Advertisements

(रविवार विशेष)
स्वत:च्या ६० एकर शेतीमधील खातात सेंद्रिय पौष्टिक धान्य
शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी ‘ॲग्रो व्हिजन कृषि प्रदर्शन’
ॲग्रो व्हीजनचे हे १६ वे वर्ष: हजारो शेतक-यांच्या आत्महत्या मात्र,थांबल्याच नाहीत
गडकरींच्या वर्धा रोडच्या घराजवळ साकरतेय ७ मजली ॲग्रोव्हिजन इमारत!नाव शेतक-यांचे वापर व्यवसायिक
कृषि प्रदर्शन संबधी पत्रकराचे प्रश्नच ठरवले निरर्थक!
नागपूर,ता.१४ सप्टेंबर २०२५: ‘ॲग्रोव्हिजन कृषि ट्रस्टतर्फे गेल्या १६ वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनाचा भव्य-दिव्य ‘सोहळा’पार पडत असतो.यंदा देखील २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान या ‘बहुप्रतीक्ष्त कृषि प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पसच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.या कृषि प्रदर्शनाची माहिती गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.त्या वेळी त्यांनी त्यांच्या चांगल्या अारोग्याचे रहस्य देखील अचानक उलगडले.त्यांच्याकडे धापेवाडामध्ये ६० एकर शेती असून त्यात संपूर्ण अन्नधान्य हे सेंद्रीय पद्धतीने पिकविली जातात.त्यात गहू,बासमती तांदूळ,तूर डाळ ते अगदी शुद्ध तेलासाठीची बि-बियाणे देखील पिकतात.विविध आणि ते ही दररोज ताज्या भाज्या यातून त्यांनी उत्तम आरोग्य कमावले असून,त्यांच्या मांजघरात(स्वंयपाकघरात)त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांसाठी एक ही वस्तू ही केमिकल किंवा फर्टिलायझरची येत नसून, त्यांच्या शेतात पिकवल्या जाणा-या सेंद्रीय शेतीतूनच येतात.परिणामी,हे ‘शुद्ध’भाग्य इतर शेतक-यांच्या व ग्राहकांच्या वाट्याला का येत नाही?असा प्रश्न सर्वांनाच पडला.
महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ५,०६१,उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात १६६० तर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात १०२३ शेतक-यांनी आपले आयुष्य संपवले होते.एकंदरित सरकार कोणाचेही असो शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.चार वर्षातून एक वेळा केली जाणारी कर्जमाफी किवा केंद्र व राज्य सरकारचे दोन हजारांचे मिळणारे हप्ते,तरी देखील त्यातून मार्ग निघत नाही.मात्र,गडकरी यांच्या पुढाकारातून ॲग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनातून, गेल्या १६ वर्षापासून, नागपूर जिल्हा व विदर्भाच्या शेतक-यांना ‘व्हिजन’मिळत असल्यावर देखील हजारो आत्महत्या घडल्या,हे या कृषि प्रदर्शनाचं यश म्हणायचं का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.मूळात या भव्य-दिव्य कृषि प्रदर्शनांचं अप्रूप ख-या शेतक-यां ऐवजी आता मोठमोठ्या कंपनीपुरत्या मर्यादित झाल्या असल्याची टिका होत आहे.या कृषि प्रदर्शनात लावल्या जाणा-या एकेका स्टॉलचेच भाडे एक ते दीड लाखांपर्यंत आहे.बळीराजाला ते भाडे परवडणार आहे का?शेतक-यांच्या नावाने मोठमोठ्या कंपन्याच त्या स्टॉलचे भाडे भरतात व आपापले प्रोडक्ट त्यात विकण्यास ठेवतात,असा देखील आरोप केला जातो.
