वेलेंटाईन डे स्पेशल(भाग-१)
‘प्रेम’…फेब्रुवरीचा महिना लागताच जगाला वेध लागतं ते वेलेंटाईन डे चं.भारतात बोचरी थंडी निरोप घेत असते.वसंत… चैत्र आणि वैशाख दरम्यान येणारा हिवाळ्यानंतरचा व उन्हाळ्या पूर्वीचा हा सुखद ऋतू प्रत्येकाच्या मनाला सुखावत असतो ..त्यात प्रेमाचा महिना म्हटला की,मनाच्या हिंदोळ्यावर भावनांचे अधीर भाव आणखी अधीर होतात..!
प्रेम…परमेश्वराने माणसाला दिलेलं असं पारलौकिक स्पंदन जे माणसाच्या जगण्याला समृद्ध करुन जातं.प्रेम…गहन,जटील,नि:स्वार्थ भाव.. जो भक्तीचे सर्वोच्च स्वरुप मानला जातो.प्रेम..मोबदल्यात काहीच मागत नाही म्हणूनच तर भगवत् गीतेत भगवान श्रीकृष्णाने पाप आणि पुण्याची सीमारेषा स्पष्ट करताना सांगितले पाप आणि पुण्य हे ’कृती’वर ठरत नसून ’हेतू’वर ठरत असतं.
असं हे प्रेम जगातील प्रत्येकाच्या मनातील पवित्र अनुभूती असली तरी प्रेमाचं नातं हे प्रत्येकाच्या जीवनात आनंद फूलवतो असे नाही.अनेकांचे प्रेम हे गहन अनुभूतींनी आयुष्य समृद्ध करणारे असले तरी अधुरे राहीले…!नातं संपलं मात्र,सोबत घालवलेल्या सोनेरी क्षणांनी ह्दयावर कायमच्या आठवणी कोरल्या..त्या आठवणीच्या वणव्यापासून कोणाचीही सुटका नाही.अगदी चित्रपटसृष्टितील गाजलेल्या तारकांची देखील नाही.जगभर प्रेमाचा आठवडा साजरा होणा-या वेलेंटाईन वीक निमित्त खास ‘सत्ताधीश’बॉलिवूड मधील काही अधूरी प्रेमांची दास्तां बयां करणार आहे…
राज कपूर-नर्गिसची प्रेम कहानी ही फिल्मी दूनियेत १९४०-५० च्या दशकातील सर्वाधिक चर्चित आणि अधूरी प्रेम कहानीपैकी एक आहे.१९४८ मध्ये राज कपूर निर्मित ‘आग’या चित्रपटात, नर्गिसचे हिरोईन म्हणून या चित्रपटसृष्टीत आगमन झाले.पुढे तब्बल ९ वर्ष राज-नर्गिसने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
१ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नर्गिसचे खरं नाव फातिमा रशिद होतं.वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरवात केली होती.बाल कलाकार म्हणून त्यांचा पहीला चित्रपट ‘तलाश-ए-हक’ हा होता.त्यांचा जन्म कोलकत्ता येथे झाला होता.त्यांच्या वडीलांचे नाव मोहनबाबू आणि आईचे नाव जद्दनबाई होेते त्या उत्कृष्ट गायिका होत्या.
राज कपूर भारतीय चित्रपटसृष्टीतले ‘द ग्रेट शो मॅन’म्हणून ओळखले जातात.अभिनेते,निर्माता,दिग्दर्शक असलेल्या राज कपूरने फार कमी वयात आपल्या अफाट बुद्धीची कल्पकता चित्रपटात साकारली होती.राज कपूरने बाल कलाकार म्हणून आपल्या कारर्कीदीची सुरवात केली. अभिनेता म्हणून त्यांचा पहीला चित्रपट ’नीलकमल‘(१९४७)होता,या चित्रपटात त्यांनी अतिशय सहज,सुंदर अभिनय केला होता.नर्गिस यांचे फिल्मी करिअर खूप मोठे नव्हते मात्र,त्यात त्यांनी प्रेक्षकांना लक्षात राहतील अश्या लक्षणीय भूमिका साकारल्या होत्या.१९४० ते १९६० च्या दशकात नर्गिस या बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनल्या होत्या.
