Homeनागपूर न्यूजतानाशाह मुंढेंना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवावे:आ.विकास ठाकरे

तानाशाह मुंढेंना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवावे:आ.विकास ठाकरे

 

 

 

 

 

 

नागपूर शहराचा केला बट्टयाबोळ:ठाकरे यांचा आरोप:सदर येथील रुग्णालय केले काेरोना रुग्णालय

नागपूर,ता. १० मे: पश्‍चिम नागपूरातील दाट वस्तीमध्ये महापालिकेच्या आरोग्य रुग्णालयाला कोरोना रुग्णालयात परिवर्तित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे. तेथील स्थानिक नागरिकांनी मनपाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केला. अनेक दिवसांपासून निवेदन देऊन झाले मात्र आयुक्तांनी मनपाचे हे रुग्णालय कोरोना रुग्णालय होईलच असे नागरिकांना सांगितले. पश्‍चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे देखील आज रविवार दि.१० मे रोजी भर दूपारी या ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी झाले व तानाशाह मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईत घेऊन जावे,त्या ठिकाणी मुंढेंची जास्त गरज असल्याचा घणाघात केला.

२७ जानेवारी रोजी मुंढे हे मनपा आयुक्त पदी रुजू झाले मात्र लगेच कोरोना साथीच्या रोगाने संपूर्ण जग हवालदिल झालं.नागपूरात देखील जनता साथीच्या या रोगाने पराकोटीची भयभीत आहे. दररोज नागपूरात काेणत्या ना कोणत्या भागात कोराेनाचे रुग्ण आढळतात आहेत. अश्‍यावेळी मनपा आयुक्तांनी जनतेची भीती समजून घेण्याची गरज असताना तानाशाही पद्धतीने मुंढे यांनी मनमानी कारभार चालवला आहे. आता तर त्यांनी कहरच केला. सदर येथील मनपाच्या रुग्णालयाचे त्यांनी कोरोना रुग्णालयात परिवर्तित करण्याचा निर्णय म्हणजे जनतेच्या भावना व भीती समजून न घेता तानाशाही कारभारच असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

शहरात कोरोना बाधितांनी उच्चांक गाठला आहे. दररोज हजारो लोकांना घरातून विलगीकरणात पाठवले जात आहे.परिणामी नागरिकांच्या मनात आणखी जास्त भीती बसली असताना नागरिकांच्या सदनिकेजवळच असणा-या रुग्णालयात चक्क कोरोना बाधितांनाच आणून ठेवण्याचा मुंढे यांचा अट्टहास हा हूकूमशाहीच असल्याचे ठाकरे हे म्हणाले.

एवढ्या कर्तबगार आयुक्तांची खरी गरज ही मुंबईतच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंढेंना मुंबईत बोलवावे,अशी मागणी त्यांनी केली. मुंढेंच्या मनमानी कारभारामुळे नागपूरकर जनता एवढी त्रस्त आहे की आज कोरोना संसर्गाची भीती दूर सारुन शेकडो नागरिक मुंढेंच्या मनमानी कारभारा विरोधात रणरणत्या उन्हात येथे आंदोलनाला बसलेत. या परिसरात कोराेनाचा कोणताही रुग्ण आणू देणार नाही,अशी ग्वाही ठाकरे यांनी येथील नागरिकांना दिली.

विशेष म्हणजे अतिशय गजबजलेल्या परिसरात मनपाचे हे रुग्णालय असून या रुग्णालयाच्या मागील भागाला लागूनच अनेक सदनिकांच्या बालकनी आहेत. कोराेना बाधितांचा वावर येथील नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आणू शकतात. या सदनिकेत अनेक ज्येष्ठ तसेच आजारी नागरिक आहेत. त्यांच्याही मनात पराकोटीची भीती दाटली आहे. मात्र मुंढे यांना येथील नागरिकांनी अनेक निवेदने देऊन सुद्धा या रुग्णालयात खिडक्या बनवण्यासाठी तोडफोड करणे सुरु आहे.

परिणामी येथील रहीवाश्‍यांनी आज भर उन्हात आंदोलनाचा मार्ग पत्करुन मुंढे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. ’मुंढे भगाओ नागपूर बचाओ’अश्‍या संतप्त घोषणांनी आसमंत दणाणला.

नागपूर शहराचा बट्टयाबोळ मुंढेंनी केला,त्यांच्याच एककल्ली कारभारामुळे कोरोना बाधितांची संख्या ही तीनशेच्या जवळ पोहोचली असल्याचा घणाघात ही ठाकरे यांनी याप्रसंगी केला.१५० कोराना बाधितांसाठी १५ हजार रहीवाश्‍यांच्या जीवाशी खेळणा-या असा आएएस नागपूरात नको,असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला.

मुंढे हे साम्यवादी राष्ट्राचे प्रशासन चालवतात का?

मुंढे यांच्या विरोधात संताप व्यक्त करताना मुंढे हे चीन किवा रशियासारख्या साम्यवादी राष्ट्रांच्या प्रशासकीय व्यवस्थेचे अधिकारी म्हणून जास्त प्रभावी ठरले असते असा संताप येथील बुद्धिजीवींनी व्यक्त केला. लोकशाही देशात लोकांच्या भावनांना,प्रश्‍नांना समजून घेण्याची प्रगल्भता प्रशासकीय अधिका-यांमध्ये असावी लागते. मात्र साथीच्या रोगाचा कायदा राज्यात लागू झाल्याने प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंढे यांना अमर्याद अधिकार मिळाले त्याचा दूरुपयोग करुन जनप्रतिनिधींनाच नव्हे तर जनभावना देखील डावलने सातत्याने सुरु असल्याचे येथील एका माजी निवृत्त शासकीय अधिकारी रहीवाशी यांनी भावना व्यक्त केली. लोकशाहीत जनभावना ही महत्वाची असून येथील रहीवाश्‍यांना हे रुग्णालय या ठिकाणी सुरु होता कामा नये. आयुष्य भर घामाची पुंजी जमवून या सदनिका घेतल्या. आधी मनपाच्या या जागेवर शॉपिंग मॉल होणार असे सांगितले गेले. नंतर रुग्णालय बांधण्यात आले,आता तर चक्क कोरोना बाधितांनाच उपचारासाठी या ठिकाणी आणण्यात येणार असून जनभावनेच्या विरोधात मुंढे यांना कारभार करु देणार नसल्याचा इशारा येथील नागरिकांनी व्यक्त केला.

Latest बातम्या