माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांचा पत्रकार परिषदेत दावा
२३ जून रोजी भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषदेत ठरवणार निवडणूकीची दिशा
अविनाश ठाकरे काटोलमधून लढणार:महासंघाचा निर्धार
नागपूर,ता.२० जून २०२४:महाराष्ट्रात माळी समाजाची मतदारसंख्या ही दूस-या क्रमांकाची आहे.एवढंच नव्हे तर ४२ विधानसभा मतदारसंघात माळी समाजाची मते ही निर्णायक आहेत.अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी अधिकाधिक माळी समाजाच्या उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अन्यथा लोकसभेसारखेच परिणामांसाठी सज्ज राहावे,असा सारगर्भित इशारा आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना तिखे म्हणाले,की महाराष्ट्रात एकेकाळी सर्वाधिक आमदार हे माळी समाजाचे होते.मात्र,वर्षागणिक माळी समाजाच्या प्रतिनिधित्वाची टक्केवारी ही खाली येत गेली.प्रत्येक राजकीय पक्ष हा माळी समाजाला गृहीत धरुन आपली राजकीय वाटचाल करीत आहे मात्र,यंदाच्या विधानसभेच्या निवडणूकीत माळी समाज याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही.१९७८ साली विधान सभेत सर्वाधिक आमदार हे माळी समाजाचे होते.२०२४ मध्ये एक तृतीयांशवर ही संख्या पोहोचली आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत ज्या समाजाची संख्या १६ टक्के आहे त्यांना ३५ जागा देण्यात आल्या तर माळी समाजाची संख्या ११ टक्के असून देखील फक्त १ जागा देण्यात आली.असेच धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये देखील विविध राजकीय पक्ष राबवताना आढळतात.
याच पार्श्वभूमीवर माळी समाजातील इच्छूकांना विविध राजकीय पक्षांकडून योग्य प्रमाणात उमेदवारी मिळावी तसेच माळी समाजाचा राजकीय टक्का वाढावा यावर चिंतन करण्यासाठी रविवार,दिनांक २३ जून २०२४ रोजी माळी भवन, नाहाटा कॉलेज जवळ, भुसावळ येथे ’माळी समाज हक्क परिषदेचे‘आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी तिखे यांनी दिली.या परिषदेला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांकडून विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत माळी समाज हा उपेक्षीत,दूर्लक्षीत आणि राजकीयदृष्टया अस्तित्व नसलेला समाज आहे का?यावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यामुळे माळी समाजाला वेगळी दिशा मिळणार असल्याचे तिखे म्हणाले.सध्या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी समाजामध्ये जो संघर्ष सुरु आहे त्यामध्ये माळी समाजाची नेमकी भूमिका काय असेल,यावर देखील मंथन होणार असल्याची माहिती तिखे यांनी दिली.
या परिषदेचे मुख्य संयोजक कैलास महाजन राहणार असून गजेंद्र महाजन हे व्यवस्था प्रमुख असतील.याशिवाय मुंबई व कोकण विभागासाठी वनिता लोंढे,पूर्व विदर्भ विभागासाठी डॉ.नामदेवराव कोकोडे,मराठवाडा विभागासाठी संतोष जमदाडे,पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी दिपक अण्णा जगताप,उत्तर महाराष्ट्र विभागासाठी बापूसाहेब खलाणे व प्रा.डॉ.प्रमोद तांबे तर पश्चिम विदर्भ विभागासाठी प्रा.नानासाहेब कांडलकर यांची सह-संयोजक पदासाठी नेमणूक करण्यात अाली असल्याचे त्यांनी सांगितले.या परिषदेच्या माध्यमातून माळी समाज आपली राजकीय दिशा निश्चित करणार असल्याने ही परिषद विशेष महत्वाची असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
याप्रसंगी,कोणत्या समाजाची संख्या १६ टक्के असून त्यांना ३५ जागा मिळाल्या?असा प्रश्न केला असता मराठा समाजाचा उल्लेख त्यांनी केला.मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनात माळी महासंघ हे ओबीसी आंदोलनकर्त्यांना पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले.यात जालना वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके तसेच पुण्यात ससाणे यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठींबा जाहीर केला.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नाही मात्र,ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
वडीगोद्री जवळ धुळे-सोलापूर महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला तसेच टायरची जाळपोळ केली,या विरोधात जालन्यात १० गाेंदी पोलिस ठाण्यात ५ तर अंबड पोलिस ठाण्यात ५ ते ७ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. प्रवाश्यांना गृहीत धरुन तासनतास महामार्ग रोखून धरने या कृत्याचे माळी महासंघ समर्थन करतो का? यावर बोलताना,आपल्या आंदोलनाचा सामान्य जनतेला त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे मात्र,आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असे आंदोलन गरजेचे आहे,असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लोकसभे पाठोपाठ राज्यसभेचे देखील तिकीट देण्यात आले नाही,याकडे लक्ष वेधले असता,याबद्दल भुजबळ यांनी त्यांचे वक्तव्य माध्यमांसमोर मांडले असल्याचे तिखे म्हणाले.
काटोल मधून माळी महासंघाचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे विधानसभेची निवडणूक लढणार आहेत का?यावर बोलताना,काटोलमध्ये अविनाश ठाकरे यांनी विस्तारक म्हणून चांगली कामगिरी केली असून बूथपर्यंत त्यांनी कामे केले असल्याचे तिखे यांनी सांगितले.काटोलसाठी अविनाश ठाकरे हेच माळी समाजाचे उमेदवार राहणार असून विजयी देखील होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले.काटोलमध्ये ३९ हजार ९५० एवढी माळी समाजाची मतदारसंख्या असून अनेक लहान-लहान गटांनी अविनाश ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे.त्यामुळे ‘देशमुखांची’ सरहद्दी यंदा संपणार असून ठाकरे यांचा विजय सुनिश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रविंद्र अंबाडकर,विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर,विभागीय कार्याध्यक्ष मुकुंद पोटदुखे,प्रदेश उपाध्यक्ष ज्योती देवधरे,सावता सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलय चोपडे,विभागीय युवा अध्यक्ष राहूल पल्लाडे,महिला शहराध्यक्ष विजया अंबाडकर,महिला शहर उपाध्यक्ष शालिनी पवार,नागपूर शहर अध्यक्ष शंकर चौधरी,उन्मंत वंशीय विकास संस्थेचे सचिव रामदास वाघे,सहकार आघाडीचे अध्यक्ष अशोक आंजरणकर,डॉ.कु-हाळे तसेच श्याम नागफासे आदी उपस्थित होते.
……………………………..
(अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक अरुण तिखे- ९७६७०७२६३७- ९४२२१३५५७०
रविंद्र अंबाडकर- ९४२२१०१७१७)