Advertisements

(भाग-१)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.३ नोव्हेंबर २०२५: महाराष्ट्रात सध्या निवडणूक आयोग, ईव्हीएम,मत चाेरी,दुबार मतदान,पत्त्यांच्या घोळ आणि संपूर्ण निवडणूकच हायजॅक केल्याचा मुद्दा गाजत आहे.विरोधकांनी शेकडो पुरावे गोळा करीत पुराव्यानिशी नुकताच ‘सत्याचा ’मोर्चाच मुंबईत काढला.याला सत्ताधारी भाजपकडून देखील ‘हिंदू-मुस्लिम’अँगलने प्रतिउत्तर मिळाले.मंत्री आशिष शेलार यांनी विरोधक ज्या मतदासंघातून विजयी झाले त्या मतदारसंघात लाखो मुस्लिम मतदारांनी कसे दुबार मतदान केले,याची जंत्रीच वाचून दाखवली.माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किमान शेलारांनी ‘मत चोरी’झाली हे तरी अप्रत्यक्षरित्या मान्य केले,असे सांगत निवडणूक आयोग तर या मुद्दाला गेल्या १२ महिन्यांपासून सातत्याने नाकारत असल्याचा टोला हाणला.आज पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या (फक्त नगरपालिका आणि ग्राम पंचायत! जणू सत्ताधा-यांची लिटम् स टेस्ट असून,यात यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणूका घोषित होतील,लोकशाहीत लोकांचेच राज्य मागील चार वर्षांपासून निवडणूक आयोगाने गुंडाळून ठेवले आहे तरी देखील आयोगाला संवैधानिक मार्गाने लोकांचे राज्य परत आणण्याची कोणतीही घाई नाही!) तारखांची घोषणा देखील केली.या सर्व पार्श्वभूमीवर ‘सत्ताधीश’ने लोकशाही देशातील सर्वात महत्वपूर्ण घडामोड असलेल्या पारदर्शक मतदानाविषयी देशात व राज्यात घडलेल्या आजपर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडीचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वायत्त निवडणूक आयोग हे कोणत्याही लोकशाही देशासाठी एकमेव मूल्याधिष्ठित व आधारभूत संरचना आहे.मात्र,भारतात नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या हरियाणा,कर्नाटक व महाराष्ट्राच्या निवडणूकीनंतर निवडणूक आयोगाने राबवलेल्या निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व विराेधी पक्ष ‘मत चोरी’मुद्दावर एकत्रित आले असून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे मतदारयादीतील बोगस नावे,दुबार मतदार आणि निवडणूक आयोगाची पराकोटीची ’निष्क्रीयता!’
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी मतचोरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.यानंतर महाराष्ट्रात सर्वच विरोधी पक्ष या मुद्दावर एकवटले.विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्दांचे,दोष निवारण करण्यासाठी यंत्रणेला भाग पाडायचे सोडून सत्ताधारी भाजपाच आयोगाच्या पाठीशी उभी राहत असल्याचे सातत्याने दिसून पडत असून, सुधारणेचा मुद्दाच बाजूला पडून फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सध्या महाराष्ट्रात झडत आहेत.
याद्यांमधील मतदारांची दूबार नावे,एकाच पत्त्यावरील शेकडो मतदारांची नावे,अस्तित्वात नसलेल्या घरांतील मतदारांची नोंद,चक्क शौचालयाच्या पत्तावर शंभर मतदारांची नोंद,मतदारांच्या वयाच्या तपशीलातील दोष विधान सभा निवडणूकीनंतर चर्चेत आल्या.यावर ’आम्ही आमच्या पद्धतीने काम करु,तुम्ही शंका असलेल्या विशिष्ट प्रकरणात एकेका मतदाराच्या नावावर आक्षेप घेऊ शकता,सरसकट नव्हे’निवडणूक आयोगाची ही भूमिका वेळखाऊ ठरलेली असून व्हीव्हीपॅटच्या वापरावरील फूली,सीसीटीव्ही फूटेज न देण्याची आयोगाने घेतलेली भूमिका,निवडणूकीनंतर अवघ्या ४५ दिवसात डेटा नष्ट करण्याचे काढलले फर्मान एकूणच आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत दाट संशय निर्माण करतात.
३ फेब्रुवरी २०२५ रोजी राहूल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदारयाद्यांत हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप केला.निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणूकीशी संबंधित सर्व डेटा विरोधी पक्षांना द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती,जी निवडणूक आयोगाने धुडकावून लावली.महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांचा ‘लाजिरवाणा’पराभव झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणूकी पूर्वी ७० लाख नव्या मतदारांची भर पडली,असा आरोप राहूल गांधी यांनी केला.तर निवडणूक आयोग केंद्र सरकारचा ‘गुलाम’असल्याचा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.महाराष्ट्रात ३९ लाख मतदार बाहेरुन(फ्लोटिंग वोटर्स)आले हाेते व आता ते बिहार निवडणूकीतही मतदान करतील असा खळबळजनक दावा ही राऊत यांनी केला.
