
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यलयात येऊन माझ्या पीएकडे राजीनामा दिला. तसेच मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केल्याचं सांगितलं. राजीनामापत्रात त्यांनी कोणतंही कारण दिलेलं नाही. तसं कारणही देत नसतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल झाले होते. मात्र अजित पवार हे मुंबईत दाखल झाले नव्हते. त्यावरही आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं. अजित पवार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येत होतं.

आमचे चॅनल subscribe करा