फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपानागपूरच्या बैठकीतूनच महापालिका सुधारणा विधेयकाची मुहुर्तमेढ!

नागपूरच्या बैठकीतूनच महापालिका सुधारणा विधेयकाची मुहुर्तमेढ!

विधान सभेत बहूमताने पारित तर फडणवीस यांनी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव घेतला मागे

नागपूर: महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयकावर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी वादळी चर्चेनंतर बहूमताने हे विधेयक पारित करण्यात आले तर विधान सभेतील विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सरसकट लागू न करता यावर साधक-बाधक चर्चा होण्यासाठी विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता तो मागे घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक आज पटलावर ठेवले होते. या विधेयकानुसार आता महाराष्ट्र राज्यात पुन्हा एक नगरसेवक असणारा प्रभाग लागू झाला असून एका प्रभागातून आता एकच नगरसेवक निवडून येणार आहे. हे विधेयक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आणण्यासाठी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती.

आमदार विकास ठाकरे यांना जानेवरी २०१७ च्या नागपूर महापालिकेच्या निवडणूकीत या प्रभागपद्वतीचा चांगलाच फटका बसला होता. २००२,२००७ मध्ये ते काँग्रेस पक्ष्ातर्फे नगरसेवक म्हणून मनपात पोहोचले,२०१२ मध्ये त्यांनी महापौर पद भूषवले मात्र २०१४ साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिका विधेयकात सुधारणा करुन त्यांनी चार नगरसेवकांची प्रभागपद्धती महाराष्ट्रात रुढ केली. परिणामी विकास ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेला वार्डच या प्रभागपद्धतीमुळे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाला आणि याचा चांगलाच फटका त्यांना बसला. त्यांना दुसऱ्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरावा लागला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. हेच शल्य तेव्हापासून त्यांच्या मनात रुतले होते. भाजपने हेतुपुरस्सर त्यांना मनपात येण्यापासून रोखले होते. त्या पराभवाची परतफेड आमदारकी मिळवून झाली असल्याची प्रतिक्रिया ‘सत्ताधीश’ला दिली.

विधान सभेत शनिवारी या विधेयकावर बोलताना त्यांनी आपल्या मनातले शल्य उघड केले.दोन वेळा मी विरोधी पक्ष् नेता होता, महापौर ही झालो मात्र जेव्हा चार नगरसेवकांचा प्रभाग झाला तेव्हा मला आपले क्ष्ेत्र सोडून दूसरीकडे जावे लागले आणि निवडणूकीत ‘पडावे’लागले. विधान सभेत यावे लागले,अशी पुस्तीही त्यांनी लगेच जोडली. या शहरातील लोकांना अशी कार्यप्रणाली हवी जी त्यांना सोयीचे होईल या दृष्टिने काम केले पाहिजे. चारच्या प्रभागपद्धतीत चारही नगरसेवक जबाबदारी घेण्यास धजत नाही असा अनुभव आहे.एकाच प्रभागात दोन पक्ष्ाचे नगरसेवक असतात त्यांच्यात भांडणे होतात. एवढेच नव्हे तर एकाच पक्ष्ाचे चारही नगरसेवक हे सुद्धा आपापसात भांडतात. सामान्य जनतेचे हित लक्ष्ात ठेऊन हे विधेयक पारित झाले पाहिजे. एक नगसेवकाच्या प्रभागात एकावरच जबाबदारी निश्‍चित होते आणि काम नाही केले तर जनता त्याला घरी बसवते. त्यामुळे एक नगरसेवक प्रभागपद्धतीत तो निवडून येऊ शकतो यासाठी तो काम करतो. त्यामुळे चारची पद्धत रद्द करुन एक प्रभाग एक नगरसेवक सदस्य पद्धती यावी यासाठी मी या विधेयकाचे समर्थन करतो.चार नगरसेवक प्रभाग पद्धतीत चारही नगरसेवक हे एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलतात,जनतेची कोणतीच कामे होत नाही,जनता हवालदिल होते,अश्‍या शब्दात त्यांनी आज सभागृहात या विधेयकाचे जोरदार समर्थन केले.

तत्पूर्वी विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाला विरोध नाही मात्र सुझाव प्रस्तावित केला,सध्या महाराष्ट्रात कोणतीही तातडीची मनपा निवडणूक नसून तीन-चार महिन्यांनी फक्त औरंगाबाद मनपाचीच निवडणूक जवळ आहे. संपूर्ण राज्यात मनपाच्या निवडणूका या २०२२ सालीच होणार असल्यामुळे हे विधेयक तातडीने पारित न करता सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात यावे,यावर सर्व पक्ष्ीय सदस्यांकडून साधक-बाधक चर्चा करुनच पुढील अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला मात्र शनिवारी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बहूमताने हे विधेयक पारित करण्यात आले. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावरील प्रस्ताव मागे घेतला.

