माणसाच्या महत्वाकांक्षेला अंत नसतो:सरसंघचालकांच्या शब्दांना तरी जागा!
‘नो मोर सिमेंट रोड्स’ आंदोलन तीव्र करणार
नागपूर,ता.२० जुलै २०२४: दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याने ‘त्याच्या’ बरसण्याचा नव्हे कोसळण्याचा इशारा दिला होता.कधी नव्हे तो हवामान खात्याचा इशारा खरा ठरला आणि त्याच्या कोसळण्यामुळे आज नागपूरात म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा त्राही-त्राही माजली.गेल्या दहा वर्षात नागपूरात ज्या वेगाने ’विकास’घडला ते बघता आज पुन्हा एकदा ’विकासाचा’पाऊस बसरला असल्याची जळजळीत टिका सोशल मिडीयावर उमटली होती.
पुन्हा एकदा प्रशासन व राजकीय नेते याचे खापर सकाळी साडे पाच ते साडे आठ वाजेपर्यंत बरसलेल्या पावसाला ‘अतिवृष्टि’ठरवत पावसावरच फोडतील,यात शंका नाही.योगायोगाने देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राज्याचे गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत पुण्यात,राज्यात येणा-या विधानसभेच्या ‘स्ट्रेटेजी’वरील बैठकीत मशगुल असल्याने गृहमंत्र्यांच्या नागपूरात जणू पावसाने आपला धरबंधच सोडला होता.
नागपूरचा असा एक ही भाग नव्हता जिथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले नाही.जणू नागपूर शहरात बाढ आली अशी परिस्थिती जागोजागी दिसत होती.अनेक भागात पाणी तुंबले होते,तर अनेक भागात ते एखाद्या धबधब्याच्या वेगाने वाहत होते.नागपूरातील पॉश समजले जाणारे वसत्या आणि रस्ते देखील आज या त्राही-त्राहीला अपवाद नव्हते.दूसरीकडे भांडेवाडी डंपिंग यार्डमधील दूर्गंधीयुक्त कचरा वाठोडा परिसरातील नागरिकांच्या घरात तरंगताना दिसत होता तर शहरात ठिकठिकाणी तुंबलेल्या या पावसाने मेडीकलच्या रुग्णांना देखील पलंगाखाली उतरण्याची मुभा दिली नाही.रेल्वे स्टेशनवर नेहमीसारखाच धुमाकूळ तर घातलाच शहरभरातील चौका-चौकात तो आज देखील तुंबून पडला होता.
वर्धा रोड डबल डेकर उड्डाणपूलाखाली,हल्दीरामच्या मागील भागात पडोळे हॉस्पीटल चौक,दूबे नाका,हुडकेश्वर रोड,मिनीमाता नगर अंडरपास,लाडीकर ले-आऊट मानेवाडा रोड,मिहान,मानेवाडा नाईक नगर,मानेवाडा कल्याणेश्वर नगर,क्रीडा चौक ते मेडीकल चौक,उत्कर्ष नगर,केटी नगर,आग्याराम देवी चौक,म्हाडा कॉलनी नंदनवन,एलआयजी कॉलनी हसनबाग रोड नंदनवन,विश्वज्योती क्रिकेट मैदान शांतीनगर,पॉवर ग्रीड चौक,रेल्वे स्टेशन रोड,पारडी पूलावरुन कोसळणारे धबधबे,मनीष नगर अंडरपास,अयोध्या नगर,नरेंद्र नगर आरयूबी,शंकर नगर,असा एक ही तुंबलेला भाग नव्हता ज्याचे व्हिडीयोज आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले नाही.
यासोबतच नाग नाल्यातील सांप ही पाण्यात डूंबले तर गोम,विंचू,उंदिर यांचे देखील नागपूरकरांना नाल्यातील पाणी रसत्यावर आल्याने ‘दूर्लभ’ दर्शन घडले. अनेकांनी त्यांचेही व्हीडीयोज व्हायरल केले.पारडी,बेसा,हुडकेश्वर,पिपळा फाटा,सोनेगाव भागात तर पाण्याने कहर बरपवला.या संपूर्ण भागाला जणू एखाद्या नदीचे रुप आले होते.चहूबाजूने,जिकडे-तिकडे पाणीच पाणी.अथांग…तितकेच घाण….!थोडक्यात,नागरिकांना किती तासात किती मिलीलीटर पाणी पडले,अतिवृष्टि झाली की ढगफूटी झाली,याच्याशी काही एक देणेघेणे नाही,त्यांची एकच मागणी असते ती म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा आणि सुरक्षीत जगणे.नेमके तेच त्यांच्या वाट्याला मेला पाऊस येऊ देत नाही.
