
मनपा कर्मचा-यांच्या व्हॉटस ॲपवर मॅसेज व्हायरल:सोशल मिडीयावरच सोडला सुटकेचा सुस्कारा
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर,१८ मे: महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून २५ मे नंतर त्यांच्याकडे मनपाचा कारभार नसणार असल्याचा मॅसेज गेल्या दाेन दिवसांपासून मनपा कर्मचा-यांच्या व्हाटॅस ॲपवर चांगलाच व्हायरल झाला झाले.एवढेच नव्हे तर शहरातील अनेक किरकोळ विक्रेत्यांनी देखील या मॅसेजची सत्यता तपासून बघण्यासाठी आपला संपूर्ण कस लावला आहे.असे असले तरी अद्याप शासनाकडून याला अधिकृत दूजोरा मिळाला नाही.
मात्र,मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेने सोशल मिडीयावरच अनेकांनी सुटकेचा जणू सुस्कारा सोडल्याचे चित्र उमटले आहे.२७ जानेवरी राेजी तुकाराम मुंढे हे नागपूर मनपाच्या आयुक्त पदी रुजू झाले.तत्पूर्वी अभिजित बांगर यांची तडकाफडकी आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.आयुक्त पदी रुजू होताच मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीने कार्यभार हाकण्यास सुरुवात केली. सर्वस्वी भारतीय जनता पक्ष्ाची सत्ता असणा-या नागपूर मनपात मुंढे यांनी आल्याबरोबर सत्ताधारी यांच्याशीच पंगा घेण्यास सुरवात केली.नागपूर मनपात भाजपची सत्ता असल्यानेच मुंढे यांना नागपूरात बोलावण्यात आल्याची चर्चा रंगली होती.
मार्च पासून ‘काेरोना’या साथीच्या रोगाचा कहर संपूर्ण जगासोबतच उपराजधानीतही सुरु झाला. ११ मार्च रोजी नागपूरात कोरोनाचा पहीला रुग्ण सापडला.केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण कार्यभार हा प्रशासकीय अधिका-यांच्या हातात एकवटला.तेव्हा पासून मुंढे हे नागपूरात एकहाती कोरोनाशी लढा देत आहेत मात्र तरीही ११ मार्च रोजी १ कोरोना रुग्ण असणा-या बाधितांची संख्या ही दोन महिन्यात ३७० च्या घरात पोहोचली असून लवकरच ४०० चा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मनपाचे जनप्रतिनिधीच नव्हे तर शहरातील आमदार हे देखील याला मुंढेंच्या कार्यपद्धतीचं अपयश मानत आहेत.
स्थानिक काँग्रेसी मंत्रीही नाराज-
.मुंढे यांच्या कारभारावर नागपूरातील भाजपच नव्हे तर काँग्रेस पक्ष्ाचे आमदार व मंत्री यांनी देखील पराकोटीची नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील पक्ष् श्रेष्ठींपर्यंत सातत्याने मुंढेंच्या एककल्ली काराभाराविषयी नाराजीचे अहवाल पाठवले जात असून यावर ठोस कारवाई होण्याची त्यांना आशा आहे.आ.विकास ठाकरे यांनी नुकतेच मुंढे यांच्या एका निर्णयाच्या विरोधात जनआंदोलन करणा-या नागरिकांमध्ये सहभागी होऊन मुंढे यांचा उल्लेख ‘तानाशाह’असा केला.सेमिनरी हिल्सवरील मनपाच्या स्थावर इमारतीचे रुपांतर कोव्हिड रुग्णालयात करण्याचा मंढे यांच्या निर्णयाचा तेथील स्थानिक नागरिकांनी भर उन्हात विरोध केला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या मनपाच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचे धोरण सुरवातीपासूनच स्वीकारले असून मुंबईतील काही मोठ्या काँग्रेसी नेत्यांचे पाठबळ मुंढे यांना असल्याचे सांगितले जात आहे.नुकतेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘राज्यात राजकीय नेतृत्वच दिसत नाही’अशी टिका करुन सरकारला घरचा अहेरही दिला होता.सगळे अधिकार हे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे एकवटले असल्यामुळे सरकार नावाची गोष्टच नागरिकांना दिसत नसल्याची खंत व्यक्त करुन राज्यापुढील आर्थिक आव्हाने पेलताना ’व्हिजनरी लीडरशिप’ दाखवावी लागेल अशी अपेक्ष्ा व्यक्त केली होती.