राहीला प्रश्न तर दरवेळी शेतक-यांना मार्गदर्शनासाठी भरवण्यात येणा-या विविध विषयांवरील कार्यशाळा, तर त्यात नक्कीच मान्यवरांना ऐकण्यासाठी गर्दी असते मात्र,त्याचे फलित काय?दुस-या दिवशी वृत्तपत्रांमध्ये काही रकाने भरण्यापुरतीचे प्रभावी शब्द!ते ही पान-पान भरुन जाहीराती मिळाल्यामुळे छापणे अनिवार्य असल्यामुळे अशी प्रसिद्धी देणे भाग आहे.यशस्वी शेतक-यांच्या यशोगाथा अपवाद वगळता हे विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातूनच सादर होताना दिसून पडतात.सोयाबिन,कापूस,संत्रा उत्पादक शेतक-यांसाठी मात्र,शिकणे,शिकणे आणि शिकणेच नशीबात आहे.या वेळी तर कृत्रिम बुद्धीमत्ता(एआय)एमएल,आयओटी या तंत्रज्ञानाचा उपयोग यावर कार्यशाळा होणार आहेत.या मोफत कार्यशाळांचे फलित मात्र,शेतातील झाडांच्या दोरीवर सहज झुलणा-या देहाच्या डोळ्यातील अगतिक निराशेपर्यंत पोहोचले असते तर….!
किटनाशकाची फव्वारणी शेतातील रोपांवर करता- करता बळीराजा अचानक ते सांगाडे दिसणा-या पोटात घरच्या लोकांपासून लपून रिचवतो,यावर तोडगा गवसला असता तर…गडकरींच्या कृषि प्रदर्शनाच्या कार्यशाळेतील तत्वज्ञान बळीराजाच्या कानातून आत्म्यापर्यंत झिरपलाच नाही…..!मग कोट्यावधींचे वारेन्यारे करणा-या अश्या कृषि प्रदर्शनातून शेतक-यांच्या नावाखाली, कोट्याधीश होणा-यांच्या यशोगाथा उघडपणे का सादर होत नाही?असा सवाल देखील निर्माण होतो.
गडकरी गेल्या १५ वर्षांपासून दर पत्रकार परिषदेत हेच सांगतात,या भागामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या कमी करने हेच ॲग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनीचे लक्ष्य आहे….!शेतक-यांना जोडधंद्यातून उत्पन्नाचे साधन मिळायला पाहिजे.गेल्या १५ वर्षांपासून ॲग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनामुळे शेतक-यांमध्ये अत्यंत उत्साह दिसून पडतो.पंधरा वर्षात शेतक-यांनी फळबागायती वाढवली आहे.एनिमल सायंस,डेअरी उत्पादनांनी नेत्रदिपक प्रगती गाठली आहे.मात्र,शेतक-यांच्या प्रगतीचा हा आलेख गेल्या पंधरा वर्षांत ना त्यांच्या डोळ्यात दिसला ना जमीनीत उगवताना दिसला…!एक एकर शेतीमध्ये पाण्याची फव्वारणी करणारे यंत्र प्रदर्शनात बघून बळीराजाने खूश होऊन कपंनीला त्याचे दर विचारले तर किंमत होती…पंचवीस हजार रुपये!
प्रगती दिसली ती गडकरी यांच्या उत्साहात.आता तर पुढील वर्षी ॲग्रोव्हीजनची पत्रकार परिषद स्वत:च्या भव्य इमारतीत पार पडेल,असे गुपित त्यांनी उलगडले. वर्धा रोड वरील हॉटेल रेडीसन ब्ल्यूजवळ ही जागा आपण महानगरपालिकेकडून वार्षिक १६ लाख रुपये भाड्याने घेतली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.या जागेवर ७ मजली भव्य इमारत उभी रहात आहे.ही इमारत ॲग्रो व्हिजन ट्रस्ट बांधत आहे,नाही तर पत्रकार माझ्या नावाने छापतील….!असा खुलासा करण्यास ते विसरले नाही.कंत्राटदाराने(त्यांचे आवडते कंत्राटदार हबीब) मला वचन दिले आहे की २७ मे च्या पूर्वी ही इमारत बांधून तयार असेल.खालच्या भागाला ऑरगेनिक भाज्या व फळे यांची दूकाने असणार आहे.समोर देखील दूकाने असणार आहे ज्यामध्ये धान्य,फळे इत्यादी मिळू शकेल.या इमारतीत वर चार सभागृह असणार आहे.ज्यामध्ये खासदार क्रीडा महोत्सव समिती,खासदार सांस्कृतिक समिती,स्व.लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह असणार आहे.हे सर्व ४०० आसनक्षमतेचे सभागृह आहेत.सर्व संस्था एकत्रित्त आल्यामुळे या इमारतीत संगीत,नृत्य,नाटकांचा आनंद नागपूरकरांना घेता येणार आहे.याच इमारतीत ४०० आसन क्षमतेचं एयर थियेटर देखील असणार आहे.ॲग्रोव्हीजनची इमारत ही पाच हजार चौ.फूट जागेवर असणार आहे.यात कापूस पासून वेगवेगळ्या ऑरगेनिक उत्पादानाचं मार्गदर्शन,पाणी परिक्षण,प्रशिक्षण मिळेल!बुटीबोरीत गार्वे नावाच्या मालकाची मोठी कंपनी आहे त्यांच्यासोबत भागीदारीत ऑरगेनिकचे हे कार्य होणार आहे.येणा-यांसाठी राहण्याची व्यवस्था तसेच एक रेस्टारेंट देखील या इमारतीत असणार आहे कारण खर्च निघालया हवा.
