Homeराजकारणमहाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली: फडणवीस

महाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली: फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. ‘महाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल. कुणी अतिशयोक्ती म्हणेल पण महाराष्ट्रात कधीच कुणाला प्रतिसाद मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल’, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.

हिंदुत्वाचा धागा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी तमाम जनतेची अपेक्षा होती आणि त्यानुसारच आमची युती झाली आहे, असे सांगताना महायुतीत सगळ्यांनाच काही प्रमाणात कॉम्प्रमाइज करावं लागलं आहे. युतीसाठी ते करावंच लागतं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत सगळ्या बंडखोरांना माघार घ्यायला लावणार आहोत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकतील व बंडखोरी राहणार नाही, असे आम्हाला वाटते. त्याउपरही बंडखोरी राहिल्यास त्याला युतीत स्थान नसेल. त्याला त्याची जागा महायुती दाखवेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कापत तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्याबाबत विचारलं असता याला तिकीट कापलं असं म्हणता येणार नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यांची जबाबदारी आता बदलली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महायुतीत शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या आहेत. शिवाय भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या दोन जागा शिवसेनेला मिळणार आहेत. अन्य घटकपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या आहेत आणि उरलेल्या १५० जागा भाजप लढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेली ५ वर्षे आम्ही राज्याला गती दिली. बरेच प्रश्न मार्गी लागलेत आणि अजूनही खूप प्रश्न बाकी आहेत. त्यावर पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त भर देणार आहोत. दुष्काळी भागावर आमचा फोकस असणार आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असून वाहून जाणारं पावसाचं सर्व पाणी साठवून दुष्काळी भागाला देऊ व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Latest बातम्या