राहूल गांधींच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,दररोज एकच चुटक़ुला सांगितला तर त्यावर लोक हसत नसतात,अशी मिश्किली केली.तर तत्कालीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भारतातील निवडणूका या ‘गोल्ड स्टँडर्ड‘ असल्याची मखलाशी केली.मतदारयाद्यांतून विशिष्ट नावे वगळणे,मतदान यंत्रांबाबतचे(ईव्हीएम)आरोप,मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील रात्री अकरा पर्यंत मतदान होणे, मतदानाचा टक्का प्रचंड वाढणे,तीन वेळा मतदानाची टक्केवारी वाढवून वेगवेगळी घोषित करणे इत्यादीबाबतचे सर्व आरोप राजीवकुमार यांनी फेटाळले.साडेचार कोटी व्हीव्हीपॅटची तपासणी केली असून,कुठेच तफावत आढळली नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीन वेळा या माहितीत बदल केला व राज्यात ६७.१२ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले.मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता ५९ टक्के ७ वाजता हीच आकडेवारी ६५.११ टक्के,रात्री साडे अकरा वाजता ६५.२ व दुस-या दिवशी ६७ टक्के अशी घोषित झाली होती.मतदानाच्या आकडेवारीत ७.८३ टक्क्यांचा फरक कसा?यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.काँग्रेसने ११८ मतदारसंघातील विजयाच्या मताधिक्याबद्दलही आयोगाला स्पष्टीकरण मागितले.महाराष्ट्रातील या ११८ विधानसभा मतदारसंघातील विजयाचे मताधिक्य २५ हजारांपेक्षा कमी राहीले होते.यातील १०२ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले.या बद्दल लेखी माहिती निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला द्यावी,या संपूर्ण आकडेवारीचा तपशील आयोगाने जाहीर करावा,यातून आयोगाची पारदर्शकता व निष्पक्षाता दिसून येईल,असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले.
यावर आयोगाने सायंकाळी ५ वा.जाहीर होणारी आकडेवारी ही अंदाजे असून राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींना दिल्या जाणा-या फॉर्म १७ सीच्या आधारेच राज्याचा अंतिम मतटक्का जाहीर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.मतमोजणीचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करुन देण्याची विरोधकांची मागणी देखील लोकशाही देशात आयोगाद्वारे फेटाळण्यात आली!
सर्वात महत्वाचे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज तसेच उमेदवारांचे व्हिडीयो रेकॉडिंग यासारख्या इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांची सार्वजनिक तपासणी करता येऊ नये यासाठी मोदी सरकारने तातडीने निवडणूक नियमात काही बदल केले.या निर्णयाला आव्हान देणारी रिट याचिका काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली,निवडणूक प्रक्रियेतील अखंडता झपाट्याने नष्ट होत आहे.सर्वोच्च न्यायालय त्याची पुनर्स्थापना करण्यात मदत करेल,असे याचिकेत नमूद केले.
लाखो मतदार अवघ्या तीन महिन्यात वाढले या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोगाची बाजू घेत, राहूल गांधी यांनी पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला तर मतदार ओळखपत्रावर एकसमान क्रमांक(ऐपिक क्र.)असणे म्हणजे ते बनावट मतदार नाहीत,असा खुलासा आयोगाने केला.दोन वेगवेगळ्या राज्यात मतदारांना एकसारखाच मतदार ओळखपत्र क्रमांक देण्यात आल्याचा वृत्तानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले.लोसंख्याशास्त्रीय तपशील,विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र यासारखे अन्य तपशील वेगळे असतात.मतदार ओळखपत्रावरील क्रमांक काहीही असला तरी मतदार ज्या राज्यात किवा केंद्रशासित प्रदेशातील मतदारयादीत नोंदणीकृत आहे.तेथील संबंधित मतदारसंघातील मतदान केंद्रावरच मतदान करुन शकतो,या व्यतिरिक्त तो इतरत्र कुठेही मतदान करु शकत नाही,असे आयोगाने स्पष्ट केले.सर्व राज्यांच्या मतदारयादीचा डेटाबेस ‘ऐरोनेट’प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यापूर्वी विकेंद्रित आणि मॅन्युअल प्रक्रियेमुळे वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील काही मतदारांना समान मतदार ओळखपत्र क्रमांक देण्यात आला होता.परिणामी,काही राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी समान अल्फान्युमरिक मालिका वापरत आहेत.यातून वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना एकसारखा ओळखपत्र क्रमांक मिळण्याची शक्यता आहे,असे आयोगाने अधोरेखित केले मात्र,महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत या एकसमान मतदार ओळखपत्र क्रमांक असलेल्या मतदारांनी अवैध मतदान केले का?याचे कोणतेही स्पष्टीकरण अयोगाकडून मिळाले नाही.