मुंढे यांच्याकडे मूळात ग्रास रुट लेवलवर निर्णय घेण्याचे ‘व्हिजन’ नसल्याचे अनेक जण खाजगीत बोलत आहेत.शहरातील दूकानांबाबत,बाजारपेठा,ग्राहक,नागरिक,ज्येष्ठ नागरिक,मनपातील कर्मचारी यासर्वांसोबतच जनप्रतिनिधी,नगरसेवक,आमदार यांच्यासोबत चा त्यांचा व्यवहार बघता या शहराबाबत निर्णय घेताना फक्त स्वत:चे निर्णय लादले जात असल्याचा संतापही सोशल मिडीयावर चांगलाच व्यक्त होत आहे.
मुंबई मनपा आयुक्तांची उचलबांगडी कोरोना काळातच–
मुंबईतील मनपा आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी नुकतीच ८ मे रोजी करण्यात आली व त्यांचा कार्यभार वरिष्ठ सनदी अधिकारी इकबाल चहल यांच्याकडे सोपविण्यात आला. अर्थात कोरोनाच्या काळातच ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला असल्याने नागपूरात देखील त्याचा अंमल होऊ शकतो,अशी आशा आता मुंढेंच्या कारभाराला कंटाळलेल्या विरोधकांना लागली आहे.केंद्रिय पथकाने मुंबईच्या केलेल्या पाहणीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.नुकतेच मनपात अति.आयुक्त पदी संजय निपाणे यांच्या नियुक्तीकडे याच उद्देशाने बघितले जात आहेत.निपाणी हे या पूर्वी अमरावती मनपाचे आयुक्त पदी म्हणून कार्यरत होते.मुंढे यांच्या बदलीनंतर निपाणे यांच्याकडे कार्यभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंढेंनी शहरातील सतरंजीपुरा भागातील १७०० च्या वर तर मोमिनपुरा भागातील ६०० च्या वर नागरिकांना विलगीकरण केंद्रात पाठवले.एवढेच नव्हे तर शहरात ज्या ठिकाणी कोरोना बाधित आढळतो,सुरेक्ष् ेच्या कारणावरुन बाधिताच्या घराजवळील २०० ते ३०० नागरिकांचे विलगीकरण केले जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांचाही भरपूर रोष मुंढे यांच्यावर आहे. मुंढेंच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडीपीठात काही वकीलांनी आव्हान याचिका देखील दाखल केली आहे.
शहरातील विविध विलगीकरण केंद्रात या संशयित नागरिकांचे अक्ष् रश: हा हाल होत असून त्यांना आरोग्यदायी जिवन जगणे असह्य झाल्याची अनेक उदाहरणे प्रसार-प्रचार माध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्ध केली.मात्र मुंढे यांनी विलगीकरण केंद्रातील नागरिकांना फक्त मनपाच्या ‘कोरोना कंट्रोल रुम’च्या भरवश्यावर सोडल्याचे चित्र उमटले आहे.
विलगीकरण केंद्रात त्याची चादर रक्ताने भरली…..
वनामती येथील सतरंजीपुरा येथील एका आईचा फोन मनपाच्या कोरोना कंट्रोल रुममध्ये आला.गेल्या चार-पाच दिवसांपासून ती संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या २२ वर्षाच्या मुलाला मूळव्याधीचा त्रास आहे. त्याची चादर रोज रक्ताने भरत होती. अत्यंत काकूळतेने त्या मातेने कंट्रोल रुमच्या कर्मचा-याला मुलासाठी औषधोपचाराची सोय करावी नाहीतर मी त्याला गच्चीवरुन खाली ढकलून देईल,अशी धमकी दिली.तो फोन आल्यावर कर्मचारीने वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली.यावर मुंढेंचे खास जवळचे वैदकीय अधिकारी यांनी त्या कर्मचा-यालाच रागवून पळवून लावले. ‘मला काही नको सांगू,त्यांची नेहमीची नाटकं आहेत’अश्या असंवेदनशील शब्दात त्या लाडक्या वैद्यकीय अधिका-याने त्या मातेच्या अंतकरणातला टाहो उडवून लावला.असे दररोज एका एका शिफ्टमध्ये २०० च्या वर फोन कॉल्स कंट्रोल रुममध्ये येतात,मात्र मुंढे आणि त्यांचे संवेदनशील मनाचे वैद्यकीय अधिकारी हे विलगीकरणातील तसेच शहरातील नागरिकांचे प्रश्न कसे हाताळतात आहेत,याचे हे एकच प्रातिनिधीक उदाहरण सांगता येईल.
