
बाधितांचा आकडा पोहोचला १२४ वर
नागपूर,२५ एप्रिल: ११ मार्च रोजी नागपूर शहरात ‘करोना’चा शिरकाव झाला. ४४ दिवसात या विषाणूच्या संसर्गाने शंभरी गाठली. त्यातील पहील्या ५० रुग्णांची नोंद होण्यासाठी ३४ दिवसांचा कालावधी लागला मात्र दूसरे अर्धशतक हा आकडा गाठण्यास फक्त १० दिवसांचाच कालावधी लागला. शुक्रवारी शहरात १०५ करोना बाधितांची नोंद होताच नागपूर शहराने शंभरी आेलांडली होती मात्र शनिवारी एकाच दिवशी त्यात आणखी १९ बाधितांची भर पडली,आता नागपूर शहरात करोना बाधितांचा आकडा हा १२४ वर पोहोचला आहे.
उशिरा रात्रीपर्यंत यात आणखी ७ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडण्याची शंका वर्तवली जात आहे,याचा अर्थ शनिवारी रात्री हा आकडा एकाच दिवसात १३३ अंकापर्यंत पोहोचू शकतो. या ७ जणांचा संबंध यवतमाळशी असल्याची माहिती आहे. या ७ संशयितांचे नमूने हे एम्स मध्ये तपासण्यात आले आहे तर १७ संशयितांचे नमूने हे मेडीकलमध्ये तपासण्यात आले आहे. सकाळी दोन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होतो. एकाचा नमूना एम्स तर एकाची चाचणी ही मेयोमध्ये तपासण्यात आली होती. या दोन पॉझिटीव्ह पैकी एकाचे वय हे ४० तर एकाचे २४ वर्ष असून हे दोन्ही बाधित आमदार निवासात विलगीकरणात राहत होते.
आज करोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेले १७ संशयित यांना वानाडोंगरी येथील सामाजिक न्याय विभागात विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. वानाडोंगरी येथील नागरिकांनी याचा तीव्र विरोध केला होता व जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना करोना संशयितांना इतरत्र हलवण्याचे निवेदन देण्यात आले होते. वानाडोंगरी येथील १२४ संशयितांपैकी आज शनिवार दि. २५ एप्रिल रोजी १७ संशयितांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असल्याने प्रशासनासमोर दूहेरी संकट निर्माण झाले आहे.
या अहवालामुळे वानाडोंगरी येथील स्थानिकांचा उद्रेग हा अधिक तीव्र होऊ शकतो. ज्या ठिकाणी करोना संशयितांना ठेवण्यात आले आहे त्याच ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी विहीर असल्यामुळे तेथील नागरिक हे तनावात आहेत. .महत्वाचे म्हणजे वानाडोंगरी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेले १२४ संशयितांचा संबंध हा ‘सतरंजीपूरा’येथील मृत करोना बाधिताशी असून त्याच्या संपर्कात आले होते.
मनपा प्रशासनाने पोलिस विभागाच्या सहकार्याने सतरंजीपुरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांना शहरातील विविध ठिकाणी विलगीकरणात ठेवल्याने व खबरदारीचा उपाय आधीच योजिला असल्यामुळे शहरातील नागरिकांना घाबरण्याचे कारण नसले तरी सतत वाढत जाणा-या बाधितांचा आकड्याने वेगळाच ‘सामाजिक प्रश्न’ निर्माण केला आहे,तो म्हणजे संशयितांना शहरातील विविध विलगीकरणात केंद्रात ठेवण्याचा. आमदार निवास,वनामती, रवि भवन,सिम्बॉयसिस आणि कोराडी जवळील लोणार या ठिकाणी सध्या करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांना सध्या ठेवण्यात आले आहे मात्र जसजसा हा आकडा वाढत जाईल,विलगीकरण केंद्राची कमतरता,स्थानिक नागरिकांचा उद्रेग,करोना लागण होण्याची पराकोटीची मात्र सत्य भीती या सामाजिक,भावनिक,मानसिक प्रश्नांवर देखील प्रशासनालाच प्रभावी उपाय शोधणे आता गरजेचे झाले आहे.
वानाडाेंगरी येथील १२४ पैकी १७ संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह येणे यामुळे प्रशासनाची डोकेदूखी आणखी वाढली आहे. अद्याप पुन्हा या संशयितांच्या संपर्क साखळीचा शोध घेण्याचे कार्य देखील सुरु आहे. त्यांच्या देखील विलगीकरणाचा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा राहणार आहे. सध्या नागपूरकर हे कमालीचे धास्तावले आहेत.
गेल्या २४ मार्च ते काल २४ एप्रिल सलग एक महिन्यापसून नागपूरकरांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. ३ मे कडे नागपूरकर फार आशेने बघत होते. लॉक डाऊन संपायला केवळ ९ दिवसांचा अवधी उरला,या आनंदात असताना दररोज बाधितांचा वाढत जाणारा आकडा नागपूरकरांचे काळजाचे ठोके चूकवत आहे. असाच आकडा वाढत गेला तर पुढील आणखी एक महिना त्यांना घरातच बंदिस्त राहणे क्रमप्राप्त ठरणार आहे,दिल्लीतील ‘मरकज’चं हे प्रकरण देशातील इतर राज्यांसारखेच महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या उपराजधानीला किती महागात पडले,याचा तीव्र संताप देखील आता नागरिकांमध्ये व्यक्त होऊ लागला आहे.
सतरंजीपु-यातील केवळ एका बाधितांनी २३५ लोकांना संशयितांच्या साखळीत ओढले,याच संशयितांच्या साखळीतील माणसे हे करोना बाधित रुग्ण ठरत आहेत. मेयो,मेडीकलवर यामुळे अत्यधिक ताण वाढला असल्याचे देखील सांगितले जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा