फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजओढवून घेतलेला अगतिक मृत्यू!

ओढवून घेतलेला अगतिक मृत्यू!

Advertisements

 

भुशी धरणाच्या धबधब्यात चार लहान मुलांसह एका महिलेचाही समावेश

लोणावळा,१ जुलै २०२४:कोण्या एका कविने लिहले आहे ‘‘तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी…आज खांद्यावर खांदे दिले जात आहे’ पुण्यातील हडपसरच्या सय्यदनगर येथील एकाच कुटुंबातील दहा जण हे काल रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गेले होते.त्यांच्यासोबत चार लहान मुले देखील होते.अन्सारी कुटूंबियांना घरातून निघताना याची कल्पना ही नसेल ते पिकनिकला नाही तर मृत्यूच्या थरारात सापडण्यासाठी जात आहेत.तोे ही असा मृत्यू ज्याला अगतिक मृत्यूशिवाय दूसरे कोणतेही नाव देणे शक्य नाही.

अन्सारी कुटूंबिय हे लोणावळ्यात भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत असतानाच पाण्याची पातळी वाढू लागली.आपल्याच आनंदात मग्न या कुटूंबियांना याची कल्पना देखील आली नाही आणि क्षणार्धात पाण्याच्या खळखळणा-या प्रवाहात दहा जणांचे हे कुटूंबिय एका लहानशा खडगावर अडकले.

चारही बाजूने पाण्याचा प्रवाह,हाकेच्या अंतरावर किनारा मात्र…सगळेच अगतिक!सोबत अतिशय लहान मुले.कडेवर…तर कोणी हात घठ्ठ धरुन,निसटू नये म्हणून एकमेकांना घट्ट धरुन ते सगळे जण तग धरुन उभे राहीले.मृत्यूच्या भयापेक्षा चिमुकल्यांच्या चेह-यावरची भिती जास्त जीवघेणी होती.किना-यावरील पर्यटक हे देखील अगतिक होते.एका झाडाची फांदी तोडून निसरड्या खडगावर एकमेकांना घट्ट धरुन उभे असलेल्या त्या कुटूंबियांकडे ती तोडून फेकण्याचा प्रयत्न ही निष्फळ ठरला.किना-यावरील लोकांकडे आशाळभूत नजरेनी त्या महिला,ते चिमुकले,ती पुरुष मंडळी बघत होती.काही तर प्रयत्न करा….!आमच्यासाठी नाही तर कमीत कमी या भेदरलेल्या चिमुकल्यांसाठी…!
क्षणार्धात पाण्याची पातळी आणखी वाढली आणि एवढ्याशा खडगावर एकमेकांना घट्ट धरुन उभे असणारे ते….त्यांचा हात आणि हिंमत दोन्ही निसटू लागले.क्रूर पाण्याचा प्रवाह जणू त्यांना चिमुकल्यांसह लवकरात लवकर गिळंकृत करण्यासाठी सरसावला होता.दोघांचे हात निसटले आणि….पाण्याच्या प्रवाहात ते वाहू लागले.इतरांनी किंकाळी फोडली…..!सगळीकडे अगतिक स्तबधता…!पुन्हा उरलेल्यांनी चिमुकल्यांना घट्ट काळजावर धरले.अश्‍या क्षणी माणसाला मृत्यूची नव्हे तर पिलांच्या जिवितेची काळजी मारत असते.काहीही करुन किमान आपली पिले किना-यावर सुखरुप पोहोचली तर…!किना-यावरील माणसे ही अगतिक होऊन तो मृत्यूचा थरार अनुभवण्याशिवाय काहीही करु शकत नव्हती.

अखेर रौद्र झालेल्या पाण्याने डाव साधला.त्या पाण्याला आपले भक्ष्य साधायचे होते,साधले.निसटले हात एकमेकांचे क्षणार्धात.वाहू लागले चिमुकलेही किंकाळी फोडत.काय निघाले असतील शब्द त्यांच्या मुखातून?अम्मी…अब्बा…..कि…खुदां!

