
नागपूर: काँग्रेसचे हाविव्हेट माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने रद्द केले आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी या संदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
या निर्णयामुळे चतुर्वेदी समर्थकांमध्ये उत्साह संचारला. नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी चतुर्वेदी व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात तिकीट वाटपावरून तणाव निर्माण झाला होता. चव्हाण यांच्या विरोधात माजी मंत्री नितीन राऊत,माजी खासदार गेव्ह आवारी,माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार नरेश पुगलीया यांनी बंडाचे निशाण फडकावले होते.
शहर काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार,शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच चतुर्वेदी-राऊत यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला व त्यांना कारणे दाखवाची नोटीस बजावण्यात आली. त्याचे उत्तर न दिल्याने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी दिल्ली देखील गाठली होती.
बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्याबरोबर चतुर्वेदी यांच्या समर्थकांची आशा पल्लवीत झाली.त्याचप्रमाणे बुधवारी चतुर्वेदी यांची शेवटी घर वापसी झाली. चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला तेव्हाच चर्चेला उधाण आले होते. चतुर्वेदी यांची घर वापसी झाल्यामुळे सर्व चर्चाना विराम मिळाला.

निलंबना नंतरही मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो,पक्षाच्या विचारधारे पासून मी कधीही दूर जाऊ शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.




आमचे चॅनल subscribe करा
