Homeनागपूर मनपा११० लोकांमध्ये फक्त २ टॉयलेट! हैद्राबादमधून आलेल्या मजुरांचे हाल

११० लोकांमध्ये फक्त २ टॉयलेट! हैद्राबादमधून आलेल्या मजुरांचे हाल


११० लोकांमध्ये फक्त २ टॉयलेट! हैद्राबादमधून आलेल्या मजुरांचे हाल

महाराष्ट्र सरकार आम्हाला शिळे अन्न खाऊ घालते:उत्तर प्रदेशात परत जायचे आहे

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर, १२ मार्च: लॉक डाऊन नंतर हैद्राबाद पासून तर नागपूरपर्यंत जवळपास ११० मजूर माणसे हे ३०० किलोमीटर पायी चालत आली होती. ही सर्व माणसे उत्तर प्रदेश आणि राजस्थानपर्यंत पायी जाणार असल्याचे कळताच प्रशासनाचे धाबे दणाणले.प्रसार माध्यमांमध्ये या विषयी बातम्या प्रसिद्ध होताच नागपूरातील प्रशासनाने तातडीने हालचाल करुन या सर्वांना बॉर्डरवरच थांबवले व बेसा,रेवती नगर येथील एका हॉलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवसथा केली.

३१ मार्चच्या मध्यरात्री यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज दि. १२ एप्रिल पर्यंत ही सर्व माणसे एकाच हॉलमध्ये वास्तव्यास असून ११० माणसे मिळून फक्त दोन टॉयलेट या ठिकाणी आहेत. माणसांच्या या तांड्यामध्ये महिला,लहान मुले देखील आहेत. या सर्वांना जेव्हा कळले महाराष्ट्र सरकार त्यांना १५ एप्रिल रोजी त्यांच्या राज्याच्या बॉर्डरपर्यंत सोडून देणार नसून आता ३० एप्रिल पर्यंत त्यांना याच कोंडवाड्यात राहावयाचे आहे तेव्हा त्यांनी आज सायंकाळी एकच हल्लकळ्ळोल केला. काहीही करा मात्र आम्हाला उत्तरप्रदेशच्या बॉर्डरपर्यंत पोहोचवून द्या अशी विनंती त्यांनी त्यांना भेटायला आलेले पोलिस निरीक्ष् क यांना केली.

या सर्वांच्या डोळ्यात निराशेचे अश्रू तरळत होते. गेल्या १२ दिवसांपासून त्यांना शासनातर्फे सकाळी १२ वा. तर स्वयंसेवी संस्थेतर्फे सायंकाळी ६.३० वाजता भाजी,पोळी आणि दाळ असे अन्न पुरवले जाते मात्र स्वयंसेवी संस्थेतर्फे पुरविण्यात येणारे अन्न हे शिळे असून त्यात किडे देखील असतात असा आरोप या तांड्यातील जितू पाल या मजूराने केला आहे. लहान मुलांकडून त्या पोळ्या चावल्या देखील जात नाहीत तरी देखील जिवंत राहण्यासाठी आम्ही मुकाट्याने ती खात होतो.

मनाला एकच समाधान होते,आम्हाला आणखी फक्त ३ दिवस राहायचे आहे,सर्वांचे आभार मानून आम्ही निघून जाऊ,मात्र महाराष्ट्र सरकार आता आम्हाला या कोंडवाड्यात ३० एप्रिल पर्यंत डांबून ठेवणार असेल तर ‘करोना’नाही मात्र उपाशी राहून आम्ही आमचा जीव मात्र नक्की देणार असल्याचे तो म्हणाला.

सकाळची पोळी ही चावल्या देखील जात नाही. माझ्या घरी आई-वडील दोन भांवडे व एक बहीण आहे. मी कुटुंबात सर्वात लहान असल्यामुळे माझ्यात सर्वांचाच जीव अडकला आहे. माझी आई तर रडून रडूनच मरुन जाईल. तिच्या गळ्यात माझ्यासाठी घास अडकतो. मी मजूर माणूस आहे. ३०० किलोमीटर चालत आलो तसे आणखी ४०० किलोमीटर चालत जाईल मात्र मला माझ्या कुटुंबियांकडे जायचं असल्याचे जितू सांगत होता.