काळजाचा थरकाप उडवणा-या या मृत्यूना कोण जबाबदार आहेत?हौशी पर्यटक?जे धरण आहे हे माहिती असतानाही आणि त्यातील पाणी कधीही सोडले जाऊ शकते हे माहिती असतानाही धबधब्याच्या हव्यासापायी स्वत:सोबत चिमुकल्यांचाही जीव धोक्यात घालतात!की जिल्हाधिकारीस्तरावरील प्रशासनाचा?कुठे लावली होती का धोक्याची फलके?

हा व्हिडीयो सर्वात जास्त व्हायरल झाला असून प्रत्येक संवेदनशील मनाचा थरकाप उडवून जाणारा होता.भीतीच्या सावलीत असणा-या त्या चिमुकल्यांचा चेहरा कोणालाही बघवला जात नव्हता.एकच व्हिडीयो हजारदा बघितला गेला..काय करता आलं असतं त्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी,हे बघण्याकरिता तो वारंवार बघितला गेला,पण….?नियतीने डाव साधला होता.शासनाची आकस्मिक कोणतीही उपायोजना त्या ठिकाणी नव्हती.मृत्यूचा तो खडग आणि जिवनाचा तो किनारा यात खूप जास्त अंतर नव्हतंच मुळी..तरी देखील…असं का घडलं?अचानक कसं पाणी वाढलं?कोणताही भोंगा नव्हता सांगणारा?सावध करणारा?अवघ्या ४ वर्षांचा अदनान,७ वर्षांची मारिया,७ वर्षांचा हुमेदा,१३ वर्षांची अमिना,कोण आहे यांच्या किंकाळणा-या मृत्यूला जबाबदार?भेदरलेल्या डोळ्यातील अश्रूंचा अपराधी?या चिमुकल्यांचा मृत्यू काळीज पिळवटून जाणारा ठरला.नूर शाहिस्ता अन्सारी वय वर्ष ३५,काय वाटलं असेल या आईला?कसं वाचवू मृत्यूच्या दाढेतून आपल्या चिमुकल्यांना?दहा जणांच्या कुटूंबातून तिघांचे मृतदेह गवसले.पाच जण बचावले,तर चारही चिमुकल्यांचा आणि नूर शाहिस्ता यांचा मृत्यू झाला.

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे सर्व जण वाहून गेले होते.या धरणाचं पाणी सोडलं तेव्हा कोणती खबरदारी घेण्यात आली होती?येथील स्थानिक सांगतात,दुपारी साढे बाराच्या सुमारास हा मृत्यूचा थरार त्यांनी अगतिक होऊन अनुभवला.या ठिकाणी अचानक पाऊस वाढला.१५ मिनिटे जरी पाऊस पडला तरी धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढत.हा धबधबा पुढे भुशी धरणात जाऊन मिळतो.चिमुकल्यांचे मृतदेह देखील हे त्या धरणातच सापडले….!हे कुटूंबिय बाहेरचे असल्यामुळे त्यांना अश्‍या संकटाची काहीच कल्पना नव्हती.शनिवार,रविवारी हे ठिकाण पर्यटकांनी फूललेलं असतं.
घटना घडून गेल्यावर ग्रामीण पोलीस आणि रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली!मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असलेल्या स्थळी मायबाप शासनाने आधीच अशी रेस्क्यू चमू तयार ठेवली असती तर….त्या भेदरलेल्या  चिमूकल्या किंकाळ्या आणि आपल्या चिमुकल्यांसाठी एका आईच्या काळजाचे चुकलेले ठोके…या अगतिक मृत्यूचे साक्षीदार होण्यावाचून वाचले असते पण…..?असे घडले नाही.त्यामुळेच पावसाळ्यात चिमुकल्यांना घेऊन नको ते धाडस करु नका पर्यटकांनो.निदान धर्मग्रंथांतील वचनांचे तरी स्मरण असू द्यावे…अग्नि आणि पाणी हे खेळायची(मनोरंजनाची) तत्वे नाहीत…..!
अन्सारी कुटूंबिय आपल्या चिमुकल्यांसोबत…. शासन असो किवा त्या स्थळी उपस्थित पर्यटक केवळ एका मदतीच्या हातासाठी तरसले होते….आता मायबाप शासनापासून तर पोलीस प्रशासनापर्यंत सगळेच त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी तत्परतेने सरसावलेले दिसून पडतात….!
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या