या ठिकाणी साढे चारशे ते चाढे पाचशे वाहनांची पार्किंग व्यवस्था असेल.संपूर्ण वातानुकुलीत इमारत असणार आहे.सोलारवर असणार आहे.हा पाच हजार चौ.फू.चा भूखंड ॲग्रोव्हिजन ट्रस्टने धनवटे यांच्याकडून विकत घेतला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.अगदी वर्धा रोडवर मोक्याच्या ठिकाणी आपला हा प्रकल्प असल्याचे ते सांगतात.परिणामी,पत्रक़ार परिषदेत एलईडी स्क्रीनवर झालेले सादरीकरण नंतर सोशल मिडीयावर बरेच गाजले.नाव शेतक-यांचे…वापर व्यवसायिक!
१०० रुपये भरुन माध्यमकर्मींनी देखील नाव नोंदणी केल्यास या ठिकाणी होणा-या सर्व कार्यक्रमांची माहिती त्यांना मिळू शकेल,असेही ते म्हणाले.
स्पेनच्या व्हेलेनिया शहरात संत्रा संबधी पाहणी करण्या करिता ॲग्रोव्हिजन ट्रस्टचे पदाधिकारी व काही शेतकरी(की उद्योजक?)अशी ६० जणांची चमू गेली होती.तिथे टँगो नावाचा संत्रा खूप प्रसिद्ध आहे.तेथील अग्रीकल्चर डेव्हलपमेंट व ॲग्रोव्हिजन ट्रस्ट यांच्यात एक सामंजस्य करार(एमओयू)झाला असल्याची माहिती ही गडकरी यांनी दिली. कृषि क्षेत्रातील कृत्रिम प्रज्ञेचा प्रयोग यात समाविष्ट आहे.स्पेनमध्ये एका एकरामध्ये २५ ते ३० टन संत्र्याचे उत्पादन तेथील शेतकरी करतात.कच्छ गुजरातचे गज्जूभाई यांचाही उल्लेख झाला.रोपांची नर्सरी यावर गुजरातचे गज्जूभाई हे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
इतकंच नव्हे तर दाभा येथे आंतरराष्ट्रीस दर्जाचे अग्रीकल्चर कन्वहेशन सेंटर उभारले जात आहे.ही जागा पंजाबराव कृषि विद्यापीठाची असून ३५० कोटींचा प्रकल्प शेतक-यांसाठी त्या ठिकाणी उभारल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले….!कृषि विद्यापीठाच्या शहरातील मोकळे भूखंड हे नियमबार्ह्यरित्या ज्याप्रमाणे शासकीय नावाखाली तद्दन खासगी प्रकल्पांसाठी दिले जात आहे,त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे मात्र,तारिख पे तारिख…सुरु असून बांधकामावर कोणतीही स्थगिती न्यायालयाने दिली नाही.ही जागा आता झुडपी जंगल कायद्याचे उल्लंघन करुन घश्यात घातली असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.मूळात असे कनव्हेंशन सेंटर हे कोणत्या शेतक-यांनी गडकरी आणि कृषि विद्यापीठाला मागितले आहे?असा सवाल ते करतात.या प्रकल्पाच्या एमओयूमध्येच, या इमारतीचा पण व्यवसायिक वापर होणार असून,कृषि उपक्रमांना देखील सभागृह रिकामे असले तरच बुकिंग दिली जाणार असल्याचा धक्कादायक दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे….!नाव शेतक-यांचे…वापर व्यवसायिक!