नगरसेवक त्रस्त ‘मुंढे सोया है क्या?’संतप्त सवाल-
मुंढे यांच्या कार्यभाराला सर्वच पक्ष्ीय नगरसेवक हे देखील त्रस्त झाले असून त्यांचा प्रभाग हा मनमानी पद्धतीने सील केला जातो.याविषयी कोणतीही नाराजी ते व्यक्त करीत नाही मात्र आता चौथा लॉक डाऊन हा अंशत:शिथिल झाल्यावर,काही दूकाने व उद्योग उघडण्याची परवानगी दिल्यानंतर नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. त्या बॅरिकेट्समुळे ३ किलोमीटरच्या ऐवजी १० किलोमीटरचे अंतर पार करुन बाहेर पडावे लागत आहे. मुंढे हे कोणत्याही जनप्रतिनिधींचे कॉल रिसिव्ह करत नाहीत.शेवटी शहरातील नगरसेवक हे आता लॅण्ड लाईनने संपर्क साधून व्यथा मांडत आहेत. जनप्रतिनिधी असल्याने स्थानिक जनता नगरसेवक किवा आमदारांकडे आपले प्रश्न घेऊन जातात मात्र त्यांच्या समस्येवर उत्तर हे केवळ मुंढेंच्याच हाती आहे.
कंट्रोल रुमला कॉल करुन थोडे बॅरिकेट्स काढण्याची विनंती केल्यास हे काम पोलिसांचे असल्याचे टोलवले जाते,पोलिस विभागाला जनप्रतिनिधी संपर्क करतात तेव्हा हे तर मनपाच्या अतिक्रमण विभागाने लावले आहेत त्यांनाच काढायला सांगा,असं उत्तर मिळतं.
मनपाचे कर्मचारीही नाराज-हैदराबाद मनपाकडून काही शिका
हैदराबादमधील मनपाने कर्मचारीच नव्हे तर आपल्या कर्मचारी व अधिका-यांच्या सर्व कुटुंबियांची काळची हैदराबाद मनपाने चोख वाहीली आहे.घरच्यांसाठी देखील ६ साबणे,सॅनिटायझर,मास्क इ.साहित्याची किटच हैदराबाद मनपा दरवेळी आपल्या कर्मचा-यांना पुरवते.मात्र मनपा मुख्यालयात एक आयुक्तांची इमारत सोडली तर इतर विंगमध्येच तर पाणीच नाही.त्यात रणरणत्या उन्हात देखील ‘कोरोना कंट्रोल रुम’मध्ये कालपर्यंत एक ही कूलर लावण्यात आला नव्हता.येथील कर्मचा-यांनी अनेकदा विनवण्याकरुन कूलर मागवला तर त्यात पाणीच नाही कारण या इमारतीमध्येच पाणी नाही.कूलरही गरम वारे फेकतोय.त्यात कंट्रोल रुमच्या कर्मचा-यांना मनपाकडून कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर,मास्क इ. साहित्य पुरविण्यात आले नाही.हे कर्मचारी आपापल्या घरुन सॅनिटायझर आणतात,इतकेच नव्हे तर एवढा गाजावाजा करुन आयुक्तांनी ज्या ’कंट्रोल रुम’ची सुरवात केली ती झाडल्या-पुसल्या देखील जात नाही. येथील कर्मचारी हे आयुक्तांच्या कक्ष् ाची सफाई करणा-या कर्मचा-याला स्वत:च घरुन आणलेले सेनिटायझर देऊन अनेक विनवण्या करुन ही कंट्रोल रुम झाडायला-पुसायला लावतात.
सर्वात धोकादायक स्थिती तर तेव्हा उद् भवते जेव्हा मनपाचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे विविध विलगीकरण केंद्रात जाऊन संशयितांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पोहोचवून पुन्हा या कंट्रोल रुममध्ये येऊन बसतात तेव्हा येथील कर्मचा-यांच्या काळजात कोरोनाच्या भीतीनेच धस्स होतं. हे वैद्यकीय अधिकारी जरी पीपीई किटचा वापर करुन परत आलेले असले तरी ते आंघोळ करीत नाही,संशयितांच्या अगदी जवळून संपर्कात आल्यामुळे कंट्रोल रुममध्ये ३-३ शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी हे सतत धास्तीत जगतात.
मुंढे साहेब फक्त एकदा सकाळी राऊंडवर येऊन औपचारीक प्रश्न विचारतात,आज किती रुग्ण वाढले?काय अपडेटस आहेत?बस निघून जातात. कंट्रोल रुम ज्या उद्देशाने सुरु केली त्या उद्देशाला मात्र मनपाचेच झोनलस्तरावरील वैद्यकीय अधिकारी कसे फटाके लावतात,याचे देखील किस्से ऐकायला मिळतात. या झोनल वैद्यकीय अधिका-यांचा कल सतत एकमेकांकडे जवाबदारी ढकलण्याकडे असतो,यासाठी ते सतत आपापसात भांडत असतात,.कंट्रोल रुममध्ये आलेल्या कॉल्सची दखल घेऊन नागरिकांचे तसेच विलगीकरणातील लाेकांचे प्रश्न त्यांना सांगितल्यास ते प्रत्येक केससाठी पुरावा मागतात.व्हॉट्स ॲपवर फोटो पाठवा,अशी मागणी लावून धरतात.नागरिकांच्या प्रत्येक समस्येचे पुरावे व्हॉट्स ॲपवर या झोनल अधिका-यांना देणे शक्य आहे का?हे आयएएस मुंढे यांनीच ठरवावे,असा देखील संतप्त सवाल येथील कर्मचारी उपस्थित करतात.
