
मुंबईः विधानसभा निवडणुकीत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत त्यांची मी या ठिकाणी माफी मागतो. कोणत्याही परिस्थितीत मला सत्ता पाहिजे आहे. विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे. मी सत्तेत होतो, उद्याही सत्तेत राहणार आहे, असे सांगत महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचा भगवा फडकणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात व्यक्त केला. मुंबईतील शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले, शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही पाहिजे तर त्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होणे गरजेचे आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत उद्धव ठाकरे हे आज राम मंदिरावर बोलले. शिवप्रभूंनी दिलेला भगवा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. राम होते हे सगळ्यांना मान्य आहे, मात्र, ते अयोध्येतच जन्मले होते का? याचा वाद सुरू आहे. राजकारणासाठी आम्हांला राममंदिर नको आहे, ही जनतेची मागणी आहे. आम्ही वचन पाळतो, त्यासाठी आम्हाला राममंदिर हवे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा