Homeब्रेकिंग न्यूजजन्मदात्यांची हत्या़: अभियांत्रिकीतून शेतीकडे वळवण्याची मिळाली शिक्षा!

जन्मदात्यांची हत्या़: अभियांत्रिकीतून शेतीकडे वळवण्याची मिळाली शिक्षा!

एकविसाव्या शतकातील मुलांना समजून घेण्यास पालक कमी पडतात का?
तरुण बहीण झाली निराधार:परिणामांची समज आरोपीला आली असती तर?
खोट्या प्रतिष्ठेने केला घात:नागपूरात कपिल नगरातील घटना
नागपूर,ता.१ जानेवरी २०२५: आंग्लं नुतन वर्षाचा पहीलाच दिवस,संपूर्ण जगाने नुतन वर्षाचे स्वागत चोवीस तासांपूर्वीच जल्लोषात केले,नुतन वर्षात मंगलमय अायुष्याची कामना केली,कोट्यावधी पालकांनी स्वत:सोबत आपल्या पाल्यांसाठी सुखी,आनंदी,आरोग्यदायी आयुष्याची कामना आपापल्या दैवताजवळ केली मात्र,नागपूरातील कपिल नगर हद्दीत प्लॉट क्र.१६७,न्यू खसाळा,पांडूरंग गवते विद्यालया जवळ,कामठी रोड येथे राहणारे अरुणा लिलाधर डाखोळे वय वर्ष ४३ व लिलाधर मसाराम डाखोळे वय वर्ष ५० हे जन्मदाते असे होते ज्यांनी नुतन वर्षाचा सुर्योदय बघितलाच नाही कारण,त्यांच्या २१ वर्षीय मुलाने उत्कर्ष लिलाधर डाखोळे याने २६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता आईचा गळा दाबून तर ३.३० वाजता वडील लिलाधर डाखोळे यांना चाकूने वार घालत ठार केले होते!
उत्कर्ष अभियांत्रिकी शाखेत अनुत्तीर्ण होत होता त्यामुळे, संगीता उच्च प्राथमिक शाळा,विनोबा भावे नगर येथे शिक्ष्का असलेल्या आईने व कोराडी थर्मल पावर येथे नोकरीवर असणारे वडील यांनी उत्कर्ष याला अभियांत्रिकी सोडून शेती करण्याकरिता त्यांच्या नातेवाईकांच्या घरी बैलवाडा,बोखारा,गोधनी येथे निघून जाण्यासाठी बाध्य केले होते.उत्कर्ष हा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे तिस-या वर्षात शिकत असून, तो पहिल्या वर्षाच्या भौतिकशास्त्र विषयात अनुत्तीर्ण झाल्याने तिस-या वर्षाची परिक्षा देऊ शकला नाही.त्यामुळे त्याचे आईवडील त्याला सतत टोमणे मारत होते,व त्याला शेती करण्या करीता नातेवाईकाकडे जाण्यास सांगत होते.
२६ डिसेंबर रोजी उत्कर्ष याची लहान बहीण महाविद्यालयात गेली होती व वडील कोणाच्या तरी अंत्यविधीला गेले होते.उत्कर्ष हा दुपारी दीड वाजता त्याच्या बेडरुम मध्ये होता,त्याची आई त्याच्या बेडरुममध्ये आली असता त्याने आईच्या गळ्यात हात टाकून गळा दाबला,यात तिचा मृत्यू झाला.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आईने त्याच्या बेडरुममध्ये येऊन,तुझी बॅग भरली आहे तुला नातेवाईकाकडे शेती करायला जावेच लागेल,अशी सूचना केली होती!दुपारी साढे तीन वाजता वडील घरी आले असता वडीलांचाही उत्कर्षने गळा दाबण्याचा प्रयत्न केला मात्र,वडीलांनी तीव्र प्रतिकार केला परिणामी,उत्कर्षने चाकूचे वार त्यांच्या खांद्यावर,मानेवर केल्याने, ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.उत्कर्षने रक्त पुसून घराला कुलुप लावले, वडीलांचा मोबाईल घेऊन व गाडी घेऊन निघून गेला.

