Homeनागपूर मनपाबोला...मोकळं....मनातलं..अगदी नि:शुल्क!

बोला…मोकळं….मनातलं..अगदी नि:शुल्क!

‘अस्मि माईंड केअर‘चा उपक्रम
नागपूर.ता.६ सप्टेंबर २०२६: ‘एकटेपणा’...ही एक सामान्य भावना आहे.एकटेपणा ही तात्पुरती भावना आहे ज्यावर नक्कीच मात करता येते.मूळात एकटेपणा हे शल्य मानावं की नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे.जीवनात एकटं तर वाटतं पण कोणाला बोलायचं,कोणाला सांगायचं हा एक गहन सामाजिक आणि मानसिक प्रश्‍न आहे.यावरच प्रभावी उपाय शोधून काढला आहे .डॉ.स्वाती धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या ‘अस्मि माईंड केअर’या उपक्रमातून.
सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व मानसशास्त्रज्ञ डॉ.श्रीकांत चोरघडे यांच्या हस्ते रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सिद्ध हनुमान पंचकमेटी मंदिर,लक्ष्मीनगर येथे या उपक्रमाचे उद् घाटन झाले.‘मनाची देखभाल’या दोन शब्दात अस्मि माईंड केअरचे वर्णन करता येईल.विद्यार्थी,शिक्षक,पालक,आजी-आजोबा,पती-पत्नी,व्यावसायिक,नोकदरदार,गृहीणी या पैकी कुणीही असाल तरी अस्मि माईंड केअर हे त्यांच्यासाठी असल्याचे प्रास्तविकेत डॉ.स्वाती यांनी सांगितले.ही एक नि:शुल्क हेल्पलाईन असून ज्यांना बोलायचं आहे…मोकळं व्हायचं आहे,त्यांनी या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून भरभरुन बोलावे,असे आवाहन त्यांनी केले.
हा उपक्रम सुरु करण्या मागे एक सर्वंकष दृष्टिकोण असल्याचे त्या सांगतात.फक्त महिला,फक्त पुरुष,फक्त विद्यार्थी,फक्त गृहीणी अशी सीमारेषा यात नाही.प्रत्येक मानवी नात्यातील पोषकत्वावर फोकस करुन ‘अस्मि माईंड केअर’’उपक्रम सुरु करण्यात आला आहे.प्रत्येकाला खूप काही बोलायचं असतं परंतू,काेणी आपल्याला नावे ठेवू नये,मूल्यमापन करु नये अशी सुप्त ईच्छा किंबहूना भीती,एक सामाजिक,मानसिक दडपण प्रत्येकामध्ये असतं.त्यामुळेच अस्मि फक्त…ऐकणार.हे एक खुले व्यासपीठ आहे जे मानवी मनाचं सक्षमीकरण करण्यास सज्ज झाले असल्याचे डॉ.स्वाती सांगतात.
या ऐकण्यातून वेगवेगळ्या भेडसावणा-या प्रश्‍नांचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षणच देण्यात आले आहे असे डॉ.स्वाती यांनी सांगितले.पुणे,मुंबई,बंगलौर वरुनही आम्हाला फोन येतात,त्यांना आम्ही व आमची चमू शंातपणे ऐकतो…ऐकत राहतो.त्यांच्या प्रश्‍नांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केला जातो.महत्वाचे म्हणजे अस्मिचे सदस्य प्रत्येकाने व्हावे.संपूर्ण कुटूंबच अस्मिचे सदस्य झाल्यास त्यांच्यासाठी आम्ही कार्यशाळाच घेऊ,असे डॉ.स्वाती म्हणाल्या.
आज युवांमध्ये पराकोटीचा तनाव व अस्वस्थता आढळते.जंतरमंतरवरील आंदोलन याचे बोलके उदाहरण आहे.सरकारने तर आता प्रत्येक शाळांमध्ये मानसोपचारतज्ज्ञाची नेमणूक करण्याचा अध्यादेशच काढला आहे.या मागे शालेय स्तरावरच विद्यार्थी व तरुणाईमधील अस्वस्थेला योग्य दिशा दाखविण्याचा सरकारचा हेतू आहे.आज मोबाईल व टी.व्हीमुळे घराघरांमधील,कुटूंबातील सदस्यांमधील संवादच हरवला आहे.तो संवाद परत साधण्याचा प्रयत्न अस्मि करेल,अस्मि साधेल,असे डॉ.स्वाती म्हणाल्या.
अध्यक्षस्थानी असेलेले ८० वर्षीय ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ डॉ.श्रीकांत चोरघडे यांनी डॉ.स्वातीच्या या उपक्रमाचे कौतूक केले.एकट्यापासून कुटूंबापर्यंत पोहोचण्याचा डॉ.स्वातीचा हा उपक्रम निश्‍चितच कौतूकास्पद असल्याचे ते म्हणाले.आपल्या वैद्यकीय आयुष्यातील अनुभव सांगताना डॉ.चारेघडे म्हणाले की माझ्याकडे छिंदवाड्यातील एक आठ वर्षीय मूलाला त्याचे आई-वडील घेऊन आले होते.त्याला आकडी येत असल्याचे त्यांनी सांगितले.हे सांगत असतानाच त्या मुलाला माझ्याच समोर आकडी आली.मात्र,त्याच्या लक्षणांवरुन मला समजले तो आकडी येण्याचे नाटक करत आहे.यानंतर मी त्याच्या पालकांशी घरातील वातावरणाविषयी बोललो,तेव्हा कळले त्याची आज्जी ही आजारी आहे, त्यामुळे घरातील सर्वांचे लक्ष तिच्या सेवासुश्रृतेत आहे.संपूर्ण घरातील लाडाचा केंद्रबिंदू असलेल्या या मुलाला ते रुचले नाही व सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हा बनाव केला होता.मला त्याच्या पालकांना सांगावे लागले,आधी घरातील वातावरण बदला हाच त्याच्यावरील उपचार आहे.
एक सहा वर्षाची छकुली रात्री बिछाना ओला करीत असे.तिचे पालक माझ्याकडे तिला घेऊन आले.मी लघवीचे परिक्षण करुन रिर्पोट आणण्यास सांगितले.मात्र,अनायास मीच त्यांच्या घरासमोरुन गेलो अन रिर्पोट काय आली हे बघण्यासाठी घरात गेलो.पूर्वी डॉक्टर्स आणि रुग्णांचे संबंध हे फार कौटूंबिक होते.ती छकूली मला बाहेरच रडताना दिसली.आतमध्ये नवरा-बायको कडाकडा भांडत होती!रात्री तिचा बिछाना ओला होण्याचे कारण मला कळले होते.लहान असले तरी त्यांनाही मानसिक तनाव असतो,असे डॉ.चोरघडे म्हणाले.
जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सिग्मंड फ्राईड ज्याने जगात मानसिक उपचाराची रुजवात केली तो प्रत्येक रुग्णाच्या उशाशी जाऊन बसत असे.रुग्णाला मनातलं बोलायला लावत असे.मनातील भावना मोकळी झाली किंबहूना कोंडमारा संपला तरी अर्धा आजार बरा होतो,असे डॉ.चोरघडे सांगतात.आमच्या काळी शाळांमध्ये पालक सभा होत असे त्यात मी लहान मुलांच्या मनातील भावना पालकांनी कश्‍या समजून घ्यायचा हे सांगत असे.डॉ.स्वाती यांनी आजच्या काळात गरजेचा असलेला एक वेगळा विषय घेतला आहे.याचा खूप फायदा पालकांना होईल.पुष्कळ घरे अशी आहेत ज्यात समस्या आहेत मात्र,पालकांनाच त्या समस्यांची कल्पना नसते.सर्वात मोठी आणि महत्वाची समस्या म्हणजे बोलायचं कोणाकडे?बाहेर कुठे मनातलं बोललं की ‘गॉसिपिंग’ची भीती वाटते.असे डॉ.चाेरघडे म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित श्रोत्यांनी डॉ.चोरघडे व डॉ.स्वाती यांना काही प्रश्‍ने ही विचारली.रांगोळीचे ठिपके असतात त्यांना जोडल्याशिवाय रांगोळी पूर्ण होत नाही,तसंच कुटूंबांचं देखील आहे.आज घरोघरी आर्थिक सुबत्ता आहे मात्र,ज्येष्ठांचा कोंडमारा होत आहे.ज्येष्ठांना पुढच्या दोन पिढ्या म्हणजे स्वत:ची मुले व मुलांची मुले यांच्याशी जुळवून घेताना त्रास होतो कारण त्यांच्याकडे यांच्यासाठी वेळ नसतो.यावर काय उपाय आहे?असा प्रश्‍न केला असता,घरातील व्यक्ती मनाने स्वत:च स्वस्थ असेल तर ती स्वत: चांगली समुपदेशक होऊ शकते,असे उत्तर डॉ.स्वाती यांनी दिले.एका श्रोत्याने सांगितले आजारपणात त्यांच्या मुलावर ॲलापॅथी औषधांचा इतका मारा झाला की तो खूप चिडका झाला.यावर डॉ.चोरघडे यांनी सांगितले की ॲलोपॅथी औषधांमध्ये काही साईड इफेक्टस असतात हे मान्य करावंच लागेल जे मनावर आणि मेंदूवर परिणाम करीत होते मात्र,आजच्या काळात जास्त प्रगत औषधे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
तीन वर्षाच्या मुलाचा मूड विचित्र असून त्याचे समुपदेशन कसे करावे,असे विचारले असता,मुलाचे नाही त्याच्या पालकाच्या समुपदेशनाची गरज असल्याचे डॉ.चोरघडे म्हणाले.लहान मुले अगदी सामान्य असतात मात्र त्यांच्या वर्तवणूकीत बदल झाल्यास पालकांनी सज्ञान घेणे गरजेचे असल्याचे डॉ.स्वाती यांनी सांगितले.एकटे बसून राहणे,एकटक कुठेतरी बघत बसणे,चिडचिड करणे,कधीकधी मुलांच्या वागण्यामागे कारण एकच असतं मात्र वागणं बदलतं तर कधीधकी वागणं एकच असतं मात्र कारणे वेगळी असतात.घरामध्ये एखादे लहान बाळ आल्या बरोबर मोठ्यांचं वागणंच बदलून जातं,यात बाळाच्या आगमनाने कोणाला आनंद होतो तर कोणाला जळण होते जी एक स्वाभाविक भावना असते,असे डॉ.स्वाती म्हणाल्या.
‘ There is no Problem in Children,There is Problem in Parents’असे सूत्र याप्रसंगी डॉ.चोरघडे यांनी सांगितले.मनातील दु:खांवर मात करुन आयुष्यात पुढे कसे जाता येईल?असा प्रश्‍न केला असता तीन ‘ A‘ हे आनंदी जीवन जगण्याचं सूत्र असल्याचे डॉ.स्वाती धर्माधिकारी म्हणाल्या.Acceptence, Achivement आणि Affection म्हणजे स्वीकर करा,उपलब्धी मिळवत रहा आणि प्रेम घेत व देत रहा,असे आनंदी राहण्याचे तीन सूत्र त्यांनी सांगितले.संपूर्ण भांडण हे आधी स्वत:सोबत असतं.त्यामुळे आधी स्वत:सोबत जुळून रहा,असा सल्ला त्यांनी दिला.‘‘राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है,दु:ख तो अपना साथी है’हे ‘दोस्ती’चित्रपटातील गीताचे बोल लक्षात ठेवावे असे डॉ.चोरघडे म्हणाले.आयुष्यातील दु:खं सहन करीत-करीतच व्यक्तीमत्व घडत असतं असे ते म्हणाले.
आज ज्येष्ठांचे वयोमान वाढले असून अनेक घरात ९० वर्षांचे ज्येष्ठ आपल्या ६० वर्षीय मुलाला समुपदेशन करु शकत नाही याकडे लक्ष वेधले असता,सल्ला हा नेहमी ‘ Willing People‘साठीच असतो,विचारायला आले तरच समुपदेशन होईल,असे डॉ.चोरघडे म्हणाले.
याप्रसंगी ॲड.प्रतिभा साठे या महिला श्रोत्याने सांगितले की त्यांची मुलगी फक्त १५ दिवसांची होती तेव्हा डॉ.चाेरघडे यांनी तिच्यावर उपचार केले होते,आज ती एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षीची परिक्षा देत असून स्वत: डॉक्टर होणार आहे.आई म्हणून मी आजही डॉ.चाेरघडे यांच्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही तसेच डॉ.चोरघडे यांच्या ‘अडगुळ-मडगुळ’पुस्तक वाचूनच मी तिला घडवले आहे.मी तिला तिचा संपूर्ण वेळ दिला यानंतरच मी माझा ‘ Me Time’जगले व जगते आहे,आणि माझ्या जीवनात खूप आनंदी अाहे,यावर डॉ.चोरघडे यांनी,हाच माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार असल्याचे सांगितले.
डॉ.स्वाती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांमधील परिक्षेचे तानतणाव,तरुणाईने राग कसा आवरायचा,वयात येणा-या तरुणाईचे प्रश्‍न,नकारात्मकते पासून कसे वाचायचे,गोल सेटिंग कसे करायचे,काय करावे,काय करु नये यावर देखील कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले.