राज कपूरने आपल्या पहील्या चित्रपटात ’आग’(१९४८)मध्ये अभिनेत्री म्हणून नर्गिसला साईन केले.त्यांची पहीली भेट नर्गिसच्या घरी झाली होती. नर्गिसने राज कपूरसाठी पहील्यांदा आपल्या घराचे दार उघडले त्यावेळी तिचे हात कनिक मळत असल्याने कनकेने भरलेले होते.त्याच हाताने आपले कपाळ पुसल्यामुळे तिच्या कपाळाला देखील कनिक लागली,हे बघून राज कपूरला हसू आले होते.त्यावेळी नर्गिसचे वय १६ तर राज कपूरचे वय २२ वर्ष होते.मनाच्या पटलावर उमटलेले हेच दृष्य राज कपूरने १९७३ साली ‘बॉबी’चित्रपटात डिंपल व ऋषि कपूरच्या पहील्या भेटीसाठी चित्रित केले.काळानुसार भावना बदलत असल्यातरी आठवणी या अमर असतात.माणसाच्या मेंदूत त्या साठलेल्या असतात.
राज कपूरने नर्गिसच्या कुटूंबियांना चित्रपटात काम करण्यासाठी मनवले व तेव्हापासून नर्गिस ही आर.के बॅनरची हिरोईन झाली.कामपासून सुरु झालेला हा प्रवास लवकरच एकमेकांविषयीच्या आकर्षणात व नंतर प्रगाढ प्रेमसंबंधात परिवर्तित झाला.
या दोघांनीही ‘आवारा’,‘श्री ४२०’,‘बरसात’या सुपरहिट चित्रपटांसह एकूण १६ चित्रपटात काम केलं.‘अंदाज’चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी त्यांच्यात प्रेमाची भावना रुजली.त्यामुळेच राज-नर्गिसवर चित्रित अनेक गाण्यांमध्ये एकमेकाप्रति त्यांची ओढ,तळमळ,विरह,दु:खं,अगतिकता ही अगदी खरी वाटते.‘क्यो आग सी लगा के,गुमसुम है चांदनी,सोने भी नही देता मौसम का ये इशारा,ये रात भीगी-भीगी…’
६० च्या दशकात राज कपूर-नर्गिस यांच्या प्रेम संबंधांची खूप चर्चा होती.तो काळ म्हणजे लग्न झालेल्या स्त्री-पुरुषांवर नैतिक बंधनाचा काळ होता.समाजाची अश्या प्रेम संबंधांना मान्यता नव्हती.मात्र,राज-नर्गिस हे जणू एकमेकांसाठीच जगात आले होते आणि जगत होते,इतकं अतुट नातं या दोघांमध्ये होतं.हे नातं,लग्नाच्या बेडीत अडकू शकले नाही कारण राज कपूर हे आधीपासूनच विवाहित होते व तीन अपत्यांचे पिता होते.यामुळे त्यांच्या या प्रेमाला सांसारिक मर्यादा होती.वयाच्या २२ सा व्या वर्षीच १९४२ मध्ये राज कपूर यांचं कृष्णा मल्होत्रा सोबत अरेंज मॅरेज झालं होतं.
मधु जैन यांच्या ‘द कपूर्स:द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’मध्ये नमूद केल्या प्रमाणे जेव्हा राज कपूरच्या घरी त्यांच्या प्रेमसंबधाविषयी कळले तेव्हा घरात खूप तनावपूर्ण स्थिती उद् भवली.कृष्णा कपूरने सांगितल्याप्रमाणे राज कपूर रात्रभर घरी यायचे नाहीत व ती त्यांची वाट पहात असे.राज कपूर फक्त दिवसा घरी येऊ लागले ते ही नशे मध्ये द्युत..घरी येताच ते झोपून जात असे.
त्यांनी आपले वडील पृथ्वीराज कपूर यांना वचन दिले होते ते पत्नी कृष्णा कपूरला कधीही सोडणार नाही व ही प्रेम कथा अधुरी राहीली.नर्गिस ही राज कपूरसोबत दूसरी पत्नी म्हणून देखील राहायला तयार होती.यासाठी त्यांनी मोठमोठ्या वकीलांचाही सल्ला घेतला होता.देशाचे गृहमंत्री माेरारजी देसाई यांना देखील नर्गिसने राज कपूरची दुसरी पत्नी होण्याची ईच्छा सांगितली होती.यावरुन तिचं राज कपूरवरील उत्कट प्रेम दिसून पडतं.या सगळ्यानंतरही राज कपूर नर्गिससोबत लग्न करण्यास तयार नव्हते.
तब्बल ९ वर्षांच्या नात्यानंतर,या नात्यामध्ये नर्गिसला काेणतेही भविष्य दिसत नव्हते.नर्गिसचे बंधू अख्तर हुसैन यांना देखील राज-नर्गिसच्या नात्यावर आक्षेप होता.हे नातं १९५७ पर्यंत टिकलं.९ वर्षांच्या काळखंडात अगिणक सुख-दु:खाचे क्षण दोघांनीही सारख्याच भावनेने भोगले होते,जगले होते..भावभावनांच्या हिंदोळ्यात सारखचे झूलले होते,मात्र लग्नाच्या बेडीत त्यांचे हे नातं अडकलंच नाही व सुनील दत्त यांच्यासोबत लग्नाचा निर्णय नर्गिस यांनी घेतला व नियतीने त्या दोघांनाही विभक्त केले.
