फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअनुत्तरित अधिकारी चक्क राज्य शासनाच्या सेवेत!

अनुत्तरित अधिकारी चक्क राज्य शासनाच्या सेवेत!

Advertisements


जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी समितीत दोन अपात्र अधिकारी:ॲड.प्रतीक पाटील यांचा गंभीर आरोप

अजब सनदी अधिका-यांचा गजब कारभार!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत झाले पाच वेळा अनुत्तीर्ण: नियमानुसार चार वेळा परिक्षेत बसण्याचा नियम

अपात्र सनदी अधिका-यांच्या वेतनापोटी राज्य शासनावर आर्थिक भुर्दंड

अपात्र सनदी अधिका-यांनी दिलेले जात वैद्यता प्रमाणपत्रही ठरणार अवैद्य!

नागपूर,ता.२५ मे २०२४: राज्यातील काही भ्रष्ट सनदी अधिका-यांच्या संगममताने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये अवैद्यरित्या,संशोधन अधिकारी म्हणून दोन अपात्र अधिकारीनियुक्त असल्याची धक्कादायक माहिती आज नागपूर पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड.प्रतीक पाटील यांनी दिली.याप्रसंगी कागदोपत्री पुराव्याच्या आधारावर त्यांनी काही सनदी अधिका-यांवर गंभीर आरोप केले.

चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम तसेच यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील संशोधन अधिकारी मारोती वाठ यांची नियुक्ती अवैध असल्याचा आरोप याप्रसंगी ॲड.पाटील यांनी केला. त्यांच्या या अवैध नियुक्ती घोटाळ्यात राज्याचे तत्कालीन समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,बार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे या तिन्ही सनदी अधिका-यांच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.कारण,दोन्ही सनदी अधिकारी हे गट ‘अ ‘व ‘ब’ विभागीय परीक्षा नियोजन समितीचेसुद्धा पदाधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्राम व वाठ यांनी विभागीय परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या शासन नियमांना डावलून चक्क पाच वेळा परिक्षा दिल्या व पाचही वेळा हे दोन्ही सनदी अधिकारी अनुत्तीर्ण झाले.असे असुनही या दोन्ही अधिका-यांची सेवा अवैधरित्या अद्यापही घेतली जात आहे.यामुळे या दोन्ही अपात्र सनदी अधिका-यांनी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात जात वैद्यता प्रमाणपत्रे दिल्यास ती प्रमाणपत्रेही अवैध ठरणार असल्याचा दावा याप्रसंगी ॲड.पाटील यांनी केला.

२३ जुलै २०२३ रोजी विभागीय परिक्षेचा निकाल जाहीर झाला.यात परिक्षार्थी पुष्पलता आत्राम ,बैठक क्रमांक डीई ००६,परिक्षेचे वर्ष जुलै २०१५,२०२३ तसेच मारोती गणपतराव वाठ ,बैठक क्र.डीई ००७,परिक्षेचे वर्ष मे २०२३,जुलै २०१५,जुलै २०१४,जुलै २०१३ या सर्व परिक्षांमध्ये हे दोन्ही सनदी अधिकारी अनुत्तीर्ण झाले आहेत.शासननियमानुसार खुल्या वर्गातील परिक्षार्थ्यांना फक्त तीन वेळा तर आरक्षीत वर्गातील विद्यार्थ्यांना चार वेळाच परिक्षेला बसता येतं मात्र, या दोन्ही अधिका-यांनी नियमाला डावलून पाच वेळा परिक्षा दिली,त्यातही ते वारंवार अनुत्तीर्ण झाले तरी देखील काही भ्रष्ट सनदी अधिका-यांच्या संगममताने या दोन्ही अधिका-यांच्या तखत्यात पाच ऐवजी दोन व तीन वेळा परिक्षा दिल्याचा तख्ता तयार करण्यात आला.या बोगस तखत्याखाली दोन सनदी अधिकारी व रजिस्ट्रार यांच्या स्वाक्षरी असल्याचे पुरावे याप्रसंगी ॲड.पाटील यांनी पत्रकारांना दाखवले.

हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक आर्थिक लाभासाठी या सनदी अधिका-यांनी जुन्या संध्या गहाळ करुन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.पुणे येथील समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांनी दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी शासकीय पत्राद्वारे व इतर अधिक- यांच्या टिपण्णीच्या अनुषंगाने या दोन्ही अनुत्तीर्ण व अपात्र असणा-या सनदी अधिका-यांची सेवा समाप्तीची नस्ती कार्यान्वित करण्याकरिता व पुढील वाटचालाकरीता पाऊल उचलले आहे,अशी माहिती ॲड.पाटील यांनी दिली.

(छायाचित्र : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे आयोगाचा शेरा…‘विहीत संधी संपलेल्या आहेत’)

विशेष म्हणजे करोनाकाळात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने विभागीय परिक्षेचे संचालन त्यांच्याच विभागाला करण्याची सुट दिली होती.त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा विभागीय नियोजन समितीद्वारे पार पडली.या नियोजन समितीने भरतीचे सर्व नियम डावलून श्रीमती आत्राम तसेच वाठ यांची सेवा समाप्त न करता नियमबाह्यरित्या तब्बल पाच वेळा परिक्षेत बसण्याची संधी दिली!सर्वसामान्य,शेतक-यांचे पाल्य,गोरगरीब विद्यार्थ्यांना अशी संधी अश्‍या तत्परतेने ही समिती देते का?असा सवाल करीत,नियमबाह्दयरित्या पदाची अडवणूक करणा-या या दोन्ही सनदी अधिका-यांच्या सेवा तात्काळरित्या समाप्त कराव्या,अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.शासनाची फसवणूक करणा-या या दोन्ही सनदी अधिका-यांचा अपराध गंभीर असून आत्राम या येत्या सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश असणारी नस्ती हेतुपुरस्सर काही भ्रष्ट सनदी अधिका-यांकडून प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.इतकंच नव्हे तर वाठ यांना विभागीय परीक्षा नियोजन समिती पुर्नमुल्यांकनात उत्तीर्ण करणार असल्याची चर्चा असल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.यात सत्यता असल्यास याची देखील दक्षता शासनाने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या दोन्ही उमेदवारांकडून स्वाक्षरी करणा-या अधिका-यांनी देवाण-घेवाणचा व्यवहार केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ॲड.पाटील म्हणाले.परिणामी,या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाने एसआयटी गठीत करण्याची मागणी त्यांनी केली.या संपूर्ण प्रकरणात पदाचा गैरवापर करीत अवैध नियुक्तीला पाठबळ देणा-यांनी, शासनाची आर्थिक लुबाडणूक केली असल्याने प्रशांत नारनवरे,सुनील वारे तसेच इंदिरा अस्वार या तिन्ही अधिका-यांची विभागीय चौकशी करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी निवेदनाद्वारे महामहिम राज्यपालांना केली असल्याचे ॲड.पाटील यांनी सांगितले.

……………………………………

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-
ॲड.प्रतीक पाटील- ९९७०६५६५१७)
………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या