Homeनागपूर मनपामहापौरांनी शहरभर फिरुन केले जनतेला आवाहन

महापौरांनी शहरभर फिरुन केले जनतेला आवाहन


गर्दी करुन फिरणे टाळले,भविष्यासाठी ‘लॉकडाऊन‘पाळा केली विनंती

नागपूर: शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांनी रविवारी आपल्या चार चाकी वाहनातून संपूर्ण शहर पिंजून काढला. हातात माईक घेऊन लाऊडस्पीकरवर त्यांनी संपूर्ण नागपूरकर जनतेशी संवाद साधला. आपल्या भविष्यासाठी ‘लॉकडाऊन पाळा’हे कळकळीचे आवाहन करताना,करोना विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी घरातच राहण्याची विनंती केली.विशेष म्हणजे ही जनजागृती करताना त्यांनी कोणाताही ‘लावाजामा’ सोबत घेतला नाही. महापौर हे जर रस्त्यावर उतरले असते तर निश्‍चितच त्यांना आपल्या समस्या सांगण्यासाठी, प्रश्‍न विचारण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी गर्दी जमा झाली असती.

संपूर्ण जगावर कोसळलेल्या कोरोना नावाच्या मानवजातीचा वैरी ठरलेल्या विषाणूच्या विरोधात संपूर्ण जगच लढा देत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारताने या संकटाला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलली असताना,नागपूरात प्रशासनातर्फे देखील कडक उपाययोजना अंमलात आणली जात आहे. आपण सर्वच एका कठीण परिस्थितीशी मुकाबला करीत असताना नागपूर महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्त यांच्या प्रयत्नांच्या ‘दोन दिशांचा’ अनुभव मात्र आज नागपूरकरांनी घेतला.

शनिवार दि. २८ मार्च रोजी महापौरांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधला होता,त्यात एका नागरिकाचाच हा प्रश्‍न होता,आयुक्त तुकाराम मुंढे हे करोना प्रतिबंधासाठी रस्त्यावर उतरलेले दिसतात,तुम्ही का दिसत नाही?यावर महापौरांनी देखील तेवढेच चोख उत्तर देऊन, रस्त्यावर कॅमरे आणि गर्दीला सोबत घेऊन मला रस्त्यावर उतरायचे नाही,मी उद्यापासून चारचाकी वाहनातून लाऊडस्पीकरवर संपूर्ण शहर पिंजून काढणार आहे व गर्दी न करता, विषाणूचा प्रसार होण्याची संधी न देता, जनतेचे आरोग्य धोक्यात न आणता जनजागृती करणार असल्याचे जाहीर केले होते’

त्याप्रमाणे आज रविवार दि.२९ मार्च रोजी, गल्लोगल्ली शहरात महापौरांचा आवाज घूमला. आतापर्यंत शहरातील अनेक चौकात व गल्लोगल्ली फिरणा-या मनपाच्या जनजागृतीच्या वाहनावरील लाऊड स्पीकरवर केवळ आणि केवळ आयुक्त तुकाराम मुंढे यांचाच आवाज घूमत होता. अतिशय कणखर आवाजात जनतेला सूचना देणारा,व सूचनांचे पालन न केल्यास कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल,याचा इशारा देणारा मुंढे यांचा खणखणीत आवाज गेल्या दहा दिवसात नागपूरकर जनतेच्या कानात चांगलाच रुंजी घालतो आहे.

‘लॉकडाऊन’ हा कोणाचे नुकसान व्हावे, या हेतूने जाहीर करण्यात आला नाही तर आपल्या आणि कुटुंबीयांच्या भविष्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. त्यामुळे कृपया लॉकडाऊन पाळा. घरीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि त्यांनाही सुरक्षित ठेवा, अशी कळकळीची विनंती महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना केली आहे.

नागपुरात अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत. मात्र, त्याचा गैरफायदा घेताना नागरिक दिसत आहेत. दुकानात गेल्यानंतर तेथे नियम पाळल्या जात नाही. कॉटन मार्केटमध्ये विनाकारण गर्दी केली जात आहे. त्यामुळे आता मोजक्या लोकांमध्ये असलेला कोरोना विषाणू समाजात पसरण्यास वेळ लागणार नाही. केवळ काळजी हाच यावरील उपाय आहे. जर हा वेगाने पसरला तर १५ एप्रिलनंतरही घरात बसण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. आता जर या विषाणूवर विजय मिळविला तर लवकर आपल्याला घराबाहेर पडून आपली दैनंदिनी सुरू करता येईल. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावे. घरपोच सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे करीत असताना ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना संपूर्ण मदत देण्याचा शासन आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, महापौर संदीश जोशी यांनी शहरातील विविध परिसरात जाऊन नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहनही केले. प्रशासकीय यंत्रणेचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून नागरिकांनी कुठलीही आरोग्य सेवा हवी असल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

रविवारी मात्र महापौरांचा मधाळ आवाज कानी पडताच अनेकांनी आपल्या बालकनीत बाहरे येऊन महापौरांची सूचना लक्ष् पूर्वक ऐकल्याचे दृष्य बघायला मिळाले. २१ दिवस हे तुमच्या-माझ्यासाठीच नव्हे तर तुमच्या-माझ्या कुटुंबासाठी,या शहरासाठी देखील अत्यंत महत्वाचे असून आपण काळजी घेतली तर शंभर टक्के या करोनाला हरवू शकू,असे आवाहन महापौरांनी आज नागपूरकर जनतेला केले.

‘करोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन,सत्ताधारी, नगरसेवक,आवश्‍यक सेवा पुरवणारे,पोसिल दल, वैद्यकीय चमू आणि नागपूरकर जनता यांचे सर्वांचेच एकत्रित प्रयत्नच या संकटावर यशस्वीपणे मात करु शकतील,असेच आजचे हे दृष्य होते.

Latest बातम्या