Homeनागपूर मनपामनपातर्फे गरजूंच्या अन्नदानात ‘अळींचे’भोजन!

मनपातर्फे गरजूंच्या अन्नदानात ‘अळींचे’भोजन!

तीन वर्षाच्या मुलीच्या वरण-भातात निघाली एकच इंच मोठी अळी

नागपूर: मोठा गाजावाजा करीत मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मनपातर्फे १० एप्रिल रोजी गरजूंना अन्नदानासाठी ‘फूड झोन’ची निर्मिती करण्यात आली होती. मनपा मुख्यालयात शहरातील ५० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने निर्मित झालेल्या या’ फूड झोन’चा मोठा गाजावाजा करीत संपूर्ण स्वच्छता व करोनापासून सुरक्ष्ेची खबरदारी घेत शिजवलेल्या अन्नाचे पॅकिंग होणारे व्हिीडीयो मनपाच्या जनसंपर्क विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आले मात्र ९ दिवसातच मनपातर्फे शहरातील विविध स्लम वस्तीत गोरगरीबांना कोणत्या दर्जाचे अन्न पुरविले जात आहे याची झलक राणी दूर्गावती चौक येथील संजय गांधी नगरमधील स्लम वस्तीत काल शनिवार दि. १८ एप्रिल रोती वाटल्या गेलेल्या अन्नाद्वारे मिळाली.

या वस्तीत पहील्यांदाज मनपातर्फे ५० गरजूंसाठी अन्नाचे पाकिट वाटण्यात आले. एक तीन वर्षाची मुलगी हे अन्न खात असताना तिच्या वरण-भातात एक इंच आकाराची अळी निघाली. त्या निरागस,लहानश्‍या,भूकेल्या जीवाला हे काय आहे हे कळलेच नाही,तिने तिच्या बाबांना ते दाखवले आणि विचारले,बाबा हे काय आहे? तेव्हा त्यांच्याही लक्ष्ात आले मात्र तोपर्यंत त्या लेकराने त्या पॅक पाकीटातील पोळी खाऊन घेतली होती. यावेळी उत्तर नागपूरमधीलच एक स्वयंसेवी गुणवंत सोनटक्के तिथे उपस्थित होते. त्यांनी संबधित अधिका-याला फोन लावला आणि अश्‍या अन्नाबाबत विचारणा केली असता त्या अधिका-याने ’अळी निघाली तर काढून फेकून द्यायला पाहिजे, नाही खायला पाहिजे’ अशी मुजोरी केली.

यावर सोनटक्के यांनी तुमची तक्रार जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले असता,‘बरं’म्हणून त्या अधिका-याने फोन कापून दिला. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा गाजावाजा करुन शहरातील गरीब,गरजूंसाठी मनपात या फूड झोनची निर्मिती केली होती मात्र ‘करोना’विषाणूशी दोन हात करता करता,गरीबांच्या भूकेसाठी त्यांना लक्ष् पुरविता येत नसल्याचे आता म्हटल्यात जात आहे. त्यांच्याच नाकाखाली विविध स्वयंसेवी संस्था असे निकृष्ट जेवण भूकेल्या गरजूंना पुरवित असून एक प्रकारे त्यांच्या गरीबीची थट्टाच करीत असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे.

 

गरजूंची यादी १३३ वाटप मात्र फक्त ५० गरजूंना-
या भागात काल शनिवारी एकूण १३३ गरजूंना स्वयंसेवी संस्थेतर्फे अन्न वाटप करण्यात आल्याचा आकडा आयुक्तांपर्यंत पोहोचविण्यात आला मात्र प्रत्यक्षात ५० गरजूणांच अन्न वाटप करण्यात आले. असाच प्रकार उप्पलवाडी मध्ये देखील घडला, त्या ठिकाणी ५० गरजूंची संख्या सांगण्यात आली मात्र प्रत्यक्षात १० गरजूंनाच अन्न वाटप झाले,दुर्देवी चित्र तर तेव्हा उमटले जेव्हा इतर ४० भुकेले गरजू हे त्या १० गरजूंना अन्न खाताना बघत होते!मनपा आयुक्क्तांतर्फे ही गोर गरिबांची करण्यात येणारी एक प्रकारे थट्टाच असल्याचा संताप उत्तर नागपूरच्या स्लम वस्त्यांमध्ये उमटला आहे.

नुकतेच आयुक्तांनी मनापतर्फे शहरातील ३६.००० गरजू नागरिकांपर्यंत ५० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्न पुरवले जात असल्याचा आकडा सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती,कागदोपत्री हे आकडे जरी सुखावह वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्वयंसेवी संस्था हे अकड्यांमध्ये घोळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.

Latest बातम्या