मधू जैन यांनी लिहल्याप्रमाणे राज कपूरच्या मनात नर्गिसने त्यांना धोका दिला असल्याची भावना होती.ज्यावेळी नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केले त्या वेळी राज कपूर आतून खूप तुटले होते.त्यांनी स्वत:ला मद्यामध्ये बुडवून टाकले,अनेकदा ते बाथरुम मध्ये जाऊन रडत असे.ते इतके जास्त दु:खी होते की सिगारेटच्या तुकड्यांनी स्वत:लाच अनेकदा चटके देत असे,हे पाहण्यासाठी ते स्वप्नात तर नाही ना?नर्गिस त्यांच्यासोबत असं कसं करु शकते,याचं त्यांना खूप दू:खं झालं होतं.नर्गिस ही फक्त राज यांचे प्रेम नव्हती,ती राज यांच्या जगण्यातला श्वास होती.उर्जा होती.अचानक ह्दयाच्या इतक्या खोलवर रुजलेलं प्रेम दूस-या कोणाच्या तरी हक्काचं होणं हे दु:खं,ही चोट सहन करायला दगडाचं काळीज लागतं जे…राज यांचं नव्हतं…काळच…या ही दु:खावर औषध ठरला.
राज-नर्गिसचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर राज कपूर यांनी पत्रकार सुरेश कोहली यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.नर्गिस तिच्या जीवनात लग्न या संस्काराला खूप महत्व देत होती.संपूर्ण जग मी नर्गिसला फसवले असं सांगतं मात्र,नर्गिसने माझा विश्वासघात केला,हेच सत्य आहे…!
त्यांनी नर्गिसोबत कधीही लग्न करण्याचा हेतू नसल्याचेही एका मुलाखतीत स्पष्ट केले.‘अगदी सुरवातीपासून मी एक रेषा आखली होती,माझ्यासाठी हे स्पष्ट होतं की,माझी पत्नी ही अभिनेत्री नाही आणि माझ्याबरोबर काम करत असलेली अभिनेत्री ही माझी पत्नी नाही’.माझ्या मतानुसार पत्नीचा अर्थ असा की,जी माझ्या मुलांची आई आहे,त्यामुळे माझे कौटूंबिक आयुष्य हे दुसरीकडे कुठेतरी दूर आहे.दुसरीकडे अभिनेत्री आहे,जी माझ्या सर्जनशीलतेमध्ये भर टाकत असे,ते तिच्यासाठी समाधानकारक आहे…’.मी कधीच माझ्या पत्नीला अभिनेत्री व अभिनेत्रीला माझी पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला नाही….!
१९५८ साली नर्गिस यांनी सुनील दत्तसोबत लग्न केलं.नर्गिस तिच्या लग्नाच्या नात्याविषयी अखेरपर्यंत खूप प्रामाणिक राहीली.नर्गिस यांच्यावर पुस्तक लिहणा-या टी.एस.जॉर्ज यांनी आपल्या पुस्तकात लिहलं,नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या लग्नानंतर राज कपूर यांनी मोठ्या प्रमाणातवर दारु पिण्यास सुरवात केली होती.१९५७ साली ‘मदर इंडिया’च्या सेटवर एक भयानक आगीची घटना घडली.या चित्रपटात राजेंद्र कुमार व सुनील दत्त यांच्या आईची भूमिका करणा-या नर्गिस, या चित्रपटाच्या सीनमध्ये आगीच्या मधोमध सापडतात व जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडतात,असा तो सीन होता.
या सीनमधील आग ही खरी होती,चार ही बाजूने आगीने वेढलेली नर्गिस ही देखील खरी होती व आगीने क्षणार्धात उग्र रुप घेतल्याने जीवाच्या आकांताने ओरडणारी नर्गिस ही देखील खरी होती.चित्रिकरण करणारी संपूर्ण युनिट अचानक आलेल्या या संकटामुळे पार हादरुन गेली होती.कोणालाच नर्गिसला त्या आगीतून बाहेर कसे काढायचे हे सूचत नव्हते,इतक्यात जांबाज सुनील दत्त जीवाची परवाह न करता त्या आगीत कुदला व नर्गिस यांना ब्लँकेंटमध्ये उचलून आगीतून रस्ता काढून बाहेर पडला!या घटनेत सुनील दत्त चांगलेच भाजले होते.मात्र,नर्गिस यांचा जीव वाचला होता.