नागरिकांना साधे ई-पास देण्यासाठी देखील हे मनपाचे अधिकारी कसा छळवाद मांडतात याची देखील चर्चा कानावर पडली.मनपाचे हे कंट्रोल रुम म्हणजे,नागरिकांचे दू:ख हे मनपाच्या नोंदवहीत नोंदणी पुरतेच सिमित असल्याचे दिसून पडतंय.येथे नागरिकांच्या समस्यांची कोणतीही सोडवणूक करण्याची संवेदनशीलता मनपाच्या अधिका-यामध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. वनामतीमधून ज्या आईचा कॉल कंट्रोल रुममध्ये आला,त्याला किती वेळानंतर,कोणाकरवी,कधी,किती वाजता औषणे उपलब्ध करुन देण्यात आली?याची माहिती आता महापौरांनीच घेण्याचे सांगितले जात आहे. शहरातील प्रथम नागरिक या नात्यााने शहरातील नागरिकांचे दू:ख,समस्या,प्रश्ने सोडविण्याची जवाबदारी महापौरांची देखील असल्याचे म्हटले जात आहे.मुंढेंचे विश्वासहार्य ज्या वैद्यकीय अधिका-याने ’हे त्यांचे नेहमीचेच नाटक आहे’असे असंवेदनशील वक्तव्य केले त्याच्यावर शिस्तप्रिय व कठोर कारवाईचे धनी मुंढे हे कारवाई करतील का?त्या आईला न्याय देतील का?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांना बसवले दीड तास बाहेर!
आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या घेऊन नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील हे मुंढे यांना भेटायला गेले असता त्यांना दीड तास बाहरेच बसवल्यानंतर देखील मुंढे हे कंट्रोल रुमला गेले व त्यानंतर ते मनपा मुख्यालयाच्याच बाहेर निघून गेलेत. एका ज्येष्ठ नगरसेवकासाठी त्यांनी ५ मिनिटांचा देखील अवधी काढला नसल्याने गुडधे पाटील हे देखील कमालीचे दूखावले गेले असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी देखील नुकतीच मुंढे यांची भेट घेतली, त्यांना मुंढे हे कक्ष्ा च्या बाहेर निघताना दिसले,जनतेच्या समस्या घेऊन गेलेल्या आभा पांडे यांनी कडक शब्दातच मुंढे यांना सुनावले.त्यांची समस्या मुंढे यांनी उभ्या उभ्याच ५ मिनिटे ऐकून निघून गेले.महिला नगरसेविका म्हणून सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्ष्ा आयएएस अधिकारी यांच्याकडून केलीच नव्हती मात्र शहरातील नागरिकांच्याच समस्या जनप्रतिनिधींकडून ऐकण्यासाठी देखील मुंढेकडे वेळ कसा नसतो?असा संतप्त सवाल त्यांनी केला.
एकंदरित मुंढे यांच्या कारभारातून शहरातील नागरिक,भाजी विक्रेते, उद्योग व्यवसायिक,किरकोळ विक्रेते,मनपा कर्मचारी,नगरसेवक ते महापौर,सगळेच नाराज असल्याचे चित्र उमटले आहे. परिणामी त्यांच्या विरोधात असंख्य तक्रारी मुंबईपर्यंत येथील मंत्री पासून संत्रीपर्यंत सर्वांनीच रितसर पोहोचवल्याने मुंबईत आता मुंढे यांचा काय निकाल लागतो?या कडे नागपूरकरांचे लक्ष् लागले आहे.
दूसरीकडे मुंढे यांची बदली झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील अनेक संघटनांनी दिला आहे. मुंढे यांच्या कठोर शिस्तीच्या कारभारामुळेच नागपूरात ३७० बाधित आहेत नाहीतर हा आकडा ३ हजारांच्यावर असता असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. भाजपच्या भ्रष्टाचारी कारभारावर त्यांनी नकेल कसली म्हणून सत्ताधारी पक्ष्ाला मुंढे हे मनपात नको आहे असे देखील मुंढेंचे समर्थक सांगत आहे.मुंढेंना नागपूरातून हलवल्यास लॉक डाऊनचा नियम तोडून आंदोलन करु असा इशारा राष्ट्र निर्माण संघटनेचे अध्यक्ष् नीलेश नागोलकर यांनी दिला आहे.

आमचे चॅनल subscribe करा