

नागपूरकरांचा सवाल:सत्र न्यायालया समोरच नियमांची धज्जीया
सत्र न्यायालयात जामिनासाठी येणा-या लोकांची भर उन्हात भटकंती
पोलिस आयुक्त म्हणाले होते मी नियम मोडले तर माझ्यावरही कारवाई:विना हेल्मेट गडकरींच्या रॅलीत सहभागी होणा-यांवर करणार का कारवाई?नागपूरकरांचा सवाल
नागपूर,ता.२९ मार्च २०२४: कायदे हे सर्वांसाठी समान आहेत मात्र,काही लोकांसाठी ते ‘जास्त समान’ असल्याची म्हण चांगलीच प्रचलित आहे.वास्तव अगदी हेच आहे.ऐन निवडणूकीच्या हंगामात ‘सब चलता है’ही राजकीय नेत्यांची,नोकरशाहीची मनोवृत्ती असली तरी जनता मात्र ,फार सुजाण झाली आहे.२७ तारखेला,उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या भव्य रॅलीसाठी किंबहूना शक्ती प्रदर्शनासाठी आकाशवाणी चौकात अगदी मधोमध भव्य मंच उभारण्याची परवानगी नेमकी कोणी प्रदान केली?याचा शोध नागपूरकरांकडून घेतला जात आहे.
वाहतूक विभागातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विभागातून अशी कोणतीही परवानगी दिली गेली नाही तर नागपूर महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाला तर अशी मंच वगैरे उभारण्याची परवानगी देण्याचा अधिकारच नसल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातून भारतीय जनता पक्षाच्या शक्ती प्रदर्शन रॅलीसाठी अशी परवानगी देण्यात आली असेल तर ती कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली?असा सवाल केला जात आहे.
मार्च एण्डिंगच्या रणरणत्या उन्हात सत्र न्यायालय,तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-यांना वेठीस धरुन ,आकाशवाणी चौक वाहतूक पोलिसांनी कठडे लाऊन अनेक तास अडवून ठेवले होते,महाराज बाग चौक, तर जीपीओ चौकात देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.इतकंच नव्हे तर संविधान चौकात डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यापर्णाचा ‘सोपस्कार’कार्यक्रम असल्याने तिथेही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने गोवारी उड्डाण पूलावरील ट्रॅफिक जाममध्ये वाहनधारकांवर भाजून निघण्याची वेळ आली.
सर्वात जास्त कोंडी झाली ती सत्र न्यायालयाच्या आत जाणा-यांची.बाहेर गावावरुन आपल्या कुटूंबियाच्या जामीनासाठी आलेल्या दोन गृहस्थांवर तिथल्या तिथे अनेकदा प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली तर वकील वर्गाला देखील सत्ताधा-यांचा हा राजकीय इव्हेेंट फार भारी पडला होता.मूळात रस्त्याच्या मधोमध सर्वस्वी राजकीय भाषणबाजीसाठी नागरिकांना असे वेठीस धरले जाऊ शकते का?सामान्य माणसाला व्यवस्थेच्या नावाखाली फक्त हाल अपेष्टा सहन करने माहिती आहे मात्र,सत्र न्यायालयात येणा-या अनेक न्यायाधीशांना नियमांच्या सर्रास झालेल्या पायमल्लीची दखल का घ्यावीशी वाटली नाही?
ऐन सकाळच्या वेळी कामावार जाणा-या नोकरदार वर्गासह सर्वसामान्य वाहनधारकांना कमालीचा ‘ताप’दोन्ही बाजूंनी सहन करावा लागला.वरुन सूर्यनारायण कोपत होता तर खाली पांढरेवस्त्रधारी वाहतूक पोलिसांनी बेरिकेट्स लाऊन वाहनधारकांची अडवणूक करुन ठेवली होती.ते ही मध्य दूपारपर्यंत!वॉकीटॉकीवर संदेश दिले जात होते…कशाला सोडले आत अमूक दुचाकीधारकाला?उत्तर मिळाले ’न्यायालयात जायचे आहे असे कारण सांगितल्याने आत सोडले‘यावर पुन्हा वरिष्ठ वाहतूक पोलिस भडकले आणि ’कोणालाही जिल्हाकिधारी कार्यालयाच्या रस्त्यावर सोडू नका,हा आदेश म्हणजे आदेश आहे,कारणे सांगू नका!’लाचार चेहरा उतरवून अनेकांनी जीपीओ चौकातून वळसा घालून सत्र न्यायालयाच्या आत जाण्याचा मार्ग पत्करला मात्र,तिथे ही दोन मुख्य फाटक चक्क बंद करण्यात आली होती!
राजकीय रॅलीला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही मात्र,संविधान चौकातच एखादा मंच उभारुन राजकीय भाषणबाजी उरकता आली असती मात्र,असे घडले नाही.आकाशवाणी समोर मधोमध भव्य मंच उभारुन भाषणबाजी करण्यात आली. जोपर्यंत सामान्य नागपूरकर भर उन्हात वेठीस धरला जात नाही ताेपर्यंत राजकीय नेत्यांचे शक्ती प्रदर्शन अर्थपूर्ण होत नाही,अशी टिका केली जात आहे.
रॅलीत उपमुख्यमंत्री उपस्थित होते.रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नामांकन भरण्यासाठी उमेदवारासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपस्थित राहणार होते,अति महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाही कळतो,यासाठी थोडा वेळ वाहतूक बंदीही तो सहन करेल मात्र,राजकीय भाषणबाजीसाठी एवढी रहदारी असणा-या रस्त्यावरच चक्क मंच उभारुन,रणरणत्या उन्हात मध्य दूपारपर्यंत वाहतूक अडवून राजकीय नेत्यांना,जिल्हाधिकारी कार्यालयाला व मनपा आयुक्तांना काय संदेश द्यायचा होता?भाषणासाठी सेंट उर्सूला शाळेचे मैदान नसते का देता आले?वाहतूक अडवून ठेवणे हे कोणत्या नियमात बसत होते?

