Homeनागपूर न्यूजजे बोललो तेच घडले: नितीन गडकरी

जे बोललो तेच घडले: नितीन गडकरी

Advertisements
Advertisements

नागपूर: राजकारण असो किंवा क्रिकेटचा खेळ या दोन्ही खेळात शेवटपर्यंत काहीही घडू शकतं असे मी मागेच बोललो होतो शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातही तसेच घडले,असे मिश्‍किलपणे सूचक विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्‍नावर त्यांनी वरील विधान केले.

राजकारण आणि क्रिकेटचा खेळ याविषयी मी मागे जे बोललो होतो त्याचे महत्व आज तुम्हाला पटले असेल,अशी मिश्‍किलीही त्यांनी यावेळी केली. शनिवारी सकाळी महाराष्ट्र झोपेतून जागा झाला तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तर राष्ट्रवादीचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनात शपथविधी ’उरकून’घेतल्याचे दृष्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितला,अचानक घडलेल्या या अति-महत्वाच्या घडामोडीवर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे पत्र परिषदेत काय भाष्य करतात याकडे सर्व प्रचार-प्रसार माध्यमांचे लक्ष् लागले होते. शेवटी पत्रकारांनी त्यांना राजकारण या विषयावर बोलतं केलंच. गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांनाही शुभेच्छा देताना या दोघांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळणार असल्याचे ते म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राचे काय होणार?याची चिंता लागली होती. मात्र आता महाराष्ट्रात एक स्थिर सरकार येत असून राज्यात विकासाची कामे होतील,असे ते म्हणाले. राज्यपाल यांनी बहूमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस यांना जी मुदत दिली आहे त्या मुदतीत फडणवीस सरकार नक्कीच बहूमत सिद्ध करतील असा विश्‍वास यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजीच रात्री ॲग्रो व्हीजनचे उद् घाटन करताना गडकरी यांनी ‘सरकार कोणाचे बनेल याची चिंता नको’असे सूचक विधान केले होते.माध्यमांनी कोणाचे सरकार स्थापन होईल,याची चिंता करायला नको, ज्याचे काेणाचे सरकार येईल,ते येऊ द्या’त्यांच्या या विधानाचा अर्थ शनिवारी सकाळी महाराष्ट्राला उलगडला. भारतीय जनता पक्ष् हा २४ ऑक्टोबर रोजी विधान सभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-शिवसेनेत घडलेल्या सर्व घडामोडीनंतरही शांत होता. शेवटी ही ‘वादळा पूर्वीची शांतता’ होती,असा निष्कर्ष शनिवारी राजकीय पटलावर ज्या वेगाने घडामोडी घडल्या त्यानंतर स्पष्ट झाले.राष्ट्रवादी पक्ष्ातील आमदारांचा एक गटच फूटून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राजभवनात पोहोचला व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर ‘महा-शिव-आघाडी’च्या सत्ता स्थापनेच्या महत प्रयासास चांगलाच सुरुंग लागला.

Latest बातम्या