पत्रकारितेतील ‘डर्टी पिक्चरची’ मालिका सुरुच

महत्वाकांक्षी श्रेयाला पाहोचवले मनोरुग्ण अवस्थेत रुग्णालयात
पत्रकार जगत व सभ्य समाजाच्या बोथट संवेदना
पत्रकार क्षेत्रातील मोठ्या धेंड्यांसाठी कायदा ‘असमान’
अनुसूचित जाती-जमाती आयोगाची सीताबर्डी पोलिस ठाण्याला कारवाईची नोटीस
२१ मार्च २०२३ पासूनचे प्रकरण पोलिस विभागाने दाबले!
नागपूर,ता.४ फेब्रुवरी २०२६: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात भारतातील स्त्रीच्या सन्मानजनक जीवनासाठी,तिच्या समानतेच्या अर्थाजणासाठी,तिच्या आत्मसन्मानाच्या अस्तित्वासाठी आणि पुरुषसत्ताक समाजातील तिच्या संघर्षपूर्ण यशासाठी अनेक कायदे बनवले मात्र,स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षात देखील बाबासाहेबांची ती संवेदना देशातील पुरुषांच्या मानसिकतेत रुजलीच नसल्याचा प्रत्यय या देशात अनेक घटनांवरुन येतो.घराच्या सुरक्षीत समजल्या जाणा-या चार भिंतीतून अर्थाजणासाठी व स्वत:चे अस्तित्व शोधत बाहेर पडलेली स्त्री, अनेक पुरुषांना त्यांच्यासाठी ‘संधी’वाटते.कामाच्या ठिकाणी तिला येनकेन प्रकारे प्रभावित करुन स्वत:च्या विकृत कामतृप्तीसाठी ‘भोगण्याचा’त्यांचा प्रयत्न, एखाद्या महत्वाकांक्षी व सालस स्त्रीला मनोरुग्णावस्थेत कसा पोहोचवू शकतो,नागपूरात याचे उदाहरण पत्रकार श्रेया स्नहेदीप भोंगाडे यांच्या घटनेवरुन देता येईल.
श्रेया गेल्या १३ दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे.गंभीर अवस्थेत तिला दाखल करण्यात आले होते.तिची अवस्था देह असून जगण्यातला जिवंतपणा गमावल्यासारखी आहे,गेल्या दोन वर्षांपासून न्यायासाठी तळमळणा-या तिच्या अति संवेदनशील मनाने तिला या अवस्थेत पोहोचवले.ज्या पोलिस विभागाकडून न्यायाची पहीली पायरी सुरु होते त्याच सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-यांनी तिला पत्रकार क्षेत्रातील मोठ्या धेंडयांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यापासून परावृत्त करण्याचा अक्षम्य प्रकार केला!मात्र,श्रेया हिने हार न मानता तिच्यासोबत नागपूरातील एका स्थानिक वृत्त वाहीनीतील नोकरीत जे घडले त्यासाठी न्याय मागण्याचा व दोषींना शिक्षा होण्यासाठी लढा देण्याचा निर्धार कायम ठेवला.तिचे हे धाडस अखेर तिच्याच कोमल मनावर खोलवर जखम कोरीत राहीले व अखेर नैराश्याने ती मनोरुग्णावस्थेच्या खोल-खोल खाईत कधी ढकलल्या गेली हे तिला देखील कळले नाही.
सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या दिलेल्या तक्रारीत श्रेया नमूद करते की,नागपूरातील या स्थानिक वृत्त वाहीनीत नोकरीत रुजू झाल्यानंतर तिला तेथील एका वरिष्ठ अकाऊंटंटने त्रास देण्यास सुरवात केली.कुटूंबासाठी नोकरीची गरज असल्याने श्रेयाने त्याच्या या त्रासाकडे दूर्लक्ष करण्यास सुरवात केली.त्यामुळे त्याचे धाडस वाढत गेले.सुरवातीला व्हॉट्स ॲपवर व्यवसायिक असलेल्या संभाषणाने हळूच अश्लीलतेकडे वळण्यास सुरवात केली.त्याला उत्तर न दिल्यास नोकरी धोक्यात येईल व पत्रकारितेच्या जगतातून ती बाहेर फेकल्या जाईल या दडपणातून श्रेया त्याच्या या व्हॉट्सअप चॅटला दिलेल्या उत्तर देती झाली मात्र,योग्य शब्दात ती त्याला टाळू लागली.माझं लग्न झालं आहे,मला नवरा आहे,एक मुलगी आहे,असे बोलणे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही वरिष्ठ आहात..रात्री,अपरात्री असे मॅसेज पाठवू नका मात्र,तरी देखील या अकाऊंटटने तिला लैंगिक सुखाची मागणी कायम ठेवली..!