महत्वाचे म्हणजे,गडकरी यांच्या शेजारी मंचावर पंजाबराव कृषि विद्यापीठाचे कुलगुरु नितीन पाटील बसले होते,जे गडकरी यांच्या पीकेव्हीच्या भूखंडांबाबतच्या प्रत्येक दाव्याला हसून दाद देत होते…!‘सत्ताधीश’ने एकदा याच संदर्भात कुलगुरु यांची भेट घेतली असता,विद्यापीठाला भूखंडातून उत्पन्न मिळत असल्याचे अजब आणि गजब उत्तर त्यांनी दिले…..!नियमात नसताना व उत्पन्न मिळवण्याची इतर अनेक साधने असताना आपल्या हक्काची भूखंडे कृषि विद्यापीठ तद्दन व्यवसायिक व खासगी प्रकल्पासांठी शहरातील दोन राजकीय नेत्यांना देत सुटला आहे ,त्यातही कृषि विद्यापीठाला ‘उत्पन्न’मिळत असल्याची मखलाशी कुलगुरु या पदावरच गदा आणण्यासारखी आहे…!
यावेळी तिथे बांधकाम सुरु असल्याने रातुम नागपूर विद्यापीठ अमरावती रोड,कॅम्पसच्या मैदानात हे अॅग्रोव्हिन कृषि प्रदर्शन भरणार आहे.मूळात प्रदर्शन संपल्यानंतर मैदानात शेकडो टन कचरा पडून राहतो.अनेक जागरुक नेटीझन्सनी मैदानातील कचरा व मैदानाची झालेली दूर्दशा यावर शेकडो व्हिडीयोज सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत.त्यामुळेच पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने गडकरी यांना तीन प्रश्ने केली,सध्या नागपूर शहर,जिल्हा,विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो हेक्टर शेतजमीनी या विविध प्रकल्पांच्या नावाखाली हस्गत केली जात आहेत.त्या बाधित शेतक-यांसाठी,त्यांच्या त्रासदी व उधवस्तेसाठी ॲग्रोव्हिजनकडे कोणते ‘व्हिजन’आहे का?हे प्रदर्शन संपल्यानंतर मैदांनाची ज्याप्रकारे दूर्दशा होते,मैदानात शेकडो टन कचरा पडून राहतो.मनपाद्वारे नंतर तो स्वच्छ केला जातो,यात नागरिकांचा कराचा पैसा खर्च होतो,हा कचरा मनपाची जवाबदारी आहे की ॲग्रोव्हिजन ट्रस्टची?याशिवाय एका आठवड्याच्या या प्रदर्शनीमध्ये एक ते दीड लाख रुपये घेऊन स्टॉल बुक केले जातात,ती रक्कम ॲग्रोव्हीजन ट्रस्टला मिळते की कृषि विद्यापीठाला?
यावर गडकरी यांनी,‘तुमचे तिन्ही प्रश्ने निरर्थक आहे’अश्या शब्दात उत्तर दिले.ट्रस्टचे अध्यक्ष रवि बोरटकर यांनी प्रदर्शन संपल्यानंतर मनपा नव्हे तर ट्रस्टद्वारेच मैदानातील कचरा उचलल्या जात असल्याचा (खोटा)दावा केला.स्टॉलचे शुल्क हा ट्रस्ट आणि कृषि विद्यापीठाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे उत्तर मिळाले.प्रकल्प बाधित शेतकरी या प्रश्नावर ,शेतक-यांच्या उत्थानासाठी प्रदर्शन भरवणारे ‘निरर्थक’प्रश्न असल्याचे शिक्कामोर्तब मंत्री महोदयांनी केले.

(छायाचित्र : दाभा येथे पार पडलेल्या ॲग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनानंतर मैदानातील शेकडो टन कचरा!)
याशिवाय संकरित गाई,सिनोम,फिशिंगचा भरभराटीला येणारा उद्योग,मामा तलावातील झिंगे व्यवसाय,ऊस लागवड,रेशीम उद्योग,नॅनो यूरिया,ड्रोनने शेतांमध्ये फव्वारणी,सोयाबिन,मशरुम,केळी,गडकरींचे सर्वात आवडते पेरणी पीक म्हणजे बांबूची लागवड,त्यातून मिळणारा नफा,मधूमाशी पालन,प्रत्येक तालुक्यात उत्तम नर्सरीचे निर्माण,ऑरगेनिक डाळी इत्यादी अश्या अनेक शेतक-यांना प्रभावित करणा-या विषयांना दर वर्षीप्रमाणेच यंदाही(त्याच-त्याच विषयाला)गडकरींनी हात घातला.