भवन्समध्ये तीस वर्षे प्राथमिक शाळेतील शिक्षीका राहीलेल्या व आता निवृत्त झालेल्या आरती आठले यांनी देखील शाळेतील काही अनुभव सांगितले.’हेलिकॉप्टर पेरेन्टस’म्हणजे २४ तास मुलांच्या डोक्यावरच घिरट्या घालत,लक्ष ठेवून असलेले पालक यावर त्या बोलल्या.साध्या रेल्वेमधील प्रवासात अवघ्या दोन वर्षाच्या मुलीसाठी आधी आईने संपूर्ण बर्थवर स्प्रे मारला,मग अंथरुण अंथरले,त्यावरही स्प्रे मारला,मग मुलीला ऑडोमास लावले,इतके अतिरेकी  पालकत्व मुलांच्या नैसर्गिक संगोपनासाठी कितपत योग्य आहे,यावर त्यांनी प्रकाश टाकला.

उपक्रमामागील भूमिका वर्षा बासू यांनी स्पष्ट केली.सूत्र संचालन सोनाली अकोलकर-मोहिते यांनी केले.
मनमोकळा संवाद साधा या क्रमांकावर ९४२२८०६७४९/ ९०११५९८२८२
प्रत्यक्ष भेटा या पत्त्यावर,‘ U2,Padmavati Aashray,Near Rani Lakshmi Hall,Lakshmi Nagar,Nagpur.
……………………………

Latest बातम्या