या विधेयकाच्या चर्चेत सहभागी होताना सुधीर मुनगंटीवार यांनी विधेयक मांडले तर चर्चा तर झालीच पाहिजे अन्यथा ‘विधीमंडळाचे’नाव ‘प्रस्ताव’मंडळ असे बदलून टाकावे अशी प्रखर टिका केली.या विधेयकाला विरोध नसून ज्या पद्धतीने हे लागू होत आहे त्या पद्धतीला विरोध असल्याचे ते म्हणाले.ज्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे विधेयक लागू होत आहे त्यांचाच अभिप्राय मागवण्यात काय हरकत आहे?यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा निवडणूका या जरी जवळ नसल्यातरी अनेक वर्षांपासून नगरसेवकांची ही मागणी असल्याचे सभागृहाच्या लक्ष्ात आणून दिले. अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या १६९ आमदारांची जी बैठक पार पडली त्यात साधकबाधक चर्चा करुनच याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

याचा अर्थ नागपूरच्या बैठकीतच हे ‘प्रपोजल’पुढे आल्याचे सिद्ध झाले. ‘कालाये तस्मै नम:’२०१७ च्या जानेवारी महिन्यात ज्या महापौरांनाच पराभवाला सामोरे जावे लागले होते त्याच पराभूत महापौरांनी त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या चार नगरसेवक प्रभाग पद्धती त्यांच्याच शहरात पार पडणार्या हिवाळी अधिवेशनात संपुष्टात आणून विजयी मुद्रा विधीमंडळ परिसरात उमटवली. प्रतापराव सरनाईक यांनी या प्रस्तावाचे समर्थन करून मी स्वतः या प्रभापद्धतीचा भुक्तभोगी असल्याचे सांगितले तर आशिष शेलार यांनी नोटा चा पर्याय मतदारांना उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधून प्रस्तावाचा कडाडून विरोध केला.मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे विधान सभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष्ाला मिळालेले २ कोटी ३० लक्ष् ५८ हजार मतदार एका बाजूला तर दुसरीकडे शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १६९ आमदार अश्‍या सामन्यात शेवटी सत्ता ज्यांच्या हातात त्यांचाच विजय झाल्याची चर्चा विधीमंडळ परिसरात आज दिवसभर चांगलीच रंगली होती.

पाच वर्षात पुन्हा सत्तांतर झाले तर पुन्हा या विधेयकात सुधारणा होऊ शकते का?आमदार विकास ठाकरे यांना हा प्रश्‍न विचारला असता, पाच वर्षे हेच सरकार कायम राहणार असून पुढील मनपा निवडणूक आज संमत झालेल्या पद्धतीनेच लढवली जाईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

एकाच वॉर्ड मधील एकच नगरसेवक वॉर्डाचा सत्यानाशच करील- महापौर संदीप जोशी
नवीन सरकार आलं,त्यांना वाटतंय प्रभाग पद्धती रद्द करून पुन्हा एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धती लागू करून जबाबदारी निश्चित करता येईल मात्र अनुभव हाच येतो एकच नगरसेवक असला आणि तो जबाबदारी पेलण्यास असमर्थ असला तर त्या वॉर्डाचा सत्यानाशच होतो,उलट चार नागसेवकांची प्रभाग पद्धती हीच योग्य होती,चार पैकी दोन नगरसेवक यांनी जरी जवाबदारी स्वीकारली नाही तर उर्वरित दोघे त्या प्रभागाचे प्रश्न,समस्या या सांभाळून घेत होते, त्यामुळे नव्या सरकारचा हा आक्षेप अयोग्य आहे की चार नगरसेवक हे एकमेकांवर जवाबदारी ढकलतात, ते काम करीत नाही! नवा कायदा जरी अंमलात आला असला तरी तो एक नगरसेवकाचा वॉर्ड असो किंवा २,३,४ नगरसेवकांचा,कोणतीही प्रभागपद्धती असली तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार हे मात्र निश्चित.

एकचा करो की चार नगरसेवकांचा प्रभाग, २०२२ मध्ये आणखी जास्त जागा जिंकू-प्रवीण दटके [शहराध्यक्ष्,भारतीय जनता पक्ष्]
महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक आज जे विधान सभेत पारित झालं यावरुन या सरकारची नौटंकीच दिसून पडली.हे खोट्यांचे सरकार आहे ते नौटंकीच करतील. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोटी आश्‍वासाने महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहे मग ते २५ हजार हेक्टरी शेतकर्यांना मदत असो किवा सातबारा कोरा करण्याचे वचन असो. स्वत: खोटे बोलतात आणि नगरसेवकांवर अविश्‍वास दाखवतात की चार नगरसेवकांचा प्रभाग असल्यास ते काम करीत नाही,जबाबदारी एकमेकांवर ढकलतात.भारतीय जनता पक्ष्ाला काहीही फरक पडत नाही मग तो एकचा प्रभाग असो,दोनचा,तीनचा किंवा चारचा. मी स्वत: चारमध्येही निवडून आलो,तीन,दोन आणि एकमध्येही निवडून आलो. शेवटी मतदार हे मत देताना काम बघतात.आमची तर ही तिसर्र्या टर्मची सरकार आहे.एकचा प्रभाग महाराष्ट्र सरकारने केला असला तरी भारतीय जनता पक्ष्ाचा शहराध्यक्ष् या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो २०२२ मध्ये आहे त्यापेक्ष्ाही जास्त जागा आमचा पक्ष् जिंकेल. हे मी आमच्या दोन्ही नेत्यांच्या माननीय केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरील विश्‍वास, समस्त कार्यकर्ते,बूथप्रमुख यांच्यावतीने सांगतो आहे. भारतीय जनता पक्ष्ाच्या संघटनेची ताकद ,जर ही सरकार राहीली तर, पुढील मनपा निवडणूकीत या सरकारला दिसून पडेल.

……………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या