२७ तारखेला भर उन्हात राजकीय प्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेला झालेला त्रास,झालेले अतोनात हाल,यावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात तिखट प्रतिक्रिया उमटल्या.आपाल्या कामाने घराबाहेर पडणारा नागपूरकर नागरिक याला कोणता राजकीय पक्ष,कोणता उमेदवार,राजकीय स्टंटबाजी,राजकीय भाषणे,शक्ती प्रदर्शन इत्यादी बाबींशी काडीमात्र घेणे देणे नसते.’लोकशाहीचा उत्सव’ वगैरे जुमले ठिक आहे मात्र,लोकशाहीच्या या उत्सवात तोच जर रणरणत्या उन्हात शासकीय अधिका-यांकडून व राजकीय नेत्यांकडून नागवला जात असेल तर या उत्सवाविषयी त्याच्या मनात शिवाय चीड निर्माण होण्याचे इतर कोणती भावना उमटणार?
याच दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला.त्यांच्यासाठी देखील सेंट उर्सूला शाळेसमोरील भर रस्त्यातच सभा घेण्यात आली!वाहतूक पोलिसांनी त्यामुळे देखील आकाशवाणी चौकाकडून व्हीसीए कडे जाणारा मार्ग अनेक तास रोखून ठेवला.ही सभा या शाळेच्या मैदानात देखील पार पडू शकली असती मात्र,‘हम किसी से कम नही’हे दाखविण्याच्या नादात, आपल्या अश्या नियोजनशून्य आयोजनामूळे नागपूरातील सर्वसामान्य वाहनधारक वेठीस धरला जात आहे,ते ही भर उन्हात,याचा विचार ही करण्याची तसदी हे लोकशाहीचे ठेकेदार,लोकशाहीत सर्वात महत्वाचा असणारा घटक म्हणजे सर्वसामान्य माणूस,त्याच्यासाठी घेण्यास धजावत नसल्याचे चित्र उमटले.

