
आलिया मुंढेंच्या मनी….केली कॉटन मार्केटमध्ये मनमानी!
आडवी उभी असलेल्या आयसर गाडीने केला घात: मुंढेचा वाढला संताप
कॉटन मार्केटच्या दूकानदारांचे शेड तोडण्याचे मिळाले परिणामी आदेश
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर: सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊनमध्ये असून नागपूर शहर देखील याला अपवाद नाहीच. मुख्य म्हणजे राज्यात साथी रोग कायद्याची अंमलबजावणी सुरु असल्याने नागपूरातील सर्व प्रमुख भाजीबाजार हे देखील लॉक डाऊनमुळे बंद आहेत. यात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख कॉटन मार्केटचा देखील समावेश आहे. मात्र असे असताना या मार्केट मधील तीन फूटाण्यांची दूकाने ही सुरु होती,कारण किराणा दूकानांना सूट देण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी १७ एप्रिल रोजी यातील एका फूटाण्याच्या दूकानात माल आणून देणारी एक ‘आयसर’गाडी आली.संपूर्ण बाजारच बंद असल्याने आयसर चालकाने ती सरळ उभी न करता,रस्त्याच्या मधोमध आडवी उभी केली आणि….येथेच घात झाला!
मनपा आयुक्त तुकराम मुंढे नेमके त्याच वेळी कॉटन मार्केटमध्ये शिरले आणि रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या आयसर गाडीला बघून चांगलेच संतापले. लगेच त्यांनी फरमान सोडला…सर्व दूकानांसमारेचे शेड काढून फेका! शेवटी मुंढेंचा फरमान होता,अतिक्रमण विभाग लागले तत्परतेने कामाला. आलू-कांदे ओळीतील समोर आलेले शेड तोडण्यात येऊ लागले. येथील दूकानदारांना ही माहिती कळताच त्यांनी कॉटन मार्केटला धाव घेतली.

मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज यातील अनेक दूकानांमध्ये तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. जेव्हा पासून या कॉटन मार्केटची निर्मिती झाली तेव्हा पासून यांचे दूकान याच ठिकाणी आहेत. मनपाच्या परवानगीने ५ फूटांची जागा व वरुन टिन टाकून देण्यात आले.मात्र नागपूरच्या रणरणत्या उन्हासमोर तेवढ्या टिनांच्या आडोश्याचा निभाव लागत नसल्याने या दूकानदारांनी उन्हा पासून बचावासाठी ते शेड थोडे पुढे आणले होते. आयुक्तांचा राग याच्यावरच बरसला.
लॉक डाऊनच्या काळात त्या शेड्सचा खरे तर कोणालाही त्रास नव्हता मात्र आयुक्तांना झाला.अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांनी ते तोडण्याचे फरमान सोडले आणि निघून गेलेत. गेल्या चार आठवड्यांपासून घरात एका पैसाची अावक नसताना येथील दूकानदारांवर ‘करोना’सोबतच ही प्रशासकीय आपत्तीही कोसळली.या दूकानदारांनी अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांची विणवनीही केली मात्र शेवटी मुजोर प्रशासनाकडून त्यांना अपेक्ष्ति असेच उत्तर मिळाले. ‘अतिक्रमण काढत असल्याचा आम्ही बाजार करणार नाही’याचा अर्थ गवगवा करणार नाही,उलट बाजार बंद असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ नसल्यामुळे अतिक्रमण विभागाला चांगली संधी मिळाली होती.
या ठिकाणी सकाळ पासून तर संध्याकाळपर्यंत एक महिला अधिकारी ही कर्तव्यावर असते व संपूर्ण बाजार परिसरावर लक्ष् ठेऊन असते.
जाळी काढण्याचेही फरमान…पदरातले जातात ४०० रुपये!
आलू-कांदे विकणा-या या दूकानदारांनी आपापल्या दूकानांसमोर जाळी बसवून घेतली आहे.जेणे करुन माल बाहेर पडू नये व ग्राहकांना आतील भाग दिसावा.मात्र आता अतिक्रमण विभागाने ही जाळी काढण्याचे फरमान सोडले आहे. महिनाभरापासून घरात एका पैशाची आवक नसताना येथील दूकानदारांनी वेंडरला बोलावून ही जाळी काढण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरु केले आहे.वेंडर हा दोन माणसांना सोबत घेऊन येतो.त्यालाही दिवसभराची ४०० रु.मजूरी हे दूकानदार पदरातले देत आहेत. हे ४०० रु.आजच्या लॉक डाऊनच्या काळात ४ हजारासारखे वाटतात ताई,असे एक दूकानदार गळ्यात दाटून आलेला आवंडा गिळत म्हणाला. घरी आठ माणसे खाणारी. या एकाच दूकानाच्या भरवश्यावर दोन्ही भावांचे संसार चालत आहेत. अतिक्रमण विभागाला जाळ्या तोडण्याची संधी दिली तर ते बुलडोजर चालवून कसेही जाळया तोडतील.नुकसान तर आमचेच होणार ना.
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिका-याने ही धमकीच दिली आहे ’तुम्ही नाही तोडणार तर आम्ही तोडू’जेव्हा मार्केट सुरु असतं तेव्हा मार्केटच्या आतपर्यंत कार जातात,तेव्हा मुंढे साहेब कुठे असतात?एका फूटाण्यावाल्याची आयसर आडवी उभी होती म्हणून गरीब दूकानदारांवर आयुक्तांनी राग काढल्याची भावना येथील दूकानदार खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त करतात.
मनपाला आम्ही एवढ्या लहानश्या ओट्याचे ४ हजार महीना भाडे देतो. मनपाने लाऊन दिलेले सिमेंट शीट तर कधीचेच तूटफूट झालेत. आम्हीच टिनाचे शेड टाकले. जे प्रशासन ‘मंदिर’तोडते त्यांना भाजी विक्रेत्यांच्या दूकाने तोडण्याचे काय वाटणार?मनपा समाज मंदिरे बांधून देते,माणसांच्या जगण्याचे मंदिर असणारे त्यांचे उपजिविकेचे साधन,त्यांची दूकाने एका आदेशाने तोडून निघून जातात.आम्ही त्या आयसर आडवी उभी करणा-या फूटाण्याच्या दूकानवाल्यांशी भांडलो सगळे.
त्याचा एक आयसर उभा नसता..आयुक्त साहेब त्याच वेळी तिथे आले नसते तर…तर…अशी घामाची कमाई वाया गेली नसती…आधीच दूकानाच्या आत पडलेला कांदा सडला. सगळ माल भरला होता दूकानात. बाहेर कुठेच विक्री करु शकलो नाही. आपलं कॉटन मार्केटच उघडेल या आशेवर दिवस ढकलत होतो मात्र….आयुक्तांच्या संतापासमोर गरीबांचे हात जोडनेही वाया गेले…!

आमचे चॅनल subscribe करा