नागपूरात आता थोडा जरी पाऊस कोसळला की नागरिकांची घरे त्या पाण्यात तुंबतात कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी आता या शहरात जागाच उरली नाही. शहरभरातील सिमेंट-काँक्रिटचे रस्ते हे दीड मीटर उंच झाली तर नागरिकांची घरे खाली झाल्याने पूर्वी रसत्यावर पडणारे पाणी सरळ वाहून जात होते,ते आता सरळ नागरिकांच्या घरात शिरताना दिसून पडतं.नागपूरकर नागरिकांनी न मागितलेली अगणिक उड्डाणपूले,बेशुमार झाडांची झालेली कत्तल,मेट्रोचा शेकडो किलोमीटर शहरात पसरलेला पांढरा हत्ती,सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरातील तलावांची झालेली ‘राजकीय’दूर्दशा आणि सर्वात महत्वाचे गल्ली-बोळ्यात निर्माण झालेले सिमेंट-काँक्रिटचे रस्ते या सर्व ‘विकासात्मक’कामांमुळे आजचा पाऊस हा देखील ’विकासाचा’पाऊस या श्रेणीत नेटीझन्सच्या शब्दात गणल्या गेला.
शहरातील अनेक नाले असे होते ज्यांना वाहण्यासाठी जागाच उरली नव्हती.परिणामी ते आजूबाजूच्या
नागरिकांच्या घरात शिरले.बेसा येथील जो नाला ५०० मीटरचा होता तो आता पिपळा-बेसातील जमीनीला आलेल्या सोन्याच्या किंमतीमुळे, काही राजकारणी व बिल्डर लॉबीमुळे फक्त १० फूटांचा देखील शिल्लक राहीला नाही,असे समाजसेवी प्रवीण राऊत सांगतात.पाणी वाहून जाणा-या नैसर्गिक स्त्रोतांना बिल्डर लॉबीने मनमानेल त्या पद्धतीने वळवले,बुजवले,त्याची परिणीती पिपळा-बेसा भागाचे रुपांतर आज काेसळणा-या एवढ्याशा पावसामुळे नदीत झाल्याचा संताप ते व्यक्त करतात.
शहरातील तरुणाईने विशेषत: पर्यावरणासाठी काम करणा-या तरुणाईने आज इन्सटावर फार मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या नागपूरची त्राही-त्राही व्हायरल केली,यामुळे शहराच्या एका कोप-यात राहणा-यांना शहरातील दूस-याा कोप-यात तुंबलेल्या पाण्याची काय अवस्था आहे,याची माहिती मिळाली.चार चाकी,दूचाकी,बस,नेहमीसारख्या तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढत गेले तर काही भागात मनपाची बोट देखील चालली!मनपाच्या दाव्यानुसार पिपळा,नरसाळा,हुडकेश्वर,विहिरगाव भागातून आज १६० लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले.हाच कहर आज दिवसा ऐवजी मध्यरात्री, मागील वर्षी २३ सप्टेंबर सारखा बरपला असता तर?हा विचारच जिवित राहीलेल्या त्या १६० नागरिकांना पुन्हा मारुन जाईल.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा जोर लक्षात घेता तात्काळ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आढावा घेतला. परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मात्र,फडणवीस यांनीच नागपूर शहरातील एक ही रस्ता हा सिमेंट-काँक्रिटशिवाय राहणार नाही,असे जाहीर आश्वासन एका कार्यक्रमात नागपूरसाठी दिले होते.याची देखील चांगलीच दखल समाज माध्यमांवर आज उमटली.नागरिकांना काय हवं?या ऐवजी नेत्यांना शहराचा ‘अ’शाश्वत विकास घडवण्याची घाई झाली असल्याचा संताप ही उमटला.
नुकतेच फडणवीस यांनी कारागृहाच्या १५ एकर जागेवर मॉल बांधण्याची देखील घोषणा केली.नागपूर शहरातील मध्य भागातील कारागृहाच्या १७२ पेक्षा जास्त एकरवर वसलेल्या कारागृहाच्या जागेवर भाजपच्या दोन्ही राजकीय नेत्यांची ‘विकासात्मक’नजर आहे.लोकसभा निवडणूकी पूर्वी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वचननाम्यात कारागृहाला कामठी येथे १०० एकर जागा देणार असून, कारागृहाच्या ठिकाणी यूरोपच्या धर्तीवर ‘यूरोपियन सक्वेअर’साकार करण्याची घोषणा केली आहे.तत्पूर्वी गडकरी यांच्या स्वप्नातील ड्रीम प्रोजेक्ट असणा-या अजनीच्या मल्टी मॉडल हब प्रकल्पात कारागृहाच्या जागेचा समावेश होता मात्र,शहरातील काही जागरुक पर्यावरणवाद्यांनी त्या प्रकल्पात ७ हजारच्या वर वृक्षतोड होणार असल्याने त्याला न्यायालयात आव्हान दिले.सध्या त्या प्रकल्पाला न्यायालयाची स्थगिती मिळाली असून आता तोच प्रकल्प ‘युरोपियन सक्वेअर’ नावाने साकार होणार आहे.आजच्या या त्राहीत्राहीमान शहराच्या दूर्दशेची कारणे शोधताना गडकरी व फडणवीस यांच्या कारागृहातील जागेचा व्यवसायिक उपयोगाचा अट्टहासाचा देखील चांगलाच समाचार सोशल मिडीयावर घेण्यात आला.