सायंकाळी ५ वाजता बहीणीला फोन करुन ऑटोमोटीव्ह चौकात बोलावले व आई-वडील मेडीटेशनला बंगलोरला गेले असल्याचे सांगून तिच्या सोबत बैलवाडा,बोखारा येथे निघून गेला.घटना उघडकीस येईपर्यंत दोघेही भांवडे नातेवाईकांच्याच घरी होती.

दरम्यान,डाखोळे यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणा-यांनी घराचे कुलूप तोडले असता लिलाधर व अरुणा डाखोळे यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.यानंतर कपिलनगर पोलिसांनी उत्कर्ष व त्याच्या बहीणीला घटनास्थळी बोलावून घेतले.उत्कर्ष जवळ वडीलांचा मोबाईल कसा व कधी पोहोचला,याचे उत्तर देऊ न शकल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी उत्कर्षला अटक केली.
फिर्यादी सहायक पोलिस निरीक्षण आस्मान शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिस ठाणे कपिलनगर येथे आरोपीविरुद्ध कलम १०३(१),२३८ भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

 

थोडक्यात,अभियांत्रिकीकडून शेतीकडे वळवण्यासा अट्टहास डाखोळे दाम्पत्याला भोवला का?असा प्रश्‍न या दूर्देवी घटनेतून उद्भवला आहे.उत्कर्ष हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याने त्याचे वर्ग मित्र किवा मैत्रीणी या देखील सुखवस्तू घरातील असणे क्रमप्राप्त होते.अशाच मित्रवर्गामध्ये उत्कर्षची व्यक्ती किवा विद्यार्थी म्हणून प्रतिष्ठा पणाला लागली असावी.

वर्ग मित्रांमध्ये शेती करण्यासाठी गेल्यास उपहासाचा विषय होईल,असे कदाचित उत्कर्षला वाटले असावे,त्यामुळे देखील त्याने ते टाळण्यासाठी टोकोच पाऊल उचलले असावे,असा कयास लावला जात आहे.याशिवाय आई या स्वत: शिक्षीका असल्याने उत्कर्षचे अनुत्तीर्ण होणे त्यांनी फार जिव्हारी लावले असल्यानेच वारंवार उत्कर्षचे अपयश हे त्यांना स्वत:च्या शैक्षणिक वर्तुळात कमीपणाचे वाटत असावे,त्यामुळेच त्या उत्कर्षला समजून न घेता वारंवार टोमणे मारत होत्या.ज्याचा खूप घातक परिणाम त्यांना भोगून द्यावा लागला.
ही एकविसाव्या जगातील पिढी आहे,सर्वात आधी पालकांनी हे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.९० च्या काळात खासगी वाहिन्या आल्या त्यावेळी इंटरनेट नावाचे तांत्रिकी मायाजाळापासून ती पिढी दूर होती,उत्कर्षचे पालक हे त्या दशकातील पालक होते त्यामुळेच त्या काळातील नीती-मूल्ये आपल्या मुलांमध्ये शोधण्याची चूक त्यांनी केली.आईचे वय अवघे ४२ तर वडील फक्त ५० वर्षांचे होते.उत्कर्ष हा एकविसाव्या शतकातील तरुण असून,अद्यावत तंत्रज्ञानाने व्यापलेल्या भोवतालात मोठा झाला होता.वयाच्या २१ साव्या वर्षी चांगले-वाईट याची समज येण्यास निश्‍चितच हे वय पुरेसं नसंत.आई-वडीलांप्रति त्याच्या मनात खदखदत असणारा टोकाचा राग,त्याचा आत्मसन्मान,वर्ग मित्रांमधील प्रतिष्ठा किवा व्यक्तिगत त्याच्यात असणारे मानसिक असंतुलन,अशी कोणतीही कारणे या खळबळजनक हत्याकांडामागे असू शकतात.
आजच्या या घटनेमुळे मात्र,आजच्या काळातील पालक हे आतून घाबरले आहेत.पाल्यांना त्यांच्या भल्यासाठी सूचना कश्‍या कराव्यात?हा गुढ प्रश्‍न त्यांच्या समोर उभा झाला आहे.आई-वडील रागावल्याने तरुण वयातील मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण, हे देखील त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे ठरत आहे.
अश्‍या घटना पालकांसाठी धडा : डॉ.सुशील गावंडे (सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ)

