Homeनागपूर न्यूजपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण येत्या तीन- चार दिवसात पूर्ण करून शासनाकडे पाठविणार :चंद्रशेखर...

पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण येत्या तीन- चार दिवसात पूर्ण करून शासनाकडे पाठविणार :चंद्रशेखर बावनकुळे

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकाची हानी: पालकमंत्री बावनकुळे यांनी केली पिकांची पाहणी:शासन शेतकर्‍याच्या पाठीशी

नागपूर, 2 नोव्हेंबर: परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असतानाच पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण येत्या तीन- चार दिवसात पूर्ण करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी आज मौदा, रामटेक आणि पारशिवनी या तीन तालुक्यातील शेतकर्‍याच्या पिकांच्या हानीची पाहणी केली. मौदा, रामटेक तालुक्यात प्रामुख्याने धान पिकाची प्रचंड हानी झाली आहे. या दौर्‍यात पालकमंत्र्यांसोबत मौदा येथे आ. टेकचंद सावरकर, रामटेक तालुक्यात आ. आशिष जयस्वाल आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, भाजप नेते आनंदराव राऊत, अरविंद गजभिये, तसेच तालुका कृषी अधिकारी वासनिक, तलाठी आडे, प्रशांत सांगळे, जिल्हा कृषी अधिकारी शेंडे, तहसिलदार सहारे, तहसिलदार म्हस्के आदी उपस्थित होते.

पावसासह जोरात वारा असल्यामुळे धानाचे पीक झोपले. आता हे पीक शेतकर्‍याच्या हाती लागत नाही. यावेळी पालकमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये पावसामुळे सुमारे 25 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले तर ऑक्टोबरमधील अतिपावसामुळे अंदाजे 5500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत तीन- चार दिवसात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, संत्रा, मोसंबी, भाजीपाला, फळपिकांचेही नुकसान झाले असून या सर्व ठिकाणची पाहणी केली जाणार आहे. गावात जाऊन शेतकर्‍यांना भेटून त्यांना मदतीसाठी धीर आम्ही देत आहोत. शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले जाणार नाही. ज्या शेतकर्‍याचे नुकसान झाले, त्याला नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
शेतकर्‍यांची कर्जमाफीची योजना अजूनही सुरु आहे. ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकर्‍यांनाही लाभ मिळेलच. शासन शेतकर्‍यासोबत आहे, असेही पालकमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तऱात स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसानीचे सर्वेक्षण तीन- चार दिवसात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्याप्रमाणे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठवू. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे सुरु झाले आहेत. या सोबतच कर्ज कुणी घेतले, पीक विमा कुणी काढला याची माहितीही कृषी विभागाचे अधिकारी घेत आहेत, असेही जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले.

पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणार : बावनकुळे
पक्षाला मी आजपर्यंत काही मागितले नाही. आतापर्यंत पक्षाने ज्या ज्या जबाबदार्‍या मला दिल्या त्या मी सक्षमतेने पार पाडल्या. यापुढेही पक्ष देईल ती जबाबदारी मनापासून काम करून सांभाळणार अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. पीक पाहणी दौर्‍यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाने मला खूप दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला 32 विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यामुळे यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती मी यशस्वी पार पाडील असेही ते म्हणाले.

1) फोटो…..मौदा येथे बबनराव आमधरे या शेतकर्‍याच्या शेतातील धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री बावनकुळे
2) रामटेक तालुक्यातील शिवनी भोंडकी येथे शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसानीबाबत चर्चा करताना पालकमंत्री बावनकुळे, आ. आशिष जयस्वाल व अन्य.

Latest बातम्या