Homeनागपूर मनपाकॉटन मार्केटच्या ठोक भाजी विक्रेत्यांना मनपाचा अखेर दिलासा:पहाटे ४ ते सकाळी ८...

कॉटन मार्केटच्या ठोक भाजी विक्रेत्यांना मनपाचा अखेर दिलासा:पहाटे ४ ते सकाळी ८ च्या वेळेत केला बदल

नागपूर,ता.१८ मे: तिसरा लॉक डाऊन संपत असताना चौथ्या लॉक डाऊनमध्ये केंद्राच्या सूचनेप्रमाणे उद्योग,व्यापार,बाजार,दूकानदारांना अशंत:दिलासा देण्याचा निर्णय घेताना महापालिका आयुक्त यांनी नवे दिशानिर्देश जारी केले यात कॉटन मार्केट येथील घाऊक बाजार विक्रीसाठी मंगळवार दि.१९ मे पासून परवानगी प्रदान करण्यात आली होती. मात्र यात पहाटे ४ ते सकाळी ८ दरम्यान विक्रेत्यांना विक्री करण्याची बंधने घालण्यात आली होती.ही वेळ सोयीची नसल्याने येथील प्रतिनिधी मंडळाने आज मनपाच्या अति.आयुक्तांची भेट घेऊन गैदसोयीची असणारी वेळ बदलण्याची विनंती केली.परिणामी उद्या मंगळवार पासून सकाळी ९ ते सायं ६ ची वेळ देण्यात आल्याची माहिती आहे.

लिखित स्वरुपात अद्याप कॉटन मार्केटमधील या प्रतिनिधी मंडळाला आदेश प्राप्त झाले नसले तरी मौखिक आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगाने येथील ठोक विक्रेत्यांनी आपल्या दूकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली असून गेल्या ५५ दिवसांपासून अर्थाजनाचे हे मंदिर बंद असल्याने येथील ठोक विक्रेत्यांनी शासनाचा आदेश पाळून आतापर्यंत अनेक संकटाचा सामना करीत धीर धरला होता. पहाटे ४ ते सकाळी ८ ही वेळ ठोक विक्रेत्यांसाठी अत्यंत गैरसोयीची असल्याने प्रतिनिधी मंडळाने ही वेळ बदलून देण्याची विनंती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली होती.

उरलेला माल फेकावा लागला असता-
अत्यंत गैरसोयीची ती वेळ बदलली नसती तर उर्वरित माल हा खराब होण्याची शक्यता होती. दूस-या दिवशीपर्यंत नाशवंत भाजीपाला खराब झाल्यामुळे विक्रेत्यांना तो फेकून दयावा लागला असता.तीन महिन्यांच्या जवळपास अर्थाजणच बंद असल्याकारणाने मनपाला द्यावे लागणारे दूकानाचे भाडेही या वेळेत निघणे शक्य नसल्याचे येथील विक्रेते सांगतात.वरुन कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी अनेकाने हात उधार पैसे घेतले आहे. उद्यापासून सुरु होणा-या विक्रीपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्ष्ा या विक्रेत्यांनी व्यक्त केली. मात्र मनपाने तीन महिन्यांचे दूकानांचे भाडे माफ करावे अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केली आहे.

सायंकाळी ६ नंतर दूकान सुरु राहील्यास ५ हजार रुपये दंड दूकानदारांकडून वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याचे सांगितले जात आहे.एकीकडे विक्रीची चिंता दूसरीकडे दंडाची भीती,अश्‍या विचित्र कोंडीत कॉटन मार्केटमधील ठाेक विक्रेते सापडले असून,कोरोना संबंधी शासनाचे सर्व नियम आम्ही काटेकोरपणे पाळणार असल्याचेही ते सांगतात. मात्र गांधी बाग,महाल येथील दारुच्या दूकानात मद्यपींची तूफान गर्दी लोटली असताना एका एका दूकानात २०० मद्यपींच्या गर्दीचे दृष्य असताना गर्दीच्या कारणावरुन आमच्यावर मनपाने कारवाई करु नये,अशी मागणी ही त्यांनी केली. आम्ही सामाजिक अंतराच्या नियमांचे पूर्णपणे पालन करुन व्यवसाय करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवार,गुरुवार,शनिवार कोरोना होत नाही का?शिंपी समुदायाचा प्रश्‍न-

तब्बल ५५ दिवसांच्या टाळेबंदीनंतर शिंपी समुदायाला मनपा अायुक्तांनी काही अटींवर आठवड्यातून तीन दिवस सकाळी १० ते सायं ५.३० दरम्यान दूकान उघडण्याची परवानगी दिली आहे. यावर या समुदायानेही तीव्र नाराजी व्यक्त करीत गेले तीन लॉक डाऊन कोणतीही तक्रार न करता आम्ही घरी बसलो मात्र आता चौथ्या लॉक डाऊनमध्ये आयुक्तांनी दिलासा दिला तरी काेणता? गर्दीचे कारण देत तीनच दिवस व्यवसाय करण्याची परवानगी दिली,मात्र मंगळवार,गुरुवार आणि शनिवार दूकान सुरु ठेवल्याने कोरोना होत नाही,सोमवार,बुधवार,शुक्रवारी दूकान सुरु राहील्यास कोरोना होतो का?असा मार्मिक प्रश्‍नही या समुदायाने विचारला आहे.
हातचे जमा पैसे तर मार्चमध्येच संपले. विकट परिस्थिती आहे जगण्याची. शेजारांकडून,नातेवाईकांकडून गेल्या दाेन महिन्यांपासून पैसे उधार घेऊन आला दिवस ढकळला मात्र आता घराचे भाडे,दूकानाचे भाडे, ऊसणे घेतलेले पैसे फक्त तीन दिवस दूकान सुरु ठेऊन ते ही ठराविक वेळ,कसा धंदा चालणार आहे?