आरोपीची कौटूंबिक पार्श्वभूमी, सायकोटिक परफारेन्स,मेंटली डिसऑर्डर,एडीक्शन म्हणजे व्यससनाच्या अधीन असेल तर त्या ,अंडर इन्फ्लूएंसखाली अशा घटना घडतात.हा मुद्दा प्रतिष्ठेचा नसून कोणीही प्रतिष्ठा जपण्यासाठी अशी हत्या करणार नाही. पर्सनालिटी डिसआर्डर असेल तरच अशी घटना घडते. अश्‍या घटना इतरांना शिकवतात पाल्यांना कसं हाताळायला पाहिजे.वारंवार फेल होणे,त्या मागे अनेक कारणे असतात.शैक्षणिक क्षेत्रात वारंवार अनुत्तीर्ण होणे हे देखील एक महत्वाचे लक्षण आहे.याचा अर्थ पाल्यासोबत काही तरी योग्य सुरु नाही,म्हणून मेंटली डिसऑडर होतो.व्यसनाधिनता,रिलेशनशिप इश्‍यू,यामुळे देखील रिपिटेड फेल्यूअर येतं.अश्‍यावेळी पालकांनी सजग झाले पाहिजे,आपल्या पाल्यांच्या मनात काही तरी सुरु आहे.पाल्य वारंवार फेल होत असेल याचा अर्थ त्याला अधिक अटेंशनची गरज आहे,तिरस्कार आणि टोमण्यांची नाही.अनुतीर्ण होणे याचा अर्थ पाल्याची मेंटल स्टेज बरोबर नाही,अश्‍या मुलांवर काॅमेंट करताना सजग राहावं लागतं.

आपल्या पाल्यासोबत बसणे,त्याच्या सोबत अधिक वेळ घालवणे,त्याच्या विषयी अवांतर माहिती काढणे,मित्रांकडून माहिती घेत राहणे, वेळोवेळी त्याच्या कॉलेजमध्ये जात-येत राहणे,शिक्षकांना भेटणे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या पाल्यांना समजून न घेता सतत त्यांना आतून दुखावणे किंवा त्यांचा आत्मसनम्मान दुखावणे हे योग्य नाही.अपयशामुळे त्यांना शाळेतही प्रेम मिळत नाही,पालक ही वारंवार तिरस्कार करतात,त्यांना कोणीही प्रेम करीत नाही,अश्‍यावेळी त्यांच्या अचेतन मनात राग साठत जातो. कुठल्यातरी मार्गाने तो बाहेर निघतो.या घटनेत आरोपीची आई स्वत: शिक्ष्का होती,शिक्षणाचं महत्व त्यांना कळत होतं मात्र,पाल्याला समजून न घेतल्याने अनेक दिवसांचा राग आरोपीच्या मनात साचत गेला असावा.आपल्या जन्मदात्या आईचा गळा दाबणे,ही अतिशय क्रूर अशी घटना आहे,आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही घडणे,रेअर ऑफ रेअस्ट अशी घटना आहे.यानंतर ही आरोपी तब्बल सहा दिवस शांत राहून आयुष्य जगत होता,जणू काही घडलेच नाही.
आपल्या या कृत्यामुळे बहीणीचं मागे काय होईल?असा विचार आराेपी करीत नाही कारण
त्या क्षणाला वेळ निघून गेलेली असते. तो एक क्षण जर टळला असता तर दुस-या दिवशी हे हत्याकांड झालेच नसते.त्या क्षणी आरोपीच्या मनात इम्पल्स सुरु असेल,परिणाम काय होईल,बहीणचं काय होईल,हा विचार मागे पडत असतो.प्रचंड राग किंवा सूड भावना बुद्धीवर हावी झालेेली असते.या कृत्यानंतर आता त्या २१ वर्षीय तरुणाला आपल्या कृत्याचा पश्‍चाताप होत असेल का?असा प्रश्‍न केला असता,ज्यांची सायकोटिक पर्सनालिटी असते किवा जे मेंटेली डिसऑर्डर असतात त्यांच्यात पश्‍चातापाची भावना लवकर येत नाही मात्र,जे  रागाच्या भरात असे कृत्य करतात त्यांना पश्‍चाताप लवकर होत असतो,कदाचित उत्कर्षसोबतही हे घडत असावं,असे उत्तर डॉ.गावंडे देतात.
…………………

Latest बातम्या