Advertisements

पिंटू झलके यांचा आरोप
पाणी पुरवठ्यातील तोटा २९ टक्के झाल्याचा ओसीडब्ल्यूचा दावा
नागपूर,ता.९ ऑक्टोबर २०२५: आज विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ऑरेंज सिटी वर्क्स(ओसीडब्ल्यूने)पाणी पुरवठ्यातील तोटा (नॉन रेव्हेंन्यू वॉटर,एनआरडब्ल्यू)हे २९ टक्क्यांवर आल्याचा दावा करण्यात आला,जो नागपूरकरांच्या डोळ्यात कमालीची धूळफेक असल्याचा आरोप आज मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी पत्रकार परिषदेत केला.
मी स्वत: मनपाच्या जलप्रदाय विभागाचा २०१८ मध्ये माजी अध्यक्ष राहीलो असल्याने पाण्यासंबंधीचे सर्व करार-मदार,नियोजन व आकड्यांची धूळफेक मला माहिती असल्याचे ते म्हणाले.तीन महिन्यांपूर्वी नॉन रेव्हेंन्यू वॉटर म्हणजे ज्या पाण्याच्या वापरातून महसूलच मिळत नाही ते ४० टक्के होते अचानक तीन महिन्यात ‘मेलोडी की जादू’झाली अन् पाणी पुरवठ्याचा तोटा २९ टक्क्यांपर्यंत कमी झाला,असा टोला त्यांनी हाणला.
प्रशासनाचा कार्यकाळ सुरु झाला त्यावेळी देखील हा तोटा ४० टक्केच होता.कंपनीच्या दाव्यानुसार २०२४ मध्ये ४० टक्के असलेले एनआरडब्लूचे प्रमाण चालू वर्षात ऑगस्टपर्यंत २८.८९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.त्यामुळे कंपनी व नागपूर महानगरपालिकेला पाणी पुरवठातून होणा-या महसूलात वाढ होणार आहे.२०१२ मध्ये कंपनीसोबत मनपाचा करार झाला त्यात शहरातील जुन्या पाईप लाईन्स बदलून द्यायच्या होत्या,परिणामी आम्ही काम केले हे दाखविण्याचा प्रयत्न कंपनी करीत असल्याची खरमरीत टिका याप्रसंगी पिंटू झलके यांनी केली.
ओसीडब्ल्यूने बिलिंग सायकलच बदलली असल्यचा आरोप करीत,विशिष्ट भागातील एकाला बिल पाठवणे,दुस-याला नाही,तिस-याला पाठवणे,चौथ्याला नाही,असे अनेक घोळ कंपनीने केल्याने ग्राहकांनी झोन कार्यालयात धाव घेतली आहे.या सर्व घोळातून कंपनीने महसूलीचा आकडा फूगवून दाखवला,असा आरोप त्यांनी केला.
नागपूर शहराला रोज ७३० एमएलडी पाणी पुरवठा होतो त्यातील ५३० एमएलडीचेच बिलिंग होत असतं.तरी देखील पाणी पुरवठ्यातील तोटा हा अचानक २९ टक्क्यांपर्यंत आणणे याला ‘चमत्कारच ’म्हणावा लागेल.असा टोला झलके यांनी हाणला.
पाण्याचा कर वसूलण्याच्या आड कंपनीने मोठी हेराफेरी केली असून, ग्राहकांच्या ते लक्षातच आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.इतके वर्ष कंपनीला जे जमले नाही ते अचानक तीन महिन्यात कसे जमले?या बाबत मनपा आयुक्तांना देखील विचारणा केली असता आयुक्तांनी ’काम करतोय’असे सांगितले.
एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या महसूलीची तुट कंपनीने भरुन काढली असेल तर नवीन मीटर किती लावले,अवैध कनेक्शन किती कापले याचा हिशेब देखील कपंनीने जाहीर करावा,अशी मागणी त्यांनी केली.
मूळात २०१२ मध्ये जेव्हा कंपनीसोबत करार झाला त्याच दिवसापासून दर महिन्याला ग्राहकांना बिल पाठवणे कंपनीवर बंधनकारक होते मात्र,कंपनी ग्राहकांना तीन-तीन,सहा-सहा महिन्यांचे बिल एकसाथ पाठवते,त्यात हेराफेरी करण्यास भरपूर वाव असतो,नागरिकांना याचा भुर्दंड बसतो व त्यांना हे कळत देखील नाही,असा आरोप झलके यांनी केला.
ओसीडब्ल्यू नागपूरकरांना मूर्ख बनविण्याचा धंदा करीत असल्याचा आरोप झलके यांनी केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वेळा बैठक घेऊन कंपनीने आपला कारभार सुधरावा अशी तंबी दिली तसेच कारभार न सुधारल्यास कंपनीसोबत करार रद्द करण्याचा देखील इशारा दिला,यामुळे कंपनीची ही नागरिक,प्रशासन व स्वयं गडकरी यांच्या डोळ्यात धुळफेक आहे का?असा प्रश्न केला असता,गडकरींच्या आदेशानंतर ओसीडब्ल्यू निश्चितच कामाला लागली आहे मात्र,केवळ दोन-तीन महिन्यात एवढा महसूली तोटा कमी करणे याला चमत्कारच म्हणावा लागेल,एवढ काम कपंनी करुच शकत नाही,असे ते म्हणाले. मनपा आयुक्तांनी याची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करायला पाहीजे,चौकशीत कुठल्या-कुठल्या भागात कंपनीने आरएनआर केलं आहे,कोणत्या भागात नवीन पाण्याच्या पाईप टाकले,तपासणीसाठी कुठल्या कुठल्या भागात चमू पाठवली,कुठे नव्याने नळ जोडणी केली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी याप्रसंगी पिंटू झलके यांनी केली.
हा केला आेसीडब्ल्यूने दावा-
ओसीडब्ल्यूने एनआरडब्लू कमी करण्यासाठी शहरातील अवैध नळ कनेक्शन तोडण्याची माेहिम हाती घेतली.यामध्ये पाणी चोरी रोखणे,मीटरमध्ये असलेले दोष दूर करने,एकापेक्षा अधिक पाण्याचे कनेक्शन तोडणे आदींचा समावेश होता.त्याच बरोबर देयकांची वसुली करणे,अत्याधूनिक रोबाकॅम तंत्रज्ञानाचा वापर करुन जलवाहिन्यांची आतील तपासणी करणे आदींद्वारे तोटा कमी केल्याचा दावा ओसीडब्लूने केला आहे.
……………………
Advertisements

Advertisements

Advertisements