माझ्या आई-वडीलांना मी खोटे सांगतो,मी ठिक आहे.येथे सगळी चांगली सोय आहे,पण आई-वडील म्हणतात,काहीही कर तू घरी ये.त्यांनाही ही आशा होती आता फक्त ३ दिवस उरले आहेत. मात्र आता जर मी घरी सांगितले आणखी १८ दिवस मी घरी पोहोचू शकणार नाही तर माझी आई रडून रडूनच मरुन जाईल. या ठिकाणी इतकी वाईट व्यवसथा आहे की ‘करोना’ने नाही तर उपाशी राहून आणि इतर आजारांनी आमचे सर्वांचे मरण होईल.

आयुक्त तुकाराम मुंढे यांचे भाषण मी पण ऐकले. ते सांगतात ३,५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली.मला त्यांना एकच विचारायचे आहे जिथे १०० लोकांना चांगले जेवण देऊ शकत नाहीत तिथे ३६ हजार लोकांना तुमच्या स्वयंसेवी संस्था कसे जेवण जेऊ घालत असेल. ‘हमको दोन वक्त का खाना मिलता इस बात से हम इंकार नही करते मगर वो खाना खाकर ही हम बिमार हो जायेंग,मजूर आदमी है तो क्या हूआ?मेहनत का ताजा पकाके खानेवाले लोग है हम’ ऐसे ही और पंधरा दिन बासा,कच्चा खायेंगे तो बिमार हो जायेंगे.
यहा का ‘शिवम‘नाम का लडका बहोत भेदभाव करता है. मॅडमजी,गरीब का कोई नही होता,यही सच है’जितू आपली वेदना अश्‍या शब्दात प्रकट करत होता.एसपी साहेबने हमारा आधार कार्ड ,नंबर ले गये.उन्होने वादा किया था १५ एप्रिल को सबको बॉर्डर तक छोड देंगे मगर अब मुकर गये.

समुपदेशनाची कोणाला खरी गरज?

उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधून हैद्राबाद येथे मजूरी करण्यास गेलेली ही माणसे कष्टकरी आहेत. कोणी ठेकेदारकडे बांधकामावर होते.कोणी फॅक्टरीमध्ये काम करीत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता लॉक डाऊनची घोषणा केली आणि…हा मजूर वर्ग त्यात होरपळला गेला. यांना दोन दिवसांचा अवधी हवा होता फक्त आपापल्या घरी जाण्यासाठी. यांना ‘करोना’ची भीती वाटत नाही मात्र भीती वाटते ती अश्‍या जगण्याची…महाराष्ट्र शासनाची.

महाराष्ट्रा मे सबसे ज्यादा करोना पेशंट है.उलटा हमको ही यहा खतरा है,असे ते सरळ सांगतात.जिल्हा प्रशासनातर्फे आमदार निवास व वनामती मधील अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या संशयितांसाठी नागपूर शहराचे सर्वाधिक नावाजलेले समुपदेशक व मानसोपचातज्ज्ञाची फौज दिमतीला उभी केली असता,या ११० कष्टकरी माणसांनाही तेवढीच समुपदेनाशी गरज नाही का? ‘करोना से मर जाये भला मगर यहा महाराष्ट्र मे नही रहना’त्यांच्या एकच घोषा सतत सुरु आहे.

हम रो रो के यहा पागल हो जायेंगे मॅडमजी,आप तो मेरी बहना है,आपके पांव पडता हंू हम युपी के ४० लोगो को बॉडर तक पोहोचाने कह दो.त्यांची एकमेव मागणी आहे. १५ एप्रिल नंतर त्यांची सुटका होणार या आशेवर जगणारे अचानक त्यांना आणखी १८ दिवस या बंदिस्तखान्यात राहायचे आहे,याचा त्यांना चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. ‘हम यहा पागल हो जायेंगे’करोना से नही,भूक और गंदगी से मर जायेंगे, हमारे घरवाले वहा खून के आसंू रो रहे है,उनकी याद मे पागले हो जायेंगे…या त्यांच्या मानवी भावना या तेवढ्याच स्वाभाविक आहेत जितक्या सामान्य माणसांचा आहेत.

‘करोना’चे दुष्परिणाम,महाराष्ट्र शासनाची हतबलता, त्यांच्या जिविताची सुरक्ष्तिता,या सर्व गोष्टीबाबत त्यांचे योग्य समुपदेशन झाल्यास ते १८ दिवस नव्हे तर १८ महिनेही महाराष्ट्राला आपलं मानून आनंदाने कदाचित राहू शकतील,गरज आहे ती प्रशासनाने तातडीने योग्य वेळी,योग्य पाऊल उचलण्याची…!

जितू पाल-7981452862

Latest बातम्या