मतांच्या चोरीसाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याचा आरोप करीत हजारो काँग्रेस समर्थकांची नावे मतदारयादीतून परस्पर वगळल्याचा नवा आरोप राहूल गांधी यांनी केला तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘लोकशाहीचे मारेकरी’असल्याची घणाघाती टिका करुन मतचोरांना ते संरक्षण देत आहेत,या शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला.कर्नाटकमध्येही आयोगाने हे कृत्य केले असा आरोप करीत, केवळ कर्नाटक नव्हे तर देशभरात ‘मतचोरी’ची कृत्य घडली,हे सिद्ध करण्यासाठी मोहिम सुरुच ठेवणार,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.आयोगाने बनावट मतदार तयार करुन भाजपसाठी मतदान वाढवण्याचा असंवैधानिक प्रकार केला.६ महिन्यात प्रत्येक मतदार ओळखपत्राची लाखो छायाचित्रांशी तुलना केलेल्या आमच्या संशोधनात, बनावट आणि बेकायदा पत्ते तयार केले असल्याचे आढळले.एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार आढळले असून बेकायदा फोटो आणि पहिल्यांदाज मतदार नोंदणी करण्यासाठी असलेल्या फॉर्म-६ चाही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार बी.आर.पाटील यांच्या आलंद मतदारसंघात किमान ६,०१८ काँग्रेस समर्थकांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे पुरावेही त्यांनी दिले.महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात देखील त्याच पद्धतीने ६,८५० बोगस नावे जोडण्यात आली,असा दावा त्यांनी केला.
महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मतचोरीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांना चित्रफित दुवा जोडलेला संदेश पाठविण्याला केंद्र सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने परवानगी नाकारली!पक्षाच्या डेटा ॲनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन ‘ट्राय’ला लक्ष्य केले.परवानगी नाकारण्यासंदर्भात ‘ट्राय‘च्या अधिका-यांनी पाठविलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट सोबत जोडला.‘महाराष्ट्र २०२४ च्या निवडणूकीची चोरी कशी झाली‘या यूट्यूबवरील चित्रफितीचा दुवा जोडलेला एसएमएस पाठवायचा होता.सरकारी प्रक्रियेनुसार ‘ट्राय’कडे पक्षाने अर्जही पाठवला मात्र,‘ट्राय’ने एसएमएस पाठविण्यास परवानगी नाकारली….!
राहूल गांदी यांनी मतदार यादीतील गैरप्रकाराची उदाहरणे देत गुरकिरत सिंग डांग या मतदाराची ११६,१२४,१२५,१२६ या चार मतदार केंद्रावर नावे होती,आदित्य श्रीवास्तव यांचे नाव कर्नाटक,महाराष्ट्र,उत्तर प्रदेशात चार मतदार याद्यांमध्ये आढळले असल्याचे सांगितले.४० हजार ००९ मतदार ओळखपत्रांवरील पत्ताच अस्तित्वात नाही किवा पत्ता शून्य तसेच खोटे आढळले.अनेकांच्या वडिलांची नावे विचित्र,एकाच पत्त्यावर शंभरावर मतदार,एका खोलीत ४६ मतदार तर एका खोलीत ८० मतदारांच्या नोंदी सापडल्या. अर्ज-६ चा गैरवापर करुन तब्दल ४ हजार,१३२ नवी मतदारांची नोंद,शेकडो मतदारांचे दुबार मतदान याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
राहूल गांधी यांनी मतदार यादीतील गैरप्रकाराच्या मुद्दावरुन केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत, भाजपशी निवडणूक आयोगाने हातमिळवणी केली नसल्याचे निवडणूक आयोगाने सिद्ध करावे,असे आव्हान केले.मतदारांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग उत्तर का देत नाही?लोकसभेनंतर अवघ्या तीन महिन्यात लाखो मतदारांची नावे यादीत कशी जोडण्यात आली?मतदानाची टक्केवारी वेळावेळी का बदलली?असा प्रश्न केला.आयोगाचे भाजपशी साटेलोटे असल्याचा आरोप त्यांनी केला.सत्ताधा-यांनी आयोगासोबत संगनमत करुन देशभरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फसवणूक केली.महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीनंतरही जनमत चाचण्यांचा कल वेगळा असताना निकाल वेगळा लागला,ज्यांचे पत्तेच अस्त्विात नाहीत त्यांनी ही निवडणूक भाजपला जिंकून दिली असल्याचा टोला ही त्यांनी हाणला.