तुझ्या नव-याला कोण सांगेल?ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यातच असणार आहे,अश्या शब्दात तो तिच्यावर नोकरीच्या ठिकाणी दबाव टाकू लागला.त्याची विकृत मनोकामना पूर्ण होत नसल्याने तिच्यावर रात्रीच्या ११-११ वाजेपर्यंत कामाचा बोजा तो टाकू लागला.श्रेया ही जरी महत्वाकांक्षी असली तरी चारित्र्यहीन नव्हती.वरिष्ठांना खुश करुन शॉट कर्ट मार्गाने या क्षेत्रातील काही इतर स्त्रियांसारखा तिला यशाचा मार्ग चोखाळायचा नव्हता.अखेर तिने या वृत्त वाहीनीच्या संपादकाकडे त्याची तक्रार केली मात्र….त्या संपादकाने वाईट हेतूने तिलाच अश्लील पुस्तक देऊन तिच्या आत्मसन्मानाला खोलवर ठेच पोहाेचविण्याचे घृणित काम केले…!
या थोराड संपादकानेही,आपल्या मुलीच्या वयाच्या तरुण कर्मचारीमध्ये ‘संधी‘शोधली.मी भविष्यवेत्ता असून हात बघून मला प्रत्येकाचे भविष्य कळते अशी ‘अघोरी’थाप मारत, घरी नवरा-बायकोमध्ये सततच्या तनावामुळे बरेच दिवस शारिरीक संबंध होत नाहीत.मी तुला यावर खूप यशस्वी उपाय सांगतो,तो तू कोणालाही सांगू नकोस म्हणून या थोराड संपादकाने चक्क कव्हरमध्ये पॅक करुन श्रेयाला एक अत्यंत अश्लील चित्रे व मजकूर असलेले पुस्तक वाचायला दिले.श्रेया नोकरीतून घरी गेल्यावर पहीले काम तिने हे केले हे पुस्तक तिने आपल्या पतीला दिले!ते बघून स्नहेदिप यांनाही जबर धक्का बसला.
दुस-या दिवशी श्रेया कामावर आल्यानंतर या थोराड संपादकाने तिच्याकडे धाव घेत,पुस्तक पाहीले का?अशी विचारणा केली.यावर श्रेयाने वेळ मिळाला नसल्याचा बहाणा केला.मात्र,मी घरी एकटाच असतो,बायको-मुले परगावी राहतात,तू घरीच ये मी तुला नवरा-बायकोमधील संबंध कसे सुधारतात हे प्रात्यक्ष्क दाखवतो!असा ‘चमत्कारीक’ उपाय या संपादक नावाच्या भविष्यवेत्याने सांगितला….!मात्र,श्रेया त्याचा हा हेतू टाळत राहीली.
श्रेया ही मनाची खूप भावूक असल्याने नोकरीच्या ठिकाणावरील या सर्व ‘अनैतिक’गोष्टींमुळे ती प्रचंड तनावात राहू लागली.अखेर त्या वासनांधांची ईच्छा पूर्ती न करु शकल्याने व नोकरीच्या ठिकाणी कामाच्या संदर्भात होणारा अन्याय व सर्वांसमोर केला जाणा-या वारंवार अपमानातून तिचे धेर्य खचले…पतीसोबत तिने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले व लिखित तक्रार दिली.लैंगिक शोषण किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक सुखाच्या मागणीवरील तातडीच्या कारवाईवर, वेळोवेळी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे कितीही कठोर आणि स्पष्ट दिशानिर्देश पोलिस विभागाला दिले असले तरी शेवटी त्या सूचनांच्या व संवैधानिक कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार हे न्यायाची सर्वात पहीली पायरी असणारी‘एफआयआर’कॉपीमध्येच उमटताना दिसून पडत नाहीत….!
सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अतुल सबनीस व डीसीपी राहूल मदने यांनी श्रेयाला या मोठ्या धेंड्याविरुद्ध तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला,असे राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारीत स्नेहदिप नमूद करतात.या पोलिस अधिका-यांनी पिडीतेची तक्रार दाखल करुन घेण्या ऐवजी,तक्रार दाखल केल्यास तुझीच बदनामी होईल,तुला कोर्टात वाटेल तसे प्रश्न विचारले जातील,पत्रकारितेच्या क्षेत्रात तुला कोणीही जॉब देणार नाही,असे सांगून ऑफिसमध्ये जाऊन ‘तडजोड‘करण्याचा ‘अफलातून’सल्ला दिला.आपल्या आत्मसन्मानाची पहीली लढाई श्रेया सीताबर्डी पोलिस ठाण्यातच हरली होती…!
ऑफिसला गेल्यानंतर एच.आर यांनी तिचा विभाग बदलला.टी.व्हीच्या लहान पडद्यावर वृत्त वाचन करताना दिसणा-या श्रेयाला प्रोगाम शेड्यूलिंगचे काम देणे बंद करुन बॉडबँचे नवीन काम दिले.हे काम श्रेयाचा या क्षेत्रातील अनुभव व कर्तृत्वाच्या तुलनेत अतिशय निम्न श्रेणीचे काम होते तरी देखील श्रेयाने ते इमाने इतबारे केले.या काळातही शाब्दिक त्रास व रात्री-अपरात्रीपर्यंत कामाचा बोजा टाकण्यास सुरु होते,जेणेकरुन श्रेया स्वत:हून काम सोडून निघून जाईल.ऑक्टोबर २०२३ मध्ये मात्र,मालकांच्या आर्शिवादातून जबाबदारीची खूर्ची उबणा-यांची ‘सहनशीलता’संपली व त्यांनी चक्क श्रेयाला कामावरुन काढत असल्याचे पत्र हातात दिले…!हा श्रेयासाठी जबर मानसिक धक्का होता.
नोकरी ही स्त्री असो किंवा पुरुष त्यांच्यासाठी केवळ अर्थाजण नसतो,ती त्यांची समाजातील ओळख असते,त्यांची प्रतिष्ठा असते,त्यांचा स्वाभिमान असतो.अश्या या स्वाभिमानावर अचानक जबाबदारीची खूर्ची उबवणा-यांच्या विकृत अंहभावातून चोट बसल्यास ,किती ही कठोर मनाची स्त्री असो किंवा पुरुष,कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही.इतकंच…काही जण काही काळाने सावरतात…भविष्याच्या विचार करुन पुढे चालू लागतात…श्रेया मात्र… त्यातून कधी सावरलीच नाही….!ती…कायमची थांबली.
या अन्यायाविरोधात या वृत्त वाहीनीच्या मालकाकडेही श्रेया व स्नेदिपने दाद मागितली.पंधरा दिवसांनंतर या कारण कथित आरोपी हे मलेशिया दौ-यावर गेले असल्याचे मालकाने सांगितले.मूळात तुमच्या बायकोने त्या अकाऊंटटला रिप्लाय दिलेच कशाला?असा प्रश्न ही त्या मालकाने केला.
मालक असणं आणि नोकरदार असणं यात भेद असतो,हे त्या मालकाला कळले असते तर त्याने कधीही हा ‘मूर्खासारखा’ प्रश्न या पिडीतांना विचारला नसता.श्रेयाच्या संपूर्ण व्हाॅट्स ॲप चॅटमध्ये कुठेही ती त्या विकृत अकाऊंटंला प्रोत्साहन देताना दिसून पडत नाही.उलट वारंवार ती त्याला त्याच्या चुकीच्या भावनांपासून परावृत्त करताना आढळते.त्या विकृत चॅट्सना ‘उत्तर देणे’हा तिच्या नोकरीतील अस्तित्वासाठी ‘अपरिहार्यता’ठरणे… हेच या मालकाच्या व्यवसायाचे सर्वात मोठे ‘अपयश’ होते.तरीही तो ‘पुरुष‘ श्रेयालाच दोषी ठरविता झाला….!