जगातल्या कोणत्याही स्त्रीला तिला कसल्याही संकटातून बाहेर काढणारा पुरुष,आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडत असतो..या घटनेनंतर नर्गिस व सुनील दत्त यांच्यात प्रेमाचा अंकूर फूलला.१९५७ मध्ये ’मदर इंडिया‘रिलिज झाली व ११ मार्च १९५८ रोजी नर्गिसने आपला भूतकाळ त्या घटनेतील आगीत विसर्जित करुन नव्याने जगण्याची इनिंग सुरु केली.त्यांना तीन अपत्ये झाली.प्रिया,नम्रता व संजय दत्त. मृत्यू पर्यंत सुनील दत्त सोबत लग्नाचं हे नातं २३ वर्षांपर्यंत तितकंच अतुटआणि उत्कट होतं.
राज कपूर यांचे मधले पुत्र व सुप्रसिद्ध अभिनेते ऋषि कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’या आत्मचरित्रात लिहले की,माझ्या वडिलांचे व नर्गिसजींचे प्रेमसंबंध होते,तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्यामुळे माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही,मला ही घरी काहीही चूकीचे झाल्याचे आठवत नाही. पण,मला आठवतं की, राज कपूर वैजयंती मालासोबत ‘संगम’च्या चित्रीकरणादरम्यान रिलेशनशिपमध्ये होते त्यावेळी मी माझ्या आईबरोबर घर सोडून काही दिवसांसाठी मरीन ड्राईव्हमधील नटराज हॉटेलमध्ये राहायला गेलो होतो…!अर्थात राज कपूर यांचे नाव त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीसोबत जोडल्या गेलं,पद्मिनी,सीमी गरेवाल,वैजयंती माला,जीनत अमान आदी तरी…त्यांच्या ह्दयातील नर्गिससाठी असलेलं सर्वोच्च स्थान कोणीही घेऊ शकलं नाही.
नर्गिस यांना कर्क रोग झाला.त्यांच्या संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होत होती.नर्गिस या खूप काळ लाईफ सपोर्ट सिस्टिमवर होत्या.डॉक्टर्सने सुनील दत्त यांना हे सपोर्ट यंत्र काढण्याचा सल्ला दिला मात्र,सुनील दत्त यांनी असे करण्यास कायम डॉक्टरांना मनाई केली. ८ मे १९८१ साली संजय दत्त याचा पहिला चित्रपट ‘रॉकी’रिलिज होणार होता,त्या पूर्वीच ३ मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला.या शोच्या प्रिमिअमच्या वेळी सुनील दत्त यांनी चित्रपटगृहात नर्गिससाठी पहील्या रांगेतील एक खूर्ची ,त्यावर नर्गिसचे नाव लिहून रिकामी ठेवली होती….!
तर राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.दादासाहेब फालके पुरस्कार स्वीकारताना त्यांना श्वसनाचा त्रास(अस्थमा) झाला होता.,स्वत: महामहिम राष्ट्रपती यांनी त्यांची अवस्था बघता त्यांना खूर्चीवरुन उठू न देता,चालत येऊन त्यांना हा पुरस्कार बहाल केला होता.यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले,तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला व चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अंत झाला.
नर्गिस जग सोडून गेल्यावर राज कपूर ७ वर्ष जगले ,सुपर डूपर हिट चित्रपट निर्मित करीत राहीले मात्र,आपल्या प्रत्येक चित्रपटात त्यांची ‘प्रेरणा’ ही नर्गिस राहीली आहे,हे सत्य कोणापासूनही लपले नाही.१९५६ मध्ये आलेल्या आपल्या ‘जागते रहो’चित्रपटात राज कपूर वर एक दृष्य चित्रित झाले आहे,ते खूप तहानलेले असतात व अखेरच्या सीनमध्ये अतिथी कलावंत म्हणून येणारी नर्गिस त्यांना आपल्या हातातील मडक्यातून थंडगार पाणी पाजतानाचे दृष्य अनेकांचे काळीज खलास करुन गेले होते.हे पाणी पिऊन जगणे जणू तृप्त झाले असा आर्त भाव राज कपूर यांच्या चेह-यावर होता…त्यांचे त्यांच्या चित्रपटातील ‘प्रेमगीतांवर’ निरातिशय प्रेम होते.राज कपूर यांच्या चित्रपटात संगीत,गीत,शब्द,बोल,गायकी,ताल सगळं काही जणू नर्गिस होती त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक ‘प्रेम गीत ’हे श्रोत्यांच्या सरळ काळजालाच भिडतं…
जग जोपर्यंत प्रेमाचा दिवस साजरा करीत रहील.राज-नर्गिस यांच्या प्रेमाची अधूरी कहाणी आकाशातल्या अमर आणि अनंत ता-यांसारखी, सदैव चमकत राहील…!
Advertisements

Advertisements

Advertisements