२०२४ मध्ये सत्तेवर टिकून राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना फक्त २५ जागा चोरायच्या होत्या.भाजपने लोकसभा निवडणूकीत ३५ जागा ३३,००० मतांच्या फरकाने जिंकल्या.आमच्यासाठी आता सीसीटीव्ही फुटेज आणि मतदार यादीच गुन्ह्यांचे पुरावे आहेत,आयोग ते पुरावे नष्ट करण्यात गुंतलेला आहे,असा आरोप राहूल गांधींनी केला.
आयोगाने राहूल गांधीसह विरोधकांचे मतचाेरीचे आरोप निराधार असल्याचे सांगून,राहूल गांधी यांनी ७ दिवसांत पुरावे द्यावेत,अन्यथा देशाची माफी मागावी,असे आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी केले.मुख्य निवडणूक अधिका-यांकडे एकाही मतदाराचे नाव पुराव्यासह मिळाले नाही,अशी पुष्टि त्यांनी जोडली. प्रत्येक पक्षाची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे होत असते त्यामुळे आमच्यासाठी सगळे पक्ष समकक्ष असल्याचे ते म्हणाले.मतदानाच्या अखेर टप्प्यात मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले,त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली.खोटे कितीही वेळा बोलले तरी ते सत्य होत नाही,असे ज्ञानेश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले.
निवडणूक आयोगाशी केलेल्या पत्रव्यवहारात राहूल गांधी यांनी कधीही स्वत: स्वाक्षरी केलेले पत्र पाठवलेले नाही.आम्ही जे काही उत्तर देतो ते इतर संघटनांना देतो आणि प्रत्येक वेळी राहूल गांधी मागे हटतात,असा आरोप निवडणूक आयोगाने केला.सायंकाळी ५ वा.नंतरचे वेबकास्टिंगचे फूटेज सार्वजनिक करण्याची विरोधकांची मागणी ही ‘मतदारांच्या खासगीपणावर घाला ’असल्याचे (चमत्कारीक) मत ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केले!मतदान केंद्रावरील वेबकास्टिंग,सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची कृती मतदारांच्या गोपनीयता आणि सुरक्षेवर घाला घालणारी ठरु शकते.ही कृती लोकशाही प्रक्रियेचे संरक्षण व मतदारांच्या हिताची वाटत नाही.विरोधकांनी विरुद्ध उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतुने ही मागणी केली असून,प्रत्यक्षात मतदारांच्या गोपनीयता आणि सुरक्षेप्रति असलेली चिंता,लोकप्रतिनिधत्व कायदा,१९५० आणि १९५१ चा उल्लंघन करणारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
राहूल गांधी यांचे आरोप अतिशय गंभीर असून अशा आरोपांबात फक्त,उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते,असे ज्ञानेश कुमार म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगावरील राहूल गांधींच्या आरोपावरुन ‘राहूल गांधी यांची हार्डडिस्क करप्ट’झाली असल्याचा टोला हाणला.मतांची चोरी कुठेही झालेली नसून राहूल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असून ते त्याच-त्याच गोष्टी बोलून पळून जातात,अशी बोचरी टिका कली.
ज्यांच्याकडून उत्तर हवे तेच पुरावे नष्ट करीत असल्याची टिका करीत राहूल गांधी यांनी बिहारमधील मतदारयादीतील अनियमिततेच्या विरुद्ध ‘व्होटर अधिकार यात्रा’ १७ ऑगस्ट पासून काढण्यास सुरवात केली.बिहारच्या ३८ जिल्ह्यांमधून २४ जिल्ह्यांमधून ही यात्रा गेली.१६ दिवसात संपूर्ण राज्यात १,३०० किमीचा प्रवास या यात्रेने केला.या यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी पाटण्याच्या गांधी मैदानावर झाला.
बिहारमध्ये मृत ठरवलेल्या मतदारांसोबत राहूल गांधी यांनी संवाद साधला.निवडणूक आयोगाने असा ‘विशेष अनुभव’दिल्याबद्दल आभार,असे खोचक ट्टीट केले.दिल्ली फिरुन घ्या,मृत लोकांना कोणतेही तिकीट लागत नसल्याची गंमत मृत ठरविण्यात आलेल्या मतदारांशी केली.बिहारच्या निवडणूकीत पराभव दिसत असल्यानेच काँगेसकडून बहाणे शोधल्या जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते अनुराग ठाकूर यांनी केला.निवडणूक पद्धतीवरील संशयाबद्दल तत्कालीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील संताप व्यक्त केला.भारताने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे(ईव्हीएम)आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेची कार्यक्षमता वाढली आहे,असे ते म्हणाले.
(भाग -२ मध्ये न्यायालये व देशाचा मतदार)
……………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