महत्वाकांक्षी श्रेयाला या घटनेनंतर कुठेही नोकरी मिळालीच नाही.तिच्यातील कर्तृत्वाची व सादरीकरणातील अफाट गुणवत्तेची जाणीव असणा-या तिच्या अनेक हितचिंतकांनी तिला स्वत:चे युट्यूब चॅनल सुरु करण्याचा सल्ला दिला मात्र,श्रेया ही न्यायासाठी व तिच्या आत्मसन्मानावर चोट करणा-या दोषींना तुरुंगात बघण्याच्या ईच्छेने झपाटली होती. तिचं कशातही मन नव्हतं.ती सैरभैर झाली.ढाळललेला मनाचा तोल सावरण्यासाठी ती वेडी या निर्दयी जगात कुठेही भटकू लागली.अगदी पत्रकार भवनात देखील ती थट्टेचा विषय बनून गेली…! कर्क रोगाच्या रुग्णाशीही आपल्या समाजाला उपजत सहानुभूती असते मात्र,मनाच्या रोगाशी लढणारे हे समाजात थट्टेचा विषय कसे बनू शकतात…?याचं आत्मचिंतन आता तरी श्रेयाची थट्टा करणारे करणार आहेत का?केवळ पत्रकारितेतील जगच नव्हे तर श्रेया आपल्या ज्या घरट्यात राहते,तेथील शेजारी व वस्तीतील लोकं ही तिची ‘मनोवस्था ’समजून न घेता तिच्या असहज वागण्याची क्रूर थट्टा करत राहीले….!यामुळे ती जास्त आक्रमक होऊन कोसळली…!
पोलिस विभाग ते पत्रकार जगत,तिला सर्वांच्या मदतीची,सहानुभूतीची नितांत गरज होती,मात्र,या सर्वांनी मिळून तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचवले…..!तिचा दोष हाच होता ती एक ‘स्त्री’होती,त्यात ती महत्वाकांक्षी होती,त्यात ती सुंदर ही होती,सभ्य समाजासाठी ती कोणाची तरी पत्नी होती,एक आई होती मात्र,समाजात दिवसाढवल्या उजळ माथ्याने फिरणा-या व पत्रकारितेतील नीती मूल्यांचा सतत डंका पिटणा-या संपादक आणि वरिष्ठ पदे भूषविण्या काहींसाठी ती फक्त आणि फक्त ’भोग्या’होती…..!
श्रेयाचे अपराधी या समाजातील, पत्रकारितेतील प्रत्येक जण आहे.ती शारिरीक दुखण्यातून बरी होईलही मात्र,मानसिक व भावनिकरित्या ती जी खचली आहे त्या कोवळ्या व निष्पाप मनाला उभारी कोण देणार?डॉक्टर सांगतात तिला मानसिकरित्या बरं होण्यास किती तरी वर्षांचा काळ लागू शकतो….!कुठून आणावी इतकी सहनशीलता तिच्या पतीने?काय दोष होता श्रेयाचा?कोणत्या अपराधाची शिक्षा भाेगतात आहेत हे तिघेही…!तो..ती..अन् त्यांची चिमुरडी..जी शाळेच्या वर्गात डेस्कवर डोकं ठेवून आता रडत असते….!वर्ग शिक्षिकेचा स्नेहदिपला फोन जातो,चिमुरडी वर्गात का रडत असते?फाटलेल्या मनाने स्नेदिप फक्त इतकंच सांगू शकला,मॅडम..तिची आई एम्समध्ये भर्ती आहे….!
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या सूचनेनंतरही सीताबर्डी पोलिस ठाण्यातील एक महिला चौकशी अधिकारी या प्रकरणात आपल्या वरिष्ठांना वाचवताना दिसून पडत असल्याचा आरोप स्नेहदिप करतात,एका महिलेला दुस-या महिलेच्या आत्मसन्मानाचे दुख: समजू नये…यापेक्षा दुसरी शोकांतिका बाबासाहेबांच्या संविधानाची ती काय असणार….?
……………………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
