
सामानाच्या पाकिटांवर चक्क नेत्यांची छबी: दान करताय की ढोल वाजवताय?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर: एकीकडे देशाचे पंतप्रधान,शासन,प्रशासन हे घसा कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत आहे,करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी,सामाजिक अंतर ठेवा, एक मीटरचे अंतर राखा,तोंडावर मास्क लावा,हात वारंवार सेनिटायझरने धूवा मात्र या देशातील काही नेते मंडली यांना हा गैरसमज झाला असावा हे नियम फक्त जनसामान्यांसाठीच आहे.नेते,माजी आमदार यांच्यासाठी हे नियम नाहीत.तसेही समाजातील सेलिब्रिटी असल्याकारणाने त्यांचे कोणी काहीच ‘वाकडे’ करु शकत नाही.
असेच एक उदहारण मंगळवार दि. ३१ मार्च रोजी,नागपूरातील ‘फकीरवाडी’वस्तीत नागरिकांना ‘उघड्या डोळ्यांनी’बघायला मिळाले आणि ’उघडा डोळे..बघा नीट..कोरोना संकटातही नेत्यांची कशी ‘चमकोगिरी चालली आहे’याचा संताप फकीरवाडीतील काही नागरिकांनी खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केला.
फकीरवाडीत आतापर्यंत गरिबांचा कैवार घेण्यासाठी एकही नेता,नगरसेवक फिरकला नसलल्याचा दावा एका महिलेने केला आहे.हे वारंवार त्या तेथील नागरिकांच्या मनात बिंबवत होत्या. त्या कोणत्याही प्रकारच्या सुरक्ष्ेची काळजी न वाहता चक्क नागरिकांच्या हातात धान्याचे पाकिट सुपुर्द करत असल्याचे फोटो व्हायरल झाले. तुम्ही आशिष देखमुख यांचे आभार माना,त्यांच्याकडे निवडणूकीत लक्ष् द्या सांगत,ही करोना विरुद्धची लढाई आहे की माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातली असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला.
कहर तर तेव्हा झाला जेव्हा छोट्याश्या धान्याच्या पाकिटावर चक्क आशिष देखमुख यांचा फोटो झळकला. ‘वाटायचे पावभर प्रसिद्धी करायची किलोभर’अशी म्हण एका नागरिकाने म्हणून दाखवली. या महिलेने व तिच्या चमूने संपूर्ण फकीरवाडीत फिरताना स्वत: मास्क लावला नव्हता,नागरिकांना देखील त्यांच्या या कृत्याने धोक्यात टाकले असून,माजी आमदार आशिष देखमुख यांच्या या आगाऊपणावर आता शिस्तप्रिय मनपा आयुक्त यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
संपूर्ण २७ लाख नागपूरकर जनता,वृद्ध,तरुणाई, लहान मुले,गृहीणी,नोकरदार सगळे गेल्या सात दिवसांपासून घरात डांबून आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करीत आहे.अश्यावेळी ‘गरीबांचा कैवार व समाजसेवेच्या नावाखाली उघड उघड करोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याचा धोका निर्माण करणा-या नेत्यांविरुद्ध आता जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त कारवाई करणार का?की त्यांचा जोर फक्त सामान्य जनतेवरच चालतो,याकडे नागरिकांचे लक्ष् लागले आहे.
विशेष म्हणजे आशिष देखमुख यांनी आपल्या या चमकोगिरीच्या कृत्यामुळे फक्त ‘फकीरवाडीच्याच’जनतेला धोक्यात आणले नसून,मंगळवारी त्यांची चमू वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये फिरली. पुढील १४ दिवस घरातच रहा म्हणून कंठशोष करणारे प्रशासन अश्या समाजसेवेच्या चमकोगिरी उपक्रमांना आता कोणता पायबंद घालतेय याकडे नागरिक लक्ष् ठेऊन आहेत.
सामान्य नागरिकांवर पोसिलसांकरवी अमानुष लाठीमार करवणारे प्रशासन अश्या बड्या नेत्याविरुद्ध आता नियम मोडले,आणिबाणिचा कायद्या मोडला,आचारसंहिता भंग केली, गरीब जनतेचा जीव धोक्यात आणला,करोना विषाणूचा संसर्गाचा धोका वाढवला,या सबबीखाली गुन्हा दाखल करणार का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा-आयुक्तांचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकंडाऊन’ दरम्यान गरजू लोकांना अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात देत आहे. मात्र मदत पुरविताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणाऱ्यांना अडचणीतून जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक अशा गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. रस्त्यांवर असणाऱ्या लोकांनाही अन्न पुरविले जात आहे. मात्र हे करताना काही ठिकाणी मदत घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत. यामुळे कोरोनाचे समूह संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. समाजकार्य करायलाच हवे. मात्र, कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसे न झाल्यास, दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

आमचे चॅनल subscribe करा