
आणिबाणिच्या परिस्थितीतही विषयाचे गांर्भीय नसल्याची माध्यमात चर्चा
नागपूर: प्रसार माध्यमांच्या एका प्रतिनिधीला काल शुक्रवार दि. २७ मार्च रोजी नागपूरच्या एका पॉश भागात एका संशयित रुग्ण दडून बसल्याची माहिती मिळाली. हा तरुण पुण्याच्या आय.टी.कपंनीतून नागपूरला आला असून त्याचे वडील स्वत: एम.डी.डीग्री प्राप्त डॉक्टर अाहे. मुलाला करोनासदृष्य लक्ष् णे दिसत असताना त्यांनी सर्व्हेसाठी आलेल्या मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना मुलाविषयी कोणतीही माहिती दिली नाही,ही बाब लक्ष्ात येताच,परिसरातील इतर नागरिकांनी माध्यम प्रतिनिधीला याबाबतची माहिती दिली.
स्वत:एक डॉक्टर असून आजारी मुलाविषयी माहिती दडवून ठेवल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले व त्यांच्या संपर्कात येणा-या परिचितांनी याबात माध्यम प्रतिनिधीला याविषयी माहिती कळवली. माध्यम प्रतिनिधी यांनी लगेच मनपा आयुक्तांना फोन लावला असता फोन उचलला गेला नाही. मनपा मुख्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनातून याविषयी माहिती मिळण्याची शक्यता नसल्याने माध्यम प्रतिनिधीने तातडीने महापौर संदीप जोशी यांना कॉल केला. महापौरांनी तातडीने फोनवर संपूर्ण माहिती समजून घेतली व याविषयी प्रशासनाला तातडीने कळवतो,असे त्यांनी सांगितले.
शहरात सध्या ११ करोना संसर्गितांची संख्या झाली असताना घरोघरी सर्व्हे करणारे प्रशासनाचे प्रमुख, हे माध्यम प्रतिनिधींचे फोन उचलत नसल्याची तक्रार करताच,महापौर यांनीही अश्या भीषण आणिबाणिच्या स्थितीत आयुक्त तुकाराम मुंढे हे महापौरांचाही फोन उचलत नसल्याची खंत व्यक्त केली! प्रसार व प्रचार माध्यमांचे प्रतिनिधी हे जीव जोखिमेत घालून शहरभर फिरुन बातम्यांचा मागोवा घेत आहे,असे असताना त्यांच्याकडे आलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याची जवाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. माध्यमे हे फक्त माहिती पुरवणारे साधन आहे. माध्यम प्रतिनिधी हे आयुक्तांना ‘गुड मार्निंग किव गुड नाईट’चे मॅसेज द्यायला कॉल करीत नाही,मात्र मुंढे यांच्या स्वभावातील आडमुठेपणा हा माध्यम प्रतिनिधींनाही नडत असल्यामुळे मुंढेविषयी तीव्र नाराजी माध्यम जगात पसरली असल्याचे सांगितले जात आहे.
मुंढे यांनी शहरात संचारबंदी घोषित करताना २० मार्च रोजी रात्री ९ वाजता.पत्र परिषदेत बोलताना शहराचा संपूर्ण कारभार मनपा आयुक्तांना सोपविण्यात आल्याची माहिती प्रदान केली होती.गेल्या आठ दिवसात शहरातील महापौरांसह संपूर्ण नगरसेवकांना त्यांनी करोना विरोधातील लढ्यात सहभागी करुन घेतल्याचे चित्र शहरवासियांनी बधितले नाही. करोना विषाणू विरोधात लढताना लवकरच शहरवासियांच्या दैनदिन गरजेच्या व भूकेच्या प्रश्नांशीही आयुक्तांना‘ सामना’ करावा लागणार आहे,अश्यावेळी त्यांना प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांची गरज आणि सहकार्य भासणार आहे,तुर्तास मात्र आयुक्तांच्या ‘एककल्ली’कारभारावर मात्र चांगलीच खदखद व्यक्त होत आहे.
शिस्तप्रिय नसून शिक्ष्ाप्रिय!
करोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरात वाढत असताना आयुक्त प्रशंसनीय काम करीत असताना व सर्व उपाययोजना अमंलात आणत असतानाही त्यांच्याच प्रशासकीय नेर्तृत्वात अनेक त्रुटी देखील समोर येत आहे. ज्या चार पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराजवळील तीन किलोमीटरचा भागाचे सर्व्हे माननीय आयुक्तांनी करुन घेतले तो सर्व्हे फक्त तांत्रिक माहितीची खानापूर्ती ठरली असल्याची मनपातच चर्चा आहे. या सर्व्हेमध्ये मनपाच्या आरोग्य विभागातील मलेरिया/फायलेरिया विभागाचे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी हे अहो रात्र वणवण फिरुन माहिती गोळा करीत आहे मात्र तरी देखील शहरात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे,याचे कारण या कर्मचा-यांनी फक्त ‘विदेशातून कोणी सदस्य आले आहे का?नाव आणि फाेन नंबर एवढीच तांत्रिक बाजू फॉर्ममध्ये भरली,गेल्या दहा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असताना या प्रश्नाला काहीच औचित्य उरले नाही,या ऐवजी घरा- घरात पुणे,बंगलुरु,हैदराबाद,दिल्ली अश्या आय.टी.हबमधून आलेले कोणी सदस्य आहेत का?याची माहिती घेतली असती तर प्रशासनास ती तेवढीच प्रभावी आणि उपयोगाची ठरली असती.
काल २७ मार्च रोजी लक्ष्मी नगर झोनमध्ये सायंकाळपर्यंत तर मनपाच्या आरोग्य कर्मचा-यांना पिण्याचे पाणी देखील पुरविण्यात आले नव्हते. सायंकाळी शेवटी २०-२० लिटरच्या दोन कॅन पुरविण्यात आल्या. ‘आयुक्त फक्त धाकात ठेवतात’,आज मनपाचे ४०० कर्मचारी व अनेक डॉक्टर्स रस्त्यावर उतरले असताना,एवढ्या सेवाभावी व्यवसायाबाबत आयुक्तांना यत्किंचतही सन्मान नसल्याचे खाजगीत बोलल्या जात आहे.
आणिबाणिच्या काळात मनपातील अभियंते किवा कोणत्याही विभागाचे अधिकारी,कर्मचारी हे कामी पडले नसताना आरोग्य विभागातील शेकडो कर्मचारी व डॉक्टर्स हे आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडलेत. मात्र आयुक्तांना याची जाणीव नसल्याची खदखद एेकायला मिळत आहे. ‘He Behave very badly with Health Department’अशी खदखद त्यांच्याप्रति निर्माण झाल्याची चर्चा आहे. या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-याना सर्व्हे दरम्यान मनपातर्फे मास्कही पुरवल्या गेले नव्हते. संपूर्ण शहराची काळजी वाहणारे मनपा आयुक्त हे आपल्याच कर्मचा-यांप्रति किती कठोर आणि बेफिकीर वागतात,याची खदखद कर्मचारी खाजगीत व्यक्त करतात. आयुक्तांच्या या वागणूकीमुळेच त्यांना आता त्यांचे कर्मचारी ‘शिस्तप्रिय नसून शिक्ष्ाप्रिय’ही उपाधी देऊन मोकळे झाले असल्याचे सांगितले जात आहे.
डोमेस्टिक उड्डाणाकडे केलेले दूर्लक्ष् शहरवासियांना भोवले-
शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली तेव्हा फक्त चार देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली मात्र विदेशातून अनेक प्रवाशी हे दिल्ली व मुंबईला उतरले व तेथून डोमॅस्टिक फ्लाईट्सने नागपूरात उतरले. या प्रवाश्यांची देखील विमानतळावर त्याच वेळी थर्मल तपासणी केली असती तर, शहरातील नागरिकांना एवढ्या प्रदीर्घ काळाच्या ‘लॉक डाऊन’ला सामोरे जावेच लागले नसते,असा संताप प्रशासनावर आता अनेक सुज्ञ नागपूरकर नागरिक व्यक्त करु लागले आहेत.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी देखील काल व्हीडयो प्रसिद्ध केला त्यात ’हा विषाणू नागपूरात बाहेरुन आल्याची कबूली दिली’यात सामान्य नागपूरकरांची काय चूक होती? हा विषाणू नागपूरच्या वस्तीत निर्माण झाला का? तर उच्चभ्रू व उच्च मध्यम वर्गीयांच्या मार्फत तो ‘नकळत’शहरात प्रसरण पावला,हे सत्य आता प्रशासनही दडूव शकत नाही.कदाचित विदेशातून आलेले प्रवाशी यांनाही ते करोनाचे ‘वाहक’ आहेत याची जाणीव झाली नसावी मात्र तरी देखील त्यांनी घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवायला हवे होते. सामजिक भान जपायला हवे होते.दूसरीकडे अद्यापही आपल्या मुलाचा आजार एक डॉक्टरच लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याे दृष्य बघायला मिळतं तेव्हा खरोखरंच ‘करोना’ची दहशत किती खोलवर रुजली आहे,याचे बोलके उदाहरण देते. मनपा आयुक्तांच्या जनजागृतीच्या उपक्रमाचे हे ‘अपयशही’ म्हणता येईल.