धापेवाडा या माझ्या गावात असणा-या आमच्या शेतात एकेरी १५ क्विंटल तूर डाळीचे उत्पन्न झाले.(एका ऐकरीत पंधरा किलो तूर डाळ!)ती आम्ही पूर्ती सुपर बाजारात १६० रुपये किलोने विकली.मला भरपूर फायदा झाला,असे सांगून आता माझे ऐकरी ३० क्विंटल तांदूळ उत्पादनाचे लक्ष्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले!यासाठी तूरीच्या रोपाला दोनवेळा कापण्याचे तंत्र त्यांनी सांगितले.

(छायाचित्र : शैक्षणिक रातुम विद्यापीठाच्या मैदानाची देखील ॲग्रोव्हीजन कृषि प्रदर्शनानंतर अशीच दूर्दशा होणार का?)
तेलाचा प्रकल्पच ॲग्रोव्हिजनमुळे झाला असल्याची कबुली त्यांनी दिली!दूग्ध केंद्रात विदर्भातील २६०० दूध केंद्रात ३३ हजार दूध उत्पादक शेतकरी ३५ लाख लिटर दूध मदर डेअरीला विकतात,ते आता ५० लाख लिटर करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मदर डेअरीमुळे दिनशॉ,हल्दीराम यांचा फायदा झाला कारण मदर डेअरीने दूधाची किंमत वाढवताच त्यांनी देखील किंमत वाढवली(यात ग्राहकांच्या खिशाला किती भुर्दंड पडतोय?याचा विचार मात्र त्यांच्या खिजगणतीत नव्हता)पुन्हा एकदा संत्र्याची बर्फी,इतर मिठाई,पेडा,पनीर,बर्फी,संत्र्यामध्ये तर
‘आग लागल्यासारखे बदल’घडले असल्याचा दावा त्यांनी केला.,विदर्भात पाच कोटी नवीन संत्र्यांची झाडे,एआय तंत्रज्ञानाचा उपयोग,फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांची स्थापना,संमेलने घेणे,बचत गटाच्या महिलांन द्रोणचे प्रशिक्षण,द्राक्ष निर्यात,
निखिल गडकरी याला दुबईत मिळालेले काकड्यांच्या निर्यातीचे कंत्राट,इत्यादी सर्व ज्ञानानंतर उलगडा झाला,
त्यांच्या याच अफाट ज्ञानावर त्यांना आजवर १३ डि.लिट तर ७ कृषि विज्ञानाच्या देखील पदव्या मिळाल्या असल्याचा उलगडा झाला!
बुटीबोरीत जागतिक दर्जाच्या जॉईंट वेंचर प्रायव्हेट कंपनीशी करार करुन शेतक-यांना कसा फायदा करुन देता येईल,यावर देखी त्यांनी विचार मांडले.बुटीबोरीतील प्रकल्पाविषयी सांगतानाच आता मदर डेअरीमध्ये ‘धारा‘तेलाच्या उत्पादानाला त्यांनी हात घातला.(धारा हे उद्योगपती अदानी यांचे उत्पादन आहे हे विशेष!)
याच वेळी त्यांचा आवडीचा विषय ‘इथेनॉल’ला छेडीत त्याही पुढे आता ‘आयसी इथेनॉल मशीन’तयार करीत असल्याची(धक्कादायक) माहिती त्यांनी दिली.
गडकरी यांनी सगळे विषय विदर्भाच्या शेतक-यांच्या विकासाशी संबंधित असून,ज्या दिवशी एक ही शेतकरी आत्महत्या बंद होईल त्या दिवशी ॲग्रोव्हिजनचे काम संपवू’असे वचनच दिले!(तोपर्यंत व्यवसायिक हेतू साध्य झाले असेल!)आम्ही स्मार्ट विलेज बनवायला सुरवात केली आहे.शेतकरी हा पण बंगल्यात राहू शकतो.शेतक-यांची गरीबी,भूकमरी,बेरोजगारी दूर करणे ही चळवळ झाली पाहिजे,असे आवाहन गडकरी करतात.
या सर्व पंचतारांकित,वातानुकुलीन शब्दछळावर एका शेतकरी कविचे शब्द नकळत आठवून गेले….ज्या दिवशी भाकरी पिझ्झाबर्गरसारखी ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी देशाला शेतक-यांची किंमत कळेल.कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,रात्रभर झोप लागणार नाही,विचार करा….!
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh 0fficial युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