लग्नसराईतर हातातून निघून गेली.जो काही मौसम उरला आहे,खूप मेहनत करावी लागणार. मायबाप आयुक्तांनी कष्टक-यांच्या या प्रश्‍नाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,आमच्या दूकानात एका वेळी आम्ही एकाच ग्राहकाला आत येऊ देऊ.त्याला सेनिटायझर देऊ, मास्क लावूनच काम करु मात्र आता आम्हाला संपूर्ण आठवडा दूकान उघडे ठेऊन व्यवसाय करु द्यावा,अशी विनंती या समुदायाने केली आहे.

नाभिक समुदायावर अद्यापही बेरोजगारीची संक्रात-

सर्वात वाईट परिस्थिती ही नाभिक समुदायाची झाली आहे.सलून चालकांनी नुकतेच प्रशासनाकडे ‘एक दिवस एक कारागिर’ या तत्वानुसार,आठवड्यातील सर्व दिवस सलून सुरु ठेऊ द्यावे,अशी मागणी केली आहे.
गेल्या ५५ दिवसांपासून सलून बंद आहेत.शहरातील ५ ते ६ हजार सलूनचालकांचे अर्थाजण पूर्णपणे बंद आहे. याशिवाय सलूनमध्ये काम करणा-या कारागिरांची संख्या ही २० हजारांच्या जवळपास आहे.इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या समुदाय पराकोटीच्या आर्थिक संकटात सापडला असून मनपा आयुक्तांनी सलून चालकांचा आतातरी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती अर्जात केली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या सर्व सुरक्ष्ात्मक उपायांचा अवलंब करण्यासाठी सलून चालक संपूर्ण सहकार्य करेल असे आश्‍वासन देखील अर्जात देण्यात आले.स्वत: मास्क लावणे तसेच ग्राहकाला मास्क लावणे अनिवार्य केले जाईल. दूकानाचे वेळोवेळी सेनिटायजेशन केले जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे एका दिवशी केवळ एक कारागिर काम करेल जेणे करुन सलूनमध्ये गर्दी होणार नाही.याशिवाय ग्राहकांना आधीच फोन करुन वेळ देण्यात येईल. कोणत्याच प्रकारची गर्दी सलूनमध्ये होऊ देणार नाही. वाटल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंतच परवानगी द्या मात्र आतातरी सलून उघडण्याची परवानगी प्रदान करावी असा आर्जव काकूळतेनी सलून व्यवसायिकांनी मनपा आयुक्तांना केला आहे.

काेरोनासोबत जगण्याची सवय करवीच लागेल-मोदींचे आवाहन
कोरोना राहणारच आहे.त्याच्याशी मुकाबला करत जनजीवन हळूहळू सुरळीत करण्याकडे आता अनेक देशांचा कल आहे.कारण इतका काळ अर्थचक्र थांबवणे कोणालाच परवडणारे नाही.भारत तर १३७ कोटींचा देश आहे. परिणामी हळूहळू कारोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू न देण्याची काळजी भारतीयांनीच घेत विस्कळीत झोलेले जनजीवन पूर्वपदावर आणणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

केंद्र व राज्य सरकारने स्थानिक पातळवर जरी बाजारपेठा व दूकानांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिला असला तरी गेले ५५ दिवस संपूर्ण भारतीयांनी तसेच नागपूरकरांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले असल्याने आता प्रशासनाने गोर गरीब,गरजू,कष्टकरी,उद्योजक,व्यवसायी,फूटकळ विक्रेते,चहा ठेले,नाश्‍ता पॉईंट,फूल विक्रेते,ऑटो चालक, रिक्शा चालक, कॅब चालक आदी हातावर पोट असलेल्यांचा विचार करुन निर्णय घेण्याची अपेक्ष्ा आता व्यक्त केली जात आहे.

सरसकट कोरोनाच्या भीतीने नियम व बंधने लादण्यापेक्ष्ा प्रशासन ,व्यवसायिक व नागरिक यांच्या समन्वयानेच कोरोनासोबतच आर्थिक संकटावर मात केली जाऊ शकते,असा विश्‍वास आता नागपूरकरही व्यक्त करीत आहे. लॉक डाऊन हा समस्येवरील सरसकट उपाय नसून सामजिक अंतर,मास्क,सेनिटायजेशन व अर्थाजण या चार गोष्टीच माणसाला आता जगवण्यासाठी व कोरोनाला हरवण्यासाठी गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत.

Latest बातम्या