काल दि. २३ जून रोजी मंगला गवरे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्ताव मागे घेण्याच्या पत्रावर सभागृहात ज्येष्ठ सदस्यांचे बरेच ‘खटके’उडाल्यानंतर आज देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी या प्रस्तावावरील चर्चेवर आक्ष्ेप नोंदवला. काल सभागृह स्थगित झाले,आज नवी सभा असल्याने विषय पत्रिकेला सुरवात करण्याची मागणी त्यांनी केली.नियमानुसार स्थगन प्रस्तावावरील चर्चा ही सभागृहाला त्याच दिवशी सायंकाळी ७ पर्यंत संपवावी लागते. मात्र काल महापौरांनी सायंकाळी ५.३० वा. २५ सदस्य बोलल्यानंतर सभा स्थगित केली.
यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आक्ष्ेप नोंदवित कालची सभा ही स्थगित झाली नसून तीच सभा कायम करण्यात आल्याचे सांगितले.नगरसेवक संदीप सहारे यांनी देखील सकाळी ११ वा.सभेची वेळ असताना महापौरांनी दोन्ही दिवस ती आपल्या सोयीप्रमाणे दूपारी १ वा.भरवली असल्याचे सांगितले.ते दोन तास वाया गेल्याचे सांगून स्थगन प्रस्तावावर अद्याप अनेकांना बोलायचे असल्याचे सांगितले. नियम जरी त्याच दिवशी सायंकाळी ७ पर्यंत चर्चा संपवावी हा असला तरी आजची सभा ही कालच्याच सभेची पुढील प्रक्रिया असल्याचे सांगितले.यावर प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी ’मी नियम सांगितला,हा महापौरांचा अधिकार आहे,त्यांनी आजची सभा ७ वा.संपवावी मात्र असेच जर चालत राहीले तर तब्बल १७ दिवस सभा घ्यावी लागेल,यातही आम्हाला आपले प्रश्न मांडण्याची संधी कधी मिळेल?कि स्थगन प्रस्तावावरच चर्चा सुरु राहील?प्रश्नोत्तरे कधी घेणार?तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सभा होत आहे,आम्हाला देखील अनेक प्रश्न मांडयाचे असल्याचे ते म्हणाले.
चर्चेची मर्यादा ही निश्चित केली गेली पाहिजे.नाहीतर प्रत्येक सभेत १५० पैकी १०० स्थगन प्रस्ताव येतील,मग ते क्लब केले जातील,यावरच चर्चा चालत राहील.एकाच स्थगन प्रस्तावावर चार-चार दिवस चर्चा चालणार असेल तर हा अयोग्य निर्णय होईल,असा आक्ष्ेप त्यांनी नोंदवला.यावर महापौरांनी उत्तर देत आज ७ वा.पर्यंत चर्चा चालेल,गरज पडल्यास उद्या देखील स्थगन प्रस्तावावर चर्चा होऊ शकेल,असे निर्देश दिले.अश्या निर्णयामुळे असामान्य परिस्थिती निर्माण होईल,असे प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले. याशिवाय सत्ता पक्ष् व विरोधी पक्ष्ाकडून स्थगन प्रस्ताव आल्यास विराेधी पक्ष्ाचा प्रस्ताव स्वीकारावा अशी संसदीय परंपरा असल्याचे ते म्हणाले.
यावर दयाशंकर तिवारी यांनी आक्ष्ेप नोंदवित असा नियम कुठे आहे तो वाचून दाखवण्यात यावा,असे सांगितले, यावर प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी मी नियम नाही तर ‘परंपरा’असल्याचे बोललो,असे म्हणाले. दोन स्थगन क्लब करण्यात आले,पुढच्या काळात याचे अनुकरण होईल,अशी शंका उपस्थित केली.मात्र महापौर संदीप जोशी यांनी आपल्या अधिकार क्ष्ेत्राखाली आज बुधवार दि. २४ जून रोजी कालच्या स्थगन प्रस्तावावरील पुढील चर्चेस अनुमती देऊन सभेस प्रारंभ केला.