नुकतेच कारागृहातील बंदीवांनानी कारागृहात २५ लाख रुपयांचे शेतमालाचे उत्पादन घेतल्याचे वृत्त झळकले .ब्रिटीशांनी शहराच्या मध्ये हे कारागृह बांधण्या मागे बंदिवांनांना मनोवैज्ञानिकरित्या आपल्या कुटूंबियांच्या जवळच राहत असल्याची भावना असणे गरजेची वाटल्याने हे कारागृह बांधण्यात आले होते.आता तेच बंदीवान शहराच्या किती तरी दूर जाण्याच्या मार्गावर आहेत.महत्वाचे म्हणजे कामठीतून अट्टल गुन्हेगारांना शहरातील सत्र तसेच उच्च न्यायालयापर्यंत आणण्यात पोलिस विभागाची चांगलीच कसरत होणार आहे.आज कोसळलेला पाऊस हा कारागृहातील मोकळ्या जागेमुळेच आत झिरपला गेला व आजूबाजूच्या परिसरात पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
७ हजार वृक्षांची कत्तल करुन विकासाच्या नावावर या जागेवर मॉल किवा ‘यूरोपियन स्केवअर’ सारखे सिमेंट-काँक्रिटचे प्रकल्प उभे राहील्यास धंतोली,राहाटे कॉलनी,नीरी,अजनीसारख्या भागात देखील पारडी,बेसा,हुडकेश्वरसारखी पावसाच्या पाण्याची ‘नदी’ पुढील काही वर्षात दिसून पडेल यासाठी सज्ज राहण्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला.
परवा सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी झारखंड येथे ‘विकास भारती’ संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ’माणसाच्या महत्वकांक्षा कधीच संपत नाहीत त्यामुळे लोकांनी मानवतेसाठी काम करावे.स्वविकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसाला ‘सुपरमॅन’व्हायचे असते आणि त्यानंतर तो ‘देवता’आणि ‘भगवान’ही बनू पाहतो,असू सूचक वक्तव्य केले.भारताचा स्वभाव हा जंगल आणि शेतांमधून साकार झाला असून त्यातूनच सनातन धर्माचा जन्म झाला असल्याचे सांगून ,ज्यांचा निसर्गाशी संबंध कायम राहील ते विकसित ठरतील,असे नमूद केले.आज नागपूर शहराला प्राप्त झालेले नदीचे रुप पाहता,सरसंघचालकांचे हे बोल देखील समाज माध्यमावर चर्चिले जाऊन,निदान शहरातील या दोन्ही नेत्यांनी शहराचा ‘विकास’साधताना सरसंघचालकांच्या निसर्गासंबंधीच्या विचारांना तरी जागा,असा टोला हाणला.
बंगलौरसारख्या शहराला पाण्याच्या ज्या दूर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे तीच वेळ लवकरच नागपूरवर येणार असून हजारो एकरच्या मोक़ळ्या भूखंडावर(पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या शेती संशोधनाच्या जागांसह) ज्या वेगाने सिमेंट-काँक्रिटचे प्रकल्प उभे होत आहेत ते बघता,या शहरात पावसाचे पाणी झिरपायला जागाच उरणार नाही व आधीच झालेल्या लाखो वृक्षांच्या कत्तलीतून पाऊसाचे पाणी धरुन ठेवण्याचे ते ही स्त्रोत नष्ट झाल्याचे ते सांगतात.परिणामी,नागपूरकरांना आता या आणि अशाच विकासाची सवय लाऊन घेण्याची गरज प्रतिपादीत करुन,शहरातील दोन्ही राजकीय नेत्यांकडे शाश्वत विकासाची दूरदृष्टि नसून एखाद्या बिल्डरप्रमाणे विकासाचे प्रकल्प उभे होत असल्याचा आरोप ही मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात उमटला.
थोडक्यात,आज विदर्भात सर्वदूर पावसाचा कहर बरपला असला तरी पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे नागपूर हे शहर ,समाज माध्यमात गेल्या दहा वर्षात झालेल्या ‘विकासाला’घेऊन चांगलाच चर्चेत राहीला.