
सीताबर्डीतील निवारा केंद्र फक्त कागदावर: निराधाराची रवानगी परत झोपडपट्टीत
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर,९ मार्च: शहरातील ‘कराेना’बाधितांची संख्या ही १९ झाली आहे.सध्या पाठपुरावा सुरु असेलेल्या संशयितांची संख्या ही १,२१६ एवढी आहे.विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या संशयितांची संख्या ही ६३ असून एकूण ९९० संशयितांचे घशातील द्रव्य हे तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. उपराजधानीत पहीला करोना पॉझिटिव्ह रुग्ण हा १९ मार्च रोजी पश्चिम नागपूरात सापडला होता. त्याच्या कुटुंबियातील तीन जणांनाही करोनाची बाधा झाली होती.यानंतर करोनाबाधितांचा आकडा हा वाढतच गेला आणि नागपूकरांच्या काळजाचे ठोके हे वाढत गेले. परिणामी प्रदीर्घ काळाचा लॉक डाऊनचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.नागपूरची अंदाजे २७ लाख लोकसंख्या बघता प्रशासनातर्फे मेयो-मेडीकलमध्ये सुसज्ज आरोग्य यंत्रणेसोबतच शहरातील निराश्रीतांसाठी विविध ठिकाणी निवारा केंद्रे देखील उघडण्यात आले.संचारबंदीच्या काळात रसत्यावरील निराश्रीतांनाही निवारा मिळावा,त्यांच्या जेवणाची,जगण्याची सोय व्हावी यासाठी ही निवारा केंद्रे उघडण्यात आली मात्र महापालिकेच्या आयुक्तांकडून प्रसिद्ध झालेल्या यादीत सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळेत एकूण २८ निराश्रीतांची सोय करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्ध करण्यात आले,मूळात अद्याप हे निवारा केंद्र फक्त निराश्रीतांसाठी फक्त कागदावरच निवारा देत असून,याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनपाच्या पं.दिनदयाल अंत्योदय योजना नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत या निवारात आश्रय घेणा-यांच्या निवारा व जेवणाची सोय केली जाते. मात्र याच परिसरात असणारे पं.रवी शंकर शुक्ला मनपा शाळेतील निवारा केंद्रात सध्या ४३ निराश्रीत लोकांना आश्रय मिळाला आहे. या ठिकाणी ७ खोल्या व एक मोठ्या हॉलमध्ये या निराश्रितांची सोय करण्यात आली आहे.आधीच या निवारा केंद्रात ३५ निराधारांनी आश्रय घेतला होता. ३१ मार्चपर्यंत यात ८ निराधार नव्याने आलेत.आता या निवारा केंद्राची क्ष् मता पूर्ण झाली असून,शहरातील कोणत्याही भागातून पोलिसांकरवी या ठिकाणी निराधार व्यक्तीस आणल्या गेल्यास त्याला परत पाठविले जात असल्याचे या निवारागृहातील सेवकांनी सांगितले.
लॉक डाऊनचा काळ हा निश्चितच वाढणार असून,भूक आणि पोटापाण्याचा प्रश्न पुढील काळात आणखी तीव्र होणार आहे. अश्यावेळी रसत्यांवरील निराधरांचा प्रश्न ही अधिक तीव्र झाल्यास आता प्रशासनाकडे निवारागृहेच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर निवारा केंद्र म्हणून घोषित केलेल्या बुटी कन्या शाळेचे बांधकामच २०१५ पासून अद्याप सुरुच असून या निवारागृहाचे बांधकाम अर्धवट अाहे. आता कुठे इलैक्ट्रीक फिटिंगचे काम इमरातीत सुरु आहे. या निवारागृहाची क्ष मता २८ माणसांची सांगण्यात आली आहे . ५ मोठ्या खोल्या व एक मोठ्या हॉलमध्ये २० पलंग लागू शकतील असे सांगितले जाते.या शिवाय एक किचन व १ स्टोेररुमचे देखील बांधकाम सुरु आहे.

या ठिकाणी पं.रवी शंकर शुक्ला निवारा केंद्रात हल्दीराम जवळून १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेने एक निराश्रीत आणला असता,येथील क्ष् मता पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्या निराश्रीताला आत घेतल्यास या निवारागृहातील लोकांनी ते हे निवारागृह सोडून जातील,अशी धमकीच सेवेकरींना तेथील आश्रितांनी दिली. ‘करोना’या विषाणूची एवढी दहशत सध्या शहरात बघायला मिळतेय. १०८ क्रमांच्या रुग्णवाहिकेतील कर्तव्यावर असणा-या डॉ.रोहीना शेख यांना याबाबत ‘सत्ताधीश’ने विचारणा केली असता, या निराश्रीताला ना मेयोमध्ये नेता येत ना मेडीकलमध्ये,असे त्या म्हणाल्या. कारण मेयो-मेडीकलमधील ओपीडीच ही पूर्णत:बंद आहे. तिथे फक्त आपात्कालीन व करोनाचेच रुग्ण घेत आहे.
या एका निराधारासाठी आम्ही वाडीतून सीताबर्डीत आलो आहोत. मात्र मेयो-मेडीकलमधील ओपीडी बंद असल्याने या निराधाराची वैद्यकीय तपासणी होऊ शकणार नाही,इतर कोणत्याही निराधार केंद्रात वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय याला भरती करता येणार नाही.वरिष्ठांना विचारुनच आता या निराधाराविषयी निर्णय घेतला जाईल,अश्या त्या म्हणाल्या.
एकीकडे रणरणते ऊन,सगळीकडे लॉक डाऊन,शुकशुकाट,अश्या कठीण समयी १०८ क्रमांकांची रुग्णवाहिका शहरातील प्रत्येक नागरिकासाठी,निराधारांसाठी धावून येत असल्याचे दृष्य हे कौतुकास्पद होते मात्र दूसरीकडे त्या निराधाराला मात्र ना मेयो ना मेडीकल,ना निराधार केंद्र कुठेही जायचे नव्हते, त्याचे सातत्याने एकच म्हणने चालू होते…मला माझ्या झोपडपट्टीत सोडून द्या..मी माझ्या झोपडीत पडून राहील..’मेयो-मेडीकलवाले मला आधार कार्ड मागतील,माझ्या बाप-दादांचे कागदपत्रे मागतील,माझ्याकडे काहीच नाही,मला माझ्या झोपडीतच जाऊ द्या.मी लग्न नाही केले,मला कुटुंबिय नाही मात्र शेजारी आहेत ते मला भूकं मरु देणार नाही…मला नको निराधार केंद्र..मला झोपडपट्टीत सोडून द्या.
येणारा काळ हा प्रशासन,जिवनावश्यक सेवेचे अधिकारी,कर्मचारी आणि नागपूरच्या २७ लाख लोकसंख्येची कठोर परिक्ष्ा बघणारा असणार आहे. लॉक डाऊनची मुदत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलून ११ एप्रिल रोजी निश्चित करणार आहेत. अश्यावेळी नागपूरात लॉक डाऊनची मुदत वाढल्यास,निम्न आणि अति निम्नस्तरातील लोकांच्या जिवनाची कठोर परीक्ष्ा घेणाराच ठरेल,अश्यावेळी सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळेसारखे ‘निर्माणाधीन’निवारा केंद्रे मनपाने घोषित करु नये,असे आता खाजगीत बोलले जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा