

लहान गल्ल्या देखील केल्या सील: मार्केट उघडले कि आणखी बंद केले! व्यापरांचा सवाल
नागपूर,ता.२० मे: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही अटी व शर्तीवर शहरातील मध्य स्थानी असणारा सर्वात मोठा भाजी बाजार, काॅटन मार्केट हे मंगळवार दि. १९ मे पासून सुरु करण्याची परवानगी दिली होती.मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे कॉटन मार्केटमधील दर तीन-तीन दूकाने तसेच नऊ-नऊ दूकानांना लागून असणा-या लहान लहान गल्ल्लया या टिन व बल्ल्या टाकून बंद करण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. यामुळे ग्राहकांना बाजारात फिरुन खरेदी करण्याचा मार्गच बंद झाला.परणामी आयुक्त साहेबांनी ‘दूकाने उघडण्याची परवानगी दिली आहे की बंद करण्याची?’असा प्रश्न येथील व्यापारांना पडला.
गेल्या दोन महिन्यांपासून कॉटन मार्केट मधील व्यापारी वर्गाने प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करीत आपला व्यवसाय बंद ठेवला. राज्य शासनाच्या आदेशान्वये चौथ्या लॉक डाऊनमध्ये मनपा आयुक्तांनी काही अंशी शिथिलता देऊन शहरातील काही दूकाने उघडण्याची परवानगी दिली. यासोबतच अनेक अटी व शर्तींवर कॉटन मार्केट येथील बाजाराला परवानगी दिली.यात ही त्यांनी रात्री ४ ते सकाळी ८ ही अतिशय गैरसोयीची वेळ ठरवली.येथील प्रतिनिधी मंडळाने पराकोटीच्या विणवण्या करुन ही वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान करुन घेतली.

मात्र यानंतरही येथील लहान-मोठ्या ठोक व्यापा-यांच्या मागील ‘शुक्लकाष्ठ’ संपायचे नाव घेत नाही. आज बुधवार दि.२० मे रोजी मनपाच्या अतिक्रमण विभागाने कॉटन मार्केट मधील अंतर्गत गल्ल्याच टिना व बल्ल्या टाकून बंद केल्या.यामुळे ग्राहकांना आत येणे व वावरणे कठीण झाले आहे.याशिवाय कॉटन मार्केटचे मुख्य द्वार हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद करुन ठेवण्यात आले आहे. जास्त प्रमाणात गाड्यांचा वावर नको यामुळे ते उघडण्यात येणार नसल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले मात्र आता अंतर्गत गल्ल्या या देखील बंद करण्यात आल्यामुळे येथील व्यापारी वर्ग हा पराकोटीचा त्रस्त झाला आहे.
व्यापारी असणे गुन्हेगारी आहे का?
मनपाच्या या अश्या आडमुठे धोरणामुळे येथील व्यापारी वर्ग हा संतप्त झाला असून व्यापारी असणे ही गुन्हेगारी झाली का?असा सवाल ते विचारत आहेत. दरवेळी आम्हाला नियम-कायद्यांचा धाक दाखवला जातो.कुटुंबासाठी अर्थाजण करणे हा या देशात आता जणू गुन्हा झाला असल्याची ‘निराशा’ते व्यक्त करीत आहेत.दर वेळी आयुक्त साहेब,नियम मोडला तर गुन्हे दाखल करा,दंड वसूल करा असे आदेश पारित करतात,आमच्या घरातली चूल पेटते आहे की नाही?कर्जाचा किती डोंगर आमच्या डोक्यावर झाला?या प्रश्नाशी अश्या असंवेदनशील आयुक्तांना काही एक घेणे-देणे नाही,असे दू:खं येथील ठोक व्यापारी व्यक्त करीत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही एकदाही आपापल्या दूकानात फिरकलो नाहीत. आलेत का आयुक्त साहेब,आमच्या घरी डोकवयला?उपकार केल्याची भावनाच आयुक्तांमध्ये जास्त असल्याचा राग ही येथील व्यापारी वर्ग व्यक्त करीत आहेत. दूकाने उघडण्याची परवानगी दिली मात्र सतत डोक्यावर मनपाचे झोनल अधिकारी,पोलीस व कर्मचारी यांची टांगती तलवार आमच्या डोक्यावर बसवली. वरुन मनपाला आमच्याकडून बंद ठेवलेल्या दूकानांचे भाडे ही हवे आहेत,त्यात व्यापार करण्यावरही एवढी बंधने घातली आहे.आलू-कांदे ओळ ही तर सर्वाधिक अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे.
आम्ही गुन्हेगार असतो तर आयुक्त साहेबांना न जुमानता कायद्या कधीचाच हाती घेतला असता. आता मात्र त्यांनी गि-हाईक ही दूकानात शिरु न देण्याचा चंग बांधला आहे,असं आता आम्हाला वाटू लागलं आहे. माय-बाप सरकारने आता आमच्यासाठी काहीतरी करावे नाही तर,येथील व्यापारी वर्गाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याची निराशा येथील व्यापारी वर्गाने व्यक्त केली.याला जवाबदार फक्त मनपा आधिका-यांचे हे माणूसकीला धरुन न चालणारे धोरणच असेल असा ईशारा देखील त्यांनी दिला.