२६ तारखेला नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला.त्यांनी देखील संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली.मात्र,भाषणबाजीसाठी कोणताही मंच उभारण्यात आला नव्हता.वाहतूक कोंडी करण्यात आली नव्हती.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना बाहेर येऊन त्यांनी बाईट दिला आणि हीच पद्धत लोकशाहीत अपेक्षीत आहे.
सर्वसामान्य वाहनचालकांना रणरणत्या उन्हात तासनतास वेठीस धरुन आपली राजकीय पोळी शेकण्याची काही नेत्यांची‘लोकशाहीची’ ही पद्धत त्यामुळेच हजारो नागपूरकरांना रुचली नाही आणि समाज माध्यमात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून पडल्या.त्यामुळे ‘अब की बार’हा अति सर्वसामान्य माणूस बटन दाबताना‘मेरा वार’म्हणत कोणावर ‘वार’ करेल याचा अंदाज भल्याभल्यांनाही येणार नाही.

काय केला होता आदेश निगर्मित जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी?
आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरवणूका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश ६ जूनपर्यंत अंमलात राहणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणुक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ६ जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
झाले का तंतोतं पालन या आदेशांचे?उमेदवारासह फक्त चारच लोक आत जाण्याची अट पाळली जात असताना ‘काही जास्त समान’लोकांना ‘असमान’वागणूक का मिळाली?काही जास्त समान,उमेदवारी अर्ज भरताना परिसरात किती ‘शे ’लोकांची उपस्थिती होती?
पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल करतील का कारवाई?
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी नागपूरात रुजू होताच पत्रकारांशी संवाद साधताना दिलखुलासपणे अनेक प्रश्नांना उत्तरे दिली होती.कायदे पालनाच्या संदर्भात मी कठोर असल्याचेही ते म्हणाले.माझ्या अंगावर वर्दी असली तरी, मी जर कायद्या विरोधी कृत्य केले तर माझ्यावर देखील कारवाई ही झाली पाहिजे,नियम सर्वांना सारखे आहेत,हे त्यांचे शब्द होते.मग,गडकरी यांच्या राजकीय रॅलीच्या निमित्ताने राम झूल्यापासून तर शहर भरातून विना हेल्मेट शेकडो दूचाकीधारक रॅलीत सहभागी झाले होते.कायदा सर्वांना समान आहे, तर माननीय पोलिस आयुक्त करणार का या शेकडो दूचाकीधारकांवर कारवाई?सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या शेकडो व्हिडीयोजमध्ये स्पष्टपणे दुचाकींचा क्रमांक दिसत आहे,फाडणार का त्यांच्या नावे चालान?एखादा सर्वसामान्य दुचाकी चालक विना हेल्मेट दिसताच एक नव्हे तर तीन-तीन वाहतूक पोलिस, अट्टल गुन्हेगार सापडावा,अश्या अर्हिभावात दूचाकीचालकावर झपट्टा मारुन त्याला अडवतात,मग २७ तारखेला सकाळ ते मध्य दूपार नागपूरातील शेकडो दुचाकी धारकांना हेल्मेट वापरा पासून वाहतूक पोलिसांकडून विशेष ‘सूट’देण्यात आली होती का?असा प्रश्न विचारला जात आहे.
नियम सर्वांना सारखे,असे जर नागपूरचे पाेलिस आयुक्त मानतात आणि सांगतात तर, २७ तारखे रोजी सर्रास वाहतूक नियम मोडणा-या व नागपूरच्या रस्त्यांवर धूमाकूळ घालणा-या,राजकीय आनंदात मस्तवाल झालेल्यांना वाहतूक नियमा अन्वये चालान पाठवले जातील का?या कडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.‘बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले’असे संत तुकोबाराया सांगून गेलेत,नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी संतांची ही उक्ती सार्थक ठरवावी,असे आवाहन त्यांना केले जात आहे.
…………………………………………………………..
(तळटिप-संबंधित सर्व व्हिडीयोज www.sattadheesh.com च्या यूट्यूब पेज वर उपलब्ध)




आमचे चॅनल subscribe करा