सभागृहात शिवसेनेची कोंडी-
काल मंगळवार दि. २३ जून रोजी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, स्थगन प्रस्ताव शनिवार दि. २० जून रोजी सादर करणा-या शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी अचानक काल मंगळवारी स्थगन मागे घेण्याची विनंती करणारे पत्र महापौरांना दिले.परिणामी आयुक्तांनी प्रभागाची कामे रोखल्याने मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करणा-या गवरे या पत्र देऊन सभागृहात अनुपस्थित राहील्या.सेनेच्याच ज्येष्ठ नेत्यांकडून गवरे यांच्यावर दवाब आणल्या गेल्याची चर्चा यामुळे सभागृहाबाहेर रंगली.काँग्रेसच्या नितीन साठवणे यांनी देखील आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आक्ष्ेप नोंदवित स्थगन प्रस्ताव महापौरांना सादर केला होता.परिणामी महापौरांनी प्रस्तावाचा आशय एकच असल्याने दोन्ही प्रस्ताव एकत्रित करुन चर्चेस मंजूरी दिली होती.
प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी प्रस्ताव सादर करणा-या सदस्या मंगला गवरे सदनात उपस्थित नसल्याने यावर चर्चा स्थगित करण्याची मागणी केली मात्र माजी महापौर व भाजप आमदार प्रवीण दटके यांनी प्रस्ताव मतदानाला टाकण्याची विनंती महापौरांना केली.मात्र अवघ्या दोन दिवसात गवरे यांनी अापली भूमिका का बदलली?स्थगन मागे घेण्याच्या पत्रात गवरे यांनी विकासकामे होणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने प्रस्ताव मागे घेत असल्याचे नमूद केले,मात्र असा विश्वास गवरे यांना कोणी दिला? असा प्रश्न दटके यांनी उपस्थित केला.
दयाशंकर तिवारी यांनी असे आश्वासन देऊन स्थगन मागे घेण्याच्या प्रकारही लाचेचाच प्रकार असल्याची टिपण्णी केली आणि यावर बराच वाद गुडधे पाटील व दयाशंकर तिवारी यांच्यात काल उद् भवला.लोकसभेत प्रश्न विचारुन पैसे घेण्याच्या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला.यावर विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी पैसे घेतल्याचा अारोप सिद्ध करावा,अशी मागणी केली.दयाशंकर तिवारी यांनी यावर, मी केवळ उदाहरण देऊन सावध करीत असल्याचे सांगितले.
त्याच स्थगन प्रस्तावावर सलग दुस-या दिवशी देखील चर्चा ठेवल्याने प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी नियमांकडे बोट आज दाखवले मात्र महापौरांनी त्यांच्या अधिकारात, प्रस्तावावरील चर्चा कायम ठेवली,एवढेच नव्हे तर आज देखील चर्चा अपूर्ण राहीली असून उद्या गुरुवार दि. २५ जून रोजी पुन्हा याच प्रस्तावावर सभागृहात सकाळी ११ वा. उर्वरित सभासद बोलणार असून,आयुक्त तुकाराम मुंढे यावर उत्तर सादर करतील.
मात्र,शहरात दररोज कोरोनाचा प्रकोप वाढत असून संपूर्ण मनपा प्रशासनाला गेल्या तीन दिवसांपासून सभेत गुंतवल्याची नाराजी सभागृहा बाहेर चांगलीच उमटली होती. विशेष म्हणजे, उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वीज बिल वाढीविरोधात आज भाजपच्या गांधीसागर येथील मंगलम ईमारतीतील कार्यालयात सायंकाळी ५.३० वा. पत्र परिषद ठेवण्यात आली होती,यात महापौर संदीप जोशी,प्रवीण दटके,पिंटू झलके इ. नेते सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.
सभा सुरु असताना महापौर तसेच ज्येष्ठ नेत्यांनी पत्र परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नाही मात्र,कोविड-१९ च्या प्रकोपाच्या काळात सभागृह सलग चार दिवस चालवून,प्रशासनाच्या नियोजनाचा, अमूल्य वेळेचा दुरुपयोग होत असल्याची नाराजी आज सभागृहा बाहेर चांगलीच उमटली,हे विशेष!

आमचे चॅनल subscribe करा