कॉटन मार्केटमध्ये येणारा ग्राहक हा चार दूकाने,चार गल्ल्या फिरुन भाव-ताव करुन माल विकत घेतो. येथे तर दूकानासमोरच बेरिकॅट्स लावण्यात आले.ग्राहक आत शिरणार कूठून?हे आयुक्तांनीच सांगावे. आम्ही थोडी जरी लाकडाची बल्ली बाजूला करुन ग्राहकांना आत येण्यासाठी जागा केली तर लगेच येथील गार्ड आम्हाला दंडाची व शिक्ष्ेची भीती दाखवतात!
असामाजिक तत्वांसाठी सुरक्षित सोय!
गल्लोगल्ली टिनाचे पत्रे टाकून आयुक्तांनी जो पराक्रम केला आहे त्यामुळे प्रामाणिकपणे व्यापार करणा-या व्यापारांची तर अडचण झाली मात्र या ठिकाणी वावर असणा-या असामाजिक तत्वांची चांगली सोय आयुक्तांनी करुन दिल्याची चीड एका व्यापा-याने व्यक्त केली. आता रात्रीच्या वेळी याहून अधिक सुरक्ष्ति ठिकाण त्या असमाजिक तत्वांना दूसरे मिळणार नाही. आमचाही जीव धोक्यात टाकला. त्यांना काहीच बाेलू शकत नाही. आम्हाला आमच्या कुटुंबाचा विचार आधी करावा लागतो. त्यांना चाकू काढून मारायला वेळ लागत नाही.त्यामुळे प्रशासन आणि समाजातील अवांछित तत्व दोन्हीकडून कॉटन मार्केटमधील ठोक व्यापारांचे ‘मरण’झाले आहे.
शुक्रवार दि.२२ मे रोजी आयुक्त साहेब हे शहरासाठी नवे नियम घोषित करणारच आहेत मग त्यांना आजच या बाजारातील अंतर्गत गल्ल्या बंद करण्याची काय घाई होती?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आम्ही दोन नंबरचे काम करीत नाही तरी देखील आमचाच छळवाद आयुक्तांनी मांडला असल्याचा संताप या व्यापा-यांनी व्यक्त केला.
मुंढेंनी कॉटन मार्केट उघडले की आणखी बंद केले?हा प्रश्न मात्र आज दिवसभर येथील व्यापारी वर्गाला छळत होता!आज दिवसभर एकमेव फाटकातून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्यांमधून टिना,बल्ल्लयाच येत राहील्या त्यामुळे देखील व्यवसाय झालाच नसल्याची निराशा येथील व्यापा-यांनी व्यक्त केली.
निर्देशांचे पालन न करणा-याविरुद्ध कारवाईचे मुंढेंचे आदेश-
आज बुधवार दि.२० मे रोजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देशांचे पालन न करणा-याविरुद्ध कठोर करावाई करण्याचे आदेश नव्याने पारित केले. लॉकडाऊन दिशानिर्देशांचे पालन करणे संबंधीत आस्थापना प्रमुख व दुकानदारांची जवाबदारी असून निर्देशांचे पालन न करण्या-या विरुध्द कारवाई करण्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पोलीस विभागास निर्देश दिले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मनपाने स्टॅन्डअलोन प्रकारची बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल, संगणक, मोबाईल आणि होम अप्लायंसेस दुरुस्तीची दुकाने अटी व शर्तीवर उघडण्यास दि. १७ मे च्या आदेशान्वये परवानगी दिली आहे. सदर अनुज्ञेय दुकानदारांनी, आस्थापना प्रमुखांनी सोशल डिस्टनसींग, मास्कचा वापर, परिसर निर्जूंतीकरण करणे, सॅनिटॉझरचा वापर इ. निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून त्याच अटीवर सदर अनुज्ञेता करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आली आहे. जर दुकानदार, खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण तसेच साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
दिशानिर्देशांचे पालन करणे आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे, ही जबाबदारी पूर्णत: दुकानदारांची आहे. यापुढे यात कसूर होताना आढळल्यास संबंधित दुकानदारांच्या, आस्थापना प्रमुखांच्या तसेच संबंधीत बेजवाबादार व्यक्तींच्या विरोधात भादंवि १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नागपूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत. हा आदेश लॉकडाऊन संपण्याच्या कालावधीपर्यंत अर्थात ३१ मे पर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