एकीकडे मनपा आयुक्त दररोज नवनवे व्हिडीयो प्रसिद्ध करुन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येणा-या विधि उपाययोजनांची माहिती देत असले तरी दूसरीकडे ते नागपूरकर जनतेचा विश्वास संपादित करण्यात,प्रसार व प्रचार माध्यमांचे सहकार्य व जनप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचेच सांगितले जात आहे.
माध्यमांवर वॉच!
मनपा आयुक्तांनी प्रसार व प्रचार माध्यमांवरुन प्रसिद्ध होणा-या बातम्यांवर वॉच ठेवण्यासाठी एक संपूर्ण यंत्रणाच मनपा मुख्यालयात उभी केल्याची चर्चा आहे. दररोज या चमूद्वारे संपूर्ण प्रसार व प्रचार माध्यम तसेच सोशल मिडीयावरील बातम्या या तपासल्या जात आहेत. काहींना मनपा प्रशासनातर्फे ‘कारणे दाखवा’नोटीस देखील पाठवण्यात आली व २४ तासात खुलासा मागण्यात आला. जी माध्यमे मनपा प्रशासनाला आणिबाणिच्या या काळात संपूर्ण सहकार्य करतेय त्याच माध्यमांना देखील वेठीस धरण्याचे धोरण आयुक्तांनी स्वीकारल्याचे दृष्य आहे. ‘करोना’विषयी अफवाहांचे मुळीच समर्थन करता येत नाही मात्र प्रशासनाच्या एकंदरीत ’ढिसाळ’कारभाराविषयी माध्यमांना व्यक्त होण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य या देशातील संविधान, माध्यमांना देतो अश्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळासारखी आणिबाणि नागपूर शहरातील माध्यम जगतावर लादण्याचा आयुक्तांचा हा प्रयास कदापि समर्थनीय म्हणता येणार नाही.माध्यम जगतात म्हणूनच आयुक्तांविषयी प्रचंड नाराजीचा सूर आहे.
नाव,पत्ता व मोबाईल नंबर द्या-
ज्या माध्यम प्रतिनिधींनी शहराच्या विशिष्ट भागात असा संशयित रुग्ण दडून बसला असल्याची माहिती महापौरांकरवी प्रशासनाला दिली,त्याबद्दल मागोवा घेतला असता, एवढ्या मोठ्या प्रभागात पुन्हा सर्व्हे करणे प्रशासनाला शक्य नसल्याचे अति.उपायुक्तांनी सांगितले असल्याचे कळले.या भागाचा अधीच सर्व्हे झाला आहे,पुन्हा एकदा सर्व्हे करण्याची शक्यता पडताळून बघितली जात आहे, अचूक व्यक्तिीचा नाव,पत्ता व मोबाईल नंबर दिल्यास त्या घरात वैद्यकीय चमू पाठविली जाईल,असे मोघम उत्तर आयुक्तांच्या, प्रशासनाकडून माध्यम प्रतिनिधीला प्राप्त झाले. मग आधीच्या सर्व्हेत अनेकांनी माहिती लपवली तसेच प्रशानातर्फेच चुकीचे प्रश्न विचारले गेले त्याचे काय?या प्रश्नाबाबत प्रशासनाकडे सध्यातरी काहीच उत्तर नाही.
सध्या शहरावर कोसळलेले हे गंभीर संकट बघता प्रसार-प्रचार ,जनप्रतिनिधीपासून तर शहरातील संपूर्ण नागरिक हे प्रशासनाला(काही अपवाद वगळता)संपूर्ण सहकार्य करीत आहे.मनपा आयुक्त यांनी देखील या सहकार्याची दखल घेऊन या संकटावर मात करण्यासाठी आपला ‘एककल्ली’ कारभार तूर्तास तरी बाजूला सारायला हवा,अशी मागणी माध्यम प्रतिनिधी,जनप्रतिनिधी व नागपूरकर जनताच करीत असल्याचे म्हटले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
